प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली लोकांतील जातिभेद — सिंहली लोकांत जातिभेद नाहीं असें मुळींच नाहीं. बुद्धाचा हेतु जातिभेद नष्ट करण्याचा नव्हता, याचें विवेचन प्रसंगानुसार येईलच. सिंहली लोकांत जातिभेद जवळजवळ आपल्याइतकाच तीव्र आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. ब्राह्मणांनीं आपल्या ग्रंथांनीं जातिभेद उत्पन्न केला हें विधान किती चुकीचें आहे हें पाहण्यास सिंहली लोकांच्या समाजस्थितींचें अवलोकन केलें म्हणजे पुरे आहे. धर्मशास्त्र तर त्या सर्वांस एकाच वर्णांत घालून त्यांची एकी अपेक्षितें. विशिष्ट जातींचें उच्चत्व आणि नीचत्व त्यांच्या अधिकारावर, संस्कृतीवर आणि त्यांनीं स्वतःच्या उद्धारार्थ केलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असतें.
सिंहली लोकांत प्रामुख्यानें वागणारी व उच्च समजली जाणारी जात म्हटली म्हणजे "गोईगम" ही होय. ही जात वेल्लालांच्या बरोबरीची आहे हें तत्त्व वेल्लालांनीं आणि इतरांनीं मान्य केलें आहे. कोणत्याहि जातीला आपलें उच्चत्व स्थापन करावयाचें झालें म्हणजे त्याला कांहींतरी कारण हें शोधिलेंच पाहिजे. कारण देतांना आम्ही श्रीमंत आहों, आणि स्वच्छतेनें राहतों एवढ्याकरितां आम्हांस तुम्ही उच्च माना, एवढेंच कारण पुरत नाहीं. कांही जुन्या सर्वमान्य तत्त्वांची आणि आधुनिक परिस्थितीची सांगड घालावी लागते, काल्पनिक इतिहास उत्पन्न करावा लागतो आणि स्वतःचें उच्चत्व फार जुन्या कारणांनीं स्थापित झालें आहे असें भासवावें लागतें. "नीतिनिगंडुव" नांवाच्या सिंहली धर्मशास्त्रग्रंथांत पृथ्वीची उत्पत्ति आणि जातींची उत्पत्ति देतांना "गोवीय" उर्फ "गोईगम" जातीच्या श्रेष्ठतेचें कारण दिलें आहे तें येणेप्रमाणे :—
"सिंहलद्वीपांत ब्राह्मणादि तीन वर्ग नाहींत. गोवीय हीच उच्च जात आहे. गोवीय जातींत पूर्वीं येथें आलेल्या ब्राह्मणांनीं लग्नें केलीं आणि ब्राह्मण गोवीयांत मिसळून गेले तेणेंकरून गोवीय ही उच्च जात आहे."
आजचे गोईगम आपणांस उच्च शूद्र म्हणवून घ्यावयास तयार नाहींत हे मात्र लक्षांत ठेविलें पाहिजे.
निरनिराळ्या जातींनीं राजाबरोबर आणि उच्च जातीशीं कसें वागावें या संबंधानें जितके कठोर नियम लंकेंत होते तितके दुसरे कोठें नसतील. जातीच केवळ हलक्या होत्या असें नाहीं, तर जातींच्या अनुसार गांवांचाहि दर्जा ठरत असे. उदाहरणार्थ
गबदगाम=हें श्रेष्ठ प्रकारचें गांव होय. गबदगाम म्हणजे राजाचें गांव.
विहारगाम=विहाराच्या पोटगीसाठीं राखलेलें गांव.
गत्तुरगाम=उच्च जातीचे तथापि पतित झालेले लोक ज्या गांवांत रहातात तें गांव.
गहलगाम=नीच जातीनें वसलेलें गांव.
वेदिगाम=मृगया करणार्या लोकांचें गांव.
बतगाम=पादुआ नांवाच्या हलक्या जातीनें वसविलेले गांव.
(सिंहलद्वीपांतील वेद्ध नांवाचे लोक बहुतेक शिकार करुन उपजीविका करितात. वेद्ध, वेदिगाम, आणि व्याध शब्दांचा कांहींतरी संबंध असावा असें वाटतें.)
लंकेंत रोडिया म्हणून जात आहे. तिची स्थिती फारच वाईट आहे. ज्या कालांत रोडियांस उघडपणें रस्तावरून चालतां देखील येत नव्हतें तो काल आजच्या लोकांनीं लहानपणीं पाहिला आहे.
राजा तिसरा दापुलु यानें एक शासनग्रंथ तयार केला त्यांत रोडियाच्या सावलीनें पाणी विटाळतें असें दिलें आहें असें म्हणतात. हा ग्रंथ आमच्या अवलोकनांत आला नाहीं. सिंहली वाङ्मयाचा जर्मन इतिहासकार डॉ. गैजर याची तो नष्ट झाला असावा अशी समजूत आहे.
गोईगमांच्या खालोखाल महत्त्वाची जात म्हटली म्हणजे "करावा" म्हणजे कैवर्त उर्फ कोळ्यांची जात होय. ही जात देखील चांगली सुशिक्षित व श्रीमंत झाली आहे. गोईगमांच्यापेक्षां या जातीचें महत्व कमी असण्याचें कारण केवळ नीतिनिगंडुवांतील वाक्य नाहीं; जातींचें उच्चत्व अगर नीचत्व केवळ ग्रंथवाक्यांवर अवलंबून नसतें, तर ज्या कालांत ज्या गोष्टी अधिक सन्माननीय असतात त्या कालांत त्य़ा गोष्टी करणारांस महत्त्व प्राप्त होतें. स्पष्टीकरणार्थ एक भारतीय उदाहरण घेऊं. सारस्वत ब्राह्मण खरोखरच पाहिले असतां फार जुने ब्राह्मण आहेत. तथापि ते मत्स्याहारी असल्यामुळें महाराष्ट्रीय ब्राह्मण त्यांस स्वतःपेक्षां कमी समजतात. समुद्रमार्गानें प्रवास आपल्या देशांत कांहीं दिवस वाईट समजला जात होता, आणि तो सारस्वत ब्राह्मणांनीं स्वधर्मसंरक्षणार्थ केला. यामुळें कोचीन, त्रावणकोर इत्यादि संस्थानांत शूद्र नायर देखील त्यांस हलके लेखतात आणि त्यांस देवळांतून मज्जाव आहे. उलट उदाहरण पहावयाचें असल्यास तिनवेल्ली येथील "शेव" वेल्लालांचें पहावें. तिनवेल्ली जिल्ह्यांत कांही वेल्लालांनीं मांसाहाराचा त्याग करून अधिक उच्चपद मिळवलें आहे. लंकेत जमिनीवर ताबा असणें हें मोठ्या मानाचें आणि राजत्त्वाचें लक्षण समजलें जातें आणि त्याच्या योगानें 'गोईगम' हा शेतकरी वर्ग फार थोर समजला गेला.
कैवर्तांचीं गोईगमांशीं थोडींबहुत लग्नें झालीं आहेत आणि अशा प्रसंगी पन्नास हजार रूपयांपर्यंत रक्कम एका हातांतून दुसर्या हातांत गेली आहे. या लग्नांची उपपत्ति एका सुशिक्षित गोईगमानें दिली ती येणेंप्रमाणे :- "कोणी विलायतेस जाऊन आलेला गोईगम जातीचा बॅरिस्टर धंद्यांत पैसे मिळत नसेल म्हणजे असली सामाजिक सुधारणा करितो. असल्या लोकांस आम्ही बहिष्कृत करितो."
गोईगम आणि करावा या जातींमध्यें द्वेषबुद्धि बरिच आहे. कायदेकौन्सिलच्या एका निवडणुकीच्या प्रसंगी दोन उमेदवार उभे राहीले, त्यांपैकीं एक तामिळ "वेल्लाल" होता आणि दुसरा सिंहली "करावा" होता. त्या वेळेस सिंहली "करावांनीं" आपलीं मतें आपल्या जातभाईस दिलीं, तथापि सिंहली गोईगमांनीं आपलीं मतें कराव्यास न देतां तामिळास दिलीं, आणि शेवटीं तामिळ उमेदवाराचा विजय झाला.
सिलोनमध्यें जो जातिभेद दृष्टीस पडतो, त्यास विविध कारणें आहेत. कांहीं जाती राष्ट्रमूलक आहेत. रोडिया आणि पादुआ हीं लहान राष्ट्रें असून त्यांच्या पाडावामुळें त्यांस नीचत्व प्राप्त झालें असावें असें दिसतें. निदान या जाती पूर्वींच्या एकरूप समाजाचे तुकडे पडून झाल्या नाहींत हें खास. कांही जाती मात्र धंद्यावरून पडल्या असणें शक्य आहे. उदाहरणार्थ, "धोबी" नांवाची कपडे धुणारी जात घ्या. ही जात जो धंदा करिते तो धंदा सिंहली लोक शेतकरीपेक्षां हलका समजतात. धोबी जातीचे लोक करव्यांस व करवा हे धोब्यांस हलके समजतात. अर्थात कोळ्याचें काम हलकें कीं धोब्यांचें काम हलकें या गहन प्रश्नाचा कायमचा निकाल लावणें कोणास शक्य आहे ?
सिंहलद्वीपच्या सध्यांच्या समाजांत तरी "विटाळ" आणि "सोंवळें" या कल्पना नाहींत. पूर्वकालीं होत्या अगर नव्हत्या हें त्या देशांत उत्पन्न झालेल्या वाङ्मयावरून ठरविलें पाहीजे. त्या कल्पना असल्या तरी फारशा तीव्र नसाव्यात. याचें कारण सिंहली लोक सर्वभक्षक आहेत. सध्यांच्या समाजांतील कांही अवशेषांवरून त्या कल्पना एका काळीं असतील असें वाटतें. कारण आज सर्व लोक जरी मुसुलमानांच्या उपहारगृहांत काफी घ्यावयास आणि उपहार करण्यास जातात तरी मुसुलमान, तामिळ आणि सिंहली या लोकांकरितां निरनिराळीं भांडीं राखून ठेवलेलीं असतात.
सिंहली समाजाच्या अवलोकनानें ज्या कांहीं गोष्टी मनांत येतात त्या येणेंप्रमाणेः-
पहिली गोष्ट मनांत ठसते ती ही कीं, ब्राह्मणांचें वजन जरी या समाजावर नाहीं तरी देखील जातिभेद आहे. बौद्धसंप्रदायाचा परिणाम जातिभेद कमी करण्याकडे यत्किंचितहि झाला नाहीं. बुद्धाचा प्रयत्न जातिभेद नाहिंसा करण्याकडे मुळींच नव्हता या विधानास लंकेंतील सद्यःस्थितीची साक्ष आहे. जातिभेद हा पारमार्थिक चळवळीनें कधींहि जाणें शक्य नाहीं. जी परिस्थिती अनेक राजकीय, सामाजिक आणि शासनविषयक कारणांचा परिणाम आहे, त्या परिस्थितीचा पारमार्थिक गोष्टींशीं संबंध जोडणेंच हास्यास्पद आहे. जातिभेद मोडणें म्हणजे समाजाचें एकराष्ट्र बनविणें यासारख्या प्रचंड चळवळी करण्याकरितां समाजापुढें आपलें वर्चस्व स्थापण्याची एक तर्हेची प्रंचड सामाजिक आकांक्षा असली पाहीजे; आणि त्या आकांक्षेस मूर्त स्वरूप देण्यासाठीं अनेक तर्हेच्या राजकीय चळवळी केल्या पाहिजेत, ही गोष्ट अधिकाधिक स्पष्टतेनें भासूं शकते.
सिलोनमध्ये जातिपंचायती सध्या उरल्या नाहींतसें दिसते. जरी कांहीं कोठें असल्या तरी त्या मृतकल्प झाल्या आहेत. यामुळें समाजाचे निरनिराळे परमाणू एकत्र होऊन त्या परमाणूंकडून सामाजिक कार्य होण्याचा दिवस अजून आला नाहीं.
सोंवळ्याओंवळ्याच्या कल्पना जरी नष्ट झाल्या आहेत तरी समाजांत उच्चनीचतेच्या कल्पना कायम आहेत; यामुळें मनात एक अशी शंका उत्पन्न होते कीं, हिंदुस्थानांतील लोकांच्या त्या कल्पना जरी नष्ट झाल्या तरी, समाजास एकत्व आणणारी समाजघटना झाली नाहीं तर जातीभेद नष्ट होणार नाहीं. जातिभेद मोडण्यास सोंवळ्याओंवळ्याच्या कल्पना कमी अगर नष्ट झाल्यास कदाचित् सुलभ जाईल; पण तेवढ्यानेंच कार्य होणार नाहीं.
लंकेंत बालविवाह नष्ट झाला आहे हें पुढें सविस्तर सांगितलें आहे. प्रौढविवाह आणि प्रतिविवाह हे आपणास सकृद्दर्शनीं जितके जवळजवळ दिसतात तितके ते नाहींत हें या द्वीपाची आधुनिक स्थिती बोधिते. सिंहलद्वीपांत अजून देखील प्रीतिविवाहाचा प्रसार फारसा झाला नाहीं. मलबार येथील नायर स्त्रीपुरुषें जो संबंध करितात तो प्रौढ वयांत होतो, तथापि तेथें देखील प्रीतिविवाह आणि अनुनयपद्धति यांचा प्रसार झाला नाहीं. स्त्रीपुरुषांच्याच अहेतुक आणि सहज परिचयानें स्नेहसंबंध जडून त्यांचें प्रीतींत पर्यवसान होणें आणि त्यानंतर लग्नसंबंध घडून येणें हें सिंहल देशांत अजून देखील सुरू झालें नाहीं. प्रीतिविवाहाच्या योगानें जातिभेद नष्ट होण्याची पायरी फारच पुढची आहे असें दिसतें.
प्रीतिविवाहासारखी सुधारणा आमची शासनविषयक आणि राजकीय उन्नति झाल्याशिवाय चांगल्या तर्हेनें स्थापित होणार नाहीं असें आमचें मत झालें आहे. हें मत कोणच्या अनुमानमालिकेच्या आणि कार्यकारणभावांच्या साहाय्यानें झालें आहे हें येथें सांगण्यास अवकाश नाहीं. याचा ऊहापोह पुढें येईलच.
सिंहली जाती परस्परांशी लग्नव्यवहार करण्यास तयार होत नाहींत; तथापि सर्व जाती यूरोपियन आणि बर्घेर लोकांबरोबर लग्नें करण्यास तयार होतात. बर्घेर म्हणजे पोर्तुगीज आणि डच लोकांचें वंशज.
सिंहलद्वीपाची संस्कृति मुख्यत्वेंकरून हिंदु आहे हें अगोदर स्पष्ट केलेंच आहे. आतां या संस्कृतीवर यौरोपिन्याचीं पुटें कशीं काय चढलीं आहेत हें पाहूं.
प्रथमतः येथें हें सांगितलें पाहिजे कीं, हिंदुस्थानांत यूरोपियन लोकांपैकीं एकाच राष्ट्रानें आपल्या संस्कृतींत बदल करण्याचा प्रयत्न केला आणि तें राष्ट्र म्हटलें म्हणजे इंग्रजांचें होय.
पोर्तुगीजांनीं देखील आपल्या राष्ट्रावर आघात केले. तथापि देशाचा एक अगदीं अल्प भाग त्यांच्या सत्तेखालीं आला आणि तो देखील पुढे मराठ्यांनीं त्यांच्या तडाक्यांतून सोडविला. पोर्तुगीजांनीं आपल्या देशांतील लोकांस ख्रिस्ती केलें. यूरोपियन लोकांची संस्कृति आपल्यावर लादण्याचे त्यांचे उपाय फारच प्रखर होते. स्पॅनिश लोकांनीं फिलिपाइन बेटाची संस्कृति यूरोपियन तर्हेची केली. पोर्तुगीज लोकांनीं आपल्या गोवानिजांस राष्ट्रीय संस्कृतिपासून कसें काय च्युत केलें हें सर्वांस अवगत आहेच. पोर्तुगीजांचा अंमल सिंहल देशावर झाला, त्या काळीं पुष्कळ लोक जुलमानें आणि गोडीगुलाबीनें ख्रिस्ती बनले व पुष्कळ लोकांनीं आपलीं नांवें बदलून पोर्तुगीज नांवें घेतलीं. बुद्धसंप्रदाय इतरांस आपल्यांत ओढणारा असल्यामुळें त्यांनें पोर्तुगीजांच्या कृतीचा पुढें विध्वंस केला. आज सिंहली लोकांत जितके ख्रिस्ती आहेत त्याच्या दुप्पट प्रमाणानें ते तामिळांत आहेत. पोर्तुगीजांनंतर डच आले आणि डचांनंतर इंग्रज आले. येणेंप्रमाणें सिंहली संस्कृतीवर यूरोपियन राष्ट्रांच्या रीतीभातींचीं तीन पुटें चढलीं आहेत. सिंहलद्वीपांतील सिंहली लोकांचें यूरोपीभवन किती झालें आहे याचा अजमास येण्यासाठीं थोडक्याच गोष्टींचा निर्देश पुरेसा आहे. उदाहरणार्थ, कोलंबो शहराकडे पाहिलें तर तें एशियाटिक शहर नसून यूरोपियन शहर आहे असें वाटतें. अगदीं हलक्या दर्जाचे कुली सोडून दिले तर सर्व लोक यूरोपियन पोषाख करितात असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. अगदीं जुन्या प्रकारचे लोक डोक्यावर केंस राखून बुचडा बांधतात आणि केंसांत वाटोळा कंगवा खोंचतात. अर्वाचीन सिंहली लोकांच्या रसिक दृष्टीस हा पोषाख अगदींच ओंगळ दिसतो. पुष्कळांचें असें म्हणणें आहे कीं, ही कंगवा घालण्याची चाल मूळ सिंहली नसून परकी आहे. समुद्रकिनार्यावर येणार्या परक्या लोकांपासून तो कंगवा त्यांनीं घेतला आहे. जुन्या सिंहली तर्हेनें पोषाख करावयाचा म्हटला तर सभ्य गृहस्थ आणि चपराशी यांच्यामध्यें फारसा भेदच करितां येणार नाहीं. "उच्च दर्जाचा देशी पोषख मुळींच नसल्यामळें आम्हांला परका पोषाख करावा लागतो. तुम्हां हिंदुस्थानी लोकांचें ठीक आहे. तुमच्यांमध्यें राजेरजवाडे आहेत आणि देशी पद्धतीचाच परंतु सभ्य तर्हेचा पोषाख करावयाचा म्हटल्यास तुम्हांस अडचण नाहीं. आमचें तसें नसल्यानें आम्हाला परका पोषाख करावा लागतो." असें ते समर्थन करितात.
सिंहली पुरुषच परका पोषाख करितात असें नाहीं, तर सिंहली बायका देखील मडमांसारखा पोषाख आज जवळ जवळ शंभर वर्षें करीत आहेत. हलक्या दर्जाच्या बायका कमरेस लुंगीसारखें कापड गुंडळतात आणि अर्धस्तनदर्शी यूरोपियन पद्धतीचें पोलकें अंगांत घालतात. सभ्य स्त्रिया यूरोपियन पद्धतीचा पोषाख मोठ्या झोंकांत करितात. तथापि कोलंबो शहरांतील गरीब स्त्रिया आणि लहान शहरांतील स्त्रिया अनवाणी चालतात. त्यांनां बूट घालण्याची संवय नाहीं. लग्नप्रसंगीं अगर दुसर्या कोणत्या तरी कार्याच्या प्रंसगीं या बायका अनवाणी न जातां बूट घालतात. तथापि बुटानें चालण्याची संवय नसल्यामुळें हांतात बूट घेऊन रस्ता आक्रमावयाची पाळी येते.
सिंहली लोकांत सोवळ्याओंवळ्याचें बंड नाहीं आणि यूरोपियन आणि बर्घेर लोकांबरोबर सिंहली लोक मोठ्या मोकळेपणांनें मिसळतात, इतकेंच नव्हे, तर कांहीं सिंहली स्त्रीपुरुष त्यांबरोबर नाचण्यासहि कचरत नाहींत.
सिंहली लोकांपैकीं पुष्कळ लोक ख्रिस्ती झाले आहेत आणि आपल्याकडे ज्याप्रमाणें ख्रिस्ती लोक अस्पृश्य आणि बाह्य समजले जातात त्याप्रमाणें सिंहली लोकांत नाहीं. पुष्कळ शिष्ट मंडळी ख्रिस्ती आहेत आणि त्यांस बौद्ध कमी लेखीत नाहींत.
सिंहली लोकांचीं नांवें पाहिलीं तर आपल्यापैकीं पुष्कळांस मौज वाटेल. त्यांचीं नांवें म्हणजे पाश्चात्य (विशेषेंकरून डच आणि पोर्तुगीज) नांवें आणि संस्कृत शब्द यांचें एकच कोडबोळें असतें. उदाहरणार्थ, जान फेरेरा गुणतिलक, डी. आलबिस विक्रमसिंह, डान क्यारोलिस् विजयरत्न, या प्रकारचीं नांवें आपणांस जागोजाग आढळतात. अर्धेंमुर्धें नांव पोर्तुगीज असलें म्हणजे तेवढ्यानें मनुष्य ख्रिस्ती होतो असें कोणत्या शास्त्रांत सांगितलें आहे ? 'लिली', 'रोझ' हीं मुलींचीं नांवें महाराष्ट्रीयांत नांहीत का शिरलीं ?
सिंहली लोकांत खुर्च्या, टेबलें, कोच इत्यादि गोष्टींचा उपयोग सार्वत्रिक झाला आहे. अगदीं गरीब लोक देखील चमचा, कांटा, चिनी मातींचीं ताटें वगैरे घेऊन टेबलावर जेवावयास बसतात.
हें सर्व वर्णन विशेषेंकरून "पातराटांस" म्हणजे सखल प्रदेशांत रहाणार्या सिंहली लोकांस लागू पडतें, उदराटांस लागू पडत नाहीं. उदराटांमध्यें देखील यौरोपिन्य शिरलें आहे. पण तितक्या प्रमाणानें नाहीं.
आज एखाद्या सिंहली मनुष्यास विचारलें कीं, तुमच्या देशांत तुम्ही कोणता शक वापरितां तर त्यास त्याचें उत्तर देतां येणार नांही. बहुतेकांनां ख्रिस्ती शकाखेरीज दुसरा कोणता तरी शक सिलोनमध्यें होता याची कल्पनाही नाहीं. "ज्ञानदर्शय" नांवाच्या ए. मेंडिस गुणशेखर नांवाच्या गृहस्थांनीं चालविलेल्या मासिकावर शालिवाहन शक दृष्टीस पडला. तथापि पूर्वीं देशांत चालू असलेला शक त्यांनीं पुस्तकावर घातला अगर हिंदुस्थानांत चालू असलेल्या शकास प्रचलित करावें या सुधारकबुद्धीनें घातला हें सांगतां येत नाहीं. सिंहली राष्ट्रांतील सुधारकपक्षाविषयीं माहिती पुढें येईलच.
पारमार्थिक प्रयत्नांत देखील अर्वाचीन सुधारणा शिरली आहे. अमेरिकेंत ज्या लोकांस रविवारी चर्चमध्यें जावयास "फुरसत" नसते अशा मंडळीनें आपलें रविवारचें पारमार्थिक कर्म पार पाडण्याची एक युक्ति योजिली आहे. ते लोक रविवारची उपासना आणि व्याख्यान टेलिफोननें ऐकतात. सिंहलद्वीपांत पारमार्थिक बाबतींत इतकें जरी अर्वाचीनत्व शिरलें नाहीं, तथापि तेथें प्रसिद्घ भिक्षूंचे उपदेश अगर व्याख्यानें यांचे नादलेख (फोनोग्राफचे रेकार्डस) आपल्या घरीं बाळगतात.