प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली वाङ्मय :— पाली आणि सिंहली यांच्या अन्योन्याश्रयामुळें पाली वाङ्मयाइतकें नसलें तरी बरेंचसें महत्त्व सिंहली वाङ्मयास आहे. सर्व हिंदुस्थानभर अशी एक प्रवृत्ति आहे कीं, पुष्कळदां महत्त्वाचे ग्रंथ किंवा विचार देशी भाषेंत व्यक्त होतात तथापि त्यांस सार्वत्रिकता येते ती संस्कृत भाषेमुळें येते. बौद्ध संप्रदायास हिंदुस्थानांत येऊं लागलेलें महत्त्व त्या संप्रदायाच्या संस्कृत गंथप्रवाहाच्या चढउतारानें मोजतां येण्याजोगें आहे. देश्यभाषा आणि संस्कृतभाषा यांचा जो संबंध आहे तोच संबंध सिंहली भाषा व संस्कृत यांचा आहे. तथापि ज्या अनेक प्रदेशांत पाली भाषा बौद्ध संप्रदायाबरोबर पसरली त्याबरोबर संस्कृत व प्राकृत यांमध्यें दिसून येणारा अन्योन्याश्रय पाली व देश्यभाषा यांमध्येंहि दृग्गोचर होऊं लागला. सिंहली वाङ्मयाचें पृथक्करण करितांना सिंहलांतील निरनिराळ्या भाषांतील वाङ्मयें व त्यांचे परस्परसंबंध आणि सर्व वाङ्मयें मिळून होणारें जें द्वीपवाङ्मय त्याचा द्वीपस्थांच्या सामुच्चयिक आयुष्याशीं संबंध हे तपासले पाहिजेत.
द्वीपाचें वाङ्मय तपासतांना वाङ्मयाचे खालील थर लक्षांत घेतले पाहिजेत.
(१) सिंहलद्वीपस्थांनीं दुसरीकडून उचललेलें आणि त्यांच्या वापरण्यांत असलेलें संस्कृत, पाली व तामिळ वाङ्मय.
(२) सिंहलद्वीपांत तयार झालेलें संस्कृत वाङ्मय.
(३) सिंहलद्वीपांत तयार झालेलें पाली वाङ्मय.
(४) सिंहलद्वीपांत तयार झालेलें सिंहली वाङ्मय.
(५) सिंहलद्वीपांतील तामिळ वाङ्मय.
(६) सिंहलद्वीपांतील मुसुलमानी वाङ्मय.
(७) सिंहलद्वीपांतील इंग्रजी वाङ्मय.
यांचा परस्परांशीं संबंध, भारतीय संस्कृतीला पोषक अशा सर्व वाङ्मयाशीं संबंध आणि द्वीपस्थांच्या सामुच्चयिक आयुष्याशीं संबंध हे सर्व आपणांस ज्ञातव्य आहेत.
सिंहलद्वीपांतील तामिळ, मुसुलमानी आणि इंग्रजी वाङ्मयांनां हिंदुस्थान आणि जग यांच्या प्राचीनकांलीं स्थापित झालेल्या संबंधाच्या इतिहासांत स्थान नाहीं म्हणून वर सांगितल्यापैकीं पहिले चारच थर विचारांत घेतों. भारतीय वाङ्मय आणि द्वीपवाङ्मय यांचा संस्कृतिसंशोधनासाठीं तौलनिक अभ्यास करतांना भारतीय वाङ्मय या समुच्चयामध्यें जे अनेक उपसमुच्चय दृष्टीस पडतात, त्यांपैकीं कोणत्या समुच्चयाशीं विवक्षित प्रकारच्या द्वीपवाङ्मयाचा संबंध आहे याचा विचार करावा. कांहीं संबंध दृष्टीस पडल्यास पुन्हां असा प्रश्न करावा कीं, हा संबंध कोणत्या प्रकारचा आहे ? (अ) भारतीय वाङ्मयावर किंवा त्याच्या अंशावर द्वीपवाङ्मयाचा कांहीं परिणाम झाला आहे काय ? (आ) भारतीय वाङ्मय, भारतीय पारमार्थिक विचार किंवा विद्या यांच्या प्रसाराला उपयोगी असें द्वीपवाङ्मय कोणेते ? (इ) सिंहली संस्कृति ही भारतीय संस्कृतीची उपसंस्कृति शोभते असें दाखविणारे द्वीपवाङ्मयावर आणि भाषेवर कोणते संस्कार झाले ? (ई) सिंहलद्वीपस्थांसच विशेषतः उपयोगी आणि केवळ सिंहलविषयक अगर त्यांची तात्कालिक गरज भागविणारें असें त्यांच्या देशांतील वाङ्मय कोणतें ? प्रस्तुत चार प्रश्न सिंहली भाषेचे आणि द्वीपवाङ्मयक्षेत्राचें अवलोकन करतांना लक्षांत ठेवले पाहिजेत. या प्रश्नांचीं उत्तरें सामान्यतः येणेंप्रमाणें येतील. (अ) भारतीय वाङ्मयावर सिंहली वाङ्मयाचा फारच थोडा परिणाम झाला. बौद्धांचें सांप्रदायिक वाङ्मय याला अपवाद आहे. आज बौद्धांचे पाली ग्रंथ जे उपलब्ध आहेत ते सिंहली आवृत्तीच्या द्वारेंच उपलब्ध आहेत. (आ) सिंहलद्वीपामध्यें भारतीय विद्यांच्या स्थानिक प्रसारार्थ उत्पन्न झालेलें वाङ्मय मात्र पुष्कळ आहे. (इ) हें प्रसारार्थ वाङ्मय सिंहली संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा अंश आहे असें म्हणण्यास प्रवृत्त करतें. भाषेवरील संस्कार हे वाङ्मयमूलक होत पण ते अधिक काळपर्यंत टिकतात. सिंहली भाषेच्या अभ्यासास या दृष्टीनें महत्त्व कमी पण सिंहली जनतेचा भारतीयापासून विभक्त होण्याच्या काळ निश्चित करण्याकडे या अभ्यासाचा उपयोग असल्यानें त्याचें महत्त्व आहे. (ई) सिंहली लोकांनीं तात्कालीक उपयोगासाठीं जें वाङ्मय निर्माण केलें तें फारच मोठें आहे.
ऐतिहासिक दृष्टीनें या चवथ्या प्रकारच्या वाङ्मयाचें महत्त्व फारसें नाहीं असें प्रथमतः वाटेल. तथापि हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, जे कांहीं वाङ्मय स्वतःपुरतें म्हणून तयार होतें त्याचा उपयोग पुष्कळदां इतरांनां होतो आणि जें वाङ्मय सार्वलौकिक हेतूनें तयार होतें तें सार्वलौकिक वाङ्मयाच्या महासागरांत बुडूनहि जातें आणि त्याच्याठायीं वैशिष्टहि फारसें नसल्यानें त्याच्याकडे ऐतिहासिक संशोधकाचें चित्त वेधत नाहीं. महावंसो, दीपवंसो यांसारखे ग्रंथ त्यांच्या संप्रदायाच्या दृष्टीनें केवळ स्थानिक महत्त्वाचे म्हणून तयार केले गेले पण आज त्यांचें महत्त्व फार मोठें आहे. उत्पादकाच्या दृष्टीनें सार्वलौकिकत्व आणि भावी इतिहासकाराच्या दृष्टीनें सार्वलौकिकत्व आणि महत्त्व हीं निरनिराळीं आहेत.
सिंहलद्वीपाच्या वाङ्मयाचा ऐतिहासिक विचार करावयाचा झाल्यास आपणांस तामिळ ग्रंथांपेक्षां सिंहली ग्रंथांच्या आणि तेथें झालेल्या पाली ग्रंथांच्या उद्भवाकडेसच प्रथम लक्ष दिलें पाहिजे. द्वीपांत तामिळ भाषेचा प्रवेश उत्तरकालीं झाला. त्याच्या अगोदर पाली व सिंहली वाङ्मयें निर्माण होऊं लागलीं होतीं. या उद्भवप्राथम्याच्या दृष्टीनें द्वीपवाङ्मयाचा विचार करतांना पाली व सिंहली वाङ्मयासच अग्रस्थान देणें जरूर आहे. द्वीपांतील तामिळ वाङ्मयाचा इतिहास पुढें तामिळ वाङ्मयाच्या एकंदर इतिहासाबरोबर देणार आहों. येथें पाली व सिंहली वाङ्मयाचें अवलोकन करूं.