प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
समाजस्वरूप आणि परंपरा :— परंपरा सांगावयाची म्हणजे मूलगृह, मूलगृहाची प्रयाणकालीन संस्कृति, विभक्त झाल्यानंतरहि मूलगृहाशीं म्हणजे तेथील वाङ्मयाशीं व विचारपरंपरेशीं संबंध या दृष्टींनीं सांगितली पाहिजे. या दृष्टींनीं सिंहलांतील चातुर्वर्ण्य, श्रौतस्मार्त विद्येशीं संबंध अगर संबंधाभाव यांवर विचार व्यक्त करण्याचा प्रसंग येतो. सिंहली समाजाचें स्वरूप अर्वाचीन कायद्यावरून समजत नाहीं. त्यासाठीं इतिहासाकडे लक्ष दिले पाहिजे. या इतिहासांत लोकांचा प्रयाणविषयक आणि संप्रदायविषयक इतिहास लक्षांत घेतला पाहिजे.
सिंहली लोकांचीं संस्कृति पूर्णपणें हिंदूच आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. आपल्या एखाद्या प्रांतांतील ब्राह्मण काढून टाकले व ब्राह्मणांचें ज्ञान ब्राह्मणेतरांस शिकविलें आणि त्या प्रांतावर यूरोपिअन संस्कृति आणून लादली तर त्या प्रांतास जें स्वरूप येईल तें स्वरूप आज सिंहली समाजास आलें आहे.
सिंहली लोकांमध्यें आपले पूर्वज ओरिसांतून आले अशी समजूत प्रचलित आहे आणि त्या समजूतीस "महावंसो" नांवाच्या लंकेच्या इतिहासांत नमूद केलेली दंतकथा कारण आहे. त्या दंतकथेंत, वंगदेशीय एका राजकन्येस एका सिंहापासून मुलगा झाला, आणि लोक त्याला सिंहल म्हणूं लागले, तो पुढें आपल्या अनुचरांसह लंकेंत आला आणि त्यानें लंका वसविली असें सांगितलें आहे.
सिंहली लोकांची भाषा संस्कृतजन्य आहे. त्यांच्या संस्कृतीचें साधारणपणें वर्णन करावयाचें म्हटलें म्हणजे येणेंप्रमाणें. त्यांची नित्य व्यवहाराची भाषा सिंहली आहे; पारमार्थिक ग्रंथांची भाषा पाली आहे; आणि शास्त्रग्रंथांची भाषा संस्कृत आहे. सिंहली लोक बौद्ध आहेत असें पाहून आपणांस असें वाटण्याचा संभव आहे कीं, यांच्या ग्रंथांत संस्कृतपेक्षां पालीचें मिश्रण अधिक असेल; पण तसें मुळींच नाहीं. कोणताहि चांगल्या प्रौढ भाषेंत लिहिलेला सिंहली उतार घेतला तर त्यांत पालीपेक्षां संस्कृत शब्दांचाच भरणा अधिक आढळतो. ते नवीन शब्द तयार करितात ते संस्कृत शब्द जोडून
तयार करितात. एवंच, पाली भाषा जरी त्यांची पारमार्थिक ज्ञान मिळविण्याची भाषा असली तरी ती त्यांच्या संस्कृतीची भाषा खास नाहीं.
सिंहलद्वीपांत सिंहली समाजांत ब्राह्मण कां नाहींत या प्रश्नाचें उत्तर येणेंप्रमाणें देता येईल. बुद्धाच्या कालीं वंगदेशांत ब्राह्मण नव्हते, तेथें भुतें काढणारें, मंत्र म्हणणारे लोक नसतील असें नाहीं; पण श्रौतस्मार्त विद्यांचें बृंहितस्वरूप जाणून त्यांची वंशपरंपरेनें जोपासना करणारा वर्ग तेथें नव्हता, असें वाटतें. {kosh आर्यन् लोकांच्या वसाहती हिंदुस्थांनात झाल्या त्या एकाच प्रकारच्या लोकांच्या नसून अनेक परस्परविरूद्ध धर्मांचें म्हणजे आचारांचें अवलंबन करणार्या आणि जीवनकलहांत एकमेकांविरूद्ध लढणार्या लोकांच्या होत्या. शक आणि त्यांचे उपाध्यें मग यांची वसाहत कीकट म्हणजे अर्वाचीन मगध देशात झाली, ती गौतमाच्या पूर्वीं अनेक पिढ्या झाली असली पाहिजे. गौतम आपल्या अनेक पिढ्यांचा उल्लेख आपल्या संवादांत करितो पण आपण कोणी परके आहोंत अशी भावनाहि त्यास नव्हती असें दिसतें. ही वसाहत ऋग्वेदकालींहि होती असें दिसतें. "(हे इंद्रा) कीकटांतील गाई तुजकरितां काय करितात ? सोमांत घालावयाचें दूध देत नाहींत, पायस शिजवीत नाहींत तूं प्रमगंदांचें धन आम्हांस आणून दे" असा ऋग्वेदांत (३,५३,१४) उल्लेख आहे. मगंद याचा अर्थ सावकार अथवा व्याजखोर असा सायणाचार्य़ांनी पुष्कळ खटाटोप करून केला आहे, तथापि मगांस देणारे ते मगंद असा अर्थ लटपट केल्याशिवाय करतां येतो. शिवाय मगांचे अनुयायी पारशी इंद्रास दैत्य समजतात ही गोष्ट त्याच अर्थास पुष्टि देते.
मंत्ररचना चालू होती त्याच वेळेस आर्यन् लोकांचा फैलाव चोहोंकडे झाला होता असें दिसतें. श्रौतकर्मांचें उपबृंहण व व्यवस्था बर्याच उत्तरकालीं झालीं आणि यज्ञधर्म, वेदविद्या यांची व्यवस्था पहाणार्या लोकांस गौरव, स्थैर्य आणि सामान्य जनतेपासून वियुक्तत्व उत्तरकालीं आलें. त्याच्या अगोदर पौरोहित्य करणारा परंतु विद्याहीन असा वर्ग असेल तो पुढें लयास गेला असावा. ओरिसा येथून सिंहलाबरोबर जे लोक लंकेत गेले त्या वेळेस मंत्रकाल पूर्ण संपला नसून श्रौतविद्या पूर्ण वाढून ब्राह्मणज्ञाति तयार झाली नसावी असें दिसतें.}*{/kosh} पंचगौड आणि पंचद्राविड हे ब्राह्मणांचे भेद ज्या वेळेस झाले त्या वेळेस ब्राह्मणजातीचें अस्तित्व बंगाल्यांत नसावेंसें दिसतें. सुमारें पंचवीस वर्षांपूर्वींपर्यंत बंगालच्या ब्राह्मणांचें ब्राह्मण्य काशीक्षेत्रांत पूर्णपणें मान्य झालें नव्हतें; कारण, काशी येथील इतर ब्राह्मण बंगाली ब्राह्मणांस पाण्यास शिवूं देत नसत. अद्यापि देखील कांशींतील अगदीं जुन्या प्रकारच्या लोकांत बंगाली ब्राह्मणांस पंचगौडांच्या दर्जाचे लेखीत नाहींत. वंगदेशांत ब्राह्मणांच्या अगोदरच बौद्ध भिक्षू गेले असावे असें वाटतें. ब्राह्मणजातीची संस्थापना होऊन तिचा बंगालपर्यंत प्रसार होण्यापूर्वींच म्हणजे अविकसित श्रौतस्मार्तधर्मकालींच कांही उत्कलदेशीय लोक सिंहलद्वीपांत गेले असावेत. जेव्हां अशोकानें धर्मप्रचारक पाठविले तेव्हां त्यांस मुळींच अडथळा झाला नाहीं, याचें बीज हेंच आहे. आर्यसंस्कृतिच्या इतिहासाचें अवलोकन केले असतां आपणांस असें दिसून येईल कीं, पुष्कळ ठिकाणीं बौद्ध संप्रदायाचा प्रसार अगोदर होई; आणि बौद्धांनंतर ब्राह्मण तेथें जाऊन आपलें बस्तान बसवीत. सयाममध्यें देखील ब्राह्मण म्हणविणारे लोक आहेत. जावा येथील हिंदू संस्कृति नष्ट झाली आहे; आणि त्यामुळें ब्राह्मणांचें अस्तित्व तेथें होतें काय यासंबंधाची कल्पना आज करीतां येत नाहीं. जावानजीकच्या बलिद्वीपांद "पादण्ड" या नांवानें तेथील ब्राह्मण संबोधिले जातात आणि ते तेथें अजूनहि सर्व वर्णांच्या स्त्रियांबरोबर लग्नव्यवहार करितात आणि त्या संततीस ब्राह्मण लेखिलें जातें. तेथें बौद्धहि आहेत. हिंदुस्थानच्या पूर्वभागाच्या सरहद्दीवर आणि हिमालयाच्या आसमंतात् ब्राह्मण अजूनहि प्रवेश करीत आहेत, आणि तेथील बौद्धसंप्रदायाची पिच्छेहाट होत आहे, हें त्या भागांवर हिंदुस्थान सरकारच्या अधिकार्यानें लिहिलेल्या ग्रंथावरून दिसून येतें. मलबारांत बौद्धांनीं प्रथम संस्कृतिप्रचारास सुरूवात केली व पुढें ब्राह्मणांनीं जाऊन तो भाग काबीज केला, असें तेथील पुराणेतिहास संशोधकांचें मत आहे. श्रौतविद्येचा विकास जेथें झाला तें स्थान सोडून देऊन भारतांत देखील पुष्कळ ठिकाणीं आणि भारतीय वस्ती जेथें गेली अशा ठिकाणीं धर्माच्या आवरणांचे तीन थर आहेत. पहिला थर आर्यांच्या अव्यवस्थित पैतृक धर्मांचा; दुसरा थर बुद्धाच्या धम्माचा आणि तिसरा ब्राह्मणांच्या श्रौत-स्मार्त धर्मांचा. जेथें अविकसित श्रौतस्मार्त धर्मांचा देखील मागमूस नाहीं आणि उत्तरकालीन ब्राह्मणांनीं पाय ठेवला नाहीं तेथें हिंदुत्वप्रसाराचें कार्य बौद्धांनींहि केलें आहे. हिंदुसमाज उर्फ हिंदुसंस्कृति हा सार्वभौम राजा होय; आणि हिंदुसमाजांत उत्पन्न झालेले संप्रदाय हे मांडलिक होत. मांडलिकांनीं प्रदेश काबीज केला म्हणजे कालांतरानें तेथें सार्वभौमाची सत्ता हळूहळू द्दष्टीस पडूं लागते. ब्राह्मण हे हिंदु संस्कृतीचे लढवय्ये होत. जो देश बौद्ध संप्रदायाखालीं आला तो हिंदुसमाजाचा अर्धामुर्धा भाग बने, आणि तेथें ब्राह्मणांनीं जाऊन आपले वर्चस्व स्थापन केलें म्हणजे तो पूर्णपणें हिंदु बने असें म्हणण्यास हरकत नाहीं. आपणांस बौद्धसमाजाकडे या दृष्टीनें अवलोकन केलें पाहिजे. बौद्धत्व आणि हिंदुत्व हीं एकमेकांपासून विभक्त नाहींत; आणि मनुष्य बौद्ध झाला म्हणजे तो हिंदुत्वापासून मुकला असेंहि नाही.
सिंहली संस्कृतीचें यथार्थ ज्ञान होण्यासाठीं सिंहली संस्कृतीचें हिंदुस्थानातील हिंदुत्वाशीं सादृश्य किती आहे हें पाहिलें पाहिजे.
प्रथमतः उपासना घेऊं. तामिळ हिंदू लोक बुद्धास विष्णूचा अवतार समजतात आणि बुद्धदर्शनास जातात. जेथें विष्णूचें अगर सुब्रह्मण्याचें देवालय नसेल तेथें बुद्धदर्शनानें वैष्णव आपली पारमार्थिक तृष्णा भागवितात. शिवाय आपण पुष्कळ विहारांचें अवलोकन केलें तर आपणांस असें आढळून येईल कीं, विहाराच्या आवारांत इतर हिंदू दैवतांची देवालयें देखील आहेत; आणि "कापुआ" नांवाच्या जातीचे गुरव त्या देवाचे पुजारी आहेत. मद्रास इलाख्यांत पुष्कळ ठिकाणीं देवाचें पुजारीपण या जातीकडेच आहे. पुष्कळ बौद्ध हिंदुदेवतांसहि नवस करितात; पण यांत आश्चर्य मानण्याजोगें कांही नाहीं. कारण, बौद्ध हे भुताखेतांसहि नवस करितात.
वेदांत वगैरे तत्त्वज्ञानाचा अंगीकार न करितां बौद्ध तत्त्वज्ञानाचा अंगीकार करणारा हिंदु तो बौद्ध अशी बौद्ध व्याख्या केली तर ती बरोबर होईल.
चातुर्वर्ण्याची कल्पना सिंहली बौद्धांतून नष्ट झाली नाहीं. सिंहली लोकांच्या धर्मशास्त्राप्रमाणें {kosh नीतिनिगंडुव या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताहि धर्मशास्त्रग्रंथ आमच्या अवलोकनांत आला नाहीं. सामान्य सिंहली लोकांत याखेरीज दुसरा ग्रंथ फारसा माहित नाहीं. दापुलु राजानें तयार करविलेला शासनग्रंथ आमच्या अवलोकनांत आला नाहीं.}*{/kosh} (म्हणजे नीतिनिगंडुव ग्रंथाप्रमाणें) सर्व सिंहली शूद्र आहेत.
सिंहलद्वीपांत पाली भाषेचा जसा अभ्यास होतो, तसा संस्कृत भाषेचाहि होतो. कोलंबोच्या परिकरांत "मलिगाकंद" येथील विद्योदय कॉलेजांत संस्कृत भाषा शिकवली जाते, आणि कांहीं सिंहली काशीक्षेत्रांतहि संस्कृत भाषा आणि वाङ्मय शिकण्यास जातात. येथें सामान्यपणें वाचण्याचे ग्रंथ म्हटले म्हणजे, रघुवंश आणि भक्तिशतक हे होत. भक्तिशतक हा ग्रंथ श्रीचंद्रभारती नांवाच्या एका भिक्षूनें लिहिला. हा भिक्षु सुमारें पांचशें वर्षापूर्वीं होऊन गेला असें म्हणतात. हा पूर्वीं सारस्वत ब्राह्मण होता. लंकेत आल्यानंतर तो बौद्ध झाला, आणि त्यास "बौद्धगमचक्रवर्ती" असा किताब राजानें दिला असेंहि सांगतात.
येथें अजूनहि चांगले संस्कृत पंडित आहेत. त्यांत सी. ए. शीलस्कंध, एम्. ज्ञानेश्वर यांचीं नांवें देतां येतील. शीलस्कंधानें "जानकीहरण" नांवाचा एक जुना ग्रंथ प्रकाशित केला. हा ग्रंथ उपलब्ध नव्हता; या ग्रंथावर एक सिंहली टीका मात्र होती, त्या टीकेच्या साहाय्यानें त्यानें टीकेंतील शब्द घेऊन मूळ ग्रंथास पुनर्जन्म दिला. अजून देखील संस्कृतमध्यें थोडीबहुत श्लोकरचना येथें होते.
आतां सिंहली लोकांतील जातिभेदाकडे वळूं. सविस्तर वर्णन देण्यास येथें अवकाश नाहीं, तथापि मुख्य गोष्टी येथें देतों.
चातुर्वर्ण्याची कल्पना बौद्धस्वरूपांत सिंहलद्वीपांत आहे हें सांगितलेंच आहे. त्यांचा आचारविचार आपल्यापेक्षां भिन्न असल्यास, सर्व सिंहली शूद्र आहेत हें त्याचें धर्मशास्त्रीय स्पष्टीकरण होय. हिंदुस्थानांत ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण राहीले असें धर्मशास्त्रज्ञांचें मत आहे. सिंहलद्वीपांत ब्राह्मण नाहींतच त्यामुळें सर्व लोक धर्मशास्त्राच्या दृष्टीनें एक वर्णीय आहेत.
ज्या विविध जाती या समाजांत असतील त्या सर्व शूद्रांचे आणि अतिशूद्रांचे भेद आहेत, असें धर्मशास्त्रीय दृष्टीनें तेथील जातिभेदांचें स्पष्टीकरण होय. धर्मशास्त्रीय दृष्टी सोडून आतां प्रत्यक्ष वस्तुस्थितीकडे वळूं.