प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
मोन व कोलेरिअन :— रॉयल एशिआटिक सोसायटीच्या १८७८ सालच्या जर्नलमधील 'आर्यनव्यतिरिक्त भाषा' नांवाच्या निबंधांत ई. एल्. ब्रँडेथ म्हणतो कीं, "मोन भाषेस तलैंग आणि पेगुई अशींहि नांवें आहेत. मोन लोकांचें पेगू हें मूळचें वसतिस्थान होतें, परंतु सुमारें १०० वर्षांमागें ब्रह्मी लोकांनीं त्यांनां त्या प्रांताच्या बर्याचशा भागांतून हांकून लाविलें. प्राथमिक अंक व दुसरे कांहीं शब्द यांच्या सादृश्यावरून मोन व कोलेरिअन भाषासंघांत कांही संबंध असावा असें मानण्यांत आलें आहे. परंतु उपरिनिर्दिष्ट संघ असल्या क्षुल्लक पुराव्यावरून बनविलेले नाहींत. ते बनवितांनां यांपेक्षां बर्याच अधिक शब्दांचे सादृश्य विचारांत घेतलें आहे एवढेंच नव्हे, तर त्यांची उभारणी व्याकरणविषयक सादृश्याच्या पायावर झाली आहे. पण इकडे मोन व कोलेरियन भाषांच्या व्याकरणांकडे जर नजर फेंकली तर त्यांत जितकी भिन्नता दिसते तितकी दुसर्या कोणत्याहि भाषांच्या व्याकरणांत आढळून येणार नाहीं" (पान २८ पहा).