प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली भाषा :— या भाषेच्या अभ्यासकानें प्रथम हातीं घेण्यासारखे कांहीं ग्रंथ व लेख खालीं टिपेंत दिले आहेत. {kosh सिंहलीविषयक प्रास्ताविक ग्रंथ व लेख : (१) जे. डी. आलविस-सिंहली भाषेच्या उत्पत्तिविषयीं J. R. A. S. C.B. V no. 13p. 143 ff. (1865-66) & no. 14p. 1 ff. (१867-70). (2) आर्. सी. चाइल्डर्स-सिंहली भाषेवरील नोटस् (१) नपुंसकलिंगी नामाच्या अनेकवचनी रूपांच्या घटनेबद्दल J.R.A.S.N.S VII p.35 ff. (1874-75), (२) सिंहली भाषेच्या संस्कृतपासूनच्या उत्पत्तिविषयीं पुरावा J.R.A.S.N.S. p.131 ff. (1876- 77). (३) इ. कोहन-सिंहली शब्दसंग्रहांतील सर्वांत जुना आर्यन् भाग S.K.B.A.W. Phil. Hist. Cl. 1879 II p. 399 ff. (४) इ. मुल्लर- सिंहली व्याकरणावरील लेख Colombo, Sessional Papers no. XXI for 1880, reprinted in I.A.XI. p. 198-220. या लेखांत विशेषतः वर्णोच्चारणविषयक नियमांविषयीं विवेचन आहे, (५) इ. मुल्लर-सिलोनमधील जुने अंकित लंडन १८८३ प्रस्तावना, पा. ८-१६. (६) राणासिंह-सिंहली भाषेचा हिंदुस्थानांतील अर्वाचीन आर्यन् भाषांशीं संबंध J.R.A.S.C.B. VII no. 25 p. 234 ff. (1882), (७) वु. गुने टिल्के सिंहली भाषेंतील विशेष प्रकार-अनियमित उपपद The Orientalist I. Part 4 pp. 73-80 (1880), (८) फ्रेड् मुल्लर-भाषाशास्त्राचा पाया, पुस्तक तिसरें पृ. १३६-१६१, विएन्ना १८८४; यांत सिंहली लोकांची भाषा या प्रकरणांत सिंहलींचें व्याकरण विस्तरशः दिलें आहे. (९) ए. मेंडिस गुणशेखर-सिंहली भाषेचें सविस्तर व्याकरण; यांत भाषाविषयक साधनांचा उपयुक्त संग्रह देऊन मधून मधून भाषेच्या इतिहासाची संक्षिप्त माहिती दिली आहे..}*{/kosh} गैजरनें या सामग्रीचा व इतर स्वतःच्या परिश्रमानें मिळविलेल्या साधनांचा उपयोग करून सिंहलीसंबंधांचा आपला सिद्धान्त स्पष्ट करून सांगितला आहे.
प्राकृत भाषेसंबंधीं सी. आलविसचें 'रोमन लिपींत सिंहली हँडबुक' कोलंबो १८८०; व सी. छोनावेलचें 'यूरोपियन विद्यार्थ्याकरितां सिंहली भाषेचें व्याकरण', कोलंबो १८८६; हीं पुस्तकें उपयुक्त आहेत.
शब्दकोश :— बी. क्लौघची सिंहली-इंग्लिश डिक्शनरी, कोलंबो १८८२; व कार्टरची इंग्लिश-सिंहली डिक्शनरी, कोलंबो १८९१.
गैजरनें आपल्या ग्रंथांत सिंहली ही प्राकृत भाषेपासून निघाली आहे हा मुद्दा प्रथम घेतला आहे. या मुद्यासाठीं सिंहलीचे वर्णोच्चारणविषयक व शब्दसिद्धिविषयक नियम त्यानें आरंभीं दिले आहेत. सर्व प्रकारची भाषासामग्री यानंतर संगृहीत करून शेवटीं सिंहली भाषेंचें विशेष स्वरूप व तिचें कुल या संबंधानें आपलें मत त्यानें विशद केलें आहे. या ग्रंथात उपयोगिलेली व्युत्पत्तिविषयक सामगी गैजरने बहुतेक आपल्या 'सिंहली भाषेची व्युत्पत्ति' (A.K.B.A.W.1 Ci Vol. 21, part 2, Munich 1877.) या ग्रंथांतून घेतलेली आहे. सिंहली भाषेची उत्पति व विकास या गोष्टींचा उलगडा करण्यासाठीं गैजरनें आजच्या आर्यवंशीय सिंहली लोकांच्या बोलण्याच्या भाषेकडे जसें लक्ष दिलें आहे तसें प्राचीन कालच्या भाषेकडे म्हणजे प्राचीन कोरींव लेख आणि वाङ्मयग्रंथ यांतील 'एळू' भाषेकडेहि लक्ष दिलें आहे. 'एळू' या शब्दाला दोन अर्थ आहेत. एक अर्थ, प्राचीन काळाची सिंहलाची राष्ट्री भाषा. ही भाषा इ. स. पूर्वीं ५०० च्या सुमारास झालेल्या आर्य लोकांच्या सिंहल-प्रवेशापासून सिंहलभूमीवर हळू हळू तयार होत गेली. 'एळू' शब्दाचा दुसरा अर्थ, सिंहली लोकांच्या काव्यग्रंथांची भाषा असा आहे. वर्तमानकाळीं सुद्धां कविता रचणारे एळू भाषेचाच उपयोग करितात. प्राचीन राष्ट्रीय एळू भाषा सध्यांच्या सिंहलींहून बरीच भिन्न आहे. सध्यांच्या सिंहलींत आढळत नाहींत अशीं पुष्कळ प्राचीन व्याकरणरूपें एळू भाषेंत येतात. हीं रूपे प्रचारांतील सिंहलीत फार क्वचित येतात, व येतात तेव्हां कांहीं विशिष्ट संबंध अथवा कथानक दर्शविण्याकरितां येतात.
काव्यग्रंथांची एळू भाषा ही परिभाषेच्या स्वरूपाची आहे. संस्कृत आणि पाली भाषांचा हिजवर पुष्कळ परिणाम झालेला दिसून येतो. हा परिणाम लेखनशैलींत विशेष नजरेस येतो.
संस्कृत आणि पाली शब्द सिंहली काव्यवाङ्मयांत वारंवार शिरतांना दिसून येतात. अशा पुष्कळ शब्दांचें पूर्णपणें सिंहलीभवन झालेलें आहे. कित्येकांचें सिंहलीभवन अर्धवट झालेलें आहे. या प्रकारचे संस्कृत-पाली शब्द व मूळ एळू शब्द हें आजच्या कवीचें मुख्य भांडवल असतें. या भांडवलाचा उपयोग करून आपली कृति करतांना कवि नवीं रूपें व नवे शब्दहि निर्माण करीत असतो व अशा रीतीनें आपल्या भांडवलांत भर टाकीत असतो.
संस्कृत आणि पाली या भाषांतून शब्द घेण्यांत आले आहेत ते अमुक एक काळांत घेण्यांत आले असें नाहीं, व केवळ वाङ्मयांतच त्यांचा प्रवेश झाला असेंहि नाहीं. या शब्दांचा प्रवेश बोलण्याच्या भाषेंत देखील झालेला आहे, व पूर्वकाळापासून सर्वकाळीं यांचा प्रवेश वाङ्मय-ग्रंथांत व प्रचारांतील भाषेंत होत आलेला आहे. यामुळें सिंहली भाषेस फारच मोठ्या प्रमाणावर चित्रविचित्र स्वरूप प्राप्त झालें आहे. प्रचारांच घोड्याला 'अस्वया' असा शब्द आहे. एळूमध्यें घोड्याला 'अस' म्हणतात. या 'अस्वया' असा शब्दाप्रमाणें अनेक विद्वता-दर्शक संस्कृतसंबद्ध शब्द प्रचारांत घेऊन जुनीं रूपें टाकून दिलेलीं आहेत.
सिंहलींत मूळ भाषा व उसनी भाषा असे भेद करूनच सिंहलींतील वर्णविकारविषयक नियमांची रचना केलेली आहे. सिंहलींतील मूळ शब्द कोणते व उसनवारीचे कोणते हें ठरवितांना कांहीं निर्णायक लक्षणांवर भर द्यावा लागतो. हीं लक्षणें नेहमींच उपयोगी पडतात असें नाहीं. उदाहरणार्थ, एखादा पूर्ण सिंहली पेहरावाचा शब्दहि वस्तुतः उसनवारीचा शब्द असूं शकतो. कारण, विद्वान लोक सिंहलीतील वर्णविकारनियमानुसार उसनवार शब्दाला बेमालूम असा सिंहली पेहराव चढवूं शकतात, व चढवितात. मात्र, एखादा शब्द एळूंत असून चालू सिंहलींत असेल आणि शिवाय सिंहलीशीं संलग्न अशा ज्या मालदिवी व वेद्ध पोटभाषा यांतहि सांपडेल तर तो मूळ भाषेपैकीं आहे याबद्दल संशय रहात नाहीं.
गैजरनें आपल्या 'सिंहलीची व्युत्पत्ति' याm ग्रंथांत मूळ सिंहली शब्दांची व उसनवार शब्दांची फोड चांगल्या तर्हेनें केली आहे.
खालीं कांहीं कोष्टकें देत आहों त्यावरून सिहंलीचें प्राकृत, पाली व संस्कृत या भाषांशीं कसें नातें आहे तें स्पष्ट होईल.
१. सिंहलींतील स्वर- त्यांचें स्वरूप व घटना.
(खालील कोष्टकांतील शब्दांवरून सिंहली शब्दांचीं मूळ रूपें पाली व प्राकृत शब्दांशीं अगदीं सदृश आहेत असें दिसून येईल. अँग वगैरे कांहीं शब्द मूळ पाली व प्राकृत शब्दांहून बरेच निराळे झालेले आहेत. याचें कारण सिंहलीचे विशिष्ट वर्णविकारविषयक नियम होत. 'अतुळ' पासून खालचे शब्द जे आहेत त्यांचीं मूळ सिंहली रूपें यांहून निराळीं होतीं तीं उत्तरकालीन सिंहलीच्या वर्णविकारनियमानुसार बदलून खालीं दिल्याप्रमाणें झालीं.)
मूळ सिंहली रुपें यांहून निराळी होती तीं उत्तरकालीन सिंहलीच्या वर्णविकारनियमानुसार बदलून कोष्टके |
येणेंप्रमाणें अपभ्रंशविषक अनेक उदाहरणें व नियम डॉ. गैजर यांनीं दिले आहेत. येथें शब्दविषयक अधिक विस्तार करण्यांस अवकाश नाहीं, तथापि एवढ्यावरून शब्दसादृश्य लक्षांत येईल.
भाषासादृश्य म्हणजे केवळ शब्दसादृश्य नव्हे. भाषेंत नवीन शब्द लवकर येतील पण नवीन प्रत्यय येत नाहींत. यासाठीं भाषेंतील नामें, क्रियापदें वगैरेंची रूपें तपासली पाहिजेत. ती तपासून डॉ. गैजर आपल्या निबंधांत असें मत देतात कीं, सिंहली नामांचे व क्रियापदांचे प्रत्यय प्राकृतांतीलच आहेत. सिंहलींतील सर्वनामें व संख्यावचकें शुद्ध आर्यन् आहेत. सर्वनामें व संख्यवाचकें अनार्यन् भाषांतून घेतलीं असावींत असें कांहींचें म्हणणें आहे तें चुकीचें आहे. या सर्वनामांचें व संख्यावाचकांचें जें विशिष्ट स्वरूप दिसतें तें सिंहली वर्णविकारशास्त्राच्या नियमांप्रमाणें मूळ आर्यन् शब्दांचें रूपांतर झाल्यानें दिसतें. क्रियापदांच्या कांहीं रूपांवरून अडचणी उत्पन्न होतात. परंतु हीं दिसण्यांत चमत्कारिक रुपेंहि आर्यन भाषेतून आली असें बर्याच अंशांनीं सिद्ध करणारा पुरावा डॉ. गैजर यांनीं दिला आहे.
ऐतिहासिक दृष्ट्या ज्यांचा खुलासा करतां येत नाहीं अशीं थोडींबहुत रूपें प्रत्येक भाषेंत आढळतात. तरीपण अशा रूपांवरून सामान्य सिद्धान्ताला बाध येतो असें कोणी समजत नाहीं. सिंहली भाषा व तिचें व्याकरण हीं एकदम समोर ठेवून विचार केल्यास सिंहली ही प्राकृत भाषेच्या आधारावर बनली असून शुद्ध आर्यन् कुलांतील भाषा आहे हा गैजरचा सिद्धान्त कोणालाहि पटेल यांत संशय नाहीं.
सिंहली भाषेंत कांहीं अनार्यन् भाषांतील शब्द वगैरे आहेत परंतु इतर भाषांतून निघालेल्या शब्दांच्या समावेशामुळें जर्मानिक भाषा जशा इंडोजर्मानिक कुलापासून भिन्न होत नाहींत, त्याचप्रमाणें परकीय शब्दांच्या अंतर्भावामुळें सिंहलीच्या आर्यन् स्वरूपास कांहीं बाध येत नाहीं.
हे उसनवारीचे शब्द मूळ आर्यन् भाषेंत पूर्णपणें आत्मसात् केलेले आहेत. याचें प्रत्यंतर म्हणजे त्यांनां विभक्तिप्रत्यय लावतांनां शुद्ध एळू शब्दांप्रमाणें त्यांचें रूपांतर झालेलें आहे.
यावरून हें उघड होतें कीं, इंग्रजीला जर्मानिक भाषा म्हणावयास जितपत आधार आहे, तितपत तरी खास सिंहलीला आर्यन् म्हणावयास आधार आहे. इंग्रजीत इतर कित्येंक भाषांतील शब्द आलेले आहेत तरी ती जर्मानिक भाषा आहे व तिचें भाषाशास्त्र जर्मानिक भाषाशास्त्राच्या पोटांत येतें असें आम्ही म्हणतो. इंग्रजींत जितके अन्-जर्मानिक शब्द आहेत तितके कांहीं सिंहलींत अनार्यन् शब्द नाहींत. तेव्हां सिंहलींत परकीय शब्द असले तरी वर वर्णिलेल्या तिच्या सामान्य स्वरूपामुळें ती मूलतः आर्यन् भाषा आहे व अर्वाचीन इंडो-आर्यन् भाषांमध्यें हिंदी किंवा मराठी इतकेंच तिला महत्त्वाचें स्थान आहे हें कबूल करणें प्राप्त आहे.
सिंहली भाषेंत अनार्यन् व विदेशी शब्द आहेत त्यांची आतां थोडीशी ओळख करून घेऊं.