प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

सिलोनचा इतिहास :— सिलोनबेट टॅप्रोबेन या नांवानें ग्रीक व रोमन लोकांनां माहीत होतें; व नंतर सेरेंदिप, सिरिंद्युइल व झेइलन या नांवांनीं पाश्चात्य व पौरस्त्य देशांतील लेखक त्याचा उल्लेख करीत असत. सेरेंदिप हें संस्कृत 'सिंहलद्वीप' याचें अपभ्रष्ट रूप आहे. भारतीय ग्रंथांत सिंहलद्वीप हा शब्द रत्‍नावली इत्यादि ग्रंथांत वापरला आहे आणि लंका हा शब्द पूर्वींपासून अधिक परिचित आहे. इतर पौरस्त्य देशांतल्याप्रमाणें सिलोनमध्यें जुन्या लेखांचा सांठा मोठा आहे; पण त्यांत खर्‍या गोष्टी व काल्पनिक गोष्टी यांचा गोंधळ केलेला असल्यामुळें त्यांतून ऐतिहासिक व काल्पनिक गोष्टींचा निर्णय करणें कठिण आहे. जार्ज टर्नरनें (१७९९-१८४३) परिश्रमपूर्वक हा गोंधळ दूर केलेला आहे, व त्याच्या महावंश या ग्रंथाच्या आवृत्तीमुळें सिंहली इतिहासाची सामान्य रूपरेषा ठरविण्यास चांगली मदत झाली आहे.

सिंहली शिलालेखांकडे प्रथम जार्ज टर्नरनें लोकांचे लक्ष वेधिलें. सर वुइल्यम ग्रेगरी यांच्या परिश्रमांमुळें या शिलालेखांच्या शुद्ध नकला होऊन भाषांतरहि होऊं लागले. यांत इ. पू. २ र्‍या शतकापासूनचे शिलालेख आहेत. यांत सर्वांत जुने लेख म्हणजे अनुराधपूर येथील वेस्सागिरी विहारांतील खडाकांतील गुहांतले होत; ते जुन्या ब्राह्मीलिपींत लिहिलेले आहेत. या लेखांवरुन सिंहलांत बौद्ध भिक्षू किती प्रबळ होते व राज्यकारभार व लोकांचा जीवनक्रम यांवर त्यांची केवढी छाप असे, हे स्पष्ट दिसतें. या लेखांतील राजांचे हुकुम बहुतेक या बौद्ध भिक्षूंचे हक्क अबाधित राखण्याकरतां सुटलेले आहेत. कांहीं थोडेसे राजकीय कारभाराबद्दलचे आहेत; उ., ५ वा कस्सप याचा शिलालेख (इ. स. ९२९-९३९). ४ था महिंद (इ. स. ९७५-९९१) याच्या एका शासनांत सिंहली रक्षादैवत असलेल्या बुद्धाच्या प्रसिद्ध दन्तावशेषाचा उल्लेख आहे. हा दन्तावशेष हल्लीं कँडी येथील देवालयांत आहे. सदरील आज्ञालेखावरून अनुराधपुरांतील थुपरामाच्या पूर्वेकडील एका सुंदर दगडी देवालयांत कीर्तिश्री मेघवर्ण याच्या कारकीर्दींत (इ. स. ३०४-३२४) कालिंगाहून हा दंतावशेष आणून ठेवला अशी जी परंपरागत जनकथा आहे तिला पुष्टी मिळते.

सिलोनमधील मूळचे रहिवासी म्हणजे पूर्वेकडील अरण्यांत राहणार्‍या आजच्या वेद्ध नांवाच्या वन्य लोकांचे पूर्वज असावे; आणि तेथील गुहांमध्यें सांपडलेल्या कित्येक प्राचीन दगडी हत्यारांवरुन असें  दिसतें कीं, या जातीचे हे लोक या बेटांत फार प्राचीन कालापासून राहात असावे.