प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
लंकेंतील विवाहसंस्था :— सिंहली लोकांची आणि यूरोपियन व बर्घेर लोकांचीं लग्नें देखील होतात. निरनिराळ्या जातींच्या लग्नांचे आंकडे (खानेसुमारीच्या अहवालांवरून) येणेंप्रमाणेः-
मिश्र लग्नांचे आंकडे | ||
मिश्र विवाह करणार्या जाती. | १८९१ पासून १९०० | १९०१ पासून १९१० |
यूरोपियन व बर्घेर | ११० | ९१ |
यूरोपियन आणि सिंहली | २३ | २२ |
यूरोपियन आणि तामिळ | ५ | १० |
बर्घेर आणि सिंहली | २७० | ३१५ |
बर्घेर आणि तामिळ | ५३ | ६६ |
सिंहली आणि तामिळ | ५२७ | ६५३ |
वरील कोष्टकावरून कांहीं गोष्टी लक्षांत येतात, त्या येणेंप्रमाणेः-
यूरोपियन लोकांचीं देशी लोकांबरोबर लग्नें व त्याचप्रमाणें बर्घेर लोकांबरोबर लग्नें कमी झालीं आहेत. याला तामिळ आणि यूरोपियन हा अपवाद आहे; यांचें कारण हें कीं, कित्येक शिष्ट तामिळ मंडळींनीं यूरोपियन बायकांबरोबर लग्नें केलीं हें होय.
कोलंबोचे लग्नाचे रेजिस्ट्रार रा. विक्रमतिलक यांनां (विक्रमतिलक यांची बायको यूरेशियन आहे.) मिश्रविवाहाचें कारण विचारलें. त्यांनीं या प्रश्नाचें उत्तर येणेंप्रमाणें दिलें. गरीब यूरोपियन लोक, बर्घेर, सिंहली आणि तामिळ स्त्रियांस रखेल्या म्हणून ठेवतात आणि पुढें त्यांची लग्नें होतात. या मिश्रविवाहाची जी संतति होते त्यांपैकीं कांहीं आपल्या आयांच्या सल्ल्यानें व वजनामुळें सिंहली अगर तामिळ लोकांबरोबर लग्नें करितात. मिश्र लग्नांचें दुसरें कारण म्हटलें म्हणजे कोलंबोसारख्या बकाल वस्तीच्या शहरांत एका जातीच्या स्त्रिया आणि दुसर्या जातीचे पुरुष म्हणजे विशेषेंकरून तामिळ आणि सिंहली पुरुष आणि बर्घेर व यूरेशियन स्त्रिया यांच्या ओळखी होतात व पुढें लग्नें होतात. बर्घेर अगर सिंहली खाणावळींत तामिळ राहिल्यानें, त्या तामिळाचें, बर्घेर अगर सिंहली खाणावळवाल्याच्या मुलीशीं लग्न होतें. तामिळ मुलगा त्या मुलीशीं कांहीं गडबड करून मग पेंचांत सांपडतो व त्यास त्यामुळें लग्न करावें लागतें. अशी मिश्रविवाहांची उपपत्ति एक जाफना (यघनं) येथील तामिळ वकीलानें डॉ. केतकर यांस सांगितली. विक्रमतिलकांच्या मतें तामिळ वकिलाचें हें स्पष्टीकरण फारच थोड्या वर्गास अनुलक्षून आहे.
एका सिंहली तरुणाचें एका बर्घेर मुलीबरोबर प्रेमसंवर्घन चालल्याचें डॉ. केतकर यांस दिसून आलें. त्या तरूणास सिंहली लोक बर्घेर मुलीबरोबर लग्न कां करितात असा प्रश्न त्यांनीं विचारला असतां त्यांस त्यांने उत्तर दिलें कीं, वेडगळ सिंहली मुलीस "सोसायटी" मध्यें कसें वागावें हें समजत नाहीं. आम्ही गोर्या कातड्याला भुलून जातों असें मुळींच नाही !!! या तरुणाच्या शब्दांत सत्याता किती आहे याची येथें चर्चा नको. त्यानें सांगितलेली अडचण परजातीच्या स्त्रीशीं लग्न करण्यास कारण नसली तरी त्याच्या बोलण्यावरून तरुणांचें विजातीयांबरोबर लग्न होण्याचें निमित्त कांही अंशीं लक्षांत येईल.
सिंहलद्वीपांतील कांही बर्घेर जातीच्या सरकारी नोकरांस डॉ. केतकर यांनीं विचारलें कीं, सिंहली आणि तामिळ लोकांनीं तुमच्या मुलींबरोबर लग्न करावें हें तुम्हांस आवडतें काय ? त्यांनीं उत्तर केलें, काय हरकत आहे ? जर सिंहली मुलगा सुशिक्षित असेल, त्याला चांगली नोकरी असेल, तर त्याला मुलगी द्यायला काय हरकत आहे ? या उत्तरावरून बर्घेर लोकांची वैवाहिक नीति लक्षांत येईल.
सिंहलद्वीपांत बालविवाह फारसा नाहींच म्हटलें तरी चालेल. तामिळ व सिंहली या दोन्ही लोकांविषयीं हें विधान केलें आहे. खालील आंकड्यांवरून ही गोष्ट लक्षांत येईल.
विसांपेक्षां कमी वयाच्या विवाहित स्त्रिया. | ||
खानेसुमारी वर्ष १९०१ | खानेसुमारी वर्ष १९११ | |
लग्न झालेल्या | लग्न झालेल्या | |
१५ पेक्षां कमी वयाच्या एक हजार स्त्रियांपैकीं |
१३ | ६ |
१५ पेक्षां अधिक परंतु २० पेक्षां कमी वयाच्या एक हजार स्त्रियांपैकी. |
५०३ | ३२६ |
या आंकड्यांवरून असें दिसून येईल कीं, आज पंधरा पासून वीस वर्षांच्या वयाच्या स्त्रियांपैकी दोन तृतीयांश अविवाहीत आहेत.
स्त्रिया इतक्या वर्षांपर्यंत अविवाहित रहातात त्यावरून परंपरागत विवाहपद्धती म्हणजे पालकांनीं लग्नें जमवून द्यावयांची आणि लग्न करणारांनीं आपली नुसती संमति द्यावयाची ही पद्धति नष्ट झाली नाहीं. वर जे मिश्रविवाह सांगितले ते अर्थात् वधूवरांच्या स्वयंप्रेरणेनें आणि प्रसंगीं गुरूजनांच्या मताविरुद्धच होतात. लग्नांमध्यें पुरूष आपली इच्छा अधिक चालवूं शकतो. त्याला मुलीकरीतां तिच्या पालकाकडे मागणी करतां येते व क्वचित् प्रंसगीं तरुणीची आराधना स्वतः करण्याचा अनुभव त्याला मिळतो. तथापि अनुनयपद्धति या देशांत अजून विकास पावली नाहीं. पुष्कळ लग्नें अशीं होतात कीं लग्न ठरण्याच्या अगोदर वधूनें वरास पाहिलेलेंहि नसतें.
स्त्रीपुरुषांच्या संबंधामध्यें अजून मोकळेपणा आला नाहीं. एका तरुण अविवाहित तामिळ ख्रिस्ती शिक्षकानें डॉ. केतकर यांस सांगितलें कीं, माझी शेजारच्या मुलींच्या शाळेंतील मास्तरणीशीं ओळख करून घेण्याची इच्छा आहे, पण मला अजून संधि मिळाली नाहीं. तो म्हणाला, "आमच्या शाळेच्या विवाहित मुख्याधापकानें मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेशीं उघडपणें थोडेंबहुत संभाषण केलें तर, आणि चोरून लपून आणखी कांहीं गडबडी केल्या तरी चालेल; पण आम्हा बिचार्या अविवाहित उपाध्यापकांनीं त्या शाळेच्या शिक्षकिणीशीं बोलण्याचा प्रयत्न केला तर मात्र अगदींच बोभाट होऊन जाईल. त्या शिक्षकिणी तरी आम्ही बोलावयाचा प्रयत्न केला तर शांतपणें आमच्याशीं बोलतील, कीं आम्हीं त्यांच्यावर बलात्कार करण्याकरितांच आलों आहों असें वाटून भेदरून किंकाळी फोडतील कीं काय कोण जाणे !" डॉ. केतकर यांनीं त्या तरुणास म्हटलें, "कोणी मध्यस्थ पहा; नाहीं तर धट्टपणें मुख्याध्यापकाला सांग कीं, आमची पलीकडच्या शाळेंतल्या शिक्षकिणीशीं ओळख करून दे." तो म्हणाला, मीं त्यांनां अशी आपली इच्छा प्रदर्शित केली म्हणजे ते म्हणणार, तुझें त्या मुलीबरोबर काम काय ? आणि नुसती ओळख करावयाची म्हणून सांगितलें, कीं तो म्हणणार, ओळख करून काय करावयाचें ? या प्रकारची प्रश्नमालिका सुरू झाली म्हणजे स्वतःच्या लग्नसंबंधानें बोलणें करण्यासहि लाजणारा तरुण काय उत्तर देणार ?
सिलोनमधील तरुणास अनोळखी तरुणीबरोबर ओळख करून घेण्यास बर्याच अडचणी येतात. तरुणास आपल्याच वर्गाच्या अपरिचित तरुणींशीं ओळख करून घेण्याचा हक्क आहे व तरुणीस देखील तरुणांशीं ओळख करून घेण्याचा हक्क आहे. हें तत्त्व अजूनहि पौरस्त्य सिलोनमध्यें फारसें मान्य झालें नाहीं असें दिसतें.
यूरोपियन आणि यूरेशियन वर्गांशीं चिकटून रहाणार्या सिंहली लोकांत स्त्रीपुरुषांमध्यें थोडीबहुत ओळखी करून देण्याची रीत आहे. खेडेगांवांत व विशेषेंकरून हलक्या वर्गांत लग्न होण्यापूर्वींच स्त्रीपुरुषांची चांगळी ओळख असते. तथापि यूरोपियनांमध्यें अनुनयपद्धतीचा जितका विकास झाला आहे, तितका सिंहली लोकांत झाला नाहीं. उदाहरणार्थ, स्त्रीपुरुषांच्या जोडप्यांनीं रस्ता, उपवन हीं गजबलेलीं दिसत नाहींत. स्त्रीपुरुषें थोडींबहुत विनोदाचीं व थोडींबहुत प्रेमयुक्त अशीं भाषणें करताना दिसत नाहींत. रस्तांवरून तरूणींचा पाठलाग करणारे तरूण दिसत नाहींत. किंवा मुली समोरून येत आहेत असें पाहून, त्यांच्यांशीं ओळख अगर सलगी करण्याच्या इच्छेनें स्मितपूर्वक टोपी काढणारे आणि "गुड इव्हिनिंग" करणारे अलबेले दिसत नाहींत.
सिंहली लोकांत "निव्वळ हिंदू"पणा प्रीतिविवाहाच्या अभावानें नजरेस येतो एवढेंच नव्हे, तर सिंहली स्त्रियांस अजूनहि नवर्याचें नांव उच्चारावयाची लाज वाटते, सिंहली लोकांत विटाळशीच्या विटाळाची कल्पना नाहीं. लंकेंतील तामिळांतून देखील ती गेल्यासारखीच आहे.
निरनिराळ्या जातींनीं एकमेकांत लग्नास तयार होऊं नये, तथापि बाह्यांबरोबर लग्नें करावयास तयार व्हावें यास कारण काय ? प्रथमतः असा समज होतो कीं, गोरी जात सर्वांत उच्च समजली जाते; आणि उच्च समजलेल्या जातीशीं सादृश्य आणि सान्निध्य मिळवावें हा हेतु सर्वत्र असेल; तथापि "उच्च" वर्गाशीं संबंध ठेवण्याची इच्छा हें मिश्र लग्नांस केवळ कारण नाहीं असें दिसून येतें. परक्या मुलींबरोबर लग्न करण्याची प्रवृत्ति उच्च, धनाढ्य आणि सुशिक्षित अशा वर्गांत फारशी नाहीं हें कबूल केलें पाहिजे. तथापि येथें हेंहि सांगितलें पाहिजे कीं, हा वर्ग जरी गांवठी साहेबाची मुलगी करावयाचें नाकारतो, तरी इंग्लंडांत जाऊन बायको करून आणण्यास या वर्गास प्रत्यवाय वाटत नाहीं.
मनुष्यस्वभाव असा आहे कीं, स्वतःच्या समाजांतील हलक्या वर्गाच्या अगर जातीच्या मुलीशीं लग्न करण्यास जें धैर्य लागतें त्यांपेक्षां अगदीं परक्या लोकांबरोबर लग्न करण्यास कमी धैर्य लागतें. जी अगदींच परक्या वर्गांतील असेल तिच्याबरोबर लग्न करण्यास लोकांस हरकत वाटणार नाहीं. अगदीं परक्या राष्ट्राच्या बाईबरोबर लग्न केलें तर तिचा केवळ परकेपणाच लोकांच्या लक्षांत येतो. एखाद्या महाराष्ट्रीयानें बंगाली बाईबरोबर लग्न केलें, तर ती बाई ब्राह्मणाची आहे कीं कायस्थाची आहे कीं नामशूद्राची आहे हा प्रश्न विचारण्याची देखील कांही लोकांस इच्छा होणार नाहीं. बंगाली या शब्दाखालीं पुष्कळ गोष्टी लपून जातात. त्याचप्रमाणें बर्घेरची मुलगी केली म्हणजे कोणत्या योग्यतेची मुलगी केली असा प्रश्नच उरत नाहीं. कारण, बर्घेर ही एकच जात आहे आणि जातीची पदवी व्यक्तीस मिळते.
पुष्कळदां दोन जाती आपाआपसांत लग्न करीत नाहींत; तथापि बरोबरीच्या परक्यांशीं लग्न करण्यास तयार होतात. यास आपण तेलगू आणि कानडी ब्राह्मणांचें उदाहरण घेऊं. तेलगू ब्राह्मणांत अनेक जाती आहेत; त्या परस्परांशीं लग्न करण्यास तयार नाहींत. तथापि या सर्व जाती महाराष्ट्रीय ब्राह्मणांशीं लग्न करण्यास तयार होतात.
एवंच, ज्या निरनिराळ्या जातींत लग्नें होत नाहींत, त्या जातींशीं अगदीं परके लोक लग्न करूं शकतात. ते परके उच्च आहेत ही भावना तेथें असलीच पाहिजे असें नाहीं.
यूरेशिअन आणि बर्घेर यांची सिंहली लोकांबरोबर लग्नें होतात याचें दुसरे एक कारण म्हटलें म्हणजे बर्घेर मुलींचें स्वातंत्र्य होय. ज्याप्रमाणें आपल्या महाराष्ट्रांतील लोक विदेशीं गेले म्हणजे तेथील मुलींच्या प्रेमपाशांत सांपडणें त्यांस शक्य आहे, तथापि स्वदेशांतच अनेक तरुणींशीं ओळखी संपादन करणें त्यांस शक्य नाहीं; तशीच गोष्ट कांहीं अंशीं कोलंबो येथें आहे. कोलंबो येथें गोईगम जातीच्या तरुणास करावा जातीच्या किंवा प्रत्यक्ष स्वजातीच्या मुलींशीं ओळखी करतां येत नाहींत, तथापि बर्घेर मुलींशीं ओळख करणें त्यास शक्य असतें. सिंहली अगर तामिळ तरुणांवर जाळें टाकण्याचा मक्ता सिंहली लोक बर्घेर मुलींस देतात असें म्हणण्यास हरकत नाहीं. स्वजातीय स्त्रियांशीं अपरिचय आणि विजातीय स्त्रियांकडून अनुनयास उत्तेजन या विलक्षण परिस्थितींत सिंहली आणि तामिळ यांपैकीं कांहीं तरुण लोक पडतात. अशा स्थितींत परक्या स्त्रियांबरोबर झालीं इतकीं लग्नें कशीं झालीं ही आश्चर्याची गोष्ट नसून अधिक झाली नाहींत याचेंच आश्चर्य आहे.
या लग्नांविषयीं विचार करितांना आणखी एक गोष्ट लक्षांत घेतली पाहीजे ती ही कीं, आपल्याकडे या प्रकारच्या लग्नासंबंधीं जो आक्षेप असेल त्याचें एक मोठें कारण यूरोपिअन लोक ख्रिस्ती आहेत हें होय. इंग्रज मुलीबरोबर लग्न करण्यास लोकांस जो आक्षेप वाटेल तो ख्रिस्ती मुलीबरोबर लग्न करण्यांतहि वाटतो. तेथें ख्रिस्ती संप्रदायाच्या लोकांबरोबर लग्नें करण्यास आक्षेप नाहीं आणि यामुळें बर्घेरांबरोबर लग्न करणें तितकें आक्षेपणीय नाहीं. शिवाय बर्घेरांबरोबर लग्न करणारी मंडळी पुष्कळ प्रसंगीं ख्रिस्ती असते. तथापि हें लक्षांत ठेवावें कीं, तामिळ अगर सिंहली ख्रिस्ती लोकांस बर्घेरांबरोबर लग्न करण्यास हरकत नसते असें नाहीं. ज्याप्रमाणें अन्यजातीयाबरोबर लग्न करणें हिंदूंस आवडत नाहीं त्याप्रमाणें ख्रिस्ती लोकांसहि आवडत नाहीं.