प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

तलैंग व कोल :— या भाषेंतील धातू थई, ब्रह्मी, करेण, नाग वगैरे भाषांतील धातूंसारखे नाहींत. त्याप्रमाणेंच ही भाषा चिनी, तिबेटी किंवा इतर दुसर्‍या कोणत्याहि तार्तर भाषेहून स्वतंत्र आहे. संस्कृत हिंदी, तेलगु, तामिळ वगैरे कोणत्याहि भाषेचें तलैंग भाषेशीं साम्य नाहीं. तलैंग भाषेचा शब्दसंग्रह इतर सर्व भाषांच्या संग्रहांहून भिन्न आहे. मध्यहिंदुस्थानांत डोंगराळ प्रदेशांत रहाणार्‍या, कोल, ओराओन, गोंड वगैरे रानटी जाती आहेत; व सोनताल, भुमिजा, मुंडा वगैरे अनेक पोटजाती आहेत. यांच्या भाषांची व तलैंग भाषेची व्युत्पत्ति एकच आहे. ले. टिकेल यानें इ. स. १८४० त एक लेख प्रसिद्ध केला. त्या लेखावरून असें दिसतें कीं तलैंग व कोल या भाषांमध्यें निकट साम्य आहे. पहिल्या सहा आंकड्यांचीं नांवें, पुरुषवाचक सर्वनामें, शरीराच्या निरनिराळ्या अवयवांची नांवें वगैरे शब्दांची व्युत्पत्ति एकच आहे. कांही शब्दांत थोडें साम्य आहे; ते शब्दहि एकाच धातूपासून निघाले असावे. खालील कोष्टकावरून या गोष्टी स्पष्ट होतील.

 तलैंग व कोल भाषांमधील साम्य.
 मराठी  तलैंग  कोल
 पुरूष   म्निह्   मेल
 डोकें    क्दोप  क्यूप
 डोळा  मीट  मेट
 नाक  मुह्  मुआ
 कान  क्तो  खेत्वे
 तोंड    पेंग  बई
 जीभ  लेतइक  अलँग
 हात  टो  टी
 छाती  तो  तोआ
 आई  याई  आया
 "  मि  माई
 तेल  क्लिंग  निंग
 चन्द्र   केतु  चान्दु
 दगड    त्मोम्  तांगी
 पाणी   डाई  दाहू
 रडणें      यीम  याम
 ऐकणें  मिंग  मेना
 घेणें     कीट  किन्दा
 भूक  क्लो  कायर
 हें  नाव्  नोआ
 एक  म्वोआ  मोय
 दोन  बा  बई
 तीन  पि  पिआ
 चार  पोन  पोनिआ
 पांच  मेसन्  मोनया
 सहा  तरिओ  तुरिया
 असणें   नम्  मिन्ना

चिनी, थई, ब्रह्मी, करेण, आसामी वगैरे भाषांमध्यें संख्यावाचक प्रत्ययांचा उपयोग केला जातो; परंतु तलैंग भाषेंची गोष्ट निराळी आहे. पाश्चात्त्य भाषांप्रमाणें तलैंग भाषेंत नामाला संख्यावाचकें लावतात; जसें, त्माम् पि (तीन दगड). चिनी व इतर इन्डोचिनी भाषांमध्यें प्रत्ययाला संख्यावाचकें जोडतात. कोल भाषेंत नामाच्या एकवचनाला 'को' हा प्रत्यय लावून अनेकवचन बनवितात; परंतु तलैंग भाषेंत 'तौ' हा बहुवचनार्थी प्रत्यय लावतात; तलैंग व कोल यांच्या नांवांवरून या भाषांची उत्पत्ति एकच असावी असें वाटतें. कोल लोकांच्या एका जातीस ओराओन असें म्हणतात. या लोकांनां फार प्राचीन काळीं गंगेच्या जवळील प्रदेशांतून ब्राह्मण लोकांनीं घालवून दिलें. ले. टिकेल म्हणतो, "मुंडा लोकांची हकीकत प्रथमतः या ओराओन लोकांनींच दिली. मुंडा हे लोक पूर्वीं छोट्या नागपुरांत रहात असत." या मुंडा लोकांनां 'हो' असें म्हणतात; परंतु कोल या नांवानें हे जास्त प्रसिद्ध आहेत. मुंडा व मोन हीं नांवें जवळजवळ एकच आहेत. तलैंग लोक आपल्याला मोन असेंच म्हणवितात. ज्या दोन राष्ट्रांचीं नांवें इतकीं सारखी आहेत त्यांची उत्पत्ति भिन्न असणें अशक्य आहे.

ब्रह्मी व तलैंग इतिहासांवरून असें समजतें कीं, तलैंग जातीचे लोक सुसंस्कृत असून फार प्राचीन काळीं यांच्यापाशीं बौद्धधर्माचे ग्रंथ होते. सोना व उत्तरा यांनीं ख्रिस्ती शकापूर्वीं ३०७ वर्षें थादुंग येथें बौद्ध संप्रदायाची स्थापना केली. परंतु इ. स. १०५७ पर्यंत या संप्रदायाचा प्रसार ब्रह्मदेशांत पूर्णपणें झाला नाहीं. इ. स. १०५७ सालीं ब्रह्मदेशच्या राजानें थादुंग येथून विद्वान् लोक आणविले व पुगन येथें बौद्ध संप्रदायाची स्थापना केली. स्वर्णभूमि ही बुद्धघोसाची जन्मभूमि होती व हिलाच पूर्वीं पेगू हें नांव होतें. बुद्धाच्या ९३० व्या वर्षीं बुदोथेगूसेक तेरून वहान्स या नावांचा धर्मोपदेशक सिलोनमध्यें येऊन त्यानें विसुद्धिमाग्ग वगैर पुस्तकें लिहिलीं. स्वर्णभूमीस परत आल्यावर त्यानें तुर्णपिटक हा ग्रंथ तयार केला व तो बुद्धाच्या मतांचा प्रसार करूं लागला.

हिंदू लोकांनीं प्राचीन काळीं पेगू येथें वसाहत केली असावी. मलाकांत पाली व संस्कृत लेख सांपडले आहेत, यावरून हिंदूंच्या वसाहती तेथें होत्या असें वाटतें. पेगूंतील हिंदू वसाहतवाले तेथील लोकांशीं मिसळून गेले. आराकानच्या इतिहासावरून असें समजतें कीं थोदुन नांवाच्या जातीचे लोक तलैंग लोकांशीं पूर्णपणें मिसळून गेले. पेगू, ब्रह्मदेश व थई वगैरे देशांत पाऊ किंवा तुंगघुस या जातीचे लोक आहेत, ते पेगूंतील मूळचे रहिवाशी असावे. परंतु या लोकांचा तलैंग लोकांशीं संबंध असावा असें यांच्या भाषेवरून वाटत नाहीं. जरी तलैंग भाषेंतील कांहीं शब्दांचें या भाषेंतील कांहीं शब्दांशीं साम्य आहे, तरी तेवढ्यावरून तलैंग भाषेशीं या भाषेचा संबंध असावा असें सिद्ध होत नाही; कारण, दुस-याहि कित्येक भाषांतील शब्दांशी या भाषेंतील शब्दांचें अशा प्रकारचें साम्य आढळते.