प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

चळवळी आणि वाङ्‌मय :— धर्मपाल हे दांडगे लेखक आहेत. त्यांच्या घराण्यानें "सिंहलबौद्ध" नावांचें एक पत्र चालविलें आहे.  या पत्राचा खप सुमारें साडेसहा हजार आहे. हें आठवड्यांतून दोनदा प्रसिद्ध होतें.

धर्मपालांच्या लेखांस आक्षेपक पुष्कळ आहेत. कांहीं आक्षेपकांनीं यांच्या लेखांचें येणेंप्रमाणें वर्णन केलें. "यांच्या लेखांत आवेशाची जोरदार भाषा असते, तथापि त्यांच्या लेखांत तार्किकता आणि युक्तिवाद नसतो. शिवाय एका विषयावर सुसंगतपणें न लिहितां एका विषयावरून दुसर्‍या विषयावर उड्डाण करण्याची धर्मपालांस फार खोड आहे. धर्मपालाच्या लेखांत कधीं विविधता आणि कधीं चर्वितचर्वण यांची एकच भेसळ सांपडेल."

पुरातन संस्कृतीचा अभिमान धरणार्‍या लोकांत जॉन डी. सिलव्हा यांची गणना केली पाहिजे. लोकप्रिय नाटककार म्हणून यांचा लौकिक चांगला आहे. यांच्या नाटकांतील पदांचे नादलेख (रेकार्डस्) जागोजाग आढळतात. सामाजिक सुधारणेसंबंधाचें यांचें कार्य म्हटलें म्हणजे "सिंहलपराभव नाटक" होय. या नाटकांत राष्ट्रीय संस्कृतीचा कसा नाश होत आहे हें दाखविलें आहे आणि तो नाश थांबविण्यासाठीं खटपट करण्याकरितां प्रेक्षकांचें मन वळविण्याचा यत्‍न केला आहे.

हिंदु तर्‍हेचा पोषाख करण्याची फ्याशन दिवसानुदिवस वाढत आहे; आणि तेथील सुधारक वर्गास याबद्दल बरेंच श्रेय दिलें पाहिजे. सिंहलद्वीपांतील सुधारक वर्गास आपल्याकडील सुधारक वर्गासंबंधानें फारशी माहिती नाहीं. आणि ज्यांनां ज्यांनां माहिती आहे त्यांनां आपल्या सुधारक वर्गाविषयीं आदरबुद्धि नाहीं. ब्रह्मसमाजासारख्या संस्थांवर लंकेंतील सुधारक मंडळी तडाके हाणण्यास कमी करीत नाहीं.

लंकेंतील सुधारक मंडळीचें आणखी एक कार्य म्हटलें म्हणजे, यूरोपियन नांवें टाकून देऊन संस्कृत नांवांचा प्रचार करण्याविषयीं खटपट करणें हें होय. तसेंच आणखी एक कार्य हिंदी कलेचें पुनरुज्जीवन करणें हें  होय. पोर्तुगीज लोकांच्या सहवासाने यूरोपियन संगीत लंकेंत शिरलें. आतां हिंदी संगीताकडे लक्ष घालून त्याचा प्रसार करण्याकडे अतिशय जोराची प्रवृत्ति झाली आहे.

राष्ट्रीय पुनरुज्जीवनार्थ खटपट करणार्‍यांमध्यें बौद्ध व तसेच ख्रिस्ती लोकहि आहेत. दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे यूरोपांत जाऊन परत आलेले लोक राष्ट्रीय संस्कृतीच्या उद्धारार्थ जितके उत्साही झाले आहेत तितके देशांतच अडकून राहिलेले जुन्या पिढीचे सिंहली झाले नाहींत.

पुनरुज्जीवन  चळवळींत प्रामुख्यानें खटपट करणार्‍यांमध्यें डॉ. आनंदकुमारस्वामी यांचा उल्लेख केला पाहिजे. डॉ. कुमारस्वामी हें रक्तानें पूर्णपणें हिंदी देखील नाहींत. यांची आई इंग्रज आहे. तथापि हिंदी संस्कृतीचा अभिमान यांनां जितका आहे तितका थोडक्यांसच असेल.

सिंहली समाजांत बौद्ध, प्राटेस्टंट ख्रिस्ती, आणि क्याथोलिक ख्रिस्ती असें तीन मुख्यत्वानें भेद करितां येतील. या प्रत्येक संप्रदायानें आपापलीं वर्तमानपत्रें चालविलीं आहेत; आणि प्रत्येक पत्राचा हेतु आपल्या संप्रदायाचा प्रसार करण्याचा आहे असें दिसतें. सिंहली भाषांतून जीं पत्रें चालविलीं जातात त्यांचा देशाच्या शासनसूत्रावर परिणाम फारसा होत नाहीं. इंग्रजी पत्रें शासनावर परिणाम घडवितात; त्या पत्रांतून धार्मिक विषयाची चर्चा क्वचितच होते. ती चर्चा करणें देशी भाषांतील पत्रांचें प्रधान कर्तव्य झालें आहे. सिंहलद्वीपांत प्रौढविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण इत्यादि गोष्टींवर चर्चा होणें शक्य नाहीं. कारण, तेथें या तिन्ही गोष्टी केव्हांच स्थापन झाल्या आहेत. स्त्रियांनीं जाकिटें कां वापरूं नयेत यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवरहि चर्चा होणें शक्य नाहीं. कारण, जाकिटेंच काय, पण सुधारक पक्षास न मिळालेल्या बायका कॉरसेट देखील वापरतात. मांसाहाराचा पक्ष घेऊन देखील भांडतां येणार नाहीं. कारण गाईचें, डुकरांचें आणि बोकडाचें मांस सर्वचजण खातात. ब्राह्मणांस शिव्या देण्यासहि तेथें अवकाश नाहीं. कारण तेथें ब्राह्मण मुळींच नाहींत.

सिंहल देशाची उपर्युक्त स्थिति असल्यामुळें तेथील पत्रकारांचे मोठे हाल होत असतील असें जर आपणांस वाटत असेल तर तो आपला गैरसमज आहे. तेथील देशी भाषांतील पत्रांचें एक मुख्य काम म्हटलें म्हणजे धार्मिक विषयांची चर्चा करणें हें होय.

निरनिराळ्या पक्षांचीं पत्रें आहेत त्यांची नांवें आणि पक्षवृत्ति दिल्यास वाचकांस समजण्यास सुलभ जाईल.

१. सिंहलबौद्ध :— हें आठवड्यांतून दोनदां प्रसिद्ध होतें. या पत्राची वृत्ति मूलसंस्कृतीची जोपासना करण्यास लोकांस प्रवृत्त करणें ही होय. बौद्धसंप्रदायाचा पक्ष घेऊन भांडणें व त्याचा प्रसार करणें हें या पत्राचें ध्येय आहे.

२. संदरेस :— (चंद्ररश्मि) हें पत्र थिआसाफिस्टांच्या प्रामुख्याखालीं अवतीर्ण झालें. या पत्राचे संपादक आपणांस बौद्धधर्माचे अभिमानी म्हणवितात, आणि "सध्यां थिआसफीच्या मताचा प्रसार करण्याचें काम आमचें नाहीं" असें सांगतात. "सिंहलबौद्धापेक्षां आमची पालिसी उर्फ व्यवहारनीति थोडीशी निराळी आहे" असेंहि बोलतात. सिंहलबौद्ध फारच एकांगी आहे असें या पत्राच्या संपादकांस वाटतें. हें पत्र आठवड्यांतून दोनदां प्रसिद्ध होतें.

३. सिंहलजातीय :— हें साप्ताहिक पत्र वारंवार संदरेस पत्रावर टीका करितें. संपादक आपणांस बौद्ध म्हणवितो. तो कादंबरीकार म्हणून प्रख्यात आहे.

४. ज्ञानप्रदीप :— हें क्याथोलिक संप्रदायाचें समर्थन करणारें पत्र आहे.

५. रविकिरण :— हें प्राटेस्टंट ख्रिस्त्याचें समर्थन करणारें आहे. सिंहली संस्कृतीवर हें पत्र तीक्ष्ण टीका करितें.

६. लकमिन् :— (लंकामाणिक्य) हें दैंनिक पत्र ख्रिस्ती मंडळी प्रसिद्ध करिते. पारमार्थिक संप्रदायांच्या बाबतींत याची तटस्थवृत्ति आहे असें त्या पत्राचे चालक सांगतात. तथापि बौद्धांचें असें मत आहे कीं, हें पत्र अंतःस्थपणें बौद्धांच्या विरुद्ध आहे.

७. दिनकरप्रकाश    हीं दोन दैनिकें बौद्धानींच चालविलीं आहेत; तथापी धार्मिक विषयांत जितकें
८. दिनकरतापवृत्ति    मन घालावें तितकें हीं घालीत नाहींत, असा या पत्रांविरुद्ध आक्षेप आहे.

९. दिनमिन :— ह्या पत्रानें दैनिक स्वरूप नुकतेंच स्वीकारलें आहे. संदरेस पत्राप्रमाणेंच याचें धोरण राहील असें दिसतें. कारण संदरेस पत्राच्या संपादकवर्गापैकीं कांहीं मंडळी तिकडे गेली आहे.

१०. सिंहलसमे (समय) :— हें बौद्ध पत्र आहे.

संस्कृतीचें वाग्युद्ध वर्तमानपत्रांतूनच होतें असें नाहीं; कांदबर्‍यांतून प्रत्येकास प्रिय असलेलीं मतें बाहेर पडतात.

कांदबरीकारांमध्यें एम्.सी.एफ्.परेरा, सायमन सिल्व्हा, पी.शिरीसेन, इत्यादिकांचीं नांवें सर्व लोकांस अवगत आहेत. परेराच्या कादंबर्‍यांत "मगे करुमि" (माझें कर्म) ही कांदबरी लोकप्रिय आहे. यांत सिंहली समाजाचे दोष दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे. सायमन् सिल्व्हा याच्या कादंबर्‍यांत 'मीना,' 'तेरीझा,' आणि 'अपेआगम' या कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. 'तेरीझा' ही कादंबरी लोकांस बिघडविण्याकरितां आणि हलक्या लोकांचा आश्रय मिळविण्याकरीतां लिहिली आहे, असा त्या कांदबरीवर लोकांचा आक्षेप आहे. या कादंबरींत लग्ननिर्बंधच नसावा आणि वाटेल त्या मनुष्यानें वाटेल त्या स्त्रीवर प्रेम करावें हे मत उपदेशिलें आहे. 'अपेआगम' या कादंबरींत बौद्धभिक्षूंवर झोड उडविली आहे.

पी. शिरिसेन (सिंहलजातीपत्राचा संपादक) याच्या तीन कांदबर्‍या प्रसिद्ध आहेत. त्या (१) "रोसलिन्", (२) "सहजयतिस्स" आणि (३) "अपटवेच्चदि" या होत. "सहजयतिस्स" या कादंबरीवर पुष्कळ लोकांचा आक्षेप आहे, आणि याचें कारण त्या कादंबरींत तरुणी आपल्या प्रेमपात्राबरोबर चोरून पत्रव्यवहार कसा करीत आहेत हें दाखविलें आहे. या कादंबरींतील लिहिणें तरुणींस सूचक होईल असें कांहीं पत्रकारांस वाटल्यामुळें त्यांनीं त्या कादंबरीचा निषेध केला आहे.

शिरिसेन याच्या "अपटवेच्चदि" (आम्हांस काय झालें आहे ?) या कादंबरींत समाजावर व त्यांतील व्यंगांवर पुष्कळ टीका आली आहे असें म्हणतात. या कादंबरीचा गोषवारा आम्हांस मिळाला नाहीं.

या कादंबर्‍यांचा निर्देश करण्यांत आमचा हेतु एवढाच कीं, समाजविषयक मतांचा वारा कोणत्या दिशेनें वहात आहे हें दाखवावयाचें. बौद्ध संप्रदायाचे लोक आपल्या समाजाचें निरिक्षण करून त्यांतील दोषांचें कादंबरीरूपानें आविष्करण करावयास लागले आहेत, व त्याप्रमाणेंच नवीं मतें
कादंबर्‍यांच्या द्वारानें लोकांच्या दारावर आपटत आहेत हेंहि दिसून येईल.

देशाच्या संस्कृतींत दोन तर्‍हेनें फरक होत असतो. एक तर परकीय संस्कृति देशांतील लोकांस आपल्याकडे ओढावयास पहाते आणि मूळ समाजघटना हाणून पाडण्याचा प्रयत्‍न करिते; अगर एखाद्या विशिष्ट समाजाच्या अंतर्भागांतच खळबळ सुरू होऊन समाजाचे विचार आणि आचार बदलूं लागतात. निरनिराळे पारमार्थिक संप्रदाय एकमेकांशीं झगडत असतां एकमेकांचीं उणीं काढावयाचा प्रयत्‍न करितात. एक संप्रदाय दुसर्‍या संप्रदायाचीं उणीं बाहेर काढतो, तेव्हां त्याचा हेतु, स्पर्धा करणार्‍या संप्रदायास लोकांनीं सोडून जावें हा असतो. तथापि मनुष्य स्वसंप्रदायाचींच उणीं काढूं लागला तर त्याचा हेतु आपल्या संप्रदायांतील दोष नष्ट होऊन संप्रदाय बलाढ्य व्हावा हाच असतो. कधीं कधीं परकीय धक्क्यामुळेंच अंतःस्थ सुधारणेस प्रारंभ होतो. बौद्ध संप्रदायास आणि परंपरागत रीतीतस आंतून आणि बाहेरून कसे धक्के मिळत आहेत हें पूर्वोक्त विवेचनावरून लक्षांत येईल.