प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

सिंहली शिलालेख :— सिंहली शिलालेखांचा सर्वांत जुना काळ म्हणजे इ. पू. च्या शेवटच्या शतकापासून तों इ. स. च्या ५ व्या शतकापर्यंतचा होय. या काळांतील सर्व शिलालेख अशोकाच्या शिलालेखांतल्या ब्राह्मी लिपीमध्येंच लिहिलेले आहेत; व याच लिपीमधून नंतरच्या शिलालेखांची लिपी व पुढें झालेल्या ग्रंथांतील लिपी तयार झालेली आहे. हे शिलालेख लेण्यांमध्यें किंवा खडकावर कोरलेले आहेत.

गुहालेखांची एकंदर संख्या मोठी आहे. हे लेख पूर्वीं ज्यांत बौद्ध भिक्षू रहात असत परंतु आतां जीं रिकामीं पडलेलीं आहेत अशा लेण्यांच्या प्रवेशद्वारांवर लिहिलेले आहेत. त्या सर्व लेखांत थोडक्यांत प्रथम ज्यांनीं लेणें तयार करून तें बौद्ध भिक्षूंच्या उपयोगाकरीतां त्यांच्या स्वाधीन केलें त्यांची नांवें, किंवा त्यांच्या मालकांचीं नावें दिलेलीं असतात. उदाहरणार्थ दंबूल येथील पहिल्या लेण्यावर पुढील शिलालेख आहे :—

देव न पिय महा राजस गमी नितिस स महा लेने अ ग त अ न ग त च तु दिस स गस दिने

"देवांचा आवडता गमिनितिस्स या महाराजाचें हें मोठे लेणें असून तें हल्लीच्या व पुढील काळांतल्या पृथ्वीच्या पाठीवरील चारी (प्रदेशांतल्या) दिशांतल्या भिक्षूंनां अर्पण केलेलें आहे."

इ. मुल्लर म्हणतो कीं, "गमिनीतिस्स" हा "गमिनीचा मुलगा तिस्स" या शब्दांचा संक्षेप असावा, व त्यावरून इ. पू. १ ल्या शतकांतील वट्टगामनी अभय याचा पुत्र महाचूल तिस्स या राजाचा हा लेख असावा. हें मुल्लरचें अनुमान बरोबर असावें असें वाटतें.

हिनतिपोने (कागल्ला) येथील लेण्यांतील शिलालेख तर याहूनहि लहान आहे.
उ पा स क अ स ह ले ने
"अस या उपासक-बंधूचें हें लेणें आहे"

दुसरा एक विशेष लक्षांत घेण्यासारखा शिलालेख आहे; त्यांत उजवीकडून डावीकडे अक्षरें वाचावीं लागतात; हा लेख अंबलकंद येथील लेण्यावर आहे.

खडकांवरील लेख हे मठांनां दिलेल्या जमिनींच्या देणग्यांसंबंधानें व भिक्षूंनां दिलेल्या देणग्यासंबंधानें व असल्या इतर गोष्टींसंबंधानें आहेत. या शिलालेखांतील व त्या बेटांतील एकंदर शिलालेखांतहि सर्वांत जुना लेख म्हणजे तिस्समहाराम (दक्षिणेकडील प्रांतांतल्या हंबंतोलाच्या उत्तरेस) येथील शिलालेख होय. हा इ. मुल्लर याच्या यादींतील ४ थ्या नंबरचा शिलालेख होय. त्यांत आलेल्या नांवांचे मुल्लरनें दिलेले अर्थ सर्व बरोबर आहेत. महनक राजाचा पुत्र अलुणक राजा हा यांचा उत्पादक असें सांगितलेलें आहे; हा महनक राजा म्हणजेच देवानंपिय तिस्स याचा धाकटा बंधु महावंश ग्रंथांतील महनग राजा होय असें मानणें बरोबर होईल किंवा नाहीं याबद्दल संशय आहे. पण तसें मानल्यास मात्र हा शिलालेख इ. पू. ३ र्‍या शतकांतला आहे असें ठरेल.

पहिल्या कालखंडांतील शिलालेखांपैकीं विशेष मोठा म्हटला तर मिहिंतलेचा शिलालेख होय. (इ. म्यु. नं. २०). अंबत्थल दाघोबाकडे जाण्याचा जो दरवाजा आहे त्याच्यापुढें रस्त्याच्या उजव्या बाजूला हा शिलालेख आहे. खडकाळ व किंचित् उतरत्या जमिनींतील एका मोठ्या वज्रतुण्ड शिळेवर हा लेख खोदलेला आहे. परंतु यांत नुसती धार्मिक देणग्या वगैरेसंबंधींच माहिती आहे. हा लेख पहिला मेघवण्ण अभय (इ. स. पूर्वीं ३ तिसर्‍या शतकाचा उत्तरार्ध) याच्या कारकीर्दींतील असावा असें इ. मुल्लर याचें म्हणणें आहे; परंतु येथें मतभेद आहे. रत्मलगलच्या (नं.६) शिलालेखाप्रमाणें हाहि त्याच नांवाच्या राजाचा शिलालेख असावा असें गायजरला वाटतें. रवणवल्ली दाघोबाच्या गच्चीवर खोदलेले जे २१ नंबरचे शिलालेख आहेत-हे शिलालेख कालाच्या तडाक्यांत सांपडून बरेच खराब झाले आहेत-ते शिलालेख निःसंशय पहिला मेघवण्ण अभय (३ र्‍या शतकाचा उत्तरार्ध) याच्या कारकीर्दींतील किंवा तिसला मेघवण्ण अभय (४ थ्या शतकाचा पूर्वार्ध) याच्या कारकीर्दींतील असावेत. पी. गोल्डश्मिट यानें हवरणें येथील सुंदर शिलालेख (इ. म्यु. नं. ६१) वरील दोहोंपैकीं शेवटल्या मेघवण्ण अभयाचा आहे असें म्हटलें आहे, परंतु त्यानें या बाबतींत खात्रीलायक पुरावा दिला नाहीं.

सर्वांत जुन्या शिलालेखांत जीं राजांचीं नांवें आलीं आहेत त्यांपैकीं कांहींचा उल्लेख केला पाहिजे. गामिनी अभय (वट्टगामनी अभय) हा इ. स. पूर्वीं पहिल्या शतकांत होऊन गेला; (इ. म्यु. नं. १ व ८); वहब (=वसभ) हा इ. स. च्या पहिल्या शतकांत झाला. (नं. ७ व १०) ; व गजबाहु गामिनी अभय (पहिला गजबाहु) हा इ. सनाच्या दुसर्‍या शतकाच्या आरंभीं होऊन गेला (नं. ५). त्याच नांवांचा वारंवार उल्लेख आल्यामुळें कोणाचें नांव कोणाचें हें ठरविणें हें नेहमींच फारसें सोपें नसतें.

प्राचीन शिलालेखांत खरोखरी ऐतिहासिक अशी माहिती कांहीं मिळत नाहीं. भाषाविषयक दृष्टीनें मात्र ते पुष्कळ उपयोगी आहेत. कारण, या लेखांत सिंहलीभाषा तिच्या प्राकृत पायाभूत रूपांतून विकास पावून उच्च अभिजात वाङ्‌मयाच्या काळांतील सिंहलींचें स्वरूप तिला कसें प्राप्‍त होत गेलें हें आपणास पहावयास सांपडतें.

इसवी सनाच्या पांचव्या शतकापासून पुढें शिलालेख फारसे आढळून येत नाहींत, याचे कारण इ. मुल्लर याच्या मतें त्या वेळीं राजकीय अंदाधुंदी माजली होती हें होय. हें मुल्लरचें म्हणणें बरोबर आहे असें वाटतें. आतां आपणांस इ. सनाच्या ५ व्या शतकापासून ९ व्या शतकापर्यंत जो संक्रमणाचा काल आहे त्याकडे पहावयाचें. या काळांतील शिलालेख सुमारें १२ असावेत असें कांहींचे म्हणणें आहे. कारण, यांतील लिपी अशोकाच्या काळांतील वर्णलिपीहून किंचित् निराळी आहे. या लेखांतील अक्षरांनां वाटोळें वळण विशेष मिळालें आहे, हीं काळजीपूर्वक लिहिलेलीं नाहींत, यांचा आकार मोठा नाहीं व प्राचीन लेखांप्रमाणें हीं खोल खोदलेलीं नाहींत; तथापि जिच्या योगानें कालनिर्णय करितां येईल अशी कोणतीहि माहिती यांपैकीं एकाहि लेखांत आढळून येत नाहीं, हें येथें स्पष्टपणें सांगितलें पाहिजे. प्राचीन लिपिशास्त्राच्या दृष्टीनें विचार केला असतां या लेखांतील जुन्या लिपीवरून ते दहाव्या शतकापासून आरंभ होणार्‍या दुसर्‍या कालखंडामध्यें न जाता त्या पूर्वींच्या पहिल्या कालखंडांतच जाऊं शकतात. हा प्रथमकालखंड व द्वितीयकालखंड यांच्या मध्यें बरीच मोठी फट पडली आहे. प्रथमकालखंडांतील अलीकडील शिलालेखांत जी लिपी आहे तिच्यांत व अशोक लिपींत फारसे महत्त्वाचे फरक नाहींत. उलटपक्षीं द्वितीयकालखंडांतील अगदीं जुन्या लेखांतहि सध्याची सिंहली लिपी लिहिण्याची जी मोडी पद्धति आहे ती पूर्णत्वानें दृष्टीस पडते.

पांचव्या आणि नवव्या शतकाच्या मध्यंतरींचा संक्रमणकाल भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीनें अत्यंत महत्त्वाचा होता. या कालामध्यें अभिजात सिंहली भाषेचे वैशिष्ट्यबोधक उच्चारविशेष बनले गेले.

द्वितीय कालखंडाच्या सुरवातीस जो शिलालेखसमुच्चय दृष्टीस पडतो त्याची भाषा मागाहून रूढ झालेल्या सिंहली भाषेप्रमाणें संस्कृतमिश्र नाहीं. या १० व्या शतकांतील शिलालेखांत खालील नांवें सांपडतात. हीं नांवें अमुक अमुक राजांचीं आहेत हें गोल्डश्मिटनें निश्चित केलें आहे.
१. सिरि संगबो=चवथा कस्सप (९१२-९२९).
२. अबा सिरिबो=पांचवा कस्सप (९२९-९३९).
३. अबा सलमेवन (दापूळ)=पांचवा दापूळ(९४०-९५२).
४. महिंद (अथवा सिरिसंगबो)=चवथा महिंद(९७५-९९१).

'सिरिसंगबो' हें कोणाचेंहि नांव नसून ही एक पदवी आहे व ती राजाला लावीत असत, ही गोष्ट गोलश्मिटच्या नजरेस प्रथम आली, व त्या योगानें लेखांच्या कालनिर्णयाचें काम सोपें झालें. जरी गोल्डश्मिटचे वरील सर्वच अर्थ निर्दोष नाहींत तरी त्यांपेक्षां चांगले अर्थ सुचविणें कठिणच आहे.

कोलंबोच्या वस्तुसंग्रहांत सध्यां असलेला महाकलत्तनाचा स्तंभलेख (नं.११०) चवथ्या कस्सपाच्याच कारकीर्दीत झाला असला पाहिजे.  इल्लवावचे शिलालेख (नं. ११६) व आतवीरगोल्लावचे शिलालेख (नं. ११७) हे पांचव्या दापूळच्या कारकीर्दींत झाले. उत्तरोक्त शिलालेखामध्यें दापूळचा बाप अलअबासिरिसंग याचा उल्लेख आहे व हा राजा दक्षिण हिंदुस्थानांतील  पांडी नांवाच्या जातीच्या लोकांवर चालून गेला असें त्यांत म्हटलें आहे. पांचव्या कस्सपानें पांडी राजांच्या मदतीनें चोलांवर स्वारी केल्याचा उल्लेख महावंशांत आहे. वरील यादींतील शेवटचा चवथा महिंद याच्या कारकीर्दींतला शिलालेख म्हटला म्हणजे मेजलगस्तोत हो होय. हा तिस्स महारामच्या शिलालेखाच्या (नं. १२०) जवळच आहे. या शिलालेखाच्या वेळीं महिंद राजा रोहणचा सुभेदार होता. या शिलालेखांत अबा सलमेवन व गोन ह्यांचा मी मुलगा आहें असें तो म्हणतो.

परंतु मिहिंतले येथील शिलालेख (नं. १२१) मागील सर्वांपेक्षा विस्तृत आहे व या सर्वांपेक्षां ज्यास्त चांगल्या स्थितींत आहे. ते लेख दगडी शिलांवर खोदून त्या शिला टेंकडीच्या मध्यावर बसविल्या आहेत. येथून जवळच अंबत्थल दाघोबाला जाणार्‍या पायर्‍या लागतात. शिलालेखामधील तिसर्‍या ओळीमध्यें सिरिसंगबोग अबहे हें नांव आल्यामुळें कांहीं लोकांनां तो शिलालेख ३ तिसर्‍या शतकांतला आहे असें वाटलें. अलविन्सनें हेंच मत स्वीकारलें आहे, परंतु हें मत प्राचीन लिपिशास्त्राच्या दृष्टीनें चूक आहे. गोल्डश्मिटनें आपले शोध प्रसिद्ध करण्यापूर्वीं अलविन्सचेंच मत लोकांनां खरें वाटत होतें. चवथ्या महिंदाच्याच कारकीर्दींत हा शिलालेख लिहिला गेला ही गोष्ट, महिंदानें आपल्या आईबापांचा जो येथें नामनिर्देश केला आहे तो व मेजलगस्तोत शिलालेखांतील नामनिर्देश हे दोन्ही एकच आहेत ह्या गोष्टीवरून सिद्ध होतें. मिहिंतले शिलालेख महिंद राजाच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या वर्षांत म्हणजे आपल्या हिशोबानें इ. स. ९९१ मध्येंच लिहिला गेला असें ठरतें. त्या लेखावरून कालनिर्णयाला मुळींच मदत होत नाहीं, कारण त्यांत आतविहारच्या भिक्षुकांचे नियम दिले आहेत, दुसरें कांहीं नाहीं.

सिलोनमधील १२ व्या व १३ व्या शतकांतील शिलालेखांचा विचार करावयास लागलों म्हणजे सिलोनचा अत्यंत बलाढ्य राजा जो पहिला पराक्रमबाहु (इ. ११६४-११९७) त्याचे दोन लेख प्रामुख्यानें पुढें येतात.

पहिला म्हणजे गलविहारचा होय (नं. १३७). गलविहार पोलोन्नरुवमध्यें आहे. त्याचा काल "भगवान बुद्धाच्या नंतर ४५४ वर्षांनीं जो बलगम नांवाचा राजा झाला त्या राजाच्या नंतर १२५४ वर्षांनीं" असा सांपडतो; म्हणजे बुद्धानंतर, १७०८ व्या वर्षीं अथवा इ. स. ११६५ मध्यें हा लेख लिहिला गेला. ह्या शिलालेखामध्यें आपण बुद्धाचे नियम व त्याचें धर्मशिक्षण पुन्हा सुरू केलें अशी पराक्रमबाहूची दर्पोक्ति आहे यावरून त्यानें बरींच वर्षें राज्य केलें असें दिसतें आणि त्यावरून पराक्रमबाहु राजाचा राज्याभिषेक इ. स. ११६४ चे पूर्वीं झाला असें धरून चाललें पाहिजे.

सामान्य लोकांचें मत ११६४ हेंच राज्याभिषेकवर्ष असावें असें आहे. पण वरील कारणांसाठीं तें चुकीचें दिसतें. ह्याच राजाचा दुसरा म्हणजे देवनगलचा शिलालेख फारच महत्त्वाचा आहे. इतिहासाच्या दृष्टीनें तो सिलोनमधील सर्व लेखांत श्रेष्ठ आहे. त्यामध्यें पहिल्या पराक्रमबाहूनें अरमण अथवा पालिरामण्ण म्हणजे पेगु देशावर स्वारी केली तिचा उल्लेख आहे; आणि महावंशामध्यें (अ. ९६, १०-७५) ह्या लढाईची जी हकीकत आहे तिला हा लेख पुष्टी देतो. ती गोष्ट ऐतिहासिक आहे, हें तर त्या लेखावरून दिसतेंच, परंतु किरकोळ बाबतींतसुद्धां महावंशांतील आणि या लेखांतील हकिकती जुळतात. दोन्ही ठिकाणीं सिंहली सेनानायकांनीं काबीज केलेल्या कुसुमी शहराचा उल्लेख केलेला आहे, त्याचप्रमाणें कित्ती व नगरगिरि ह्या दोन सेनापतींचा उल्लेख दोन्हींकडे आहे. हा लेख सेनापतीच्या सन्मानार्थ कोरलेला आहे व त्याचा विषय राजानें ह्या सेनापतींचा केलेला अपूर्व गौरव हा होय.

देवनगल लेखाचें महत्त्व किती आहे हें प्रथम बेलनें 'कागल जिल्ह्याचा रिपोर्ट' (पृ. ७३) (Bell’s Report of the Kagall District) ह्या पुस्तकांत लोकांच्या नजरेस आणलें, परंतु मुल्लरच्या पुस्तकांत पहिल्या पांचच ओळी दिल्या आहेत व बेलचा रिपोर्ट मिळत नाहीं.

ह्याहून अधिक विस्तृत व संख्येनें ज्यास्त असें निःशंक मल्ल (११९८-१२०७) याचे शिलालेख आहेत. त्यानें बरेच विहार बांधले व तो समंतकूट (अडॅम्सपीक) येथें यात्रेकरतां गेला एवढेंच महावंशांत सांगितलें आहे.

त्या राजाच्या शिलालेखांतील बहारदार वर्णनें महावंशांतील हकिकतीशीं मुळींच जुळत नाहींत, यामुळें महावंशांतील हकीकतीवर कितपत विश्वास ठेवावयाचा असा संशय उत्पन्न होतो.

दांवूळ आपल्या शिलालेखामध्यें (नं. १४३) आपण सिलोनमध्यें शांतता व सुरक्षितता स्थापिली असें म्हणतो; आणि आपण कांही धर्मार्थ इमारती बांधल्या व बुद्धाचे पुतळे दांबूळ विहारामध्यें उभे केले आणि तेथील देउळाचें नांव 'सुवर्णगिरिगुहा' असें ठेवलें असेंहि तो सांगतो. ह्याच तर्‍हेचा रुवणवलिदाघोबा येथील लेख आहे. ही शिला बरीच मोठी असून प्रार्थनास्थानाच्या पूर्वबाजूस आहे. ह्या लेखाची भाषा अर्वाचीन असून ती सुशिक्षित सिंहली माणसास वाचतां येण्याजोगी आहे. ह्या लेखामध्यें राजानें आपल्या कारकिर्दींतील चवथ्या वर्षीं पुलस्तिपुराहून अनुराधपुरापर्यंत केलेल्या यात्रेचें वर्णन आहे. पोलोन्नरुव येथील "गलपोत" (शिलापुस्तक) नांवाचा शिलालेख विशेष महत्त्वाचा आहे. तो एका वज्रतुंड दगडाच्या तीन बाजूंवर कोरलेला आहे; त्याची लांबी २३ फूट ४ इंच, रुंदी ४० इंचांहून अधिक व जाडी २० इंच आहे. निस्संक मल्लानें त्यांत आपल्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला आहे; त्याचप्रमाणें त्यानें स्वतःच्या प्रजेकरितां व धर्माकरितां केलेल्या प्रयत्‍नांचा उल्लेख त्यांत आहे. तसेंच त्यानें हिंदुस्थानावर केलेल्या एका स्वारीचें तेथें वर्णन आहे, व अनेक राजांशीं त्याचे झालेले करारनामे व तह ह्यांचाहि उल्लेख त्यांत आहे; परंतु ह्या बाबतींत महावंश मूकवृत्ति स्वीकारितो ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे.

दक्षिण सिलोनमध्यें सुद्धां निस्संकमल्लाचे शिलालेख आहेत. त्यांपैकीं दोन लेखांमध्यें (नं. १५२, १८२) त्यानें उपरिनिर्दिष्ट हिंदुस्थानांतील स्वारीचा उल्लेख केलेला आहे, आणि तिसर्‍या लेखामध्यें (नं. १५३) दांबूल लेखांमध्यें म्हटल्याप्रमाणेंच, त्या द्वीपांतील निरनिराळ्या शहरांची आपण तपासणी केली व हें द्वीप आपल्यामुळें भरभराटीस आलें असें तो म्हणतो.

ह्याच संबंधांत साहसमल्लाचा म्हणजे निस्संकमल्लाच्या सावत्र भावाचा शिलालेख (इ. म्यु. नं. १५६) आपणांस विचांरांत घेतला पाहिजे. ह्या लेखांत निस्संकमल्लाच्या राज्याभिषेकाची मिति दिलेली आहे. ती बुद्धशकाचें १७४३ वें वर्ष म्हणजे इ. स. १२०० हें वर्ष होय. हा लेख हाट-दा-गे-च्या उत्तरेस असणार्‍या पोलोन्नरुव येथें सांपडला. यांत लागविजयसिंग कित् ह्या सेनापतीचा उल्लेख केलेला आहे. हें नाव 'गलपोत' लेखामध्यें सांपडतें. या लाग-विजयानेंच नं. १५७ चा शिलालेख करविला. हा शिलालेख अनुराधपुरांतल्या अबयवावाच्या एका शिलास्तंभावर आहे.

दुसर्‍या पराक्रमबाहूचा (इ. स. १२५०) कागल जिल्ह्यांतील नरनबेद्द येथील शिलालेख ऐतिहासिकदृष्ट्या तितक्याच महत्त्वाचा आहे. तामिळ राजांवर ह्या राजानें जी चढाई केली तिचा आणि यानें आपल्या नांवाचा जो एक मठ स्थापन केला त्याचा महावंशाप्रमाणेंच या लेखांत उल्लेख आहे. द्वितीय पराक्रमबाहूचा आणखी एखादा लेख आहे किंवा नाहीं, हें कांहीं खात्रीपूर्वक सांगता येत नाहीं. कारण, रुणवली (नं. १५८) व दोन्द्र (नं. १५९) येथील शिलालेखांत 'सिरिसंगबो' (पराक्रमबाहु) ह्या नांवानें कोणत्या पराक्रमबाहूचा निर्देश केला आहे, हें निश्चित सांगतां येत नाहीं.

तेराव्या शतकानंतरचे शिलालेख आहेत त्यांमध्ये पहिला, तिसर्‍या विक्रमबाहूचा गंपोल येथील शिलालेख होय. हा शके १२८२ म्हणजे इ.स. १३६० मध्यें लिहिला गेला आहे. यानंतरचे शिलालेख ई. मुल्लरचे प्राचीन शिलालेख पृष्ठ ७० (Muller’s Ancient Inscriptions, Page 70 ff.) व बेलचा कागल जिल्ह्याचा रिपोर्ट, पृष्ठ ७९ (Bell’s report of the Kagall District Page 79 ff.), या दोन ग्रंथांत सांपडतात. यांतील थोडे खालीं देत आहो :—

(१) कोट्टमध्यें (१५ व्या शतकाच्या सुरवातीस) राहणार्‍या सहाव्या पराक्रमबाहूनें कोट्टाच्या जवळच पापीलियान चा शिलालेख (नं. १६०) लिहविला. कारगल (न. १७० ई. मु.) व हरकगोड (बेल, पृष्ठ ८१) येथील लेखहि त्यानेंच लिहविले.

(२) पंधराव्या शतकांतील उत्तरार्धामध्यें उदयास आलेल्या सहाव्या भुवनेकबाहूचे वालीगम (१६१ ई. मु.) आणि देदिगम (पृ. ८३-८५) असे दोन शिलालेख आहेत.

(३) धर्मपराक्रमबाहु नांवाच्या राजाचा (सोळाव्या शतकाचा आरंभ) उल्लेख कालनी देवळांत असणार्‍या शिलालेखांत आहे. त्यांतच या राजाचा राज्याभिषेक बुद्धानंतर २०५१ वर्षांनीं म्हणजे इ. स. १५०८ मध्यें झाला असा उल्लेख आहे.

या राजाचें नांव महावंशांत मुळींच नाहीं. परंतु राजावलीयामध्यें तें सांपडतें. तो बहुतकरून सातव्या विजयबाहूचा शत्रू असावा. दोन्द्र शिलालेख (नं. १६३ मुल्लर) व कप्पगोडमधील शिलालेख (बेल पृ. ८६, ८७) याचेच आहेत.

(४) देवनगल नं. २ हा शिलालेख (बेल पृ. ८७-८८) पहिल्या विमलसूर्याचा (१५९२-१६२०) आहे.

(५) सेलवचा शिलालेख (बे. पृ. ८९-९०) हा बहुतकरून शेवटचा सिंहली शिलालेख होय. हा राजसिंहाच्या कारकीर्दींत कोरला गेला असून त्याच्यावर बुद्धानंतर २३४९ वर्षांनीं म्हणजे इ. स. १८०६ असा काल आहे.

आतां सन्नसांसंबंधानें म्हणजे राजांच्या दानलेखांसंबंधानें चार शब्द सांगणार आहो. दानासंबंधींच्या शिलालेखात सन्नस म्हणतां येईल परंतु या शब्दाचा जो संकुचित अर्थ आहे, त्याप्रमाणें सन्नस म्हणजे ताम्रपट, सुवर्णपट किंवा रजतपट अथवा भूर्जपत्रावरील लेख असा अर्थ घेतात. ह्या सन्नसांपैकीं  बर्‍याच लेखांच्या नकला करण्यांत आल्या असून त्यांविषयीं बराच ऊहापोह झालेला आहे. उपरिनिर्दिष्ट बेल साहेबांच्या कागल जिल्ह्याच्या रिपोर्टांत तेथील सन्नसांसंबंधानें विचार केला गेलेला आहे. (बेल पृ. ९१). अशा तर्‍हेचे दानलेख करून भिक्षुकांनां किंवा गृहस्थांनां देणग्या देण्याची पद्धति बौद्ध लोकांच्या चांगलीं कर्में केल्यानें पुण्य मिळतें ह्या मतावरून आली असावी किंवा राज्याची उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल कांहींतरी बक्षिस द्यावें हाहि या दानांचा उद्देश असेल. ह्या दानपद्धतीचा आरंभ १४ व्या शतकाइतका जुना आहे किंवा त्याहून आधींचा असेल, आणि ही पद्धति सिंहली राज्याच्या नाशापर्यंत चालू होती. बेलसाहेबांच्या यादीप्रमाणें ३२ सन्नसांचा आतांपर्यंत कागल जिल्ह्यांतच शोध लागला आहे. ह्यांपैकीं अतिशय जुना सन्नस म्हटला म्हणजे पांचव्या भुवनेकबाहू राजाचा गणेगोड सन्नस (१३९७) हा होय व सर्वात अलीकडील म्हणजे विक्रमराज सिंहाचा १८१३ सालांतला मोल्लिगोड सन्नस हा होय. हा दुसरा सन्नस धातूवरचें उत्कृष्ट काम ह्या दृष्टीनें फार महत्त्वाचा आहे. सन्नसाचें एक चांगलें उदाहरण म्हणून १६४४ सालीं भूर्जपत्रावर लिहिलेल्या मंगलगमसन्नसाचा उल्लेख करितां येईल.

सिंहली चिरजीवि लिखाणांचें म्हणजे लेण्यांतील लेख, खडकांवरील लेख, स्तंभलेख, ताम्रपट इत्यादिकांचें अवलोकन आतांपर्यंत झालें तेवढें आपल्या स्थलावकाशाच्या दृष्टीनें पुरेसें झालें आहे. आता सिंहली ग्रंथ-वाङ्‌मयाचें सिंहावलोकन करून या वाङ्‌मयाच्या स्वरूपावरून जे प्रश्न सुचतात त्यांजकडे वळूं.

सिंहलद्वीपामध्यें बौद्धसंप्रदायाच्या प्रवेशाबरोबर ज्या भारतीय संस्कृतीचा व परंपरांचा प्रवेश झाला त्यांचें उत्तररूप आपणास तेथें तयार झालेल्या सांप्रदायिक व टीकात्मक वाङ्‌मयांत पहावयास सांपडतें. अशा तर्‍हेच्या वाङ्‌मयांत मुख्यत्वेंकरून पुढील ग्रंथ मोडतात. अठ्ठकथा, विसुद्धिमग्ग, बुद्धघोषभाष्य, दंपिया-अटुवा-गाटपद-सन्नय (धम्मपदभाष्य), अमावतार (अमृतप्रवाह-बुद्धवचनें), धर्मप्रदीपिका, विनयार्थसमुच्चय, मालाब (धर्मविषयक कोडीं), रसवाहिनी, सद्धर्मरत्‍नाकरय, सद्धर्मरत्‍नावलिय (धम्मपद अठ्ठकथा), तिरतनमालाव, वालिगलदाठागोत्पदीय आणि सियबस मलदम.

सांप्रदायिक दृष्टान्तकथा, दंतकथा, बुद्धस्तुतिपरकाव्यें इत्यादि विषयांवरील ग्रंथ म्हटले म्हणजे दळदावंस (बुद्धाच्या दांताची कथा), बाधिवंस, दाठावंसय (दळदावंसवरून पाली भाषेंत), सन्नय (दाठावंसय याचेंच त्याच कर्त्याचें सिंहली रूपांतर), एळुबोधिवंसय, सद्धर्मालंकारय (बौद्धपुराणकथा), निकायसंग्रय (बौद्धसंप्रदायेतिहास), लोकोपकारय (दृष्टान्त कथा), दळदासिरित (दंतकथा), बुधगुणालंकार, लोवाडसंगराव, मुनिगुणरत्‍नमालय इत्यादि.

सिंहली वाङ्‌मयांतील सांप्रदायिक ग्रंथांचा तिसरा वर्ग म्हटला म्हणजे पाली धर्मशास्त्रीय ग्रंथांचीं व जातककथांचीं भाषांतरें व रूपांतरे यांचा. या वर्गांत पुढील ग्रंथ मोडतात. सुत्तपिटक, विनय, सद्धर्मदास (मिलिंदपन्हावरून), पन्सियपनस्जातक, उम्मग्गजातक, ससदावत (ससजातकावरून), कुसदावत अथवा कवसिळुमिण (कुसजातकावरून), नुवदेवदावत (मखादेव जातकावरून), काव्यशेखरय (जातक ग्रंथावरून बोधिसत्त्वकथा), गुत्तिलकाव्य (गुत्तिल जातकावरून), कुसजातक, दहमसोंडजातक (जातकनीनिसारय याचें रूपांतर), मुनिचोरजातकय, असिदसजातकय, कवमिणिकोंडल (अलिनचित्तजातक), कवमिणिमल्दम (सोनकजातक), कवमुतुहर (दसरथजातक), कवसिळुमिण (अंधभूतजातक), कवमिणिरंदम आणि तलपत्तजातकय.

सिंहली ऐतिहासिक ग्रंथांमध्यें दीपवंस व महावंस या दोन ग्रंथांस आद्यस्थान दिलें पाहिजे. कारण सिंहलीद्वीपाचा प्राचीन इतिहास जाणण्यास हेंच कायतें साधन आहे. त्यानंतर 'दापुलाचीं शासनें' हीं महत्त्वाची आहेत. पण तीं उपलब्ध नाहींत. थूपवंस हा ग्रंथ सरकारी लिखाणाच्या आधारें रचला असल्यामुळें महत्त्वाचा आहे. पूजावलिय यांत मध्यंतरींच्या राजांची हकीकत सांपडते. सुलुराजरत्‍नाकरय हा त्यानंतरचा ऐतिहासिक ग्रंथ सध्यां उपलब्ध नाहीं. अट्टनगलुवंसय हा त्या सुमाराचाच ग्रंथ असून त्यामध्यें हत्तहंगल विहाराचा इतिहास आहे. यावरून कांहीं तत्कालीन इतिहास कळतो. परकुंबसिरित या ग्रंथांत पराक्रमबाहु (सहावा) याचें चरित्र व तत्कालीन इतिहास आढळतो.

परंगिहटन व महाहटन या दोन अर्वाचीन काव्यग्रंथांत सिंहली लोकांच्या अनुक्रमें पोर्तुगीज व डच लोकांशीं झालेल्या लढायांचा इतिहास आहे. त्याहून अर्वाचीन कोस्तंतीनुहटन या एका देशी ख्रिस्त्यानें केलेल्या काव्यांत एका बंडाचें वर्णन आहे. राजवलिय व राजरत्‍नाकरय हे दोन अर्वाचीन गद्य ऐतिहासिक ग्रंथ आहेत.

यानंतरचा महत्त्वाचा वर्ग म्हटला म्हणजे सर्वसामान्य भारतीय वाङ्‌मयांत अंतर्भूत होणारा व भारतीय काव्यांचें अनुकरण करणार्‍या सिंहली काव्यग्रंथांचा होय. या वर्गांतील बरेचसे ग्रंथ कालिदासाच्या मेघदूत काव्यांचें अनुकरण करून लिहिलेले आहेत. या वर्गांत जानकीहरण, मयूरसंदेशय, साळलिहिणीसंदेशय, परविसंदेशय (पारावतसंदेश), तिसरसंदेशय, गिरासंदेशय, कोवुलसंदेशय हे ग्रंथ येतात. वियोवगरत्‍नमालय आणि रतिरत्‍नालंकारय हीं दोन श्रृंगारिक काव्यें आहेत. भाषाशास्त्रीय ग्रंथांमध्यें सिदतसंगराव नांवाचें एळुव्याकरण, मोग्गलायन पञ्चिकाप्रदीपय हा अर्धपाली अर्धसिंहली टीकाग्रंथ, हे दोन व्याकरणावरील ग्रंथ, सियबसलकर हा अलंकारावरील ग्रंथ आणि पियुम्मल, रुवनमल, पुराण नामावलिय हे शब्दकोश हे अंतर्भूत होतात.

याखेरीज वैद्यकावर सारत्थसंग्रह आणि योगार्णव हे दोन ग्रंथ आहेत.

हा जो सिंहलद्वीपांतील वाङ्‌मयाचा इतिहास वर दिला आहे त्या इतिहासाच्या निरिक्षणानें एक गोष्ट स्पष्ट दिसते ती ही कीं, श्रौतधर्मविषयक वाङ्‌मयाचा तेथें अभाव आहे. सिंहलद्वीपांत सिंहलांचें विशिष्ट असें एकहि श्रौतसूत्र नाहीं. बुद्धपूर्वकालीन धर्माचें द्योतक वाङ्‌मयच नाहीं. आज सिंहलद्वीपांत
ब्राह्मणजातीचा जसा अभाव आहे तसा तो पुरातन काळापावेतों इतिहासाचें आलोडन केलें असतांहि सांपडतो. यांतील इंगित काय ? पौलस्त्य रावण हा ब्राह्मण होता अशी जी आख्यायिका आहे ती कशी उत्पन्न झाली ?  सिंहलद्बीपांत ख्रिस्तपूर्व पांचव्या, सातव्या किंवा आठव्या शतकांत भारतीय लोक वसाहतीसाठीं प्रथम गेले असें जें अंदाजी विधान अर्वाचीन संशोधकांकडून झालेलें आढळतें तें जर खरें असेल तर आजच्या सिंहली लोकसमाजांत ब्राह्मण्याचा अत्यंताभाव आहे त्याचें स्पष्टीकरण कसें करितां येईल ? सध्यां केवळ हिंदी मजूर न्यावयाचे अशा हेतूनें हिंदूंचें परदेशगमन इंग्रजी भांडवलानें करविलें तें परदेशगमन देखील ब्राह्मणांशिवाय झालें नाहीं. जर ब्राह्मणांची जात पहिल्या सिंहलार्थ प्रयाणकाळीं अस्तित्वांत असती तर तिचेंहि गमन तेथें झालेंच असतें आणि त्या जातीचें पृथक्त्व टिकलें असतें.

बौद्ध भारतीय सिंहलद्वीपांत आले तेच खुल्या समाजपद्धतीचे पुरस्कर्ते असल्यानें ब्राह्मणांसह हिंदुसमाज तेथें गेला असेल आणि तेथील ब्राह्मण इतरांत मिसळले असतील व या रीतीनें सहजच या द्वीपांतील लोक-स्थिति भारतीय लोकस्थितीहून ब्राह्मण्य, यज्ञकर्म, पौरोहित्य वगैरे बाबतींत भिन्न झाली असेल, हें मत अग्राह्य ठरविण्यास कारणें येणेंप्रमाणे :—

बुद्धानें वेदांतासारखा एक तत्त्वविचार मात्र स्वतःचा उभारला. बाकीच्या जातिविषयक गोष्टींत कांहींहि विशेष फरक करण्याचा त्यानें प्रयत्‍न किंवा विचार देखील केला नाहीं. ब्राह्मणांचा नंबर दुसरा, क्षत्रियांचा पहिला, असा आग्रह त्यानें धरिला. यापलीकडे ब्राह्मण नकोत, संस्कार नकोत, यज्ञकर्म नको, देवता नकोत इत्यादि कसलाहि आग्रह त्याच्या पंथांत नव्हता. चित्तशुद्धीचें महत्त्व म्हणजे वासना-निर्मूलन-धर्माचें महत्त्व तो गाई. पण तें मत एकंदर समाज-व्यवस्थेशीं अविरुद्ध असल्यानें समाजरूप-नाशक झालें नाहीं. ही बुद्धपंथाची भारतांतील चळवळ लक्षांत घेतली म्हणजे बुद्धमतप्रसार होऊनहि ब्राह्मणजातीचें पृथक्त्व राहूं शकतें, हे दिसतें. सिंहलांत ब्राह्मण असतां बौद्धमत पसरलें असतें तर ब्राह्मणांस समाजांत फारतर द्वितीयपद आलें असतें, ब्राह्मणजात अजीबात नष्ट झाली नसती. सिंहलद्वीपांतील आजची नजरेसमोरची ब्राह्मण्य-विहीन समाज-स्थिति बौद्धांच्या आगमनानें व त्यांच्या पंथाच्या प्रसारानें उत्पन्न झाली असें या वरील कारणांस्तव म्हणतां येणार नाहीं. आज जशी समाजस्थिति आहे तसल्याच प्रकारची समाजस्थिति ख्रिस्तपूर्व चवथ्या पांचव्या शतकांत व तत्पूर्वींहि होती असें दाखविणारें वाङ्‌मय उपलब्ध आहे. सिंहलद्वीपांत ब्राह्मणाभावाचें वैशिष्ट्य बौद्धपंथी भारतीयांचें तेथें प्रयाण झाल्यानें उत्पन्न झालें नसून ब्राह्मणजाति-विकासापूर्वीं भारतीयांची या द्वीपावर वसति झाल्यानें उत्पन्न झालें असावें. अव्यवस्थित व चिरवाङ्‌मयरहित श्रौतधर्मापासून वेदयुक्त श्रौतधर्माचा विकास आणि त्याबरोबर झालेला ब्राह्मणजातीचा विकास यांचें विवेचन वेदांच्या विवेचनाच्या अंगानें पुढें येईलच.

रामायणांतील कथासूत्र अवलोकन केल्यास आपल्या नजरेस असें येतें कीं सिंहलद्वीपांत जे लोक रहात होते त्यांच्या आचारांत यज्ञधर्म व शैवधर्म यांचें ऐक्य होतें, आणि भारतीय फक्त यज्ञधर्म आचरणारे होते. सिंहली लोक व त्यांचे विरोधी रामपक्षीय लोक यांच्यांत यज्ञाच्या म्हणजे वैदिक धर्माच्या मुख्य कल्पनेच्या बाबतींत एक प्रकारचें मतैक्य व बरेंचसें आचारैक्य होतें. तुमच्या यज्ञाचा आम्ही ध्वंस करणार एवढाच आग्रह राक्षसांचा असे. स्वतः ते यज्ञ करणारेच होते. म्हणजे अथर्व वेदांत जी एक जुनी सामान्य आर्यांची यज्ञप्रवणता व तिजबरोबर अभिचारादिप्रवणता दिसून येते ती सिंहलद्वीपस्थांत राम-कालीं दिसून येते. शिवाय रावण हा पुलस्तिऋषीचा पुत्र दाखविला आहे आणि तेथें भारतीयांस भरभराट दिसली असें वर्णन आहे. ह्यावरून सिंहली वसाहत बरीच जुनी असावी असें दिसतें. रामकालाच्या पूर्वीं निदान एक दोन शतकें आर्यन् लोक सिंहलद्वीपांत पोंचले होते, असें विधान वरील गोष्टीवरून करतां येतें. तैत्तिरीय आरण्यक ऐतरेय ब्राह्मण यांतील दाक्षिणात्य राष्ट्रांसंबंधींच्या उल्लेखांकडे पाहतां या आरण्यकाच्या व ब्राह्मणाच्या काळांत दक्षिणेकडे आर्यन् वसाहती होऊन गेल्या होत्या, तद्देशस्थांचें व आर्यन् लोकांचें वंशभिन्नत्व आर्यन् लोक विसरले होते, आणि तद्देशस्थांविषयीं सामाजिक विचार प्रकट करण्याची त्यांस इच्छा झाली होती इतकें स्पष्ट दिसतें. या दाक्षिणात्य आर्यन् वसाहतींतूनच पलीकडे सिंहलद्वीपांत आर्यन् लोकांचें प्रथम प्रयाण वर सांगितल्याप्रमाणें ब्राह्मण्यविकासापूर्वीं झालें असलें पाहिजे.

सिंहली वाङ्‌मयांतील विशेषांवरून सिंहलच्या अति प्राचीन पूर्वजांसंबंधानें जो तर्क करतां येतो तो वर दिला आहे. आतां सिंहली भाषेसंबंधानें जें संशोधन झालेलें आहे त्याजकडे वळूं. या संशोधनाच्या पूर्वस्थितींत सिंहली भाषेचा संबंध आर्यन् खेरीज इतर भाषा-कुलाकडे जोडण्यांत येत होता. परंतु आतां सिंहली ही आर्यन् भाषा आहे असें खात्रीपूर्वक म्हणतां येण्यासारखी सामग्री जुळविली गेली आहे. या संबंधांत गैजर या जर्मन भाषापंडीतानें विशेष परिश्रम केले आहेत.