प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिलोनमधील मजूर :— यूरोपीय लोकांच्या मळ्यांवर काम करणारी हिंदु वस्ती जवळजवळ पांच लाख आहे. या वस्तीचें जीवनचरित्र चांगलें अभ्यासिलें गेलें नाहीं. या वस्तीपैकीं सिलोनमध्यें किती लोक कायमचे रहिवासी बनतात आणि त्यांचे पूर्वींच्या तामिळांशी कसे काय संबंध होतात याचें ज्ञान डॉ. केतकर यांस झालें नाहीं. या प्रश्नासंबंधानें डॉ. केतकर यांनीं लोकांस प्रश्न केले नाहींत असें नाहीं. तथापि प्रश्नाचें समर्पकपणें उत्तर देण्यासाठीं त्या प्रकारचें अवलोकन ज्यांनीं पूर्वीं केलें होतें असें सुशिक्षित तामिळ त्यांनां भेटले नाहींत. ज्याप्रमाणें आपल्या देशांतील सुशिक्षित वर्गांमध्यें अशिक्षित वर्ग आणि हलक्या जाती यांच्या जीवनचरित्रासंबंधानें पूर्णपणें अज्ञान आहे तसेंच त्यांच्यामध्येंहि आहे.
रा. रा. करुमुलु थिअगराज यांनीं तेथील भारतीय मजुरांविषयीं जी माहिती प्रत्यक्ष अवलोकन करून मिळविली व प्रसिद्ध केली (Ind. Rev. March 1917) ती येणेंप्रमाणेः-
घरेंदारें व आरोग्य — सिलोनमध्यें मजुरांस राहण्याकरितां पुष्कळ इमारती बांधलेल्या आहेत. त्यांचा नमुना म्हणजे इमारतीच्या मध्यभागीं एक लांबचलांब भिंत घालून दोन्ही बाजूंनां सारख्यासारख्या खोल्या पाडतात. ही प्रत्येक खोली १२ फूट लांब, दहा फूट रुंद आणि सुमारें ९ फूट उंच असून तीतून बाहेर पडवींत जाण्याकरीतां एक दरवाजा असतो; खिडकी मुळींच नसते. भिंती व जमीन चिखलमातीची असून वर ओंबणाला लोखंडी पत्रे असतात. कांही घरांवर कौलें असतात. सर्वत्र एकजात हाच नमुना असतो. प्रत्येक भागांत चार कामकरी मजूर रहावयाचे हा सामान्य नियम खरा; पुष्कळ मळ्यांत इमारती भरपूर नसल्यामुळें एकेका गाळ्यांत पांचपांच सहासहा मजूर मुलाबाळांसह कोंबलेले असतात. गटारें, मोर्या वगैरेंची व्यवस्था अगदीं असमाधानकारक. मुतर्या, शौचकूप क्वचितच ठिकाणीं असतात. सुदैवानें नवें आरोग्यखातें या गैरसोयी दूर करण्याच्या मार्गांत आहे.
प्रकृतिमान व औषधोपचार - मजुरांचें आरोग्य समाधानकारक नाहीं. ज्या ज्या मळ्यांत गेलों तेथें तेथें आजारी पडलेले मजूर होतेच. हिंवताप आणि संधिवात या व्याधी फार पसलेल्या आहेत. रत्नपुरांतील तपासणीवरील अधिकारी डॉ. लून (Lunn) यांनीं एका भागासंबंधानें खालील मजकूर लिहिला आहे :—
"ह्या चाळींत ज्याचे सांधे धरलेले नाहींत असा एकहि इसम नाहीं. कांहीं ठिकाणीं हिंवताप आहे. हगवण, अतिसार व त्वगरोग यांचा उपद्रवहि कांहीं कमी नाहीं. औषधोपचारार्थ ठेवलेल्या इसमांवर मजुरांचा बिलकुल भरंवसा नाहीं. अशा कांहीं इसमांची मीं गांठ घेतली. या योगानें मजुरांचा त्यांचेवर विश्वास नसण्याचीं कारणें मला बरोबर समजलीं. क्विनाइन हें या औषध देणार्यांचे अगदीं आवडींचें औषध; किंवा असें म्हटलें तर अधिक बरोबर होईल कीं तेवढें एकच औषध तेथें असे. डॉक्टरनें एक दिवसाआड मजुरांच्या खोल्यांत जाऊन तपासणी करवी असा नियम आहे खरा, पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, डॉक्टरसाहेब आठवड्यांतून एकदां जात असतात ! बाकी एक दिवसाआड जाणें काय व आठवड्यांतून एकदां जाणें काय, दोहोंची किंमत सारखीच !!"
प्रत्येक आजारी माणसास तांदुळ द्यावे असा कायदा आहे; पण कायद्याची अम्मलबजावणी पहावी तर क्वचितच कोणा भाग्यवंताला तांदूळ मिळतात. सुपरिंटेडेंट साहेब म्हणतात : "तांदूळच काय, पण दूध, कांजी, साबुदाण्याची खीर, लागतील ते पदार्थ मजुरांनां देण्यांत येतात; इतकेंच नाहीं तर ते मळेवाल्यांच्या खर्चानें देण्यांत येतात." परंतु मला नमूद करण्यास फार वाईट वाटतें कीं, मी या मजुरांच्या तक्रारींची अगदीं निःपक्षपातीपणानें व बारकाईनें चौकशी केली असतां मला असें आढळून आलें कीं, साहेबमजुकरांच्या वरील विधानास वस्तुस्थितीचा बिलकूल आधार नाहीं. एखादा मजूर आजारी पडला आणि त्याचे कोणी नातेवाईक शुश्रूषा करण्यास नसले कीं त्यांनें खुशाल प्राणांची आशा सोडावी; तो मरावयाचा हें ठरलेलेंच ! मजूरस्त्रीला प्रसूतीनंतर अर्धा बुशेल (एक राकेलचा डबा) तांदूळ व दोन रूपये रोख देतात पण त्यांतहि ते दोन रुपये हिशोबांत त्या स्त्रीच्या नावांवर टाकतात !! मळ्यांमधून सुइणी नेहमींच्या नेमलेल्या नसतातच, पण तात्पुरत्याहि त्यांनां कामास ठेवीत नाहिंत !!
तसेंच मजूर आजारी पडला कीं त्याला दवाखान्यांत पाठविणें हें सुपरिंटेंडेंटचें कर्तव्य आहे असा कायदा आहे, तसें न करणें हा कायद्यांत गुन्हा आहे; पण कायद्यांतले कलम कायद्यांत. मजूर बेफाम आजारी असूनहि आपल्या खोलींतच पडलेले मी प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहिले आहेत.
कांहीं कांहीं मळ्यांतील मजुरांच्या मृत्यूचें प्रमाण पाहण्यासारखें आहे. निवितीगल येथील ९५० मजुरांपैकीं १९१३ या एका सालांतच २२७ मजूर मरण पावले ! डिकोया येथील गेल्या सालचा रिपोर्ट मला असा समजला कीं, जन्मास आलेल्या ६० नूतन अर्भकांपैकीं ४५ मृत्युमुखांत पडलीं !!