प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
करेण — ब्रह्मदेशांतील डोंगरांत राहणार्या मुख्य जातींपैकीं करेण ही एक जात आहे. हे लोक सितांग व इरावती या नद्यांनां विभागणारी पेगु योमाची मधली रांग, सितांग आणि सालविन यांमधील पौंगलौंगची रांग आणि इरावती सुंदरबनाच्या पश्चिमेस असणार्या आराकन योमा पर्वतांच्या पूर्वबाजूचे उतार, यांतून वस्ती करून राहतात. मोन सत्तेच्या वाढीमुळें पुन्हां एकवार दर्याखोर्यांत जाऊन राहण्यापूर्वीं ज्या चिनी लोकांच्या जाती शान लोकांनीं नेट लावल्यामुळें दक्षिणेकडे आल्या, त्यांचेच वंशज हे लोक (करेण) असावेत असा समज आहे. त्यांच्या परंपरागत कथांवरून, चीन आणि तिबेट यांमध्यें पसरलेल्या गोबीच्या वाळवंटाच्या पश्चिमेस यांचें मूलस्थान असावें असा तर्क करण्यांत आला आहे. १९०१ सालच्या खानेसुमारींत ब्रिटिश हिंदुस्थानांत यांची संख्या एकंदर ७२७,२३५ होती; त्यापैकीं ८६,४३४ स्गॉ लोक, १७४,०७० पो लोक, ४९३६ भाइ लोक व "अनिर्दिष्ट" असे ४५७,३५५ लोक होते. {kosh या लोकांची बेरीज वरील लोकसंख्येइतकी येत नाहीं.}*{/kosh} स्गॉ आणि पो यांनां संघशः "श्वेतकरेण" असें नांव असून, ते विशेषतः ब्रिटिश मुलुखांत राहातात. त्यांच्या कपड्यांच्या रंगावरून त्यांचीं नांवें पडतात. भाइ किंवा "रक्तकरेण" लोकांनां कांहीं जण अगदीं भिन्न वंशाचे समजतात; ते मुख्यत्वेंकरून परे-न्नि या स्वतंत्र डोंगरी संस्थानांत राहातात. करेण मनुष्य ब्रह्मी मनुष्यापेक्षां जास्त आडव्या अंगाचा व पांढर्या कातडीचा असतो; त्याच्या ठिकाणीं डोळ्यांतील मंगोली तिरवेपणा जास्त प्रमाणांत असतो. स्वभावांत सुद्धां हे लोक ब्रह्मी लोकांपेक्षां निराळे आहेत. विनोदवृत्तीचा यांच्या ठिकाणीं अगदींच अभाव आहे. ते अति मंद व सावधान असतात व ब्रह्मी लोकांत वास करणारा उल्लास व मोहकता यांच्यांत मुळींसुद्धां नाहीं. स्वच्छता व सत्यप्रियता या गुणांत त्यांची ख्याति आहे तरी ते घाणेरडे व दारूबाज आहेत. ब्रिटिश साम्राज्यांत देशी जातींपैकीं ख्रिस्ती कळपांत शिरण्यास उत्सुक असणारी पहिली जात म्हणजे श्वेत लोकांची. मिशनरी लोकांनीं त्यांच्यापुढें केलेल्या नवीन संप्रदायास ते फार उत्कटतेनें कवटाळतात याचें कारण त्यांच्यांत प्रचलित असलेल्या भविष्यांनीं त्यांचीं मनें अगोदरच तयार झालेलीं असतात हें होय. त्यांच्या चमत्कारिक परंपरागत कथा बायबलच्या धर्तीवर असतात व याशिवाय प्रबल ब्रह्मी लोकांशीं त्यांचें हाडवैर असतें. १९०१ सालच्या खानेसुमारींत ब्रह्मदेशांतील १४७,५२५ ख्रिस्तांपैकीं १ लाखाच्यावर नुसते करेण लोकच होते. रक्तकरेण लोक श्वेतकरेणांपेक्षां फारच भिन्न असतात. सर्व करेण जातींत यांच्या इतके रानटी, क्रूर व बेकायदेशीर दुसरे कोणीच नाहींत. कुळांतील प्रत्येक पुरुषाच्या पाठीवर उगवता सूर्य भडक शेंदरांत गोंदण्याची चाल असे. हीं माणसें लहान व सुरकुत्या पडलेलीं असतात तरी तीं सशक्त असतात. त्यांचे चेहरे रूंद व पिंगट रंगाचे असतात. त्यांचा पेहराव म्हणजे एक आंखूड चोळणा (याचा रंग बहुधा लालसर असून त्याचे पट्टे पांढरे काळे किंवा टार्टन कापडासारखे असतात) आणि डोक्याभोंवती एक हातरुमाल गुंडाळलेला असतो. करेण भाषा स्वरप्रधान आहे व भारत-चीन वंशाच्या सयामी-चीन शाखेंत हिचा अन्तर्भाव होतो.