प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

आराकानी :— आराकानमधील लोकांनीं आपली ऐतिहासिक परंपरा मागें इ.पू. २६६६ सालपर्यंत नेऊन पोंचविली असून आपल्या देशांतील २२७ स्वकीय राजांची सारखी ओळीनें वंशावळी तयार केलेली ते दाखवूं शकतात. शिवाय त्यांचें असेंहि म्हणणें आहे कीं, एकेकाळीं त्यांचें साम्राज्य बरेंच विस्तृत होतें, व आवाप्रांत, चीनचा कांहीं भाग व बंगालचा कांहीं प्रदेश इतक्या दूरवर त्यांची सत्ता पसरलेली होती. निरनिराळ्या काळीं मोंगल लोकांनीं व पेगूमधील लोकांनीं आराकानांतील अगदीं मध्यप्रदेशापर्यंत शिरून हल्ले केलेले आहेत. आशियाखंडांत पोर्तुगीज लोकांचें प्राबल्य होतें त्याकाळीं त्यांनींहि आराकानमध्यें आपलें तात्पुरतें ठाणें बसविलें होतें. १७८२ मध्यें तो प्रांत शेवटीं ब्रह्मी लोकांनीं जिंकून घेतला, आणि तेव्हांपासून १८२६ मध्यें येंदाबूच्या तहाअन्वयें तो प्रांत ब्रिटिशांनां मिळाला त्यावेळेपर्यंतचा आराकानचा इतिहास ब्रह्मदेशाच्या इतिहासांत मोडतो. आराकान हें प्राचीन शहर पूर्वीं त्या प्रांताची राजधानी होतें. तें कोलाडेंग नदीच्या एका लहान फांट्यावर वसलेलें आहे. परंतु त्या देशांतील लहानमोठ्या बंदरांपासून तें फार दूर असल्यामुळें आणि तेथील हवाहि अत्यंत रोगट असल्यामुळें अलीकडे अक्याब येथें वस्ती वाढत गेली व त्याबरोबर आराकान हळू हळू मोडकळीस आलें; आणि सध्यां तर अक्याब हेंच त्या प्रांताचें मुख्य शहर झालेलें आहे. जुनें शहर (हल्लीचें म्योहाँग) हें अक्याबच्या ईशान्येस ५० मैलांवर आहे. या प्रांतांत बहुतेक सर्व वस्ती माघ लोकांची असून ते बौद्ध आहे, व तोच संप्रदाय ब्रह्मदेशांतहि सर्वत्र पसरलेला आहे. भिक्षूंची निवड सर्व वर्गांच्या लोकांमधून करण्यांत येते, व त्यांचें मुख्य काम म्हणजे मुलांनां शिक्षण देणें हें होय. त्यामुळें तेथें शिक्षणाचा प्रसार पुष्कळ झालेला असून एकंदर प्रांतांत अगदीं लिहितांवाचतांसुद्धां येत नाहीं असें लोक थोडे आहेत. भिक्षु बनावयास लायकी लागते ती सदाचरण व साधारण शिक्षण या दोन गोष्टींची. भिक्षूचे ठिकाणीं सदाचरण म्हणजे बौद्धधर्माच्या नियमांप्रमाणें चांगली ठरलेली वागणूक असावी लागते, आणि त्याचें शिक्षण तेथील पंडिताकडून मानमान्यता मिळेत इतकें असावें लागते.

आराकानी लोक मूळ ब्रह्मी लोकांचेच वंशज आहेत; परंतु मध्यें आराकान योम पर्वतांच्या रांगा असल्यामुळें ते आपल्या मूळ लोकांपासून निराळे झालेले आहेत, व त्यामुळें त्यांची भाषा  व चालीरीती याहि अगदीं निराळ्या बनल्या आहेत. जरी त्यांनां ब्रह्मी लोकांनीं  जिंकलें होतें तरीसुद्धां ते जेत्या ब्रह्मी लोकांपासून अगदीं निराळेच राहिलेले आहेत.

आतां प्रत्यक्ष ब्रह्मी लोकांकडे वळूं. त्यांचा विस्तृत इतिहास येथें देतां येत नाहीं तथापि त्यांच्या नेतृत्वाखालीं सर्व देश असतां देशाची स्थिति कशी काय होती हें लक्षांत घेतलें पाहिजे.

ब्रह्मदेश इंग्रजांच्या हातीं येऊन हिंदुस्थानास जोडला जाण्यापूर्वीं ब्रह्मदेशामध्यें जी राज्यपद्धति प्रचलित होती त्या पद्धतीचें वर्णन जॉन क्राफर्ड याच्या "आवा येथील वकिलातीची हकीकत" (१८२७) या लेखावरून लासेन यानें दिलें आहे. त्याचाच येथें अनुवाद केला आहे.