प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
ब्रह्मी सैन्य — ब्रह्मी लोकांच्या सैन्यव्यवस्थेकडे दृष्टि वळविली असतां आपणांस तींत बरेच दोष असल्याचें दिसून येतें. त्यांपैकीं मख्य दोष असा कीं, न्यायाधीश किंवा करवसूली करणारा अंमलदार, किंवा इतर दिवाणी अधिकारी या सर्वांनां लष्करामध्येंहि हुद्याच्या जागा मिळूं शकतात; कारण या देशांत मुलकी कामें व लष्करी कामें असा भेद करण्याचा प्रघातच नाहीं. वयांत आलेल्या सर्व पुरूषवर्गास लष्करांत नोकरी करणें भाग असतें, परंतु ती नोकरी करावयास भाग पाडण्याकरितां जुलूमच करावा लागतो. अशा रीतीनें बळजोरीनें जमवलेल्या लोकांनां लढाईच्या कामावर पाठवावयाचें, किंवा इमारती बांधणें वगैरे इतर कामावर लावावयाचें हें त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतें. जेव्हां ब्रह्मी शेतकर्यांनां लढाईच्या कामावर जाण्याकरतां बोलावतात तेव्हां ते ग्रामाधिकार्यांच्या व प्रांतिक सुभेदारांच्या हुकुमाखालीं असतात. सरकारकडून त्यांनां पगार नसतो, मात्र लढाईचें सामान व अन्न हीं पुरविलीं जातात. सामान्यतः ब्रह्मी लोक शांतताप्रिय व शेतकींत विशेष मन घालणारे असल्यामुळें ही लष्करी नोकरी करण्यास ते नाखुष असणार हे साहजिक दिसतें. पण ते लोक काटक, आज्ञाधारक व हालअपेष्टा सोसणारे असून युद्धांत चांगले तरबेज होण्यासारखे असतात. त्यांचें देशी शस्त्र दास हें वापरण्यास मोठें कठिण असतें; शिवाय दुमुठी तरवार व भाले असतात; आणि परराष्ट्रांपासून बंदुकी वापरण्याचेंहि त्यांनीं उचलिलें आहे. ते चिलखतें कधीच वापरीत नाहींतसें दिसतें, आणि आपल्या अपुर्या पोषाखांत व सैल बांधल्यामुळें उडणार्या केसांनिशीं ते लढाईवर जातात. पूर्वीं ब्रह्मी लोकांत घोडदळ मुळींच नसें; परंतु मणिपूर व इतर उत्तरेकडील प्रांत जिंकून घेतल्यानंतर घोडदळ ठेवण्यास सुरवात झाली. १७९५ मध्यें या देशांतले सुमारें २००० घोडेस्वार राजानें ठेविले होते. घोडे ठेंगणेच पण चांगले मजबूत व दमदार असतात. ब्रह्मी राज्यांत हत्तींचा उपयोग लढाईचे कामाकडे करीत असल्याचें कधींच दिसत नाहीं. जातां जातां एवढें सांगतों कीं, राज्यांतल्या सर्व पशूंवर आपली पूर्ण मालकी आहे असें ब्रह्मी राजा समजत असतो. ब्रह्मी लोकांच्या युद्धपद्धतींत उत्तरभारतांतील इतरांच्या पद्धतींहून असा एक भेद आहे कीं, ब्रह्मी लोक मेढेकोटांचा उपयोग करतात. मेढेकोट म्हणजे किल्ल्यासारख्या चौकोनी इमारती असून त्यांनां बाहेर पडण्यास नऊ वाटा असतात व गोळ्या झाडण्याकरतां भोंकें ठेविलेलीं असतात. हे कोट बळकट टेक झाडांच्या बुंध्यांचे बांधतात. ब्रह्मी लोक असली तटबंदी करण्यांत चांगले वाकबगार असून त्यांकरितां ते चांगल्या सोईच्या जागा विशेषतः दलदलीच्या प्रदेशानजीक निवडून काढतात; व तेथें जातांना बरोबर सर्व सामग्री घेतात. तथापि इंग्लिशांबरोबर झालेल्या त्यांच्या युद्धांत इंग्लिशांच्या जोराच्या हल्ल्यांपुढें त्यांनां फार वेळ टिकाव धरवला नाहीं.