प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
काचिन.— उत्तर ब्रह्मदेशांतील काचिन डोंगरांतून हे काचिन किंवा चिंग्पा लोक राहातात. आसाम सरहद्दीवर यांनां सिंग्फो असेंहि नांव आहे. या लोकांच्या पुष्कळ जाती, पोटजाती व कुळें असल्यानें, मिस्किना व भामो या जिल्ह्यांच्या राज्यव्यवस्थेखालीं येणार्या काचिनपर्वतप्रदेशाचे ४० लहान भाग करण्यांत आले. (नुकतेच या चाळिसांचे पांच मोठे भाग केले आहेत.) या भागांखेरीज कथ, माँगमिट आणि उत्तरेकडील शान संस्थानें यांतून पुष्कळ काचिन लोक आहेत. १९०१ सालच्या खानेसुमारींत काचिन लोकांची संख्या ६४,४०५ भरली, व १९११ मध्यें १,६२,३६८ दाखविली आहे. शब्दशास्त्रीय शोधांवरून असें दिसतें कीं, काचिन किंवा चिंग्पा या लोकांचे मूळ उत्पादक भारत-चिनी वंशांतील असून, प्रागैतिहासिक कालांत भारत-चीनांत मोन-अनामची लाट पसरल्यावर, पश्चिम चीनमधील आपलीं घरेंदारें सोडून ज्या ठिकाणीं तिबेट, असाम, ब्रह्मदेश व चीन या देशांच्या हद्दी मिळतात त्या प्रदेशांत ते आले. तेथें त्यांच्या तिबेटी, नागो, ब्रह्मी व कुकी-चिनी अशा शाखा होऊन त्या पश्चिमेकडे व दक्षिणेकडे जेव्हां गेल्या तेव्हां इरावती व चिन्द्विन या नद्यांच्या दरम्यान मूलस्थानीं अवशिष्ट राहिलेले लोक तेच चिंग्पा होत. १९ व्या शतकाच्या मध्यकालीं, काचिन लोकांची दक्षिण सरहद्द हल्लीं आहे त्यापेक्षां २०० मैल उत्तरेस होती. तेव्हांपासून ही जात आपल्या मोठ्या समुदायानिशीं हळू हळू दक्षिणेकडे व पूर्वेकडे सरकत चालली आहे. समायिक शासनपद्धतीमुळें हीं लहान स्वतंत्र कुळें एकत्र होऊन यांचा मोठा समुदाय झाला आहे असें नसून आपलें मूलस्थान सोडून, ज्यांत अगदीं कमी अडथळा येईल अशा मार्गानें बाहेर जाण्याची त्यांची सामान्य प्रवृत्ति याला कारण आहे. हल्लीं काचीन लोक उत्तरब्रह्मदेशाच्या सरहद्दीच्या दोन्ही बाजूंस आहेत व त्यांचें बळ इतकें आहे कीं, शासननियमांच्या बाबतींत सरहद्दीवरील राज्यशास्त्यांनां तें चांगलें विचारांत घ्यावें लागतें. काचिन डोंगरांतून राहणार्या जातींसाठीं केलेल्या १८९५ च्या कायद्यान्वयें, इरावतीच्या डाव्या किनार्यावरच्या ब्रिटिश सरकारनें न्मइखाच्या दक्षिण प्रदेशासंबंधीं शासनाची जबाबदारी आपणाकडे घेतली; व मलिखा आणि न्मइखा यांच्या संगमापासून निघून लाबन जिल्ह्याच्या उत्तरसरहद्दीमधून (यांत मर्गझच्या खाणी येतात) जाणार्या रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेशासंबंधीं जबाबदारी उजव्या किनार्यावरच्या सरकारनें आपणाकडे घेतली. या रेषेच्या उत्तरेकडे राहाणार्या जातींनां असें सांगण्यांत आलें होतें कीं, त्यांच्या दक्षिणेवर स्वार्या करण्याचें जर त्यांनीं बंद ठेविलें तर त्यांनां कांहीं अडथळा करण्यांत येणार नाहीं. या रेषेच्या दक्षिणेला शांतता स्थापण्यांत येऊन, तेथील लोकांच्या खाजगी व्यवहारांत शक्य तितका कमी हात घालून, कांही थोडीशी खंडणी त्यांच्याकडून घेण्यांत आलीं. सरहद्दीवरच्या ब्रिटिश हद्दींत मुख्य धोरणें जीं ठेवण्यांत येतात तीं म्हटलीं म्हणजे या जातींनां निःशस्त्र करावयाचें व सरहद्द आणि अंतर्भाग यांतून रस्ते काढावयाचे. यांजकडून थोडीशी खंडणीहि घेण्यांत येते.