प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

लंकेंतील विवाहसंस्था :— सिंहली लोकांची आणि यूरोपियन व बर्घेर लोकांचीं लग्नें देखील होतात. निरनिराळ्या जातींच्या लग्नांचे आंकडे (खानेसुमारीच्या अहवालांवरून) येणेंप्रमाणेः-

मिश्र लग्नांचे आंकडे
 मिश्र विवाह करणार्‍या जाती.  १८९१ पासून १९००  १९०१ पासून १९१०
 यूरोपियन व बर्घेर  ११०  ९१
 यूरोपियन आणि सिंहली  २३  २२
 यूरोपियन आणि तामिळ  ५   १०
 बर्घेर आणि सिंहली  २७०  ३१५
 बर्घेर आणि तामिळ  ५३  ६६
 सिंहली आणि तामिळ  ५२७  ६५३

वरील कोष्टकावरून कांहीं गोष्टी     लक्षांत येतात, त्या येणेंप्रमाणेः-
यूरोपियन लोकांचीं देशी लोकांबरोबर लग्नें व त्याचप्रमाणें बर्घेर लोकांबरोबर लग्नें कमी झालीं आहेत. याला तामिळ आणि यूरोपियन हा अपवाद आहे; यांचें कारण हें कीं, कित्येक शिष्ट तामिळ मंडळींनीं यूरोपियन बायकांबरोबर लग्नें केलीं हें होय.

कोलंबोचे लग्नाचे रेजिस्ट्रार रा. विक्रमतिलक यांनां (विक्रमतिलक यांची बायको यूरेशियन आहे.) मिश्रविवाहाचें कारण विचारलें. त्यांनीं या प्रश्नाचें उत्तर येणेंप्रमाणें दिलें. गरीब यूरोपियन लोक, बर्घेर, सिंहली आणि तामिळ स्त्रियांस रखेल्या म्हणून ठेवतात आणि पुढें त्यांची लग्नें होतात. या मिश्रविवाहाची जी संतति होते त्यांपैकीं कांहीं आपल्या आयांच्या सल्ल्यानें व वजनामुळें सिंहली अगर तामिळ लोकांबरोबर लग्नें करितात. मिश्र लग्नांचें दुसरें कारण म्हटलें म्हणजे कोलंबोसारख्या बकाल वस्तीच्या शहरांत एका जातीच्या स्त्रिया आणि दुसर्‍या जातीचे पुरुष म्हणजे विशेषेंकरून तामिळ आणि सिंहली पुरुष आणि बर्घेर व यूरेशियन स्त्रिया यांच्या ओळखी होतात व पुढें लग्नें होतात. बर्घेर अगर सिंहली खाणावळींत तामिळ राहिल्यानें, त्या तामिळाचें, बर्घेर अगर सिंहली खाणावळवाल्याच्या मुलीशीं लग्न होतें. तामिळ मुलगा त्या मुलीशीं कांहीं गडबड करून मग पेंचांत सांपडतो व त्यास त्यामुळें लग्न करावें लागतें. अशी मिश्रविवाहांची उपपत्ति एक जाफना (यघनं) येथील तामिळ वकीलानें डॉ. केतकर यांस सांगितली. विक्रमतिलकांच्या मतें तामिळ वकिलाचें हें स्पष्टीकरण फारच थोड्या वर्गास अनुलक्षून आहे.

एका सिंहली तरुणाचें एका बर्घेर मुलीबरोबर प्रेमसंवर्घन चालल्याचें डॉ. केतकर यांस दिसून आलें. त्या तरूणास सिंहली लोक बर्घेर मुलीबरोबर लग्न कां करितात असा प्रश्न त्यांनीं विचारला असतां त्यांस त्यांने उत्तर दिलें कीं, वेडगळ सिंहली मुलीस "सोसायटी" मध्यें कसें वागावें  हें समजत नाहीं.  आम्ही गोर्‍या कातड्याला भुलून जातों असें मुळींच नाही !!! या तरुणाच्या शब्दांत सत्याता किती आहे याची येथें चर्चा नको. त्यानें सांगितलेली अडचण परजातीच्या स्त्रीशीं लग्न करण्यास कारण नसली तरी त्याच्या बोलण्यावरून तरुणांचें विजातीयांबरोबर लग्न होण्याचें निमित्त कांही अंशीं लक्षांत येईल.

सिंहलद्वीपांतील कांही बर्घेर जातीच्या सरकारी नोकरांस डॉ. केतकर यांनीं विचारलें कीं, सिंहली आणि तामिळ लोकांनीं तुमच्या मुलींबरोबर लग्न करावें हें तुम्हांस आवडतें काय ? त्यांनीं उत्तर केलें, काय हरकत आहे ? जर सिंहली मुलगा सुशिक्षित असेल, त्याला चांगली नोकरी असेल, तर त्याला मुलगी द्यायला काय हरकत आहे ? या उत्तरावरून बर्घेर लोकांची वैवाहिक नीति लक्षांत येईल.

सिंहलद्वीपांत बालविवाह फारसा नाहींच म्हटलें तरी चालेल. तामिळ व सिंहली या दोन्ही लोकांविषयीं हें विधान केलें आहे. खालील आंकड्यांवरून ही गोष्ट लक्षांत येईल.

 विसांपेक्षां कमी वयाच्या विवाहित स्त्रिया.
 खानेसुमारी वर्ष १९०१  खानेसुमारी वर्ष १९११
 लग्न झालेल्या  लग्न झालेल्या
 १५ पेक्षां कमी वयाच्या
 एक हजार स्त्रियांपैकीं
  १३  ६
 १५ पेक्षां अधिक परंतु
 २० पेक्षां कमी वयाच्या
 एक हजार स्त्रियांपैकी.
 ५०३  ३२६

या आंकड्यांवरून असें दिसून येईल कीं, आज पंधरा पासून वीस वर्षांच्या वयाच्या स्त्रियांपैकी दोन तृतीयांश अविवाहीत आहेत.

स्त्रिया इतक्या वर्षांपर्यंत अविवाहित रहातात त्यावरून परंपरागत विवाहपद्धती म्हणजे पालकांनीं लग्नें जमवून द्यावयांची आणि लग्न करणारांनीं आपली नुसती संमति द्यावयाची ही पद्धति नष्ट झाली नाहीं. वर जे मिश्रविवाह सांगितले ते अर्थात् वधूवरांच्या स्वयंप्रेरणेनें आणि प्रसंगीं गुरूजनांच्या मताविरुद्धच होतात. लग्नांमध्यें पुरूष आपली इच्छा अधिक चालवूं शकतो. त्याला मुलीकरीतां तिच्या पालकाकडे मागणी करतां येते व क्वचित् प्रंसगीं तरुणीची आराधना स्वतः करण्याचा अनुभव त्याला मिळतो. तथापि अनुनयपद्धति या देशांत अजून विकास पावली नाहीं. पुष्कळ लग्नें अशीं होतात कीं लग्न ठरण्याच्या अगोदर वधूनें वरास पाहिलेलेंहि नसतें.