प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली शिलालेख :— सिंहली शिलालेखांचा सर्वांत जुना काळ म्हणजे इ. पू. च्या शेवटच्या शतकापासून तों इ. स. च्या ५ व्या शतकापर्यंतचा होय. या काळांतील सर्व शिलालेख अशोकाच्या शिलालेखांतल्या ब्राह्मी लिपीमध्येंच लिहिलेले आहेत; व याच लिपीमधून नंतरच्या शिलालेखांची लिपी व पुढें झालेल्या ग्रंथांतील लिपी तयार झालेली आहे. हे शिलालेख लेण्यांमध्यें किंवा खडकावर कोरलेले आहेत.
गुहालेखांची एकंदर संख्या मोठी आहे. हे लेख पूर्वीं ज्यांत बौद्ध भिक्षू रहात असत परंतु आतां जीं रिकामीं पडलेलीं आहेत अशा लेण्यांच्या प्रवेशद्वारांवर लिहिलेले आहेत. त्या सर्व लेखांत थोडक्यांत प्रथम ज्यांनीं लेणें तयार करून तें बौद्ध भिक्षूंच्या उपयोगाकरीतां त्यांच्या स्वाधीन केलें त्यांची नांवें, किंवा त्यांच्या मालकांचीं नावें दिलेलीं असतात. उदाहरणार्थ दंबूल येथील पहिल्या लेण्यावर पुढील शिलालेख आहे :—
देव न पिय महा राजस गमी नितिस स महा लेने अ ग त अ न ग त च तु दिस स गस दिने
"देवांचा आवडता गमिनितिस्स या महाराजाचें हें मोठे लेणें असून तें हल्लीच्या व पुढील काळांतल्या पृथ्वीच्या पाठीवरील चारी (प्रदेशांतल्या) दिशांतल्या भिक्षूंनां अर्पण केलेलें आहे."
इ. मुल्लर म्हणतो कीं, "गमिनीतिस्स" हा "गमिनीचा मुलगा तिस्स" या शब्दांचा संक्षेप असावा, व त्यावरून इ. पू. १ ल्या शतकांतील वट्टगामनी अभय याचा पुत्र महाचूल तिस्स या राजाचा हा लेख असावा. हें मुल्लरचें अनुमान बरोबर असावें असें वाटतें.
हिनतिपोने (कागल्ला) येथील लेण्यांतील शिलालेख तर याहूनहि लहान आहे.
उ पा स क अ स ह ले ने
"अस या उपासक-बंधूचें हें लेणें आहे"
दुसरा एक विशेष लक्षांत घेण्यासारखा शिलालेख आहे; त्यांत उजवीकडून डावीकडे अक्षरें वाचावीं लागतात; हा लेख अंबलकंद येथील लेण्यावर आहे.
खडकांवरील लेख हे मठांनां दिलेल्या जमिनींच्या देणग्यांसंबंधानें व भिक्षूंनां दिलेल्या देणग्यासंबंधानें व असल्या इतर गोष्टींसंबंधानें आहेत. या शिलालेखांतील व त्या बेटांतील एकंदर शिलालेखांतहि सर्वांत जुना लेख म्हणजे तिस्समहाराम (दक्षिणेकडील प्रांतांतल्या हंबंतोलाच्या उत्तरेस) येथील शिलालेख होय. हा इ. मुल्लर याच्या यादींतील ४ थ्या नंबरचा शिलालेख होय. त्यांत आलेल्या नांवांचे मुल्लरनें दिलेले अर्थ सर्व बरोबर आहेत. महनक राजाचा पुत्र अलुणक राजा हा यांचा उत्पादक असें सांगितलेलें आहे; हा महनक राजा म्हणजेच देवानंपिय तिस्स याचा धाकटा बंधु महावंश ग्रंथांतील महनग राजा होय असें मानणें बरोबर होईल किंवा नाहीं याबद्दल संशय आहे. पण तसें मानल्यास मात्र हा शिलालेख इ. पू. ३ र्या शतकांतला आहे असें ठरेल.
पहिल्या कालखंडांतील शिलालेखांपैकीं विशेष मोठा म्हटला तर मिहिंतलेचा शिलालेख होय. (इ. म्यु. नं. २०). अंबत्थल दाघोबाकडे जाण्याचा जो दरवाजा आहे त्याच्यापुढें रस्त्याच्या उजव्या बाजूला हा शिलालेख आहे. खडकाळ व किंचित् उतरत्या जमिनींतील एका मोठ्या वज्रतुण्ड शिळेवर हा लेख खोदलेला आहे. परंतु यांत नुसती धार्मिक देणग्या वगैरेसंबंधींच माहिती आहे. हा लेख पहिला मेघवण्ण अभय (इ. स. पूर्वीं ३ तिसर्या शतकाचा उत्तरार्ध) याच्या कारकीर्दींतील असावा असें इ. मुल्लर याचें म्हणणें आहे; परंतु येथें मतभेद आहे. रत्मलगलच्या (नं.६) शिलालेखाप्रमाणें हाहि त्याच नांवाच्या राजाचा शिलालेख असावा असें गायजरला वाटतें. रवणवल्ली दाघोबाच्या गच्चीवर खोदलेले जे २१ नंबरचे शिलालेख आहेत-हे शिलालेख कालाच्या तडाक्यांत सांपडून बरेच खराब झाले आहेत-ते शिलालेख निःसंशय पहिला मेघवण्ण अभय (३ र्या शतकाचा उत्तरार्ध) याच्या कारकीर्दींतील किंवा तिसला मेघवण्ण अभय (४ थ्या शतकाचा पूर्वार्ध) याच्या कारकीर्दींतील असावेत. पी. गोल्डश्मिट यानें हवरणें येथील सुंदर शिलालेख (इ. म्यु. नं. ६१) वरील दोहोंपैकीं शेवटल्या मेघवण्ण अभयाचा आहे असें म्हटलें आहे, परंतु त्यानें या बाबतींत खात्रीलायक पुरावा दिला नाहीं.
सर्वांत जुन्या शिलालेखांत जीं राजांचीं नांवें आलीं आहेत त्यांपैकीं कांहींचा उल्लेख केला पाहिजे. गामिनी अभय (वट्टगामनी अभय) हा इ. स. पूर्वीं पहिल्या शतकांत होऊन गेला; (इ. म्यु. नं. १ व ८); वहब (=वसभ) हा इ. स. च्या पहिल्या शतकांत झाला. (नं. ७ व १०) ; व गजबाहु गामिनी अभय (पहिला गजबाहु) हा इ. सनाच्या दुसर्या शतकाच्या आरंभीं होऊन गेला (नं. ५). त्याच नांवांचा वारंवार उल्लेख आल्यामुळें कोणाचें नांव कोणाचें हें ठरविणें हें नेहमींच फारसें सोपें नसतें.
प्राचीन शिलालेखांत खरोखरी ऐतिहासिक अशी माहिती कांहीं मिळत नाहीं. भाषाविषयक दृष्टीनें मात्र ते पुष्कळ उपयोगी आहेत. कारण, या लेखांत सिंहलीभाषा तिच्या प्राकृत पायाभूत रूपांतून विकास पावून उच्च अभिजात वाङ्मयाच्या काळांतील सिंहलींचें स्वरूप तिला कसें प्राप्त होत गेलें हें आपणास पहावयास सांपडतें.