प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली काव्यग्रंथ :— सरतेशेवटीं १३ व्या व १४ व्या शतकांतील काव्यग्रंथांबद्दल लिहावयाचें. हीं काव्यें निर्यमक असून त्यांतील विषय बहुतेक जातकग्रंथांतुन घेतलेले असतात. सर्वांत जुनें काव्य ससदावत हें असावें. तें ससजातकाच्या आधारें लिहिलेलें आहे, आणि तें १३ व्या शताकाच्या आरंभींचें लीलावती राणीच्या कारकीर्दींतलें आहे. काव्यग्रंथामध्यें हा ग्रंथ आदर्थवत् मानतात, त्याची हस्तप्रत उपलब्ध आहे, परंतु ग्रंथ अद्याप छापून प्रसिद्ध झाल्याचें कळलें नाहीं; व त्याचा कर्ता कोण हेंहि माहित नाहीं. दुसरें काव्य कुसदावत अथवा कवसिळुमिण हें पराक्रमबाहु या राजानें केलेलें आहे असें म्हणतात. हें कुस-जातक याचें रूपान्तर असून सस-दावतानंतर थोड्याच काळानें झालेलें आहे. कवसिळुमिणची एक आवृत्ति कोलंबोमध्यें १८९९ मध्यें निघालेली आहे. मुवदेवदावत हें काव्य त्यानंतर थोड्या वर्षांनीं झालेलें असावें. त्याचें कथानक मखादेवजातकांतून घेतलेलें आहे. याचाहि कर्ता कोण तें माहित नाहीं. तथापि पूर्वींच्या सिंहली काव्यांची भाषा कृत्रिम व बरीच अतिशयोक्तिपूर्ण असून ती त्या काळींहि पूर्ण विकास पावलेली होती व तसल्याच भाषेचा सामान्यतः उपयोग करीत असत ही गोष्ट पुढें दिलेल्या कांहीं पद्यांच्या भाषांतरावरून दिसून येईल. या पद्यांत मिथिलानगरीचें वर्णन आहे.
“जंबुद्वीप हा अविमल (जल) प्रदेश अनेक नगररूपी पद्मपत्रांनीं सुशोभित झालेला असून त्यांतील सोनेरी कमळाच्या मोठ्या फळाच्या देंठाप्रमाणें ही मिथिला नगरी शोभत आहे."
"या कीर्तिसंपन्न नगरींतील राजवाड्यांच्या खिडक्यांच्या आंतल्या बाजूस सूर्य आपल्या करांनीं जेव्हां सुंदर राजस्त्रियांच्या कमलमुखांस स्पर्श करतो त्यावेळीं ते राजवाडे उंच उंच असल्याबद्दल त्याला फार आंनद होतो."
"जेव्हां हाच कैलासपर्वत कीं काय, असा विचार मनांत येऊन हर, त्या राजवाड्यांतील अगदीं उंच व भव्य खोल्यांच्या सन्निध येतो तेव्हां आंतील प्रकाशामुळें त्याच्या केंसांतील चंद्रकोर अत्यंत प्रकाशित दिसूं लागते."
लोकोपकारय व दळदासिरित हीं दोन काव्यें वर उल्लेखिलेल्या काळांतील आहेत किंवा नाहींत याबद्दल शंका आहे. पहिलें काव्य म्हणजे एक दृष्टान्तरूप कथांचा संग्रह असून तो मयूरपाद यानें लिहिलेला असावा असें कित्येंकांचे मत आहे. या कल्पनेनें त्याचा काळ १३ व्या शतकाचें उत्तरार्ध हा येतो. तथापि कांहींचें मत तो याच्या पुढल्या काळांतला असावा असें पडतें. परंतु या काव्यांतील कविता निर्यमक आहे ही गोष्ट पहिल्या मताला पुष्टीकारक आहे. हीच गोष्ट दळदासिरित या काव्यालाहि लागू आहे; कारण तेंहि निर्यमकच काव्य आहे. त्यांतील विषय दंतावशेषाच्या गोष्टीबद्दलचा असून तें ४ थ्या शतकांतील (४ थ्या शतकाच्या आरंभींच्या) पराक्रमबाहु राजानें लिहिलेलें आहे असें परंपरेनें मानण्यांत येतें. दळदावंसय व दळदासिरित यांचा घोंटाळा करतां कामा नयें; हीं दोन्ही अगदीं भिन्न आहेत. दळदासिरिताची एकहि आवृत्ति असल्याचें आढळत नाहीं.
वाङ्मय-कालाच्या या विभागाच्या अखेरीचें एक काव्य आहे; त्याचा कर्ता माहित नाहीं; परंतु अनेक कारणांस्तव तें काव्य कात्र लक्ष वेधणारें आहे; त्याचें नांव मयूर-संदेशय. हें काव्य ५ वा भुवनेकबाहु या राजाच्या कारकीर्दींत (१४ व्या शतकाच्या उत्तरार्धांत) रचलेलें आहे; व त्यांत त्या राजाच्या नांवाचाहि उल्लेख आहे, तो १४ व्या पद्यांत आहे. सयमक काव्याचा हा सर्वांत जुना मासला आहे. तसेंच 'दूत' (मेघदूतासारख्या) काव्यमालेंतील हें अगदीं पहिलें काव्य आहे. या प्रकारच्या काव्यांनां आधार म्हणजे मेघदुतकाव्यांतील नितान्त रमणीयत्त्वास पोंचलेल्या काव्यकल्पनेचा असून त्यावरुन सिंहली काव्यकलेवरहि कालिदासाचा किती परिणाम झालेला आहे तें स्पष्ट दिसतें. या काव्यांत तामिळ लोकांबरोबर अलगकोराण हा आपल्या सैन्यानिशीं लढाई करीत असतां त्यांत त्याला जय मिळावा म्हणून त्याचें मंत्रिमंडळ गंगसिरीपुर (गंपोल) येथून निघून देविनुवर (दोंद्र) या श्रीविष्णूच्या पवित्र स्थानाला जाऊन तेथें त्याची विजयप्राप्तीकरतां प्रार्थना करीत आहे असें वर्णन आहे. निकायसंग्रहामध्यें अलगकोराण याचें नांव आलेलें आहे. ५वा भुवनेकबाहु याच्या पूर्वींच्या कारकीर्दींत रायिगंनुवर येथें तो सरसुभेदार होता.
१५ व्यापासून १७ व्या शतकापर्यंत :— (संदेशकाव्यें, काव्यशेखरय, बुधगुणालंकार, लोवाडसंगराव, सारसंग्रह, शब्दकोश, कुसजातक, सुभाषित, परंगिहटन, महाहटन, कोस्तंतीनुहटन, सद्धर्मदास इ.)
या काळांतील वाङ्मयामध्यें देखील काव्यग्रंथांचा निर्देश प्रामुख्यानें येतो. १५ व्या शतकापासून सिंहली काव्यकलेंतील बहारीच्या काळास सुरवात होते. सिलोनांतील कविमंडलरुपी आकाशपटलावर श्रीराहुलथे हा अगदीं पहिल्या प्रतीचा तारा चमकत आहे. हा ६ वा पराक्रमबाहु याच्या कारकीर्दींत (१५ व्या शतकाच्या पूर्वार्धांत) होऊन गेला. दक्षिणेकडील प्रांतांतल्या ज्या जिल्ह्यांत तो होता त्या जिल्हाच्या नांवावरून त्याला तोटगमुव असें म्हणण्याचा परिपाठ आहे. त्याच्यापूर्वींच ठरून गेलेल्या काव्यकलेंतील नमुन्याबरहुकूम त्यानें जीं उत्कृष्ट काव्यें केलेलीं आहेत त्याबद्दल त्याची प्रसिद्धि आहे. त्यानें कोणताहि नवीन मार्ग घालून दिला नाहीं. मयूरसंदेश या काव्यापासून सयमक कविता लिहिण्यास जो आरंभ झाला तो क्रम सिंहली काव्यांमध्यें पुढें तसाच चालू राहिला. सर्व संदेशकाव्यांतील अत्यंत प्रसिद्ध साळलिहिणि संदेशय हें काव्य तोटगमुव यानेंच निर्माण केलेलें आहे. या काव्यांत १०४ पद्यें आहेत व त्यांतील मजकूर असा आहे :— नुल्लुरुलुवय नांवाचा प्रधान एका मैनेस जयवर्धनाहून (म्हणजे कोट्टेसो कोलंबोहून) कालनीय येथें श्रीबिभीषणाच्या देवालयांत पाठवितो व तेथें उलकुद नांवाच्या राजकन्येला मुलगा देण्याबद्दल त्या देवाची प्रार्थना करण्यास सांगतो. ती राजकन्या त्या प्रधानाची बायको असावी. आरंभींच्या पद्यांत त्या मैनेची प्रथम स्तुति केलेली असून नंतर ती मैना ज्या मार्गानें जावयाची त्या मार्गाचें अगदीं मेघदूतकाव्यांतल्या नमुन्याबरहुकूम वर्णन दिलेलें आहे; आणि त्या मैनेनें देवतेची जी प्रार्थना करावयाची ती सांगितलेली आहे.
तोटगमुवाचें परवी-संदेशय म्हणजे पारावत-दूत म्हणून काव्य आहे. मयूरसंदेशकाव्यांतल्याप्रमाणेंच यांत दूताला दोंद्र येथील श्रीविष्णूकडे जयवर्धनानें पाठविलें असून पराक्रमबाहु, त्याचा बंधु व राजाची कन्या चंद्रावती यांच्यावर भगवत्कृपा असावी अशी प्रार्थना करण्यास सांगितलें आहे.
तोटगमुवानें जातकग्रंथांतील माहितीवरून आपलें काव्यशेखरय हें १४ सर्गांचें मोठें काव्य तयार केलें. या काव्यांत बोधिसत्त्वाची तो सेनकपंडीत झाला होता, त्या जन्माची कथा (सेनकजातक) आहे. त्यांतच आलेल्या एका वाक्यावरून असें दिसतें कीं, तें काव्या ६ वा परकुंब (पराक्रमबाहु) याच्या कारकीर्दीच्या ३४ वें वर्षीं पूर्ण झालें. ६ वा पराक्रमबाहु राजा याच्या स्तुतिपर असलेलें परकुंब-सिरित या नांवाचें काव्यहि याच कवीचें असें मानतात. परंतु तें त्यांनेच केलेलें आहे अशाबद्दल खात्री नाहीं. तथापि वर दिलेल्या राजाच्याच कारकीर्दींत तें झालेलें आहे याबद्दल मात्र शंका नाहीं. या काव्याची एखादी आवृत्ति प्रसिद्ध झालेली आहे किंवा काय तें कळत नाहीं.
तोटगमुव याचे समकालीन पण त्याच्याहून जरा वयानें लहान असे विदागमथेर व वात्ताव हे होत. त्यांपैकीं विदागमथेर बुधगुणालंकार याचा कर्ता आहे. त्यांत ६१२ कवितांमध्यें बुद्धाची स्तुती व त्याचीं तत्त्वें दिलेलीं आहेत. त्यांतील ६०९ व्या कवितेंत असें दिलेलें आहे कीं, बुद्धानंतर २०१५ वर्षांनीं व ६ व्या भुवनेकबाहु याच्या कराकीर्दींतील तिसर्या वर्षीं इ. स. १४७२ मध्यें तें काव्य पूर्ण झालेलें आहे. वात्ताव हा तोटगमुवाचा शिष्य व कुलुनागल प्रांतांतील धर्मोपदेशक असून तो गुत्तिल-काव्य याचा कर्ता आहे; व हें काव्य म्हणजे एळु-वाङ्मयांतील एक नमुनेदार ग्रंथ आहे. यांत एकंदर ५११ समयक कविता असून तें गुत्तिलजातकाचें पद्यमय रूपांतर आहे.
आतां ज्या काव्यांचे कर्ते कोण याबद्दल निश्चित माहिती नाहीं आणि ज्यांचे कर्ते अजिबातच माहित नाहींत अशा कांहीं काव्यांकडे वळूं. लोवाडसंगराव हें काव्य १३५ कवितांचें असून सामान्य लोकभाषेंत लिहिलेलें आहे; त्यांत बुद्धाच्या उपदेशाप्रमाणें वागण्यास सांगितलें आहे; व तें विदागम येथील मठांतल्या एका भिक्षूनें केलेलें आहे. परंतु पूर्वीं सांगितलेल्या विदागम कवीचें नांव ह्यावरूनच पडलेलें आहे किंवा काय हें निश्चित ठरविणें फार कठिण आहे. तसें ठरल्यास बुधगुणालंकारण याचा कर्ता आणि हा एकच असें म्हणतां येईल. या अनिश्चित वर्गांतच खालील तीन संदेशकाव्यांचा उल्लेख केला पाहिजे. यांतील अद्याप अप्रकाशित असें जें तिसरे संदेशय म्हणजे हंस-दूत काव्य त्याला विशेषसा मान नाहीं. दुसरें गिर-संदेशय (कीरसंदेश), यांत एक दूत बनविलेला पोपट, तोटगमु मठांमधील श्रीराहुलाकडे जातो व तेथें त्या मठांतला मुख्य भिक्षु श्रीनाथ याच्याजवळ पराक्रमबाहु व त्याचें घराणें यांवर भगवत्कृपा असावी अशी प्रार्थना करण्याबद्दल त्याची याचना करतो. हें काव्य तोटगमुवाचा शिष्य व अनुकरणकर्ता अशा एखाद्या इसमाचें असावें. जयवर्धनापासून श्रीराहुलाच्या मठापर्यंतच्या मार्गाचें मोठें सुंदर वर्णन यांत केलेलें आहे. जयवर्धनाकडे स्वतः काव्यकर्त्यानें प्रवास केलेला आहे. कोवुल-संदेशय म्हणजे "कोकिळ-दुत" हें काव्य अद्यापि हस्तलिखित स्थितींत असून तें देविनुवर (दोंद्र) येथील मठांतल्या एका भिक्षूनें ६ व्या पराक्रमबाहूचा मुलगा युवराज सपुमकुमरू याला उद्देशून लिहिलेलें आहे. त्यांत यापापतुन (जाफना) जिंकून घेतल्याबद्दल त्या युवराजाचें अभिनंदन केलेलें आहे; ते शहर काबीज केलें त्या प्रकारचें सुंदर वर्णन व सिलोनमधील दोंद्रपासून जाफनापर्यंतच्या सर्व मार्गाचें सविस्तर वर्णन यांत आहे.