प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
मोन अथवा तलैंग :— ही भाषा पेगू प्रांतांतील मूळ रहिवाशी वापरतात. हे आपणास मोन म्हणवितात पण ब्रह्मी लोक त्यांना तलैंग असें म्हणातात, व सयामी मिंगमोन असें म्हणतात. या भाषेचा यूरोपीयांनी अभ्यास केलेला दिसत नाहीं. फक्त बुकॅनन यानें या भाषेंतील कांही उतारे प्रसिद्ध केले आहेत. {kosh Asiatic Researehes}*{/kosh} ही अगदीं स्वतंत्र भाषा असून तिचा ब्रह्मी अथवा सयामी भाषांशीं कांहीं संबंध नाहीं असें ते म्हणतात. या भाषेंत बरेचसे ऐतिहासिक ग्रंथ आहेत अशी लेडेन यास माहिती मिळाली व ती खरी असावी असें त्याचें म्हणणें आहे. कारण त्यांच्यामध्यें ब्रह्मी लोकांपेक्षां बरीच अगोदर संस्कृतीची वाढ झाली होती व नंतर जरी त्यांची सत्ता बरीच आकुंचित झाली होती तरी पूर्वीं तें फार बलाढ्य राष्ट्र होतें. पोर्तुगीजांच्या प्राचीन इतिहासांत या राष्ट्राचें नांव मोब येथील पंडालु असें उल्लेखिलेलें आढळतें व त्यांनीं प्राचीन काळी करमिन्हय साम्राज्याची स्थापना केली असें म्हणतात.
या भाषेची लिपी ब्रह्मी लिपीसारखीच आहे. या भाषेसंबंधी लेडेन यानें विशेषसें संशोधन केलें नाहीं.
तलैंग भाषेबद्दल डॉ. फ्रान्सिस मेसन (अमेरिकन ओरि. सो.ज. पुस्तक ४ थें) लिहितात :—
तलैंग भाषेंतील उच्चार चिनी भाषेंतील शब्दांच्या उच्चारांसारखे आहेत. बहुतेक धातू एकावयवी आहेत, परंतु ब्रह्मी व करेण भाषांप्रमाणें ते अनेकावयवी तत्त्वावर बनलेले आहेत. व्यंजन व मूळचा
स्वर मिळून एक अक्षर होतें व हें अक्षर एकावयवी धातूला जोडून नवा शब्द होतो; जसें-कामी (नवीन), खामिंग(पागोटें), ताला (धनी), परे (कुरुप), येमू (नांव). हें सर्व शब्द इंडो-यूरोपियन भाषांतील अनेकावयवी शब्दांहून भिन्न नाहींत.
संयुक्त व्यंजनांबद्दल तलैंग भाषा प्रसिद्ध आहे; यांपैकीं पुष्कळ व्यंजनें चिनी किंवा इंडोचिनी भाषांमध्ये आढळत नाहींत. बहुतेक मृद व मूक व्यंजनांचा म् व न् अनुनासिकांशीं संयोग करितात.
या भाषेचें व्याकरण अगदीं सोपें आहे. क्रियापदापूर्वीं कर्ता व क्रियापदानंतर कर्म येतें. इतर इंडो-चिनी भाषांप्रमाणें प्रत्यय लावून शब्दांचीं निरनिराळीं रूपें बनवितात. परंतु अशीं रूपें, थई, ब्रह्मी किंवा करेण भाषांपेक्षां तलैंग भाषेंत थोडीं आहेत. तलैंग भाषेंतील शब्दसंग्रह अगदीं स्वतंत्र आहे.