प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली लोकांतील जातिभेद — सिंहली लोकांत जातिभेद नाहीं असें मुळींच नाहीं. बुद्धाचा हेतु जातिभेद नष्ट करण्याचा नव्हता, याचें विवेचन प्रसंगानुसार येईलच. सिंहली लोकांत जातिभेद जवळजवळ आपल्याइतकाच तीव्र आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. ब्राह्मणांनीं आपल्या ग्रंथांनीं जातिभेद उत्पन्न केला हें विधान किती चुकीचें आहे हें पाहण्यास सिंहली लोकांच्या समाजस्थितींचें अवलोकन केलें म्हणजे पुरे आहे. धर्मशास्त्र तर त्या सर्वांस एकाच वर्णांत घालून त्यांची एकी अपेक्षितें. विशिष्ट जातींचें उच्चत्व आणि नीचत्व त्यांच्या अधिकारावर, संस्कृतीवर आणि त्यांनीं स्वतःच्या उद्धारार्थ केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतें.
सिंहली लोकांत प्रामुख्यानें वागणारी व उच्च समजली जाणारी जात म्हटली म्हणजे "गोईगम" ही होय. ही जात वेल्लालांच्या बरोबरीची आहे हें तत्त्व वेल्लालांनीं आणि इतरांनीं मान्य केलें आहे. कोणत्याहि जातीला आपलें उच्चत्व स्थापन करावयाचें झालें म्हणजे त्याला कांहींतरी कारण हें शोधिलेंच पाहिजे. कारण देतांना आम्ही श्रीमंत आहों, आणि स्वच्छतेनें राहतों एवढ्याकरितां आम्हांस तुम्ही उच्च माना, एवढेंच कारण पुरत नाहीं. कांही जुन्या सर्वमान्य तत्त्वांची आणि आधुनिक परिस्थितीची सांगड घालावी लागते, काल्पनिक इतिहास उत्पन्न करावा लागतो आणि स्वतःचें उच्चत्व फार जुन्या कारणांनीं स्थापित झालें आहे असें भासवावें लागतें. "नीतिनिगंडुव" नांवाच्या सिंहली धर्मशास्त्रग्रंथांत पृथ्वीची उत्पत्ति आणि जातींची उत्पत्ति देतांना "गोवीय" उर्फ "गोईगम" जातीच्या श्रेष्ठतेचें कारण दिलें आहे तें येणेप्रमाणे :—
"सिंहलद्वीपांत ब्राह्मणादि तीन वर्ग नाहींत. गोवीय हीच उच्च जात आहे. गोवीय जातींत पूर्वीं येथें आलेल्या ब्राह्मणांनीं लग्नें केलीं आणि ब्राह्मण गोवीयांत मिसळून गेले तेणेंकरून गोवीय ही उच्च जात आहे."
आजचे गोईगम आपणांस उच्च शूद्र म्हणवून घ्यावयास तयार नाहींत हे मात्र लक्षांत ठेविलें पाहिजे.
निरनिराळ्या जातींनीं राजाबरोबर आणि उच्च जातीशीं कसें वागावें या संबंधानें जितके कठोर नियम लंकेंत होते तितके दुसरे कोठें नसतील. जातीच केवळ हलक्या होत्या असें नाहीं, तर जातींच्या अनुसार गांवांचाहि दर्जा ठरत असे. उदाहरणार्थ
गबदगाम=हें श्रेष्ठ प्रकारचें गांव होय. गबदगाम म्हणजे राजाचें गांव.
विहारगाम=विहाराच्या पोटगीसाठीं राखलेलें गांव.
गत्तुरगाम=उच्च जातीचे तथापि पतित झालेले लोक ज्या गांवांत रहातात तें गांव.
गहलगाम=नीच जातीनें वसलेलें गांव.
वेदिगाम=मृगया करणार्या लोकांचें गांव.
बतगाम=पादुआ नांवाच्या हलक्या जातीनें वसविलेले गांव.
(सिंहलद्वीपांतील वेद्ध नांवाचे लोक बहुतेक शिकार करुन उपजीविका करितात. वेद्ध, वेदिगाम, आणि व्याध शब्दांचा कांहींतरी संबंध असावा असें वाटतें.)
लंकेंत रोडिया म्हणून जात आहे. तिची स्थिती फारच वाईट आहे. ज्या कालांत रोडियांस उघडपणें रस्तावरून चालतां देखील येत नव्हतें तो काल आजच्या लोकांनीं लहानपणीं पाहिला आहे.
राजा तिसरा दापुलु यानें एक शासनग्रंथ तयार केला त्यांत रोडियाच्या सावलीनें पाणी विटाळतें असें दिलें आहें असें म्हणतात. हा ग्रंथ आमच्या अवलोकनांत आला नाहीं. सिंहली वाङ्मयाचा जर्मन इतिहासकार डॉ. गैजर याची तो नष्ट झाला असावा अशी समजूत आहे.
गोईगमांच्या खालोखाल महत्त्वाची जात म्हटली म्हणजे "करावा" म्हणजे कैवर्त उर्फ कोळ्यांची जात होय. ही जात देखील चांगली सुशिक्षित व श्रीमंत झाली आहे. गोईगमांच्यापेक्षां या जातीचें महत्व कमी असण्याचें कारण केवळ नीतिनिगंडुवांतील वाक्य नाहीं; जातींचें उच्चत्व अगर नीचत्व केवळ ग्रंथवाक्यांवर अवलंबून नसतें, तर ज्या कालांत ज्या गोष्टी अधिक सन्माननीय असतात त्या कालांत त्य़ा गोष्टी करणारांस महत्त्व प्राप्त होतें. स्पष्टीकरणार्थ एक भारतीय उदाहरण घेऊं. सारस्वत ब्राह्मण खरोखरच पाहिले असतां फार जुने ब्राह्मण आहेत. तथापि ते मत्स्याहारी असल्यामुळें महाराष्ट्रीय ब्राह्मण त्यांस स्वतःपेक्षां कमी समजतात. समुद्रमार्गानें प्रवास आपल्या देशांत कांहीं दिवस वाईट समजला जात होता, आणि तो सारस्वत ब्राह्मणांनीं स्वधर्मसंरक्षणार्थ केला. यामुळें कोचीन, त्रावणकोर इत्यादि संस्थानांत शूद्र नायर देखील त्यांस हलके लेखतात आणि त्यांस देवळांतून मज्जाव आहे. उलट उदाहरण पहावयाचें असल्यास तिनवेल्ली येथील "शेव" वेल्लालांचें पहावें. तिनवेल्ली जिल्ह्यांत कांही वेल्लालांनीं मांसाहाराचा त्याग करून अधिक उच्चपद मिळवलें आहे. लंकेत जमिनीवर ताबा असणें हें मोठ्या मानाचें आणि राजत्त्वाचें लक्षण समजलें जातें आणि त्याच्या योगानें 'गोईगम' हा शेतकरी वर्ग फार थोर समजला गेला.