प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
गद्यवाङ्मय :— सिंहली वाङ्मयांतील या पहिल्या बहारच्या काळांतील गद्यग्रंथांमध्यें पहिला ग्रंथ सद्धर्मरत्नाकरय अथवा सारसंग्रह या नांवाचा बौद्धधर्माबद्दलचा असून तो ६ वा पराक्रमबाहु याच्या कारकीर्दींत (१४१०-१४६२) लिहिलेला आहे. याच वेळचे तीन एळु-शब्दकोश पिदुम्मल, रुवनमल आणि नामावलिय असे आहेत. या शेवटल्या शब्दकोशाला त्याच्यानंतरच्या नव-नामावलिय यापासून निराळा दाखविण्याकरतां पुराणनामावलिय असें म्हणतात. रुवनमल हा शब्दकोश ६ वा पराक्रमबाहु या राजानें स्वतः केला असें म्हणतात; आणि नामावलिय हा त्या राजाचा प्रधान नल्लूरुलुमय यानें लिहिला असा समज आहे. नल्लूरुलूमय हा राजकन्या उलकुद हिचा पति असून त्याचें नांव त्या काळांतील काव्यग्रंथांमध्यें पुष्कळ वेळां आलेलें आहे. शेवटी व्याकरणग्रंथांपैकीं मोग्गल्लायन-पञ्चिका-प्रदिपय याबद्दल कांहीं सांगितलें पाहिजे. मोग्गल्लायन हा पाली-व्याकरणाचा कर्ता असून त्यांतील पद्धत कच्चयनाच्या पद्धतीहून भिन्न आहे. तो १२ व्या शतकाच्या उत्तरार्धांत होऊन गेला अशी समजूत आहे. त्यानें मोग्गल्लायनवुत्ति अथवा मोग्गल्लायन-व्याकरण या नांवाच्या आपल्या व्याकरणग्रंथाला पारिभाषिक शब्दांचा कोश जोडलेला आहे. वर दिलेला ग्रंथ कांही पालीभाषेंत व कांहीं सिंहलीभाषेंत लिहिलेला आहे; व तो मोग्गल्लायनाच्या व्याकरणावरील टीकाग्रंथ असून पालीभाषेवरील अत्यंत विद्वत्तापूर्ण व साग्रग्रंथांमध्यें त्याची गणना आहे.
यांशिवाय आणखी बुतसरणय आणि दहम् सरणय असे दोन ग्रंथ आहेत; त्यांपैकीं पहिल्याच्या नांवावरून तो बुद्धासंबंधाचा ग्रंथ असावा व दुसर्याच्या नांवावरून तो त्याच्या धर्माबद्दलचा ग्रंथ असावा असें दिसतें; पण यापलीकडे त्यांची अधिक कांही माहिती मिळालेली नाहीं.
१६ व्या शतकाच्या अखेरची सिंहली वाङ्मयासंबंधानें फार महत्त्वाची गोष्ट अशीं कीं, पहिला राजसीह हा राजा ब्राह्मणधर्माकडे वळला व त्यानें बुद्धधर्म व त्याचे अनुयायी यांचा छळ केला. त्याला जेवढे बौद्ध ग्रंथ सांपडले तेवढे सर्व त्यानें जाळून टाकले; यामुळें पूर्वींच्या काळांतील पुष्कळ ग्रंथ नाहींसे झाले असें म्हणतात तें बहुधा खरें असावें.
तथापि या वाईट काळानंतर १७ व्या शतकाच्या आरंभीं बुद्धधर्माची पुनर्जागृति होऊन तेथील वाङ्मयाला दुसरा बहार आला; या बहारांतील अलगियवन्न मोहोट्टाल अथवा मुकवेहि या नांवाचा कवि विशेष महत्त्वाचा आहे. त्याचा मुख्य ग्रंथ कुसजातक हा असून तो याच नांवाच्या जातकग्रंथाचें पद्यात्मक रूपांतर आहे; व त्यांत बोधिसत्त्वानें कुसराजाचा जन्म घेतला होता त्या जन्माची हकीकत आहे. कुसजातकाची भाषा सुंदर आहे, लेखनपद्धति कुशल कारागिरीची असून फारशी कृत्रिम भासत नाहीं. याचा तोटगमुवाशीं निकट संबंध असला पाहिजे असें वाटतें. त्या काव्याच्या शेवटल्या कवितेंत १५३२ शक म्हणजे इ.सन १६१० हें ग्रंथसमाप्तीचें साल म्हणून दिलेलें आहे. त्यांतील प्रस्तावनेवरून असें दिसतें कीं, तो राजसीह राजाचा प्रधान अत्तनयक याची बायको मानिक् असमी हिच्या सांगण्यावरून लिहिला गेला. त्यांत आंरभी सावात (श्रावस्ती) नगरीचें वर्णन दिलेलें आहे.
सुभाषित काव्य नांवाचा एक दृष्टांतकथांचा व पद्यात्मक वचनांचा संग्रह असून तो मोहोट्टाल यानें केलेला आहे. सावुलसंदेशय अथवा कुक्कुटदूत हें काव्य व दुसरे अनेक आपणांस दुर्मिळ असलेले ग्रंथ त्यानेंच केलेले आहेत असें म्हणतात. दहमसोंड-जातक हे जातक-नीतिसारय याचें पद्यात्मक रूपांतर असून त्यांत नीतिवचनांचा संग्रह आहे; मुनिगुणरत्नमालय यांत बुद्धाच्या गुणांची स्तुति आहे; आणि दुस्सीलवत यांत बुद्धभिक्षूंच्या दुर्वर्तनाचें वर्णन आहे.
परंगि-हटन आणि महा-हटन हे ग्रंथ मोहोट्टालनें केले असें कांहीजण मानतात, परंतु ते त्यानें लिहिलेले खास नाहींत. त्यांपैकीं परंगिहटन यांत २ रा राचसीह राजा यानें पोर्तुगीज लोकांबरोबर केलेल्या युद्धांत मिळविलेल्या विजयांचे पद्यांत वर्णन केलेलें आहे; आणि महाहटन या ग्रंथांत डच व सिंहली यांच्यामध्यें झालेल्या लढायांचें वर्णन आहे. यांशिवाय १७ व्या शतकाच्या आरंभीं लिहिलेलें कोस्तंतीनुहटन हें तिसरें युद्ध-विषयक गाण्यांचें पुस्तक आहे. याचा कर्ता कोणी नेटिव्ह ख्रिस्ती इसम असावा असें प्रास्ताविक कवितांमध्यें इतर काव्यांप्रमाणें बुद्धाची प्रार्थना नसून ख्रिस्ताची प्रार्थना आहे यावरून दिसतें. पोर्तुगीज सेनापति कान्स्टंटिनो ड सा यानें बंडखोर मयदुन्न याच्यावर स्वारी करून त्याला लेल्लोपिलिय येथें ठार मारलें, या प्रकारचें या काव्यांत वर्णन आहे. यांतील भाषासरणी सुंदर आहे. या सरणीच्या स्वरूपावरुन या कवीनें मोहोट्टालाच्या काव्यांचा चांगला अभ्यास केलेला असला पाहिजे असें वाटतें. मोहोट्टालाच्या भाषाशैलीचें प्रतिबिंब या काव्यांत जागोजाग स्पष्ट दिसतें.
अर्वाचीन काळांतील गद्यग्रंथांमध्यें सद्धर्मदास नांवाच्या ग्रंथाचा प्रथम उल्लेख केला पाहिजे. मिलिंद-पन्हाचा तो सिंहली तरजुमा असून, अनेक हस्तलिखित प्रतींच्या द्वारा त्याचा फैलाव झालेला आहे. परंतु हा ग्रंथ कोणीं लिहिला ती माहिती मिळत नाहीं. सतराव्या शतकाच्या अखेरीस व अठराव्या शतकाच्या आंरभीं, राजवलिय व राजरत्नाकरय असें दोन ऐतिहासिक ग्रंथ तयार झाले. मुख्यतः महावंशाच्या आधारानें ते लिहिलेले असल्यामुळें, स्वतंत्र इतिहास या दृष्टीनें ते फारसे महत्त्वाचे नाहींत. तथापि त्यांतील कांहीं मजकूर सरकारी दप्तरांतून घेतला असल्यामुळें त्यांनां महत्त्व आलें आहे.