प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

पुनरूज्जीवक चळवळ — परकीय संस्कृतीनें मनुष्य कितीहि पछाडला गेला असला तरी स्वकीयतेचें बीज त्याच्या अंतःकरणांतून जाणार नाहीं असें दिसतें. शासनविषयक नवीन परिस्थितीमुळें त्यानें  बाह्यांसारखें कितीहि आचरण केलें तरी त्याच्या अंतःकरणांतील स्वकीय संस्कृतीनुसार आचरण करण्याची भूक नष्ट होत नाहीं. अमेरिकन इंडियन गोर्‍या लोकांच्या वस्तींत जाऊन राहतो, त्यांच्यांत वाढतो, कधीं गोर्‍यांचें उच्च शिक्षणहि त्यास मिळतें, पण फिरून काय ? त्यास नवीन घेतलेल्या संस्कृतीचें ओझें वाटूं लागतें आणि सुधारलेला पोषाख टाकून देऊन पुन्हा घोंगडीकडे, पिसांकडे आणि रंगाकडे त्याचें मन धांव घेतें अशीं उदाहरणें अमेरिकन लोकांच्या किती तरी प्रत्ययास येत आहेत. ज्याप्रमाणें व्यक्तीची ही गोष्ट आहे त्याप्रमाणें अनेक व्यक्तींचा समूह जें राष्ट्र त्याचीहि गोष्ट आहे. धर्मांतराचीं कराणें पुष्कळ प्रसंगीं कृत्रिमतेचा कंटाळा आणि साधेपणाची आवड हीं असतात. ही गोष्ट दुसर्‍या लोकांच्या संस्कतीच्या दडपणाखालीं ओरडणार्‍या जित लोकांसंबंधानेंच तेवढी खरी आहे असें नाहीं; ही वृत्ति अत्यंत स्वतंत्र आणि प्रबल लोकांमध्येंहि दृष्टीस पडते. पैतृक "साधेपणा" आणि अर्वाचीन "कृत्रिमता" यांचा झगडा चाललेला सर्व देशांत दृष्टीस पडतो. पुष्कळांस जुन्या  चालींचा रानटीपणा भासूं लागतो आणि कांहीं तरी फरक केला पाहिजे असें वाटूं लागतें; आणि पूर्वींपेक्षां कांहीं तरी अधिक कृत्रिमता समाजास येते. पुढें कालांतरानें कृत्रिमतेचा कंटाळा येऊन मूळ स्थितीकडे धांव घ्यावी असें पुष्कळांस वाटूं लागतें, तथापि या आरोहावरोहामध्यें समाजाची प्रगतिच होते. नवीन कृत्रिमता घेतांना आवश्यक गोष्टींबरोबर कांहीं अनवश्यक  गोष्टी देखील लोक घेतात; त्या अनवश्यक गोष्टी झाडून काढावयाच्या असतात. यूरोपांत व अमेरिकेंत "पैतृक साधेपणा"कडे कशी प्रवृत्ति होत चालली आहे हें दाखविण्यासाठीं कांही उदाहरणें घेतों. आजचा पुरूषांचा पोषाख शंभर वर्षांपूर्वींच्या पुरुषांच्या पोषाखापेक्षां पुष्कळच साधा झाला आहे. स्त्रियांनीं कारसेट {kosh स्तनांच्या अधोभागापासून मांड्यांपर्यंत एक माशांच्या हाडांची केलेली बंडी. हिचा मुख्य हेतु उरःप्रदेशांचें विस्तृतत्व, कमरेचे लघुत्व आणि नितंबाचें गुरुत्व दाखविणें हा आहे.}*{/kosh}  वापरूं नये म्हणून खटपट चालू आहे. यूरोपियन स्त्रीपुरुषें पोषाखांत अगदीं लहान वयापासून मढविलीं असतात ही गोष्ट फार वाईट आहे, नग्नता फारशी अयोग्य नाहीं, स्त्रीपुरुषांचें एकमेंकांच्या नग्नस्वरूपानें कामोद्दीपन होतें, ह्यासाठीं नग्नता निदान लहानपणीं लोकांस अधिक परिचित झाली पाहिजे, इत्यादी विचार स्त्रीपुरुषसंबंधशास्त्रज्ञ (sexual scientists) व्यक्त करीत आहेत.{kosh Havelock Ellis-Psychology of Sex. Vol. VI; शिवाय Sexual Ethics, A Study of Borderland Questions- Robert Michels.}*{/kosh} परकीय आचारांच्या ग्रहणामध्यें आपण राज्यकर्त्यांशीं  सदृश व्हावें ही एक बुद्धि असते आणि रानटीपणा टाकून आपण सुधारावें ही दुसरी बुद्धि असतें. त्याप्रमाणेंच जुन्या चालीकडे परत फिरा असा उपदेश करणार्‍यांमध्यें दोन तर्‍हेचे लोक असतात. एक तर परंपरेचे अभिमानी आणि दुसरे म्हटले म्हणजे साधेपणाचे चहाते. कोणत्याहि राष्ट्रांत परकीयांचें गुलामांसारखें अनुकरण करणें बंद व्हावयास एक गोष्ट अवश्य आहे, आणि ती म्हटली म्हणजे परकीयांशीं सादृश्य ठेवणाराला अधिक फायदा होण्याचा बंद झाला पाहीजे. जर हिंदु पोषाख करणार्‍याला सरकारी अधिकारी आणि रेल्वे इत्यादि सार्वजनिक सेवकसंस्था तुच्छतेनें वागवितील तर परकीय तर्‍हेचा पोषाख करण्याची प्रवृत्ति अबाधित राहिल. तथापि जनतेचा उत्कर्ष होऊं लागला आणि राज्यकर्त्याशीं सदृश्य अशा पोषाखाचें महत्त्व उरलें नाहीं म्हणजे आत्मभौम पोषाखास आणि रीतिरिवाजांस महत्त्व येऊं लागतें.

सिलोनमध्यें परंपरागत संस्कृतीचा अभिमान धरून तिचें पुनरुज्जीवन करणें हा ज्यांचा हेतु आहे ते लोक आपणास सुधारक म्हणवितात. त्यांनीं Social Reform S0ciety (समाजसुधारक संस्था) म्हणून एक संस्था काढली आहे. या सोशल रिफार्म सोसायटीमध्यें प्रमुख मंडळी म्हटली म्हणजे एल. डब्यू. ए. डी. सोयसा. डोनाल्ड ओभे (अभय) शेखर, आणि  पाल पेरिस ही होत. या सोसायटीनें खालील गोष्टींकडे विशेष लक्ष दिलें आहे.
१. हिंदी पद्धतीच्या पोषाखाचा प्रसार करणें.
२. जुने सण आणि उत्सव यांचें पुनरुज्जीवन करणें.
३. सिंहलद्वीपाच्या इतिहासार्थ प्रयत्‍न करणें.
४. हिंदी तर्‍हेच्या वैद्यकाचा उद्धार करणे.

सोशल रिफार्म सोसायटीच्या कामास एक दोन बाबतींत यश आलें आहे. स्त्रियांनीं युरोपीय तर्‍हेचा पोषाख टाकून देऊन हिंदी तर्‍हेचा पोषाख करावयास सुरुवात केली आहे. या बाबतींत डॉन क्यारोलिस हेवावितारण या कुटुंबांतील प्रसिद्ध लेखक धर्मपाल यांनीं पुढाकार घेतला आहे. धर्मपाल हे बराच काल हिंदुस्थानांत घालवितात. धर्मपालांनीं यूरोप, अमेरिका येथें प्रवास केला आहे; आणि त्यांचें नांव बोस्टन येथें कांही वर्गांत ऐकूं येतें. धर्मपाल यांनीं हिंदुस्थानी पद्धतीचा पोषाख सिलोनमध्यें नेला असें म्हणण्यास हरकत नाहीं. या बाबतींत त्यांस साहाय्यकर्त्या दोन स्त्रिया होत्या. एक तर त्यांचीच आई मल्लिका हेवावितारण ही होय, आणि या कार्यास हातभार लावणारी त्यांच्या कुटुंबाबाहेरची मुख्य एक बाई म्हटली म्हणजे मिसेस वीरकोणहामिनी ही होय.