प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

कायदे व न्यायपद्धति :— आतां ब्रह्मी लोकांच्या राज्य व्यवस्थेंतील शेवटल्या म्हणजे कायदेरचना व न्यायपद्धति या गोष्टींची माहिती द्यावयाची. ब्रह्मी लोकांचें कित्येक कायदेग्रंथ असून त्यांचीं नांवें मनु, नंदन व धम्मवलिय इत्यादि आहेत. पहिल्या नांवावरून असा अर्थ होतो कीं, तो ग्रंथ मानवधर्मशास्त्राच्या आधारें झालेला आहे; व हा अर्थच बरोबर आहे. या ग्रंथाला धर्मशास्त्र असें म्हणतात व हल्लीं चालू असलेल्या अत्यंत जुन्या हिंदुधर्मशास्त्रांचें हें विवरण आहे. ब्रह्मी लोकांच्या न्यायपद्धतींत चांगल्या म्हणण्यासारख्या अशा गोष्टी फारच थोड्या आहेत. कायद्याप्रमाणें न्यायनिवाडा देणें ही गोष्ट राज्यकारभारांतील इतर गोष्टींपासून अलिप्‍त ठेविलेली नसते. बहुतेक न्यायाधीश लांचखाऊ असतात, त्यामुळें दाव्यांत जो कोणी अधिक पैसा देईल त्याच्या बाजूचा निकाल होतो. यांत शेने नांवाच्या जातींतल्या न्यायाधिशांचा कायद्यांचा अभ्यास चांगला असून ते मोठे सन्मान्य असतात व ते इतर न्यायाधिशांइतके लांचखाऊ नाहींत. प्रथम साक्षीदारांनां ठरलेल्या पद्धतीप्रमाणें शपथ देतात. अगदीं महत्त्वाच्या खटल्यांत कबुलीजबाब मिळविण्याकरतां त्यांचा छळहि करतात. सर्व उपाय योजूनहि खरे काय तें बाहेर न येईल तर ईश्वरी न्याययोजनाहि शेवटीं करतात. या न्यायाचा प्रकार असा :  फिर्यादी व आरोपी यांनां आपल्या बोटांचीं टोकें कढत शिश्यावर किंवा जस्तावर ठेवण्यास लावतात. त्यानंतर तीन दिवसांनी त्या बोटांनां टांचण्यांनीं टोंचतात, आणि ज्याच्या जखमेंतून रक्त निघेल त्याला निर्दोषी समजतात आणि ज्याच्या जखमेंतून कांहीं रक्तेतर द्रव्य निघेल तो गुन्हेगार असें ठरवितात.

तुरुंग असतात ते अगदीं गैरसोयीचे व तसेच धोक्याचे असतात. कैदी लोकांनां पहारेकरी लोक फार कडक रीतीनें वागवतात. या पहारेकर्‍यांनां सरकारकडून पगार मिळत नसतो; तर कैद्यांनांच तो द्यावा लागतो; आणि त्यांनां लागणार्‍या अनेक प्रकारच्या वस्तूंचा त्यांनां लागेल तेवढा पुरवठा कैद्यांनीं केला नाहीं तर त्याबद्दल सूड उगवण्याच्या बुद्धीनें ते कैद्यांचे फारच हाल करतात. ब्रह्मी कायद्याप्रमाणें ज्या शिक्षा सांगतात त्याहि फार कठिण व क्रूरपणाच्या असतात. अगदीं सौम्य शिक्षा म्हटल्या म्हणजे दंड, कैद, व फटके. त्याशिवाय अंगविच्छेद करणें, देवळांमध्यें आजन्म चाकरी करण्यास लावणें या शिक्षा देतात. सर्वांत कडक शिक्षा म्हणजे मरणाची, आणि निरनिराळ्या गुन्ह्यांच्या प्रकारानुसार ही मरणाची शिक्षा निरनिराळ्या प्रकारची असते. शिरच्छेद करणें हा अगदीं नेहमींचा प्रकार; पण यापेक्षां क्रूर प्रकार म्हणजे माणसाला जिवंत पुरणें, किंवा पाण्यांत बुडविणें, किंवा अरण्यांत हिंस्त्रपशूच्या भक्ष्यस्थानीं पडेल अशा ठिकाणीं हांकलून देणें. मरणाच्या शिक्षेचा वारंवार अम्मल केल्याचें ब्रह्मी राज्यांतील उदाहरण म्हणजे रंगून शहरांतलें आहे. त्या ठिकाणचा म्योवन अथवा सुभेदार हा दरसाल २५ ते ३० पर्यंत इसम फांशी देत असे.