प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
मोन व कोल :— रॉयल एशिआटीक सोसायटीच्या सन १८७८ सालच्या जर्नलमधील 'पेगूचे मोन व मध्यहिंदुस्थानांतील कोल यांचा संबंध' या नांवाच्या निबंधांत फोर्बस म्हणतो कीं "पेगूचे मोन व मध्यहिंदुस्थानांतील कोल यांचा परस्परांशीं कांही संबंध असेल असें मानावयास जरी कांहीं आधार नाहीं, तरी त्यावरून ह्या दोघांत इतिहासपूर्वकालीं कोणत्याहि प्रकारचें दळणवळण नव्हतें असें कांही निष्पन्न होत नाहीं. १८७२ सालच्या ब्रिटिश ब्रह्मदेशाच्या खानेसुमारीवरील अहवालांत तलैंग राष्ट्र हें हिंदुस्थानांतून निघून ब्रह्मदेशांत एकत्र झालेल्या दोन परस्परभिन्न कुलांपासून बनलें असल्याचें दाखविलें आहे. तलैंग हें नांव तेलिंग किंवा तेलिंगण शब्दाचेंच भिन्न स्वरूप असून ज्यांनां तें आरंभीं लावण्यांत येत होतें ते लोक समुद्रमार्गानें येऊन थातुन येथें वसाहत करून राहिलेले द्राविड लोक होते असें मानण्यांत येतें. आर्य लोक येण्यापूर्वीं मध्यहिंदुस्थानांत जे कोल लोक होते तेंच तलैंग राष्ट्रांतील दुसरें व बहुधा मोठें कुल असावें. हे लोक हल्लीं स्वतःस 'मून' म्हणवितात असा समज आहे."
ब्रह्मदेशांत इकडून पूर्वीं गेलेल्या लोकांचा प्रथमपासूनचा इतिहास देण्यास येथें अवकाश नाहीं. म्हणून आतां आपण एकदम उत्तरकालीन प्रयाणाकडे वळूं.
ब्रिटिश लोकांनीं ब्रह्मदेश जिंकल्यानंतर जी एकंदर शेतकीची, व्यापाराची आणि उद्योगाची वृद्धि झाली तीमुळें येथून ब्रह्मदेशांत बर्याच लोकांचें प्रयाण झालें. कांहीं लोकांचें असें मत आहे कीं, ज्या अर्थी तें हिंदूंच्या स्वयंप्रेरणेने फारसें झालें नाहीं, त्या अर्थी तें अस्वाभाविक आणि अनित्य आहे. कित्येक लोकांचें असें मत आहे कीं, परकीय लोकांच्या या ओघामुळें ब्रह्मी लोक नाहींसे होऊन जातील. तथापि हीं दोन्हीं मतें खरीं नाहींत. बरेचसे लोक आपलें भाडें खर्चून जातात आणि ते जाण्यास कारण म्हटलें म्हणजे ब्रह्मदेशांत मिळणारे मजुरीचे दर आणि व्यापारी किफायत हीं अधिक चढाओढ असलेल्या हिंदुस्थानांतील दरांपेक्षां व किफायतीपेक्षां अधिक आहेत हें होय. 'स्वाभाविक' हा शब्द थोडासा भ्रामक आहे. साहसी भावना किंवा स्वयंप्रेरणा किफायतीची दृष्टि असेल तरच जागृत होते, एरवीं होत नाहीं. आणि किफायतीची दृष्टि स्वाभाविक नव्हे असें कोण म्हणेल ? यासाठीं किफायतीकरितां जे लोक आले ते स्वयंप्रेरणेनें आलेले नव्हत असें जें मत तद्देशस्थ कित्येक यूरोपीय अधिकार्यांनीं व्यक्त केलें आहे तें त्यांच्या मनुष्यस्वभावाच्या अज्ञानाचें द्योतक आहे. ब्रह्मी लोक वाहून जातील काय म्हणून ज्यांस फिकीर वाटते ते लोकहि एक गोष्ट विसरतात. ती हि कीं, ब्रह्मी लोक अधिक किफायतशीर धंद्यांकडे वळत असल्यामुळें परकीय येतात म्हणून त्यांच्या आगमनामुळें ब्रह्मी जातींचा संकोच होत नाहीं. शिवाय आलेल्या लोकांपैकीं बरेच लोक ब्रह्मी स्त्रियांशीं लग्नें देखील करितात आणि त्यामुळें बाहेरून आलेल्या लोकांचा ओघ ब्रह्मी लोकांच्या संवर्धनास कारण होतो. मुसुलमानांचा ओघ आणि त्यांचीं ब्रह्मी स्त्रियांशीं लग्नें होऊन मिश्र अशा जेरबादी जातीची झालेली वृद्धि या गोष्टी कदाचित् बर्याच अंशांनीं ब्रह्मी लोकांच्या ऐक्यास विघातक होतील हें खरें; तथापि हिंदूंचें प्रयाण तसें विघातक होईलसें दिसत नाहीं. बाहेरून आलेले चिनी लोक हे देखील ब्रह्मी लोकांशीं लग्नव्यवहार करितात आणि त्यांपैकीं पुष्कळ लोकांचे ब्रह्मी स्त्रियांपासून होणारे पुरुषवंशज जरी आपण चिनीच आहों असें सांगतात तरी बौद्धसंप्रदाय, ब्रह्मी स्त्रियांशीं जडलेला संबंध आणि स्त्रीवंशज आपण ब्रह्मी आहों अशीच भावना जागृत ठेवतात ही गोष्ट, या सर्व गोष्टी ब्रह्मी लोकांच्या राष्ट्रांत चिनी रक्त भविष्यकाळीं पूर्णपणें समाविष्ट होईल हें सुचवितात.
हिंदूंचें प्रयाण अथवा निवास त्या देशांतील भावी परिस्थिति कशी बनवील हें सांगावयाचें म्हटल्यास कल्पनेचाच आश्रय करावा लागतो. बरेचसे हिंदू ब्रह्मी लोकांत समाविष्ट होत आहेत किंवा पुढेंमागें होणार. हिंदू पुरुषांबरोबर हिंदू स्त्रिया तिकडे जात नाहींत या गोष्टीमुळें, ब्रह्मी स्त्रियांच्या मोकळेपणामुळें आणि तेथें गेलेल्या हिंदूंवरील जातिनिर्बंधांच्या दुर्बलतेमुळें हें टाळतां येण्याजोगें नाहीं. या परिस्थितीबद्दल हिंदूंनीं खेद करण्याचें कारण नाहीं. तिचा एक निराळा इष्ट परिणाम झाल्यावांचून राहणार नाहीं. असेंहि म्हणतां येईल की हिंदूंची स्वतंत्रसमाजरक्षणाच्या बाबतींतील दुर्बलता ही एक शक्ति आहे. हिंदु ही कल्पना केवळ सामाजिक असल्यामुळें आणि परमार्थसाधनपर नसल्यामुळें पुढेंमागें ब्रह्मदेशांतील सर्वच ब्रह्मी लोकांस आपण हिंदू आहों ही भावना उत्पन्न होऊं शकेल. ब्राह्मणपौरोहित्याची परंपरा प्रथमतः मिश्र लोकांत येईल आणि कदाचित सर्व ब्रह्मी लोकांतहि पसरेल. ती पसरण्यास अनुकूल अशी गोष्ट म्हटली म्हणजे तेथें असलेली देश्य ब्राह्मणांची वस्ती आणि त्यांचा ब्रह्मी जनतेस उपयोग ही होय. हिंदूंची वृद्धि ब्रह्मदेशांत तीन कारणांमुळें होते. पहिलें कारण नवीन लोकांचें येणें, दुसरें कारण मृत्यूपेक्षां जननाचें आधिक्य, आणि तिसरें कारण ब्रह्मी स्त्रियांशीं विवाह. यांपैकीं पहिलें कारण सर्वांत अधिक प्रबल आहे. हिंदू आणि ब्रह्मी स्त्रिया यांची लग्नें झाल्यामुळें आणि दोन हिंदू जातींमध्येंच अनेक लग्नें झाल्यामुळें ज्या हिंदूंस आपली जात सांगतां येत नाहीं अशांची संख्या बरीच आहे आणि ती सारखी वाढत आहे. आपली जात कोणती हें सांगण्यास नाखूष किंवा असमर्थ होते अशांची संख्या १९०१ सालीं ५८००० होती ती १९११ सालीं सुमारें एक लक्ष झाली आहे. हिंदूंची वस्ती शहरांत अधिक आहे आणि आज रंगून येथें बौद्धांपेक्षां हिंदू सुमारें अकरा हजारांनीं अधिक आहेत. रंगून येथें त्यांची वस्ती शेंकडा सदतीस आहे आणि सर्व शहरें घेतलीं तर तें शेंकडा अठरांहून अधिक भरतील. रंगून येथील वस्तींत हिंदूंचें प्रमाण किती आहे तें पुढील कोष्टकावरून कळून येईल.
रंगून येथील वस्तींत हिंदूंचें प्रमाण. | ||
रंगून येथील एकंदर वस्तीचें शेकडां प्रमाण | ||
वर्ष | बौद्ध | हिंदु |
१८८१ | ५०.०३ | २६.७४ |
१८९१ | ४४.२८ | ३२.०८ |
१९०१ | ३५. ६० | ३५.३३ |
१९११ | ३३.२३ | ३६.९४ |
ब्रह्मदेशाच्या नवीन परिस्थीतींत जे हिंदू जातात ते जातिनिर्बंध फारसे पाळीत नाहींत हें निराळें सांगण्याची अवश्यकता नाहीं. निर्बंध फार पाळणारा मनुष्य ब्रह्मदेशांत जातोच कशाला ? तथापि कांहि निर्बंध पाळले जातातच; आणि म्हणून तेथें गेलेल्या हिंदूंच्या समाजाचें स्वरूप आज काय आहे याची कल्पना येण्यास त्या समाजाकडे आपणांस थोडें बारकाईनें पाहिलें पाहिजे. जेथें हिंदूंची एकसारखीच वसति आहे तेथें काहीं पैतृक आचार ते पाळतात. जेथें बकाल वस्ती असते तेथें हे आचार ठेवणें शक्य नसतें. जे कांहीं ब्राह्मण ब्रह्मी लोकांनीं आपलीं कर्में चालविण्यासाठीं देशांत राखले आहेत ते स्वभावतःच थोडाबहुत आचार पाळतात.
ब्रह्मदेशांतील स्थानिक ब्राह्मणांविषयीं कांहीं माहिती येथें देऊं. ब्राह्मणांचें ब्रह्मी राजदरबारनें स्वागत प्रथम केव्हां केलें तें अजून कळलें नाहीं. ब्रह्मी इतिहासांत काळे व गोरे ब्राह्मण या नावांनें ब्राह्मणांचा उल्लेख वारंवार येतो. काळे ब्राह्मण म्हणजे देशांत अनेक शतकें असलेले व गोरे ब्राह्मण म्हणजे नवीन आलेले. राजा बोधवपय यानें आपल्या कारकीर्दींत (१७८१-१८१९) काशीहून कांहीं ब्राह्मण व ग्रंथ आणविले. या ब्राह्मणांनां हिंदू अजून ब्राह्मण म्हणून कबूल करतात आणि ते जुना आचार बर्याच अंशीं पाळतात व ब्रह्मी लोकांशीं लग्नव्यवहार करीत नाहींत. अजून देखील ब्रह्मी लोक लग्नें, प्रवास आणि उत्सव यांस मुहूर्त पहाण्यासाठीं त्यांची योजना करितात. ब्रह्मदेशच्या राजघराण्यांत तसेंच सरदारांत ब्राह्मणांस आणि श्रमणांस दक्षिणा देण्याची चाल होती. लग्नें लावण्यासाठीं ब्राह्मणांचा उपयोग होत होता. एक प्रकारचें उपाकर्म आणि कर्णवेधसंस्कार ब्राह्मणांकरवीं होत असे. जुन्या काळांत ब्रह्मी समाजांत ब्राह्मणांची मान्यता मोठी होती. ब्राह्मणांस ब्रह्मदेशांत पावन म्हणतात आणि ते निवृत्तमांस असतात अशी माहिती तेथें गेलेल्या नागपूरच्या एका कोंकणस्थ ब्राह्मण वकिलाकडून (कै. लक्ष्मणराव जोशी) मिळाली आहे.
ब्रह्मदेशांत गेलेल्या हिंदूंच्या जातींचे आंकडे बरोबर मिळणें कठिण आहे. जातीस महत्त्वच नसल्यामुळें जर कोणी हलक्या जातीच्या मनुष्यानें एखाद्या उच्च जातीचें नांव आपली जात म्हणून सांगितलें तर तें नाकारण्याची कोणी फिकीर करीत नाहीं, आणि यामुळें पुष्कळ लोकांस आपली जात निराळीच सांगण्याचा मोह पडतो. मद्रासहून नोकर म्हणून गेलेले लोक परैया म्हणून अंत्यजांची एक जात मद्रासेकडे आहे त्या जातीचे आहेत. हे १८९१ सालीं २० हजार होते, १९०१ सालीं पंचवीस हजार झाले आणि १९११ सालीं नाहींसेच झाले. कित्येकांनीं आपण ख्रिस्ती आहों म्हणून सांगितलें तर कित्येक लोकांनीं जातीचें नांवच दिलें नाहीं. पुष्कळ निरनिराळ्या जातींचे लोक आपण शूद्र आहों एवढेंच सांगतात. कित्येक ठिकाणीं हिंदुस्थानी, बंगाली, मद्रासी, तेलुगु, तामिळ अशीं भाषेचीं अगर प्रदेशाचीं नांवें जातींनीं दिलीं आहेत. या तर्हेची लोकांची आपली जात काय हें सांगण्याची नाखुषी, जातींच्या नांवाचा शिरोगणकांस असलेला अपरिचय इत्यादि कारणामुळें जातींचे आंकडे फार अविश्वसनीय झाले आहेत. जे थोडे आंकडे मिळतात ते येथें देतों.
ब्रह्मदेशांतील जाती. | |||
जाती | १९११ | १९०१ | वृद्धिक्षय |
सर्व | १४६९४१ | १५६३३५ | -९३९४ |
ब्राह्मण | २११७० | १५९२२ | +५२४८ |
क्षत्री | १०९४२ | १३४५४ | -२५१२ |
चेट्टी | १४३६६ | ६५०८ | +७८५८ |
कापू | १४९६४ | ११२१४ | +३७५० |
मल | २१२४८ | १८५२२ | +२७२६ |
मणिपुरी | ३३५३ | १११३२ | -७७७९ |
पदियच्ची | ११८०८ | ५८१७ | +५९९१ |
पल्ली | ५८६१ | १३२५० | -७३८९ |
शूद्र | २६८०६ | ४९४२१ | -२२६५ |
उडीया | १०४११ | ५०३५ | +५३७६ |
वेल्लाल | ६०६० | ६०१२ | -४८ |
ब्रह्मी लोकांच्या रीतीभातींचें वर्णन करण्यास येथें अवकाश नाहीं; तथापि ब्रह्मी लोकांचें हिंदुत्व पूर्णपणें पटण्यास कांहीं महत्त्वाचीं सध्यां दिसून येणारीं समाजसादृश्यें आणि इतर कांहीं गोष्टी येथें देतों. (१) मनुप्रणीत धर्मशास्त्र आपण वापरतों अशी ब्रह्मी लोकांची भावना आहे; आणि मनूच्या नांवावर खपणारे दोन-ग्रंथ त्यांचें आचारनियमन करितात. (२) ज्योतिष पाहण्यास व इतर अनेक कारणांसाठीं ते ब्राह्मणांचा उपयोग करितात. (३) त्यांच्यांतील तलैंग लोक हिंदुस्थानांतूनच पूर्वीं तिकडे गेले. (४) त्यांचा पारमार्थिक संप्रदाय हिंदुस्थानांतीलच आहे. (५) पुष्कळ ब्रह्मी लोक हिंदुस्थानांत यात्रेकरितां येतात. (६) आपलें विशिष्टत्व ब्रह्मी लोकांवर लादण्याचा हिंदू प्रयत्न करीत नाहींत त्यामुळें त्यांचे दरम्यान जरी जातिविषयक द्वेष असला तरी संस्कृतिविषयक दूरभाव नाहीं. (७) ब्रह्मी आणि हिंदू यांचीं लग्नें झालीं असतां जेरबादी लोकांप्रमाणें निराळी जात उत्पन्न होत नाहीं; यामुळें पुढें मागें ब्राह्मी लोकांत राष्ट्रीय जागृति उत्पन्न झाली म्हणजे मुसुलमानांपासून तुटकपणा आणि हिंदूंच्या बाबतींत तुटकपणाचा अभाव या गोष्टी त्यांच्यांत उत्पन्न होतील. (८) हिंदूंमध्यें जशीं कुलदैवतें आहेत तशीं त्यांच्यांत नाट नांवाचीं दैवतें आहेत.
ब्रह्मदेशांत नवीन गेलेल्या लोकांच्या आर्थिक स्थितीविषयींचें विवेचन वगळलें आहे. कां कीं, तेथें गेलेल्या लोकांसंबंधानें जे प्रश्न उपस्थित होतात तेच प्रश्न विदेशांत गेलेल्या आपल्या स्वजनांसंबंधानें सर्वत्र उपस्थित होतात. आणि यांपैकीं कांहीं प्रश्नांचें स्वरूप आपल्या देशांतच आपणांस पहावयास मिळतें. सिलोनमध्यें हिंदुस्थानचे गेलेले लाखों मजूर त्यांनां कामास लावणार्या यूरोपीय लोकांकडून कसे वागविले जातात इकडे नजर फेंकली असतां ब्रह्मदेशांतील एतद्विषयक प्रश्नाचें स्वरूप कांहींसें कळण्याजोगें आहे. चोहोंकडे कथा जवळ जवळ सारखीच आहे व यासंबंधींचें विवेचन पुढें साकल्यानें यावयाचें आहे.