प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
रुखेंग :— ही भाषा एकाक्षरी आहे. तथापि हींत पाली भाषेंतील बरेच अनेकाक्षरी शब्द मिसळले आहेत. पण त्यांतील प्रत्येक अक्षर निराळें लिहिण्याच्या पद्धतीमुळें ते शब्दहि कांहींसे एकाक्षरी बनले आहेत. ही भाषा आराकानमधील मूळ रहिवाशांची भाषा होय. हे सर्व बौद्धसांप्रदायी आहेत. आराकान हा प्राचीन काळीं मगध राज्याचा भाग असावा व त्यामुळेंच तेथील लोकांस बंगाली लोकांनीं मग अथवा मौग हें नांव दिलें असावें. यांची भाषा केवळ एकाक्षरी अगर अनेकाक्षरी नसून या दोहोंच्या मधील दुव्यासारखी आहे. रुखेंग लोक हे ब्रह्मी लोकांच्याच मूळवंशापासून निघाले असून त्यांची संस्कृति ब्रह्मी लोकांच्या पूर्वींच वाढली होती ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्याप्रमाणेंच रुखेंग भाषेंतील शब्दांचे उच्चार ब्रह्मीइतके अपभ्रष्ट नसल्यामुळें भाषांचा इतिहास लिहिणार्या भाषाशास्त्रवेत्त्यांस ब्रह्मी भाषेपेक्षां या रुखेंग भाषेचा जास्त उपयोग होईल. त्याप्रमाणेंच ब्रह्मी लोकांनीं त्यांनां जिंकीपर्यंत रुखेंग लोक हे स्वतंत्र होते त्यामुळें त्यांची भाषा जास्त शुद्ध राहिली आहे. ब्रह्मी लोकांवर पूर्वीं अनेक स्वार्या झाल्या त्यामुळें रुखेंग भाषेंत जर कोणत्या दुसर्या भाषेचें मिश्रण झालें असेल तर तें पालीचेंच होय; कारण ही भाषा म्हणजे त्या वेळच्या विद्वान् लोकांची पंडिती भाषा असून सर्व सांप्रदायिक ग्रंथ त्याच भाषेंत असत. यामुळें रुखेंग भाषेंत बरेचसें पाली शब्द आले आहेत व ते तसेच शुद्ध स्वरूपांत कायम आहेत.
रुखेंग भाषेंतील वर्णमाला रचनेच्या व अनुक्रमाच्या बाबतींत अगदीं देवनागरीसारखी आहे. मात्र र्हस्व दीर्घ स्वरांच्या बाबतींत कांहीं फरक आहे. या वर्णमालेंतील अक्षरांचें स्वरूप मात्र कांहींसें ब्रह्मी अक्षरांसारखें आहे. या भाषेचें रचनेच्या बाबतींत मलयु भाषेशीं बरेंचसें साम्य आहे. हिची रचना अगदीं साधी असून तींत वचनें, विभक्त्या वगैरे विकृति किंवा अर्थ, काळ, पुरुष इत्यादि क्रियापदांचीं निरनिराळीं रूपें नाहींत. बर्याचशा शब्दांचे नाम, विशेषण व क्रियापद या सर्वांचीं कार्यें करणारे अर्थ होतात व विशिष्ट अर्थ संदर्भावरून करावयाचा असतो. परंतु सामान्यतः निरनिराळे पदार्थ, गुण, क्रिया यांनां स्वतंत्र व पृथक् शब्द आहेत.
रुखेंग भाषेंत ग्रंथसंग्रह बराच आहे असें सांगतात. परंतु त्यांतील बरेचसे ग्रंथ पाली ग्रंथांचीं भाषांतरें आहेत. 'तिल्लवेरचरित' या ग्रंथांत रुखेंग राष्ट्राचा इतिहास आहे. अंगुलिमालयानें लिहिलेला 'कारिक' नावांचा ग्रंथ व थम्म-सत्' (धर्मशास्त्र) हा ग्रंथ हे दोन धर्मशास्त्रावरील ग्रंथ आहेत. याखेरीज विशेष प्रचारांतील ग्रंथ म्हटले म्हणजे पुढें दिलेले होत :— (१) राजबुत्झ (२) राज-वोग्त्झ (३) तेमि (४) नेमि (५) जनक (६) सुवन्न अस्यंग (७) भूरिदत (८) त्झैंगद-गुंग्म (९) सद श्येइ च चोगे (१०) महो (११) उनिंग ग्यइंग (१२) सोप सौंग म्येंग (१३) भूरिदत काप्य (१४) बोधिह मैंदेइ (१५) वेसइंग दर (१६) सइंगवेर (१७) क्रौकचे (१८) नरचो (१९) अथिकबल (२०) अभिधम्म (२१) सुनेइच क्येंग (२२) परम सइंग गौळ क्येंग (२३) महारग थक्येंग (२४) सपक्येंग (२५) थम्मसत् क्वेइंगख्य (२६) थम्मसत् मनु (२७) थम्मसत् क्रक्रु (२८) थम्मसत् क्रुदैंग (२९) लोगसर (३०) सब्रिह्ल (३१) तइंगतहौ (३२) रदनर्व्हे ख्रि (३३) रदनपइंग गुंग (३४) रदन पद्दैंग (३५) रदनक्वेंगख्य (३६) रदनपौंग ख्वोक (३७) बनत्स (३८) क्रइंग्म तेइच्फक् पौंग वत्हु (३९) ङ्गत्झिसाद प्रिंगदो (४०) गप्फ क्येंग (४१) लखनदिव (४२) नोमकप्य (४३) ङ्गचैंगब्रैंग (४४) रामवुत्हुच (४५) ब्रमसर (४६) बुद्धोवद (४७) पेदसौत (४८) मुंगलसौत (४९) खुनेइचरक (५०) खुनेइचरक परेइप (५१) पथविजेय (५२) सग्रउछौंग (५३) लेकेवेंग उछौंग (५४) सित्थदनु (५५) सत्पौंग (५६) सत्येंग (५७) सत् ह्नेवैंग (५८)सर्ह्वेग्वे (५९) मोएतो क्रंगच (६०) गुवैंग पोदि मौंगच (६१) हितोपदेस (६२) नोमको गथ (६३) ताचे ह्नेइ चरसि (६४) ख्वोंगरि (६५) ख्वोंगलप (६६) ख्वोंगङ्गे (६७) तह्नौंगग्र (६८) मेथौंगग्र (६९) सुमेथ (७०) रेवत्तच (७१) अश्वपिड (७२) प्रौंगब्र (७३) औंगपदिच (७४) पइंगप्रचु (७५) उग (७६) मौंगच्वच (७७) चोरे (७८) यत्रे (७९) लुंगदिच.
वरील नांवांवरून स्पष्ट दिसतें कीं यांपैकीं कांहीं ग्रंथ संस्कृत भाषेंतील पुराणांतील व्यक्तींच्या चरित्रपर आहेत. 'रामवत्हुच' हा रामचरित्रावरील व बुद्धोवद हा बुद्धचरित्रावरील ग्रंथ आहे हें स्पष्ट दिसतें. इतर कांहीं ग्रंथ म्हणजे संस्कृत ग्रंथांचींच रूपांतरें आहेत. उदाहरणार्थ, हितोपदेस-हितोपदेश; थम्मसत् मनु-धर्मशास्त्र मनूचें; सुवन्न अस्यंग-सुवर्णश्रृंगीची गोष्ट, मुंबुकर मिश्र यानें एक सोन्याची गाय केली होती व ती राजा मुकुंददेव गजपति यास अर्पण केली होती त्या गाईची कथा; भूरिदत-भूरिदत्त, ही महाभारतामध्यें आलेल्या मगधदेशाच्या भूरिदत्त राजाची कथा आहे; भूरिदत्त काप्य-भरिदत्त काव्य, हें वरील गोष्टीचेंच पद्यात्मकरूप आहे; राज बुंत्झ हें राजवंशावलीचें रुखेंग रूपांतर आहे; राजवोंग्त्झ हें त्याच विषयावरील दुसरें एक पुस्तक आहे; पथविजेय हे पृथुविजय असावें. या ग्रंथांतील मूळ कथांमध्यें व त्यांच्या स्वरूपांमध्यें बौद्ध जीवितक्रमास लागू पडतील अशा तर्हेचे फरक केले आहेत असें समजतें.
रुखेंग भाषेचा अभ्यास यूरोपीयांनी विशेषसा केलेला दिसत नाहीं. डॉ. बुकॅनन यानें या भाषेंतील कांही शब्दांचा कोश दिला आहे. {kosh Dr. F. Buchanan-Comparative Vocabulary of some languages spoken in the Burma Empire, Asiatic Researches Vol. V.}*{/kosh} बुकॅनन यानें आणखीहि दोन भाषांचे नमुने दिले आहेत. एक रुइंगा. ही आराकानमधील मुसुलमान लोक बोलतात. ही अरबी, हिंदी आणि रुखेंग यांच्या मिश्रणानें तयार झाली आहे. दुसरी रुसन. ही आराकानमधील ब्राह्मणी धर्मांतील हिंदू लोक वापरतात. ही बंगाली व संस्कृत यांच्या मिश्रणानें आणि अपभ्रंशानें तयार झाली आहे. रुखेंग लोक ज्या प्रांताला रो असें म्हणतात व ब्रह्मी लोक ज्याला यो असें म्हणतात त्या प्रांतांतील भाषा रुखेंगचीच एक पोटभाषा आहे. त्याप्रमाणेंच रुखेंगच्या उत्तरेस व पूर्वेच्या बाजूस एक खेंग नांवाची जात आहे. त्यांची भाषाहि रुखेंगसारखीच आहे व या रो आणि खेंग शब्दांपासूनच या लोकांनां रुखेंग असें नांव मिळालें असें म्हणतात. यांचें मूळचें नांव 'मरुम्भ' असें होतें व हा शब्द महावर्म याचा अपभ्रंश असावा असा लेडेन याचा तर्क आहे. वर्म हें उपपद क्षत्रियांनां लावतात ही गोष्ट प्रसिद्धच आहे.