प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

ख्रिस्ती व हिंदु :- लंकेतील तामिळ लोकांच्या जातिभेदाचें वर्ण करतांना एका गोष्टीचा उल्लेख मुख्यत्वेंकरून केला पाहिजे. ती गोष्ट म्हटली म्हणजे, हिंदु आणि ख्रिस्ती यांची लग्नें होत. तेथें एखादा वेल्लाल हिंदु असला तर त्यास वेल्लाल जातीची ख्रिस्ती मुलगी करण्यास हरकत वाटत नाहीं. तो वेल्लाल जातीची ख्रिस्ती मुलगी करील; पण दुसर्‍या जातीची हिंदु मुलगी करणार नाहीं. ख्रिस्ती संप्रदायाच्या लोकांची हीच गोष्ट आहे. ते आपली मुलगी स्वजातीय हिंदूस देतील; तथापि दुसर्‍या जातीच्या ख्रिस्त्यास देणार नाहींत. तेथें ख्रिस्ती मनुष्यास हिंदु होणें देखील सोपें आहे, असें एका ख्रिस्ती वकिलानें डॉ. केतकर यांस सांगितलें. कपाळास भस्म लावून एखादा मनुष्य हिंडूं लागला म्हणजे तो ख्रिस्ती नसून हिंदु झाला आहे असें लोक समजावयास लागतात !

सिलोनमध्यें ख्रिस्त्याचा विटाळ हिंदु तामिळास होत नाहीं हें सांगावयास नकोच.

हिंदू व ख्रिस्ती या लोकांनीं लग्न करतांना परमार्थसाधन आणि उपास्य यांच्याकडे लक्ष न देतां जातीकडे लक्ष द्यावें ही गोष्ट प्रथमदर्शनीं विस्मायक वाटेल. पण विचार केला असतां यांत आश्चर्य मानण्यासारखें कांही नाहीं. गुजराथी वाण्यांमध्यें पन्नास भेद उर्फ जाती आहेत. प्रत्येक जातींतले कांहीं लोक वैष्णवसंप्रदायी आहेत आणि कांही जैन आहेत. दोघेहि एकमेकांशी लग्नें करितात. लग्न झाल्यानंतर बायको नवर्‍याचें उपास्य स्वीकारते.

जैन आणि वैष्णव या दोघांसहि हिंदूंचें धर्मशास्त्र लागू पडते. पंजाबमध्यें शीख आणि सनातनी (श्रुतिस्मृतींस पूज्य मानणारे हिंदू) लग्नव्यवहार करितात. एखादा शीख जर आरोरा जातीचा असला तर तो आरोरा जातीच्या शीख नसलेल्या लोकांशीं विवाहसंबंध करील; पण त्यास आपली मुलगी जाठ जातीच्या शिखास देण्याचें जिवावर येईल. लग्नव्यवहारांत कोणच्या गोष्टीकडे लक्ष द्यावें या प्रश्नासंबंधानें महाराष्ट्रीयांमध्येंच प्रकार किती आहेत पहा. कोंकणस्थांत ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यांची लग्ने होतात. वेदशाखेनुसार देशस्थांत जाती आहेत. पण त्या इतरत्र नाहींत. उपास्य आणि परमार्थसाधन यांस लग्नव्यवहारांत महत्त्व किती द्यावायांचे हा प्रश्न सादृश्यावर अवलंबून आहे असें दिसतें. ख्रिस्ती लोक ही आपल्याकडे निराळी जात झाली आहे. "ख्रैस्त्य" {kosh “Christianity” या शब्दाचें रूपांतर "ख्रिस्ती धर्म" असें करणें बरोबर नाहीं. "ख्रिस्ती जात" असें करणेंहि बरोबर नाहीं.  जाति, धर्म हे विवक्षित अर्थाचे शब्द आहेत. Christianity ही निरनिराळ्या परिस्थितींत निरनिराळीं स्वरूपें धारण करिते, त्यासाठीं कोणत्याहि स्वरूपबोधक नामाशीं ख्रिस्ती हें विशेषण लावून ख्रैस्ताची स्वरूपव्यंजना करणें योग्य होणार नाहीं. ख्रिश्चानिटी हा जितका अस्पष्टार्थ शब्द आहे, तितकाच अस्पष्टार्थ शब्द तिच्या रूपांतरासाठीं वापरला पाहिजे.}*{/kosh} हें आपल्या देशांत केवळ परमार्थसाधन नाहीं तर तें भिन्न आचारविचारांचें संस्थापक आणि नवीन जात तयार करणारें करण आहे; पण सिंहलद्वीपांत तसें नाहीं. आपल्याकडे आपण थिआसफिस्टास जातीबाहेर कोठें काढतों ? लोकांची रीत बिघडविण्याच्या व बाह्यांस देव मानावयास लोकांना शिकविण्याच्या कामीं हें अर्वाचीन पाखंड ख्रिस्ती संप्रदायापेक्षां कमी नाहीं. {kosh आंग्लोसाक्सन ही जात सर्व जातींपेक्षां सर्व दृष्टींनीं उच्च प्रतीची आहे हें तत्त्व मॅडम ब्लाव्हाटस्की नावांच्या एका बाईनें "थिआसफिस्टां"स पढविलें आहे. "आकल्ट साइट" उर्फ अतींद्रिय दृष्टी सध्यां गोर्‍या कातडीच्या तिघां प्राण्यांशिवाय इतरांस साध्य झाली नाहीं, ही गोष्ट देखील मनोरंजक आहे.}*{/kosh}  जानवें टाकून द्यावें म्हणून गप्पा मारणार्‍या, तथापि जानवें न टाकून देणार्‍या प्रार्थनासमाजिस्टांस आपण कोठें जातीबाहेर काढतों ? मिल्लमतानुयायी अगर स्पेन्सरमतानुयायी कोणी झाला तरी त्याला जातीबाहेर कोणी काढीत नाहींत; तथापि जर कोणी ख्रिस्ती झाला तर मात्र आपण त्यास बाह्य लेखितों. याचें मुख्य कारण, ख्रिस्ती झालेले आपले लोक आपल्या दृष्टीनें जें अयोग्य आचरण आहे तें करितात आणि परकीय समाजांत प्रवेश करितात हें होय.

सिंहलद्वीपांतील सर्व हिंदू निवृत्तमांस नाहींत आणि सर्वच ख्रिस्ती मांसाहारी नाहींत; शिवाय परजातीबरोबर ते लग्नव्यवहार करीत नाहींत. आणि तेथील सरकाराची वृत्ति ख्रिस्त्यांस अधिक चांगल्या तर्‍हेनें वागवावयाचें आणि हिंदूंस कमी चांगल्या तर्‍हेनें वागवावयाचे अशा प्रकारची नाहीं. त्यामुळें ख्रैस्त्य पत्करणार्‍या लोकांस हिंदूंपासून तुटून राहण्यांत फायदा दिसत नाहीं.

जैन लोकांस हिंदूंचेंच धर्मशास्त्र कायद्याच्या दृष्टीनें लागू पडतें. सिलोन तामिळ-ख्रिस्ती लोकांस तामिळ हिंदूंचांच धर्मशास्त्रीय कायदा लागू पडतो. उदाहरणार्थ, हिंदूंच्या लग्नांतील मुख्य भाग नवर्‍यानें मंगळसूत्र बांधणें हा धरला आहे; आणि इतर भाग कमी महत्त्वाचे धरले आहेत. ख्रिस्ती झालेल्या तामिळांत देखील मंगळसूत्राचें महत्त्व आहेच. (कोचीन येथील गोर्‍या ज्यू लोकांच्या लग्नास देखील मंगळसूत्र हें लागतेंच !) सिंहलद्वीपांतील कायद्याविषयीं विशेष विवेचन पुढें येईलच. जातिभेदाशीं संबंध असलेल्या एकदोन गोष्टींसंबंधानें येथें लिहातों.

"थेसावलामै" उर्फ जाफना येथील कायद्यांत असें लिहिलें आहे की :—

"रीतीप्रमाणें जर कोणी पुरुषानें उच्च अगर हलक्या जातीचा मुलगा दत्तक घेतला तर त्या मुलास बापाची मालमत्ता मिळते एवढेंच नव्हे, तर तो मुलगा बापाच्या जातीचा होतो. तथापि एखाद्या बाईनें जर मूल दत्तक घेतलें, तर त्या मुलास त्या बाईची मालमत्ता मिळेल एवढेंच. तें मूल दत्तक घेणार्‍या बाईच्या जातीचें नाहीं, तर तें आपल्या जन्मदात्या बापाच्याच जातींत रहातें."

जर एखाद्या मनुष्यानें अन्य जातीच्या मुलीस दत्तक घेतलें, तर ती दत्तक घेणार्‍या मनुष्याच्या जातींत प्रवेश करिते. तथापि तिच्या मुलांची आणि तिच्या (दत्तक) बापाची जात एक होत नाहीं. तिच्या मुलांची जात तिच्या नवर्‍याच्या जातीप्रमाणें ठरते. ("थेसावलामै" भाग दुसरा, कलम ७ वें).

जे तामिळ लोक "थेसावलामै" कायद्यास अनुसरतात त्यांपैकीं कोणा स्त्रीनें परजातीच्या पुरुषाबरोबर लग्न केलें तर ती लग्नानंतर, जोपर्यंत तें लग्न कायम आहे तोंपर्यंत म्हणजे ती दुसरे लग्न करीपर्यंत, नवर्‍याच्याच जातीची आहे असें कायद्याच्या दृष्टीनें समजलें जाईल. "वैवाहिक हक्क आणि वारसा या संबंधाचा कायदा (१८७६)."

तामिळ समाजाचें निरीक्षण करतां भिन्नत्वदर्शक गोष्टी यांपेक्षां अधिक दिसत नाहींत.

सिंहली लोकांतील जातिभेद आणि एकंदर समाजस्थिति समजण्यासाठीं त्यांच्या संस्कृतीच्या स्वरूपाचें आणि कायद्याचें ज्ञान पाहिजे आणि समाजस्वरूपाचा प्रचलित राजशासनस्वरूपी कायद्याशीं असलेला संबंध लक्षांत घेतला पाहिजे.