प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिलोनमधील मजूर :— यूरोपीय लोकांच्या मळ्यांवर काम करणारी हिंदु वस्ती जवळजवळ पांच लाख आहे. या वस्तीचें जीवनचरित्र चांगलें अभ्यासिलें गेलें नाहीं. या वस्तीपैकीं सिलोनमध्यें किती लोक कायमचे रहिवासी बनतात आणि त्यांचे पूर्वींच्या तामिळांशी कसे काय संबंध होतात याचें ज्ञान डॉ. केतकर यांस झालें नाहीं. या प्रश्नासंबंधानें डॉ. केतकर यांनीं लोकांस प्रश्न केले नाहींत असें नाहीं. तथापि प्रश्नाचें समर्पकपणें उत्तर देण्यासाठीं त्या प्रकारचें अवलोकन ज्यांनीं पूर्वीं केलें होतें असें सुशिक्षित तामिळ त्यांनां भेटले नाहींत. ज्याप्रमाणें आपल्या देशांतील सुशिक्षित वर्गांमध्यें अशिक्षित वर्ग आणि हलक्या जाती यांच्या जीवनचरित्रासंबंधानें पूर्णपणें अज्ञान आहे तसेंच त्यांच्यामध्येंहि आहे.
रा. रा. करुमुलु थिअगराज यांनीं तेथील भारतीय मजुरांविषयीं जी माहिती प्रत्यक्ष अवलोकन करून मिळविली व प्रसिद्ध केली (Ind. Rev. March 1917) ती येणेंप्रमाणेः-
घरेंदारें व आरोग्य — सिलोनमध्यें मजुरांस राहण्याकरितां पुष्कळ इमारती बांधलेल्या आहेत. त्यांचा नमुना म्हणजे इमारतीच्या मध्यभागीं एक लांबचलांब भिंत घालून दोन्ही बाजूंनां सारख्यासारख्या खोल्या पाडतात. ही प्रत्येक खोली १२ फूट लांब, दहा फूट रुंद आणि सुमारें ९ फूट उंच असून तीतून बाहेर पडवींत जाण्याकरीतां एक दरवाजा असतो; खिडकी मुळींच नसते. भिंती व जमीन चिखलमातीची असून वर ओंबणाला लोखंडी पत्रे असतात. कांही घरांवर कौलें असतात. सर्वत्र एकजात हाच नमुना असतो. प्रत्येक भागांत चार कामकरी मजूर रहावयाचे हा सामान्य नियम खरा; पुष्कळ मळ्यांत इमारती भरपूर नसल्यामुळें एकेका गाळ्यांत पांचपांच सहासहा मजूर मुलाबाळांसह कोंबलेले असतात. गटारें, मोर्या वगैरेंची व्यवस्था अगदीं असमाधानकारक. मुतर्या, शौचकूप क्वचितच ठिकाणीं असतात. सुदैवानें नवें आरोग्यखातें या गैरसोयी दूर करण्याच्या मार्गांत आहे.
प्रकृतिमान व औषधोपचार - मजुरांचें आरोग्य समाधानकारक नाहीं. ज्या ज्या मळ्यांत गेलों तेथें तेथें आजारी पडलेले मजूर होतेच. हिंवताप आणि संधिवात या व्याधी फार पसलेल्या आहेत. रत्नपुरांतील तपासणीवरील अधिकारी डॉ. लून (Lunn) यांनीं एका भागासंबंधानें खालील मजकूर लिहिला आहे :—
"ह्या चाळींत ज्याचे सांधे धरलेले नाहींत असा एकहि इसम नाहीं. कांहीं ठिकाणीं हिंवताप आहे. हगवण, अतिसार व त्वगरोग यांचा उपद्रवहि कांहीं कमी नाहीं. औषधोपचारार्थ ठेवलेल्या इसमांवर मजुरांचा बिलकुल भरंवसा नाहीं. अशा कांहीं इसमांची मीं गांठ घेतली. या योगानें मजुरांचा त्यांचेवर विश्वास नसण्याचीं कारणें मला बरोबर समजलीं. क्विनाइन हें या औषध देणार्यांचे अगदीं आवडींचें औषध; किंवा असें म्हटलें तर अधिक बरोबर होईल कीं तेवढें एकच औषध तेथें असे. डॉक्टरनें एक दिवसाआड मजुरांच्या खोल्यांत जाऊन तपासणी करवी असा नियम आहे खरा, पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, डॉक्टरसाहेब आठवड्यांतून एकदां जात असतात ! बाकी एक दिवसाआड जाणें काय व आठवड्यांतून एकदां जाणें काय, दोहोंची किंमत सारखीच !!"
प्रत्येक आजारी माणसास तांदुळ द्यावे असा कायदा आहे; पण कायद्याची अम्मलबजावणी पहावी तर क्वचितच कोणा भाग्यवंताला तांदूळ मिळतात. सुपरिंटेडेंट साहेब म्हणतात : "तांदूळच काय, पण दूध, कांजी, साबुदाण्याची खीर, लागतील ते पदार्थ मजुरांनां देण्यांत येतात; इतकेंच नाहीं तर ते मळेवाल्यांच्या खर्चानें देण्यांत येतात." परंतु मला नमूद करण्यास फार वाईट वाटतें कीं, मी या मजुरांच्या तक्रारींची अगदीं निःपक्षपातीपणानें व बारकाईनें चौकशी केली असतां मला असें आढळून आलें कीं, साहेबमजुकरांच्या वरील विधानास वस्तुस्थितीचा बिलकूल आधार नाहीं. एखादा मजूर आजारी पडला आणि त्याचे कोणी नातेवाईक शुश्रूषा करण्यास नसले कीं त्यांनें खुशाल प्राणांची आशा सोडावी; तो मरावयाचा हें ठरलेलेंच ! मजूरस्त्रीला प्रसूतीनंतर अर्धा बुशेल (एक राकेलचा डबा) तांदूळ व दोन रूपये रोख देतात पण त्यांतहि ते दोन रुपये हिशोबांत त्या स्त्रीच्या नावांवर टाकतात !! मळ्यांमधून सुइणी नेहमींच्या नेमलेल्या नसतातच, पण तात्पुरत्याहि त्यांनां कामास ठेवीत नाहिंत !!
तसेंच मजूर आजारी पडला कीं त्याला दवाखान्यांत पाठविणें हें सुपरिंटेंडेंटचें कर्तव्य आहे असा कायदा आहे, तसें न करणें हा कायद्यांत गुन्हा आहे; पण कायद्यांतले कलम कायद्यांत. मजूर बेफाम आजारी असूनहि आपल्या खोलींतच पडलेले मी प्रत्यक्ष डोळ्यांनीं पाहिले आहेत.
कांहीं कांहीं मळ्यांतील मजुरांच्या मृत्यूचें प्रमाण पाहण्यासारखें आहे. निवितीगल येथील ९५० मजुरांपैकीं १९१३ या एका सालांतच २२७ मजूर मरण पावले ! डिकोया येथील गेल्या सालचा रिपोर्ट मला असा समजला कीं, जन्मास आलेल्या ६० नूतन अर्भकांपैकीं ४५ मृत्युमुखांत पडलीं !!
अन्न, काम, पगार, "हिशोब"— तांदूळ नेहमीं मळेवाल्यांकडून पुरविण्यांत येतो. त्याचा भाव दर बुशिलास सुमारें रु. ४४८ ते ५४८ असतो. हा दरांतील फरक कोलंबोपासून मळ्यापर्यंतच्या थोड्याफार अन्तरामुळें होतो. जितका मळा लांब तितका तांदूळ महाग आणि खराब.
कांही थोड्या मळ्यांत "कोकोनाडा मिलचा" किंवा "रंगूनचा कलुंडा" तांदुळ पुरवितात. हा तांदूळ चांगला असतो. पण बहुतेक मळ्यांत 'सुलई' 'पखुडी' या जातींचा तांदूळ देतात. तो अत्यंत खराब आणि अपायकारक असतो; पण बिचार्या मजुरांनां तोच खावा लागतो.
शिवाय हे तांदूळ द्यावयाचे ते दर आठवड्यास ठराविक; दर मजूर पुरुषास पाव बुशेल, मजूरस्त्रीस दर आठवड्यास आळीपाळीनें पाव व अष्टमांश बुशेल, आणि मजूरमुलांस व मुलींस प्रत्येकीं अष्टमांश बुशेल. येथें हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, मजुरांनां मजुरीच्या कांहीं रकमेऐवजीं हें तांदूळ देतात, म्हणजे आठवड्यांतील ठरलेल्या कामाच्या दिवशीं मजूर कामावर नसेल तर अर्थात् मजुरीची रक्कम कमी होते. कांहीं वेळां अजीबातच मिळत नाहीं. याप्रमाणें मजूर गैरहजर राहिला किंवा आजारी पडला कीं त्याचें अन्न बंद झालेंच. येथें आणखी हेंहि सांगणें भाग आहे कीं, १८६५ सालच्या कायद्याच्या २७ व्या कलमाप्रमाणें आजारी मजुरांनां मळेवाल्यांनीं तांदूळ फुकट द्यावा असें असूनहि या नियमाअन्वयें तांदूळ मिळाला असें क्वचितच घडतें.
मजुरांजवळ मसाला वगैरे कढीचें सामान विकत आणण्यापुरतेहि रोख पैसे बहुतकरून नसतात.
पिण्याचें पाणी कांहीं ठिकांणीं ओढ्यावरून आणावें लागतें; पण बर्याच ठिकाणीं विहिरी आहेत. कांहीं थोड्या मळ्यांत नळाची सोय केलेली आहे.
सिलोनच्या सरकारनें कृपाळूपणानें प्रत्येक मळ्यांत ताडीचें दुकान मात्र जवळच उघडलेलें आहे !
मळ्यांमधून दुपारच्या जेवणाची सुट्टी मुळींच कोठें देत नाहींत. त्यामुळें पुष्कळ मजुरांनां उभ्या चोवीस तासांत दोनच जेवणें पडतात; पैकीं एक सकाळीं सहा वाजण्याच्या आंत व दुसरें दिवस मावळल्यानंतर. काहीं मजूर मात्र दुपारचें जेवण त्यांतल्यात्यांत कसेंतरी उरकून घेतात.
सर्व मळ्यांतून घरापुढें रहाण्याच्या इतकीच जागा भाजीपाल्याकरतां मोकळी ठेवलेली असते.
कामें — लागवड करणें, खतें घालणें, बेणणें, कांट्यांनीं ओझें उचलणें, ओझीं वाहणें, हीं कामें सर्व मळ्यांतून सारखींच असतात, मग तो मळा चहाचा असो किंवा रबर, कोको, नारळ यांचा असो. चहाचीं पानें तोडणें, कोकोच्या बिंया वेंचणें व फोडणें आणि बेणणें असलीं कामें नेहमीं बायकाच करतात; कांहीं अल्प प्रमाणांत मुलगे व मुलीहि हीं कामें करतात. रबराच्या झाडांतील रस धरणें हें काम कांहीं अंशीं बायका करतात. हीं कामें सोडून बाकी सर्व कामें पुरुष करतात. खरोखर पाहतां कामें काहीं कठीण नाहींत. पण त्यावरचे देखरेख करणारे अधिकारी-सब-कंगनी, हेड-कंगनी व कंडक्टर-यांच्यामुळें काम मोठें कठिण वाटतें. या वरच्या अधिकार्यांनां लांचलुचपत देण्याचे प्रकार चालतात. त्याबद्दल पुष्कळ मजूर तक्रारी करतात. अर्थात् याचा दोष सुपरिंटेंडंटकडे आहे, कारण मजुराविरूद्ध वाईट काम करण्याबद्दलच्या तक्रारी ऐकण्यास हे नेहमीं एका पायावर तयार असतात.
कांहीं भागात कामाची वेळ सकाळीं ६ पासून संध्याकाळीं ४ वाजेपर्यंत; व कांहीं ठिकाणीं स. ६-३० पासून सं. ४-३० पर्यंत असतें. सारखें ओळीनें १० तास दररोज काम घेतात. केव्हां केव्हां १० तासांपेक्षांहि अधिक काम घेतात. एका मळ्यांत माझ्यासमोर कामबंदींचें शिंग ४-३० च्या ऐवजीं ५-१० वाजतां फुंकण्यांत आलें. असो. इतकें काम घेऊन दुपारच्या जेवणाकरतां सुट्टीहि नाहीं. याबद्दल मी तेथल्या एका सुपरिंटेंडेंटपाशीं खुलासा विचारला तेव्हां त्यानें तर्कशास्त्र लढविलें तें असे :—
(अ) मोठाल्या मळ्यांत मजूर राहत्या घरापासून लांब लांब कामावर येतात, तेव्हां तेथून दुपारच्या जेवणाकरितां घरीं परत जाऊन यायला बराच वेळ मोडणार; इतका वेळ सवड देणें मळेवाल्यांनां शक्य नाहीं.
(आ) आतां लहानलहान मळ्यांचीहि हीच पद्धत आहे.
(इ) शिवाय सुपरिंटेंडेंट लोक सुद्धां सकाळच्या थोड्याशा फराळावर दुपारीं बारा एक वाजेपर्यंत थांबतात व मग जेवतात; तर सकाळीं पोटभर जेवल्यानंतर बाराच्या पुढें आणखी दोन-चार तास थांबण्यास मजुरांनां मुळींच हरकत नाहीं.
रबराच्या कामांतील मजूर दुपारीं एक वाजतां घरीं परत येतात, पण बाकी सर्वांनां संध्याकाळीं पांच साडेपांचच्या पूर्वीं परत येणें मुळीच शक्य नसतें. अगदीं वेळेवर सुटले तरी नावें नोंदवणें वगैरे कृत्यांत आणखी एक तासावर वेळ लागतो. एवंच कारखान्याचें काम सकाळीं ६ पासून संध्याकाळीं ६ पर्यंत चालतें.
मजुरांनां पगार मिळतो महिन्यामहिन्यानें पण हिशोब मात्र रोजावरून ठेवतात; आणि एखादा दिवस जरी गैरहजिरी असली तरी तेवढा पगार कापला जातो. बहुतेक काम रोजंदारी पद्धतीनें चालतें. फक्त रबराचें काम व कांहीं चहाच्या मळ्यांत चहाची पानें तोडण्याचें काम ठेक्यानें चालते.
बहुतेक शेंकडा ८०।९० मजुरांनां मळ्यांतील कामाजी रोज-मजुरी सव्वापांच आणे मिळते. झाडें खडसणारांनां सव्वा-सहा आणे मजुरी देतात; पण हें काम वर्षांतून कांहीं ऋतूंत मात्र चालतें. कारखान्यामधील आणि सुपरिंटेन्डेंटच्या बंगल्यांतील व चाळींतील झाडूवाल्याचें काम करणार्या सुमारें शेंकडा ५ मजुरांनां सव्वासहा आणे मजुरी पडते.
सर्व मळ्यांतून स्त्रीमजुरांनां रोजी ४ चार आणे मिळतात. पण ते ठराविक काम केलें तरच पदरांत पडतात. कमी काम करणार्यांनां शिक्षा मिळते व अधिक काम करणार्यांनां बक्षिस मिळतें पण अधिक काम हातून होण्याचा सुयोग विरळाच !
मुलांमुलींनीं ठरींव रोजाचें काम केल्यास पावणेतीन आणे त्यांनां मिळतात.
रविवारीं काम करणें मजुराच्या मर्जीवर असतें; आणि काम केल्यास पुरुषाला सव्वासहा आणे व स्त्रीला पावणेपांच आणे असें जादा वेतन देतात.
रबराच्या मळ्यांत रबराचें काम व चहाचीं पानें तोडण्याचें काम उक्ते देऊन त्यांत वजनावरून मजुरीचें प्रमाण ठरवितात. रबराच्या एका औंसाला १ ते ३ पै मिळतात. आणि चहाच्या पानांच्या एका पौंडाला १ ते ३ पै मिळतात.
रबराच्या कामांत चांगल्या मजुराला रोजीं आठ आणे मिळवितां येतात; आणि चहाचीं पानें खुडण्यांत चार आणे पडतात.
अशा रीतीनें आजारी न पडतां महिन्याचें २६ दिवस काम करून एक पुरूष मजूर साडेदहा रूपये मिळवूं शकतो; परंतु पुष्कळांनां (आजारी, गैरहजर यामुळें) साडेसात रुपयांवर मजुरी मिळतच नाहीं. स्त्रियांनां याप्रमाणें फार तर साडेसहा रुपये, आणि मुलामुलींनां ४ ते ५ रुपयेंपर्यंत पडतात.
रबराच्या कामांत पुरुषाला १२ ते १५ व स्त्रीला ८ ते १० पर्यंत रुपये मिळूं शकतात.
एकंदर आढाव्यांत मजुरींचें प्रमाण इतकेंहि कायम पडत नाहीं; कारण पुरुषांनां आजारामुळें व बायकांना अडचणींमुळें कामाचे खाडे करावे लागतात. बहुतेकांनां रोख ३ रुपयांवर महिन्याला मिळत नाहीं. अगदीं मोठ्या मिळकतीच्या रबराच्या कामांत सुद्धां फार तर ५।६ रुपये दरमहा पडतो. एका चहाच्या मळ्यांत मीं पगारबुकांत पाहिलें तों बहुतेक मजुरांच्या नावांपुढें (तांदुळाची किंमत रू.५ दर बुशेलीं वजा जातां,) २ ते २४८ रूपयेपर्यंत पडलेले दिसले.
थोडक्यांत तात्पर्य असें की, मजुरी मिळते ती मजुरांनां निर्वाहाला पुरेशी क्वचितच असते.
आणखी आश्चर्य असें कीं, सिंहली मजूर जेथें आहेत तेथें हिंदी मजुरांपेक्षां काम कमी करूनहि त्यांनां मजुरी मात्र जास्त देतात.
सिलोनांत एका मजुराला खर्च दरमहा रू. ८ ते १० येतो पण पुष्कळ मजुरांनां इतकी देखील मजुरी पडत नाहीं. एका मजुराला वर्षाचा खर्च रु.१२५ येतो त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :—
तांदुळ १३ बुशेल, त्याचा सामान्य भाव दर बुशेलास
रु. ५ प्रमाणें | रु. ६५ |
धोबी | " २४८ |
धोतरें ३ जोड्या | " ६ |
अंगावरचें ३ जोड्या | " १ |
कोट २ " | " ३ |
ब्लँकेट १ " | " २ |
बन्यानी ४ " | " २ |
कढीचें सामान इ. | " ४३ |
१२५ |
स्त्रियांनां थोडा कमी खर्च लागतो. कांहीं मजुरांनां १०० रुपयांवर वार्षिक प्राप्ति होते. पण असे फार थोडे. लहान मुलें व बायको या सर्वांची मिळकत मिळून एकंदर निर्वाह चालतो. पण पुष्कळांनां कर्जबाजारीच बनावें लागतें.
मजूर ताब्यांत ठेवण्याच्या पद्धती – कोणत्याहि मळ्यांत जा, तेथें असा एरहि मजूर आढळत नाहीं कीं ज्याला कर्ज वगैरे बिलकुल नाहीं, प्रत्येक जण कर्जबाजारी; कोणी अधिक कोणी कमी, एवढाच फरक; एकेका मजुराला रु. ५० ते २०० पर्यंत कर्ज असतें काहींनां याहूनहि जास्त असतें. कर्जाची सरासरी मजुरामागें रु. १०० पडते. या कर्जाचा तपशील लक्षांत ठेवण्यासारखा आहे. मजुराची प्रथम भरती करतांना वाटखर्चाकरतां म्हणून त्याला आगाऊ रक्कम देतात. पुढें कंपनीकडून त्यानें आणलेल्या जिनसांची किंमत आकारतात. यांत आजारीपणांत व इतर अडचणींत उसनवार काढलेल्या पैशांची भर पडते-ही सर्व रक्कम त्या त्या मजुराचे नावांवर टिपणवहींत लिहितात, व नंतर ती हजेरी बुकांत उतरून घेतात. या अशिक्षित मजुरांनां फसविण्याचे तर अनेक मार्ग आहेत. आधीं पुस्तकांत मांडतांनाच खर्या रकमेपेक्षां अधिक मांडतात. मद्रासकडील एका ग्रॅज्युएटनें सिलोनांतील आपल्या प्रवासांत प्रत्यक्ष पाहिलेला एक प्रकार सांगितला तो असा :— "एक कंगनी
'८ आणि ५ पंधरा' असें मजुराला सांगत होता आणि तो "एम्" म्हणून कबूल करीत होता." बिचारे अशिक्षित मजूर, तेव्हां या प्रकाराचें कोणाला आश्चर्य वाटण्याचें कारण नाहीं. हे मजूर बहुतकरुन कंगनीपासूनच कापड आणतात व तें नांवावर मांडूनच आणतात. कंगनी कापडाच्या किंमती भलत्याच लावतात, तरी पण हे मजूर उधारीनेंच माल आणतात. प्रथम उधार आणून हे दुप्पट किंमत देतील पण रोखीचा व्यवहार करावयाचे नाहींत.
मजुरांनां मळेवाल्यांचें कर्ज असतेंच पण त्याशिवाय खाजगी कर्जहि सरासरी रु. ५ ते १५ पर्यंत असतें. शिवाय, मजुरांनां एका मळ्यांतील नोकरी सोडून दुसर्यांत धरावयाची, असें करीत फिरण्याची संवय असते. चालू नोकरी सोडतांना तेथील सर्व कर्ज वारावें लागतें. मजुरांच्या दहादहा वीसविसांच्या टोळ्या असतात. त्यांत सब-कंगनीच त्यांचा 'म्होरक्या' होतो. तो दुसर्या मळेवाल्याकडे त्यांचें जमवून देतो व मध्यें बक्षीस उपटतो. तोच त्यांचें कर्ज वारून हिशोब ठेवतो. पुन्हां दुसर्या मळ्यांत आगाऊ खर्चाला वगैरे देतो. अशामुळें एकंदरीत हिशोब पाहतां मजुरांचें कर्ज वर्षानुवर्ष वाढतच जात असतें.
या कर्जाच्या बाबतींत मळेवाल्याला हेडकंगनी जबाबदार असतो, हेडकंगनीला सब-कंगनी आणि शेवटीं सबकंगनीला मजूर.
कोणाहि कुटुंबांतील बायको, नवरा किंवा दुसरें कोणी वारल्यास त्यांचें कर्ज राहिलेल्यांचे डोक्यांवर बसतें. कायदा पाहिला तर बायको कांहीं नवर्याच्या कर्जाला बांधलेली नाहीं. पण सिलोनमध्यें हे कंगनी कायदा ठेवतात सर्व गुंडाळून; आणि सुपरिंटेंडेंट लोकहि हा प्रकार चालू देतात. तथापि ही कर्जाची फेड सर्वस्वी कधींच होत नाहीं, आणि तो तोटा मुख्यतः सबकंगनींनां व कांहीं अंशानें कंगनी व मळेवाले यांना सोसावा लागतो.
एक वर्ष नौकरी केल्यास मजुराचा वाटखर्च त्याला माफ करतात.
आगाऊ उसनवार देण्याची जी पद्धत आहे तिनेंच मजुराचा खरोखर घात होत असतो. त्यामुळें मजुराची मजुरी कधीं वाढवीत नाहींत. कर्जांतून मजूर कधीं मुक्त होत नाहीं व त्यामुळें नोकरींतूनहि त्याला सुटतां येत नाहीं ! तेव्हां हा सिलोनवास म्हणजे मजुरांनां अंदमानची काळेपाण्याची शिक्षाच होय. सिलोनांत गेलेला मजूर पुन्हां हिंदुस्थानांत परत आला असें उदाहरण अगदीं विरळा. कारण, रोजीं चार पांच आणे मिळविणार्या मजुराकडून हें शेंकडों रुपयांचें कर्ज फिटावयाचें कसें ?
तेव्हां सिलोनांत जाणारा मजूर म्हणजे अंदमानांत जन्मठेप काळ्यापाण्यावर जाणारा इसम म्हणून समजावा. हें ओळखूनच कल्लल, रामनाड वगैरे प्रांतांतल्या चेट्टीअरांनीं तेथील तंटेखोर लोकांची ब्याद नाहींशी करण्याकरीतां मजूरभरती करणार्या कामगारांनां मोठाले लांच देऊन मजुरांनां आगाऊ खर्चासदेऊन सिलोनमध्यें धाडून देण्याचा क्रम स्वीकारला आहे.
कित्येक बाबतींत मजुरांचें स्वातंत्र्य बरेंच हिरावून घेतलेलें असतें. उ., कोर्टांत दाद मागण्यास जाण्यास मजुरांनां कठिण पडतें. कारण सुपरिंटेंडेंटच्या परवानगीवांचून कोर्टांत जाण्याकरितां मळ्यांतून बाहेर पडतांच येत नाहीं, व सुपरिंटेडेंटच्याच विरुद्ध फिर्याद करण्याकरितां परवानगी मागण्यास कोणी मजूर धजत नाहीं.
स्नेह्यासोबत्यांच्या गांठी घेण्यास, उत्सव वगैरे करण्यास, लग्नकार्यादि कार्यास मजुरांस भरपूर सवलती देण्यांत येतात. तथापि मजुरेतरांस मळ्यांत जाऊन मजुरांबरोबर गोष्टी करीत बसण्यास मोकळीक नसते.
वाईट कामाबद्दल एका अर्ध्या दिवसाच्या मजुरीइतका दंड करतात. तसेंच खराब कामाबद्दल किंवा चुकारपणाबद्दल किंवा हुकूम तोडल्याबद्दल काठीनें किंवा हातानें फटके मारतात. कामावरून पळून जाणारांनां कोर्टाकडे न पाठवितां सुपरिंटेंडेंटच त्यांनां शिक्षा ठोठावतात. कोणी मजूर नोकरी सोडून जाण्याच्या परवान्याबद्दल हट्ट धरून बसतात. त्यांनां सोडण्याची मळेवाल्यांनां सवड असली तर ठीक. नाहींतर या नाराज मजुरांनां वठणीवर आणण्यासाठीं अशा वेळीं छड्यांनीं वाटेल तसे ठोकतात.
मजुरांनां वागविण्याची पद्धत— मजुरांनां वाईट तर्हेनें वागवितात हें वरील हकीकतीवरून उघड होतेंच आहे. याशिवाय पुरावा म्हणजे नोकरींतून पळून जाण्याचा प्रकार फार चालतो हा आहे. पुष्कळ मजूर पळून जाण्यास तयार असतात, पण बायको, मुलेंबाळें व पहारेकरी या अडचणी बिचार्यांच्या मार्गांत असतात.
मालक व मजूर ह्यांच्यामध्यें बहुतकरून सरळ कधींच नसतेंच. कोर्टांतील फिर्यांदींच्या संख्येवरून ही गोष्ट उघड होते.
मजूर कामाला नालायक झाला कीं त्याला मळ्यांतून हांकून देतात. राहिलेल्या आयुष्यांत त्यानें आपली पोटापाण्याची वाटेल तशी सोय पहावी.
न्यायनिवाडा— न्याय मिळण्याच्या मार्गांत मजुरांनां अनेक अडचणी असतात. कायद्यांतील सल्ला मिळविण्यास लागणारी फी देण्यास पैसा नसतो, तसेंच मारहाण केल्याबद्दलच्या सर्टिफिकीटासाठीं डॉक्टरला भरावयासहि पैसा नसतो. कोर्टांत स्वतःचा बचाव करण्यांत कोणाची मदत नसते, व स्वतःस अक्कल नसते. साक्षीदार द्यावयाचे ते मजूरबंधू, पण ते मालकाविरुद्ध साक्ष देण्यास नाखुष असतात. शिवाय मजुरांच्या जबान्या खर्या मानणारे मॅजिस्ट्रेटहि थोडेच असतात. मजुराचा कायदा कडक, मूर्खपणाचा व अमानुष आहे. कामांत खंड करणाच्या गुन्ह्यास सक्तमजुरीची कैद होते, हेंच काय पण दयार्द्रबुद्धीनें अशा मजुरास आश्रय देणारांस सुद्धां तशीच शिक्षा देतात.
मजुरभरती व मजुरभरत्ये – जेव्हां मजुरभरती करतात त्यावेळीं कामाबद्दल मजुरीबद्दल खरी माहिती मजुरांनां देत नाहींत. प्रथम मोठमोठीं आश्वासनें देतात. सुतार व एंजिनवाले यांची गोष्ट तर राहो, पण चांगले सुशिक्षित लोक, शिक्षक, कारकून, असले लोक देखील मजुरभरत्यांनीं भुलवून नेलेले आहेत. यावरून अत्यंत खोट्या थापा देऊन हें भरतीचें काम चालतें हें चांगलें सिद्ध होतें.
चहा व कोको यांच्या मळेवाल्याकडून एकेका मजुरामागें पांच रुपये व रबरमळेवाल्याकडून १० रुपये या मजुरभरत्याला मिळतात.
सिलोनसरकारनें हिंदी मजुरांच्या स्थितीची चौकशी करण्याकरितां नेमलेल्या कमिशनपुढील साक्षींत एका सुपरिंटेंडेंटनें असें कबूल केलें कीं, दर मजुरामागें १० रूपये देण्यांत येऊन ते रूपये पुन्हां मजुरांच्या नांवें टाकतात !
आणखी या मजुरभरतीच्या फीशिवाय या कंगनींना दर मजुरामागें दररोज १ आणा मिळतो. उ., ज्या दिवशीं शंभर मजूर कामावर असतील त्या दिवशीं कंगनीला ६ रुपये मिळतात. आणि याखेरीज यांनां चांगले पगार मिळतात ते वेगळेच.
मजुरांची नीतिमत्ता शिक्षण वगैरे— मी स्वतः हिंदी इसमच पडलों, तेव्हां या प्रश्नासंबंधानें लिहिण्यास मला अत्यंत शरम वाटते. हा नीतिमत्तेचा प्रश्न हें मुदतबंदीच्या मजूरपद्धतींत अत्यंत तीक्ष्ण शल्य होय. मजुरांची नीति बिघडण्याचें मुख्य कारण हें आहे कीं, पुरुषमजुरांच्या मानानें स्त्रीमजुरांची संख्या फार कमी असते. मजुरांमध्यें अनीतीचा गोंधळ फारच चालू असतो. मजुरांच्या बायकांनां व मुलींनां या बाबतींत सुपरिंटेंडेंट व कंगनी यांची दया भाकणें नेहमीं भाग पडतें !!
मजुरांच्या व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरितां फारच थोड्या मळ्यांत शाळा काढलेल्या आहेत. बहुतेक मळ्यांत त्या नाहींतच.
हिंदुस्थानांत परत कायम राहण्यास येणारे मजूर विरळाच, हें पूर्वीं सांगितलेंच आहे. जेव्हां कोणा मजुरास हिंदुस्थानांत परत येणें असेल तेव्हां आपली बायको किंवा मुलें त्याला तेथें ओलीस ठेवावीं लागतात; आणि याप्रमाणें पुरेशी जामिनकी दिल्यावांचून आपल्या घराला परत येण्याचें त्यानें स्वप्नांतहि आणण्यास नको.
याप्रमाणें सिलोनमधील हिंदी मजुरांच्या दुःस्थितीची हकीकत आहे.
एका मद्रसी मनुष्यानें स्वतः वस्तुस्थिति पाहून लिहिलेली ही हकीकत वाचली असतां आपल्या अगदीं जवळ काय चाललें आहे याची कल्पना येईल. ही हकीकत १९१७ मध्यें प्रसिद्ध झाली व ती १९१६ सालच्या स्थितीसंबंधानें असावी. सरकारनें करारबंद मजूर पाठविण्याची पद्धत बंद केली आहे. तथापि तेवढ्यानें सर्व प्रश्नांचा निकाल लागणार नाहीं. कोणत्याहि संस्थेंत असलेली पद्धति एकदम मोडत नाहीं यासाठीं करारबंद मजुरांच्या पद्धतीकडे लक्ष असलेंच पाहिजे. ही पद्धति मद्रास इलाख्यांत मुख्यतः भोंवते; तथापि सांनिध्यानें मुंबई इलाख्यावरहि तिचा परिणाम होतोच. १९१३ सालीं सिलोनच्या मजुरांच्यामध्यें सांपडलेल्या एका महाराष्ट्रीय गृहस्थाचें पत्र केसरींत प्रसिद्ध झालें होतें, व त्या वेळेस नामदार परांजपे ह्यांनीं या पत्राविषयीं मुंबई सरकारला प्रश्नहि विचारला होता.
हे मजूर बरेचसे सिंहलद्वीपांत कायमचे रहिवासी बनतात व याकरतां तेथील सर्व हिंदूंचा जीवनक्रम आपणांस लक्षांत ठेवला पाहिजे.
सिंहलद्वीपाचें हिंदीभवन अधिकाधिक व्हावें अगर न व्हावें हा आपल्या राष्ट्रांतील लोकांच्या इच्छेचा प्रश्न आहे. जर आपल्या देशांतील ब्राह्मण सिंहलद्वीपांत अधिकाधिक जाऊं लागले आणि सिंहली संस्कृतीचा उद्धार म्हणजेच हिंदुस्थानीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठीं धडपडूं लागले, तर त्यांस अनुयायी मिळण्यास अडचण पडणार नाहीं. बौद्ध संप्रदायानें कोणत्याहि देशांत अगोदर जावें आणि कनिष्ठ प्रकारच्या हिंदी संस्कृतीचा प्रसार करावा आणि तदनंतर ब्राह्मणांनीं जाऊन तेथें त्या लोकांमध्यें उच्च तर्हेच्या ब्राह्मण्याचा प्रसार करावा ही पूर्वपार रीति आहे. त्या रीतीचें प्रर्वतन हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील बौद्ध भागांत अजून बंद पडलें नाहीं. ब्राह्मण्य अजूनहि वृद्धिंगत होत आहे. संस्कृतभाषासंभव संस्कृतीचा प्रसार सिंहलद्वीपांत करण्यास लागणारे ब्राह्मण विशेष प्रकारचे पाहिजेत. संस्कृत व इंग्रजी भाषा जाणणारे आमच्या मुंबई युनिव्हर्सिटीचे कांहीं उत्साही पदवीधर सिंहलद्वीपांत जाऊन तेथें सिंहली भाषा शिकून हिंदूस्थानचा इतिहास, हिंदुस्थानीय ग्रंथ व त्यांत सांठवलेलें ज्ञान यांचा प्रसार करूं लागले तर कार्य होण्यासारखें आहे. बुद्धाविषयीं आणि बौद्धांविषयीं व त्यांच्या खाद्यपेयादि आचाराविषयीं त्यांनीं मनांत विकल्प ठेवूं नयें; तथापि बुद्धास देव बनविण्याचें कारण नाहीं. संस्कृतसंभव ज्ञानाचा प्रसार करण्यांत सिंहली लोकांची देखील त्यांस सहानुभूति मिळेल.
'दि सिलोनीज' या दैनिकाचे संपादक मि. मार्टिनस यांनीं डॉ. केतकर यांस आपला एक निरोप देशबांधवांस कळविण्यास सांगितला आहे. मार्टिनस म्हणतात :—
"जे सुशिक्षित हिंदुस्थानी लोक आमच्या देशास येतात त्यांनीं आपल्या आगमनाचें वृत्त कृपा करून कोणातरी वर्तमानपत्रकारास कळवावें. त्यांच्या संबंधानें आम्हांस (सिंहली पत्रकारांस) काय महत्त्व असणार हा विचार त्यांनीं मनांत सुद्धां आणूं नये. हिंदुस्थानांत काय चाललें आहे याविषयीं जागरूक राहण्याची आमची फार इच्छा आहे; आणि हिंदुस्थानांतून जे लोक इकडे देश पहाण्यासाठीं येतील त्यांस भेटण्यांत आम्हांस आल्हाद वाटतो. सिलोन हें हिंदुस्थानच आहे असें समजावें. तें जरी भूगोललेखकांच्या दृष्टीनें नसलें तरी अन्तःकरणानें हिंदुस्थानच आहे. पुष्कळ प्रमुख हिंदुस्थानीय या द्वीपांत येतात आणि गर्दीगर्दीने परत जातात. ते आल्या गेल्याची बातमी देखील आम्हांस लागत नाहीं. यासाठीं जर हिंदुस्थानीय मंडळी आपल्या आगमनाचें वृत्त आम्हांस कळवितील, तर आम्ही सिलोनी पत्रकार त्यांचे आभारी होऊं." असो.
सिंहलद्वीपाचा व आपला परिचय अधिक चांगला व्हावा म्हणून आपण आतां या द्वीपाच्या ऐतिहासिक वर्णानाकडे वळूं.