प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

सिंहली वाङ्‌मय :— पाली आणि सिंहली यांच्या अन्योन्याश्रयामुळें पाली वाङ्‌मयाइतकें नसलें तरी बरेंचसें महत्त्व सिंहली वाङ्‌मयास आहे. सर्व हिंदुस्थानभर अशी एक प्रवृत्ति आहे कीं, पुष्कळदां महत्त्वाचे ग्रंथ किंवा विचार देशी भाषेंत व्यक्त होतात तथापि त्यांस सार्वत्रिकता येते ती संस्कृत भाषेमुळें येते. बौद्ध संप्रदायास हिंदुस्थानांत येऊं लागलेलें महत्त्व त्या संप्रदायाच्या संस्कृत गंथप्रवाहाच्या चढउतारानें मोजतां येण्याजोगें आहे. देश्यभाषा आणि संस्कृतभाषा यांचा जो संबंध आहे तोच संबंध सिंहली भाषा व संस्कृत यांचा आहे. तथापि ज्या अनेक प्रदेशांत पाली भाषा बौद्ध संप्रदायाबरोबर पसरली त्याबरोबर संस्कृत व प्राकृत यांमध्यें दिसून येणारा अन्योन्याश्रय पाली व देश्यभाषा यांमध्येंहि दृग्गोचर होऊं लागला. सिंहली वाङ्‌मयाचें पृथक्करण करितांना सिंहलांतील निरनिराळ्या भाषांतील वाङ्‌मयें व त्यांचे परस्परसंबंध आणि सर्व वाङ्‌मयें मिळून होणारें जें द्वीपवाङ्‌मय त्याचा द्वीपस्थांच्या सामुच्चयिक आयुष्याशीं संबंध हे तपासले पाहिजेत.

द्वीपाचें वाङ्‌मय तपासतांना वाङ्‌मयाचे खालील थर लक्षांत घेतले पाहिजेत.
(१) सिंहलद्वीपस्थांनीं दुसरीकडून उचललेलें आणि त्यांच्या वापरण्यांत असलेलें संस्कृत, पाली व तामिळ वाङ्‌मय.
(२) सिंहलद्वीपांत तयार झालेलें संस्कृत वाङ्‌मय.
(३) सिंहलद्वीपांत तयार झालेलें पाली वाङ्‌मय.
(४) सिंहलद्वीपांत तयार झालेलें सिंहली वाङ्‌मय.
(५) सिंहलद्वीपांतील तामिळ वाङ्‌मय.
(६) सिंहलद्वीपांतील मुसुलमानी वाङ्‌मय.
(७) सिंहलद्वीपांतील इंग्रजी वाङ्‌मय.

यांचा परस्परांशीं संबंध, भारतीय संस्कृतीला पोषक अशा सर्व वाङ्‌मयाशीं संबंध आणि द्वीपस्थांच्या सामुच्चयिक आयुष्याशीं संबंध हे सर्व आपणांस ज्ञातव्य आहेत.

सिंहलद्वीपांतील तामिळ, मुसुलमानी आणि इंग्रजी वाङ्‌मयांनां हिंदुस्थान आणि जग यांच्या प्राचीनकांलीं स्थापित झालेल्या संबंधाच्या इतिहासांत स्थान नाहीं म्हणून वर सांगितल्यापैकीं पहिले चारच थर विचारांत घेतों. भारतीय वाङ्‌मय आणि द्वीपवाङ्‌मय यांचा संस्कृतिसंशोधनासाठीं तौलनिक अभ्यास करतांना भारतीय वाङ्‌मय या समुच्चयामध्यें  जे अनेक उपसमुच्चय दृष्टीस पडतात, त्यांपैकीं कोणत्या समुच्चयाशीं विवक्षित प्रकारच्या द्वीपवाङ्‌मयाचा संबंध आहे याचा विचार करावा. कांहीं संबंध दृष्टीस पडल्यास पुन्हां असा प्रश्न करावा कीं, हा संबंध कोणत्या प्रकारचा आहे ? (अ) भारतीय वाङ्‌मयावर किंवा त्याच्या अंशावर द्वीपवाङ्‌मयाचा कांहीं परिणाम झाला आहे काय ? (आ) भारतीय वाङ्‌मय, भारतीय पारमार्थिक विचार किंवा विद्या यांच्या प्रसाराला उपयोगी असें द्वीपवाङ्‌मय कोणेते ? (इ) सिंहली संस्कृति ही भारतीय संस्कृतीची उपसंस्कृति शोभते असें दाखविणारे द्वीपवाङ्‌मयावर आणि भाषेवर कोणते संस्कार झाले ? (ई) सिंहलद्वीपस्थांसच विशेषतः उपयोगी आणि केवळ सिंहलविषयक अगर त्यांची तात्कालिक गरज भागविणारें असें त्यांच्या देशांतील वाङ्‌मय कोणतें ? प्रस्तुत चार प्रश्न सिंहली भाषेचे आणि द्वीपवाङ्‌मयक्षेत्राचें अवलोकन करतांना लक्षांत ठेवले पाहिजेत. या प्रश्नांचीं उत्तरें सामान्यतः येणेंप्रमाणें येतील. (अ) भारतीय वाङ्‌मयावर सिंहली वाङ्‌मयाचा फारच थोडा परिणाम झाला. बौद्धांचें सांप्रदायिक वाङ्‌मय याला अपवाद आहे. आज बौद्धांचे पाली ग्रंथ जे उपलब्ध आहेत ते सिंहली आवृत्तीच्या द्वारेंच उपलब्ध आहेत. (आ) सिंहलद्वीपामध्यें भारतीय विद्यांच्या स्थानिक प्रसारार्थ उत्पन्न झालेलें वाङ्‌मय मात्र पुष्कळ आहे. (इ) हें प्रसारार्थ वाङ्‌मय सिंहली संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा अंश आहे असें म्हणण्यास प्रवृत्त करतें. भाषेवरील संस्कार हे वाङ्‌मयमूलक होत पण ते अधिक काळपर्यंत टिकतात. सिंहली भाषेच्या अभ्यासास या दृष्टीनें महत्त्व कमी पण सिंहली जनतेचा भारतीयापासून विभक्त होण्याच्या काळ निश्चित करण्याकडे या अभ्यासाचा उपयोग असल्यानें त्याचें महत्त्व आहे. (ई) सिंहली लोकांनीं तात्कालीक उपयोगासाठीं जें वाङ्‌मय निर्माण केलें तें फारच मोठें आहे.

ऐतिहासिक दृष्टीनें या चवथ्या प्रकारच्या वाङ्‌मयाचें महत्त्व फारसें नाहीं असें प्रथमतः वाटेल. तथापि हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, जे कांहीं वाङ्‌मय स्वतःपुरतें म्हणून तयार होतें त्याचा उपयोग पुष्कळदां इतरांनां होतो आणि जें वाङ्‌मय सार्वलौकिक हेतूनें तयार होतें तें सार्वलौकिक वाङ्‌मयाच्या महासागरांत बुडूनहि जातें आणि त्याच्याठायीं वैशिष्टहि फारसें नसल्यानें त्याच्याकडे ऐतिहासिक संशोधकाचें चित्त वेधत नाहीं. महावंसो, दीपवंसो यांसारखे ग्रंथ त्यांच्या संप्रदायाच्या दृष्टीनें केवळ स्थानिक महत्त्वाचे म्हणून तयार केले गेले पण आज त्यांचें महत्त्व फार मोठें आहे. उत्पादकाच्या दृष्टीनें सार्वलौकिकत्व आणि भावी इतिहासकाराच्या दृष्टीनें सार्वलौकिकत्व आणि महत्त्व हीं निरनिराळीं आहेत.

सिंहलद्वीपाच्या वाङ्‌मयाचा ऐतिहासिक विचार करावयाचा झाल्यास आपणांस तामिळ ग्रंथांपेक्षां सिंहली ग्रंथांच्या आणि तेथें झालेल्या पाली ग्रंथांच्या उद्‍भवाकडेसच प्रथम लक्ष दिलें पाहिजे. द्वीपांत तामिळ भाषेचा प्रवेश उत्तरकालीं झाला. त्याच्या अगोदर पाली व सिंहली वाङ्‌मयें निर्माण होऊं लागलीं होतीं. या उद्‍भवप्राथम्याच्या दृष्टीनें द्वीपवाङ्‌मयाचा विचार करतांना पाली व सिंहली वाङ्‌मयासच अग्रस्थान देणें जरूर आहे. द्वीपांतील तामिळ वाङ्‌मयाचा इतिहास पुढें तामिळ वाङ्‌मयाच्या एकंदर इतिहासाबरोबर देणार आहों. येथें पाली व सिंहली वाङ्‌मयाचें अवलोकन करूं.

इ. स. १२०० पूर्वींचा काळ – (तिपिटक, अठ्ठकथा, दळदावंसकाव्य, सारत्थसंगह, विसुद्धिमग्ग, दीपवंश, महावंश, जानकी परिणयादि संस्कृत ग्रंथ, कालिदासनिधन-अग्ग-बोधिकविमंडल, दापुलशासनें, दंपिया अटुवा गाटपद सन्नय, हेर नासिक विनिस).

बौद्ध मताचा सिलोनमध्यें प्रवेश होऊन त्याचा तेथें प्रसार होऊं लागल्याबरोबर तेथील वाङ्‌मयाचीहि वाढ होण्यास सुरवात झाली. तिपिटक नांवाची बौद्ध लोकांची पाली भाषेंत रचलेली संहिता व अठ्ठकथानामक तिपिटकावरील टीकात्मक ग्रंथ हे महिंद (ख्रिस्तपूर्व तिसरें शतक) यानें लंकेत आणले अशी तेथील लोकांत दंतकथा आहे. असेंहि म्हणतात कीं महिंदानेंच स्वतः ह्या दोन्हीहि ग्रंथांचें सिंहलींत भाषांतर केलें. इसवी सनाच्या पांचव्या शतकांत बुद्धघोषानें हे सिंहली ग्रंथ पुन्हां पाली भाषेंत आणले. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकांत वट्टगामनी (वलंगबाहु) राजाच्या कारकिर्दींत मूळ ग्रंथ व त्याची टीका प्रथम लिहून ठेवण्यांत आली; तोंपावेतों हे दोन्हीहि ग्रंथ मुखद्वारें एका पिढीनें दुसर्‍या पिढीस पढवूनच कायम राखण्यांत आले होते अशी सांप्रदायिक समजूत आहे.

ह्या दंतकथेंतील कांहीं भाग सत्य आहे व कांही भाग काल्पनिक आहे. तथापि तिजवरून एक गोष्ट मात्र उघड होते की, महिंदाच्या वेळीं सिलोनमधील लोक जी भाषा बोलत होते ती बौद्ध धर्मग्रंथांतील पाली भाषेहून बरीच भिन्न होती. सिंहलाकडे प्रयाण ओरिसाकडून झालें त्या अर्थीं महिंदाच्या मागध भाषेशीं सिंहली भाषा महाराष्ट्रीपेक्षां देखील अधीक जवळ असावयास पाहीजे.  ती महाराष्ट्रीइतकी जरी भिन्न असती तरी भाषांतर करण्याची मेहनत करावी न लागती. भाषांतराची मेहनत करावी लागली ही गोष्ट सिंहलद्वीपाचे लोक बर्‍याच प्राचीन कालीं वियुक्त झाल्याची द्योतक आहे. कांहीं पदरचे दृष्टान्त देऊन महिंदानें तेव्हांच्या सिंहली तिपिटकाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्‍न केला असावा व अशा रितीनें दृष्टान्तकथांचा संग्रह होऊन अठ्ठकथा ग्रंथ सिंहली भाषेंत तयार झाला असावा. दीपवंश रचला गेला त्यावेळीं अठ्ठकथा हा ग्रंथ अस्तित्वांत होता यांत शंका नाहीं. बहुधा दीपवंश व महावंश ह्या दोन्हीहि ग्रंथातील जुन्यांत जुना भाग हा अठ्ठकथांतील पूर्वेतिहासकथनावरून घेतला असावा. आणि ज्या अर्थीं या दोन्ही पुस्तकांचत महासेन (इसवी सनाच्या चौथ्या शतकाचा आरंभ) राजापावेतों इतिहास आणून पोंचविला आहे त्या अर्थीं हे ग्रंथ ज्या मूळ ग्रंथांवरून लिहिले त्या ग्रंथांत इतका इतिहास असला पाहिजे. म्हणजे त्या अठ्ठकथांचा लेखनारंभकाल ज्यास्तींत ज्यास्ती बौद्ध धर्मांचा सिलोनांतील आद्य प्रचारक जो महिंद त्याच्या पावेतों मागें जाऊं शकत असून त्यांचा लेखनसमाप्तिकाल इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या आरंभाला येतो. ह्या अठ्ठकथा सिंहली वाङ्‌मयाचा प्राचीनतम अवशेष म्हणून आपल्या उपयोगी पडल्या असत्या. परंतु दुःखाची गोष्ट ही कीं त्यांचा अद्याप पत्ता लागला नाहीं व बहुतकरून तो आतां लागणें शक्यहि दिसत नाहीं.

दंतकथांवरून आपणांस सिंहली वाङ्‌मयांतील आज केवळ नामशेष झालेल्या प्राचीन ग्रंथांचीहि माहिती मिळूं शकते.

द्वीपवाङ्‌मयांतील सर्वांत जुन्या ग्रंथांचा रचनाकाल परंपरागत लोककल्पनेनुसार इसवी सनाच्या चौथ्या शतकाइतका प्राचीन आहे. उदाहरणार्थ कित्तिस्सिरि मेघवन्न (संशोधकांच्या सांप्रदायिक गणनेनें इ.स. ३०४-३२२) राजाच्या कारकीर्दीच्या नवव्या वर्षी सिलोनमध्यें त्याकाळीं आणलेल्या बुद्धाच्या दंतावशेषावर दळदावंसनामक एक काव्य लिहिलें गेलें अशी समजूत आहे. ह्याच काव्याच्या मागून निघालेल्या आवृत्तीचा पुढें उल्लेख येणार आहे. ज्या वृक्षाखांली बुद्धाच्या अंतःकरणांत ज्ञानाचा प्रकाश पडला त्यासंबंधींची कथा देखील बरीच प्राचीन आहे. हिंचेंच पुढें उपतिस्सानें बोधिवंश नांवाखालीं पालींत भाषांतर केलें. ह्या पाली मूळाचें पुन्हां सिंहलींत केलेलें एळु बोधिवंस नांवाचें भाषांतर सिलोनांत चौदाव्या शतकापासून दृष्टीस पडतें.

चौथ्या शतकांतील बुद्धदास राजाच्या वेळीं महाधम्मकठ्ठी नांवाच्या विद्वान् भिक्षूनें सुत्तपिटकाचें किंवा त्यापैकीं कांहीं भागाचें सिंहली भाषेंत भाषांतर केलें असें ह्मणतात. यावरून त्यावेळीं लंकेंत वाङ्‌मयाबद्दल लोकांनां बराच उत्साह वाटत होता असें दिसतें. सारत्थसंगह नांवाचा वैद्यकावर एक ग्रंथ बुद्धदास राजानें स्वतः लिहिला होता असें म्हणतात. याच नांवाचा एक संस्कृत ग्रंथ अद्यापि दृष्टीस पडतो. तथापि हा ग्रंथ अस्सल आहे किंवा नाहीं हें खात्रीपूर्वक सांगतां येत नाहीं.

बौद्ध धर्मशास्त्रावर ज्यानें भाष्य केलें आहे त्या बुद्धघोषानें लंकेंतील वाङ्‌मयास नवीन चालन दिलें असावें असें वाटतें. पांचव्या शतकाच्या आंरभीं प्रसिद्धीस आलेल्या बुद्धघोषानें स्वतः पाली भाषेचा उपयोग केला; व दक्षिणेकडील बौद्ध लोक धार्मिक बाबतींत याच भाषेचा उपयोग करूं लागले. बुद्धघोषाच्या भाष्याबरोबर त्याच्या विसुद्धिमग्ग नांवाच्या बृहत्कोशाचा उल्लेख केला पाहिजे. सिंहली भाषेंत या ग्रंथाचा एकहस्तलिखित अनुवाद आहे.

महावंशांत मूळ ग्रंथाच्या पुरवणीरूप भागांत बुद्धघोषाच्या कार्याची सविस्तर हकीकत दिली आहे. ही हकीकत अशी आहे. बुद्धगयेजवळ एका ब्राह्मणकुलांत बुद्धघोषाचा जन्म झाला. विद्वत्तेबद्दल लहानपणींच त्याची ख्याति झाली. थेर रेवताबरोबर झालेल्या एका वादांत बुद्धाच्या उच्च तत्त्वांची त्याला माहिती होऊन त्यानें तो धर्म स्वीकारिला. तिपिटकाचा अभ्यास करण्यांत तो मग्न होऊन गेला; व रेवताच्या सूचनेवरून सिंहली भाष्याची (अठ्ठकथा) माहिती करून घेण्यासाठीं तो लंकेंत गेला. महाविहारांतील अनुराधपुरांत ज्या ठिकाणीं पवित्र महिंद वृक्ष आहे, त्या ठिकाणीं त्यानें विसुद्धिमग्ग नांवाचा ग्रंथ लिहिला. नंतर अंथाकर मठांत त्यानें वास्तव्य केलें. तेथें मागधीच्या व्याकरणाप्रमाणें त्यानें सर्व सिंहल अठ्ठकथांचें भाषांतर केलें. तो ग्रंथ पुरा केल्यानंतर तो हिंदुस्थानांत परत आला.

बुद्धघोषानंतर, लवकरच दीपवंश व महावंश हे पाली ग्रंथ झाले असावे.

सहाव्या शतकाच्या आरंभी, कुमारधातुसेन किंवा कुमारदास हा राजा लंकेंत राज्य करीत होता. तो रसिक कवि होता अशी तद्देशीय दंतकथा आहे. त्यानें संस्कृतमध्यें जानकीपरिणय हें साधें काव्य लिहिलें असें म्हणतात. याचा ग्रंथ उपलब्ध नाहीं. तथापि, सिंहली अनुवादाच्या आधारानें, धर्मरामानें मूळ संस्कृत ग्रंथ पुनः तयार केला आहे.

कुमारदासाच्या वेळीं कालिदास लंकेंत गेला होता व या राजकवीशीं त्याची फार मैत्री होती अशी एक मनोरंजक दंतकथा आहे. ही निव्वळ आख्यायिका आहे असें डॉ. गैजर म्हणतो. तें कसेंहि असो. सिंहली काव्यावर कालिदासाचें बरेंच वजन पडलें होतें यांत संशय नाहीं. त्याच्या रघुवंशावरून जानकीपरिणय हें काव्य लिहिण्यास कुमारदासास स्फूर्ति झाली व त्याच्या मेघदूताचें कित्येक संदेशकाव्यांत वारंवार अनुकरण झालेलें आहे. त्याचा पुढें उल्लेख करण्यांत येईल. कालिदसाचा मृत्यु सिंहलद्वीपांतच झाला आणि कुमारदासानें त्या दुःखामुळें अग्निकाष्ठें भक्षण केलीं असा दोघांच्या मैत्रीसंबंधाच्या दंतकथेचा उत्तरार्ध आहे आणि तेथील लोक त्याची दहनभूमि देखील दाखवितात. डॉ. सतीशचंद्र विद्याभूषण हे ही दंतकथा सत्य असून तिचा उपयोग कालिदासकालनिर्णयाला होईल काय अशी पहिल्या प्राच्यविद्यापरिषदेस पृच्छा करितात.

सहाव्या शतकांत लंकेंत काव्यकलेची किती प्रगति झाली होती हें महावंशांत स्पष्ट सांगितलें आहे. पहिल्या अग्गबोधि राजाच्या वेळीं (इ.स. ५६३-५९८) त्याच्या राज्यांत अनेक कवी असून त्यांनीं कित्येक सुरस व सुंदर काव्यें सिंहली भाषेंत लिहली असें त्या ग्रंथांत सांगितलें आहे.

नवव्या शतकाच्या आरंभीं दुसर्‍या दापुल राजानें कांहीं महत्त्वाच्या शिक्षांची नोंद करून व त्यांचा संग्रह करून कायदेशास्त्रांत भर टाकिली.

भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीनें फार महत्त्वाचें असें जें प्राचीन सिंहली वाह्मय, त्यापैकीं आतां कांहींएक शिल्लक नाहीं हें दुर्दैव होय. 'दंपिया अटुवा गाटपद सन्नय' हा सिंहली भाषेंतील सर्वांत प्राचीन गद्य ग्रंथ आहे. हा धम्मपदाच्या भाष्याचा कोश लुई डि झोश यानें १८७५ त शोधून काढिला. हा ग्रंथ दहाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास लिहिलेला असावा अशी कल्पना आहे.

हेर नसिक विनिस नांवाच्या लहान ग्रंथांतहि अगदीं जुनी सिंहली भाषा आढळते; या ग्रंथांत बौद्धसंप्रदायांत नवीन आलेल्यांच्या कर्तव्यांचें वर्णन केलेलें आहे. परंतु हा ग्रंथ केव्हां रचला गेला हें निश्चितपणें सांगता येत नाहीं.

बाराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत- (गुरुळुगोमी, अमावतुर, विनयाचें भाषांतर, थूपवंश, पूजावलिय, बुद्धदंतावर सिंहली काव्य, सुलुराजरत्‍नाकरय, एळुबोंधिवंसय, अट्टनगलुवंसय, सद्धर्मालंकारय, पन्सियपनसजातक, व्याकरण, काव्यें).

बाराव्या शतकाच्या उत्तरार्धांत पहिल्या पराक्रमबाहूच्या (सिंहली-परकुंब) कारकीर्दींत सिंहली राज्याच्या उत्कर्षाबरोबरच सिंहली वाङ्‌मयाचाहि उत्कर्ष झाला, परंतु या कालंतील त्याच्या उत्कर्षाचें कालक्रमानुसार बरोबर रीतीनें वर्णन करणें शक्य नसल्यामुळें, जे सिंहली ग्रंथ हस्तलिखितांच्या रूपांत आज आहेत, किंवा जे छापून प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे कांहीं वर्ग पाडून एकैकशः त्यांचा आपण विचार करूं.

धर्मविषयक गद्यग्रंथ हा वर्ग आपण प्रथम हातीं घेऊं. या वर्गात अमावतुराचा म्हणजे गुरुळुगोमीच्या अमृतप्रवाहाचा उल्लेख प्रथम करणें योग्य आहे. लंकेमध्यें हा ग्रंथ अत्यंत पूज्य आहे. यांत बुद्धाचीं वचनें व निरनिराळ्या धार्मिक विषयांवर ब्राह्मणांबरोबर झालेले त्याचे वाद आहेत. दालव्हीस वगैरे कांहीं लोकांच्या मतें, गुरूळुगोमि हा सहाव्या शतकांत पहिल्या अग्गबोधीच्या वेळीं असावा व आपल्यापाशीं असलेला त्याचा अमातुवर हा ग्रंथ सिंहली वाङ्‌मयांतील अगदीं प्राचीन ग्रंथ असावा; परंतु गुरूळुगोमि हा बाराव्या शतकांतील होता हें दुसरें मत डॉ. गैजर यांस अधिक संभवनीय दिसतें. धर्मविषयक प्रश्नांवर प्रमाणभूत असा धर्म-प्रदीपिका हा दुसरा एक ग्रंथ त्यानेंच लिहिलेला आहे. पवित्र बोधिवृक्षाची गोष्ट ज्यांत आहे, त्या पाली भाषेतींल महाबोधिवंश नावांच्या ग्रंथाचे धर्म-प्रदीपिका हें भाष्य आहे.  धर्म-प्रदीपिका या ग्रंथाची भाषा विशेषत्वेंकरून संस्कृत वळणाची आहे; उलटपक्षीं अमावतुर हा ग्रंथ शुद्ध एळूंत लिहिलेला आहे बुद्धघोषाच्या विसुद्धिमग्गाच्या सिंहली अनुवादाचा या ठिकाणीं पुनः एकदां उल्लेख करू. तिसर्‍या पराक्रमबाहु (१३ व्या शतकाचा शेवट) राजानें हा ग्रंथ लिहिला अशी दंतकथा आहे.

चौथ्या पराक्रमबाहूच्या वेळीं (सुमारे इ.स. १३००) मेधंकर नांवाचा पंडित राहत होता असा महावंशांत (१९, ८५) उल्लेख आहे. त्यानें विनयाचा सिंहली तर्जुमा व विनयार्थसमुच्चय नांवाचें त्यांचें भाष्य केलें अशी कल्पना आहे. हा ग्रंथ हस्तलिखित असून, तो अजून प्रसिद्ध झाला नाहीं असें वाटतें. दहंगात मालाव नांवाच्या थोड्या अलीकडच्या ग्रंथांत धर्मविषयक कोड्यांचा संग्रह असून तो ग्रंथ चौथ्या भुवनेकबाहु राजाच्या वेळीं (१४ व्या शतकाच्या मध्यास) झालेला आहे.

ऐतिहासिक व कथानकात्मक गद्यग्रंथांत परक्रामपंडीताच्या थूपवंशाचा प्रथम उल्लेख केला पाहिजे. परक्रामपंडित हा पहिल्या परक्रामबाहूच्या वेळीं राहत असून, त्याच्या मृत्यूनंतर विजयबाहु या नांवानें त्यानें स्वतः एक वर्ष राज्य केलें. थूपवंशांत प्रथमतः लंकेंतील दाघोबांचा इतिहास द्यावायाचा जरी मुख्य उद्देश होता, तरी त्यांत इतक्या ऐतिहासिक टिपा व विविध अप्रस्तुत विषयांवर इतकी माहिती आहे कीं, तो ग्रंथ म्हणजे एक माहितीची महत्त्वाची खाण आहे असें समजण्यांत येतें. मयूरपादाच्या पूजावलियाची हिच गोष्ट आहे. तो ग्रंथ दुसर्‍या पराक्रमबाहूच्या वेळीं (१३ व्या शतकाच्या उत्तरार्धांत) लिहिलेला आहे.

हिंदुस्थानच्या व लंकेच्या कित्येक राजांनीं बु्द्धाचा कसा सन्मान केला व त्याला कोणत्या देणग्या दिल्या याचा या ग्रंथांत उल्लेख केलेला आहे. सोळाव्या प्रकरणांत विशेषतः लंकेची माहिती दिलेली असून, त्यांत ग्रंथकाराच्या वेळेपर्यंत झालेल्या सिंहली राजांची पूर्ण यादी त्यांच्या कारकीर्दींचा काल व बौद्ध धर्माशीं त्यांचा संबंध याबद्दल मजकूर आहे.

तेराव्या शतकाच्या पूर्वार्धांत लीलावती राणीच्या कारकीर्दींत होऊन गेलेल्या धम्मकित्तिथेराचें दाठावंसय थोडें अधिक जुनें असून त्यांत क्यांडी येथें जतन करून ठेविलेल्या दंतावशेषासंबंधीं गोष्ट कथन केलेली आहे; व ती दळदावंसय नांवाच्या ज्या सिंहली काव्याचा वर उल्लेख आला आहे, त्यावरून लिहिण्यांत आली आहे. त्याच ग्रंथकर्त्यानें मग तिचें पालींत पद्यमय भाषांतर करुन त्या भाषांतरांचें पुन्हा सन्नय ह्या नांवाखालीं सिंहलींत रूपांतर केलें. मूळांतील पाली काव्य व त्याचें सिंहलींतील रूपांतर हीं दोन्हीहि आज कित्येक हस्तलिखितांतून लिहून ठेविलेलीं सांपडतात व तीं छापूनहि प्रसिद्ध झालीं आहेत.

तेथें एक गोष्ट सांगून ठेविली पाहिजे कीं, चौदाव्या शतकाच्या मध्यांत चौथ्या भुवनेकबाहूच्या कारकीर्दींत 'सुलुराजरत्‍नाकरय' नांवाचें एक ऐतिहासिक पुस्तक लिहिलें गेलें होतें पण तें अद्यापपर्यंत सांपडलें नाहीं. अठराव्या शतकांत लिहिलेल्या राजरत्‍नाकरय नांवाच्या ज्या एका अलीकडील ग्रंथाचा उल्लेख पुढें येणार आहे त्याचा उपरिनिर्दिष्ट पुस्तकाशीं कांहीं संबंध नाहीं एवढें विसरतां कामा नये.

येथें सरस सिंहली गद्याचा नमुना म्हणून उम्मनग्ग जातकांतील एक उतारा घेऊन प्रचलित भाषेंत झालेलें त्यांचे भाषांतरहि घेऊं. सिंहलद्वीपांतील वाङ्‌मयाच्या व लौकीक भाषेमधील भेद किती क्षुल्लक आहे हें या भाषांतरावरून दिसून येतें.


अभिजात (एळु) गद्य.

कपुसेनक रक्ना एक स्त्रियक कपु रक्नी, तमा रक्ना सेनेहि सवस पिपि कपु कडागेन, सकस्कोट कडा पोळा वळु-कोट सीन  हू काट वाति-कोट ए हू-वट इन तबागेन गम-ट एन्नीः "महौषध पण्डितयन-वहंसे विसिन कणवनलद पोकुणेन नहमि" कड गलवा, गोड तवा, कड मत्ते हू-वाटिय तबा, नहन-ट दिय-ट बट अनिक स्त्रियक हू-वाटिय दाक एहि लोल-वु सित-आटिव ए अत-ट गेनः "अह, इता यहपत, हूयेहि सीनः  अत नगणियनि, तोप विसिन-म कटनालद-दा ?" -यि आश्चर्यमत्-व बलन्-नियक मेन इन तबा-गेन, नागी गियाय- पेर गाट-हू-पळन्द-नायेहि परिद्देन्-म कलह कोट कोट सालाव समीपयेहि यन देदेना गेन्वा, विचारा तमन- वहंसे की युक्तियेहि "सिटुम्ह"- यि की-पुस बोधिसत्त्वयन्-वहंसेः "तो मे हू-वाटीय करन्नी कुमक आतुळे ला कळा- दा ?" -यि सोर-तानात्तिय विचाळेय. सोर-तानात्ती कियन्नीः "स्वामीनि, कपुआटक आतुळे ला वट- केळेमि" किव. आगे बस असा, हू-वाटीय-आति-तान्नातियः "तो कुमक आतुळे ला वट-कळा-दा"-यि विचाळ-सेक. ओः "तिंबिर-आटक आतुळे ला वट-केळेमि"  किव. देन्ना-गे बस असा, सभावेहि उन्नवुन गिविस्वा हू-वाटिय गलवा, आतुळे-तुबू तिंबिरि-आट्य दाक, आ सेर-बव गिविस्वू सेक-बोहो देना युक्तिय पसुन नियाव-ट तुटु-पहटु-व दहस्-गणन साधु-कार पावत्-बूह.


लौकिक गद्य.

कपुहेनक रकिना एक गानीयेक कपु रकिन अतर आ रकिन हेने सवस पिपुनु कपु कडागेन, हरिगसा कडा पोळा वळु-कोट सिहिन नूल काट वाटि-कोट ए नूल-बोलय इने तबागेन गम-ट एन अतरः "(मम) महौषध पंडितयन्-वहंसे विसिन हारवापू पोकुणेन नाञ्ञा" किया राद्द गलवा, गोड तबा, राद्द उड नूल-बोलय तबा, नान-ट वतुरट वास्साय. अनिक गानियेक नूलबोलय दाक एकट आसा-वेला एक अत-ट गेनः "अने, बोहोम होन्दयि, नूल सिहिनिय; अने नंगी, उंब विसिन्-म काटपू एकक्द ?"  किया पुदुम-वेला वलन्न्-वागे इने तबा-गेन, यन्-ट गियाय. मी-ट इस्सर गाट-नूल-पळन्दना-कथा-वेहि वागेम कोलहल कर कर सालाव लांगिन यन देन्ना गेन्वा, अहला उन्वहंसे कियन तीन्दुवक-ट "अपि कामति-वेनवाय" किया की-पसु बोधिसत्त्वयन्-वहंसेः "उंब मे नूल-बोलय करद्दी मोकक आतुळे ला कळाद ?" किया हेर-गेन आसुवाय. "स्वामीनि कपु आटयक आतुळे ला मम कळाय" किया हेर कीवाय-आ-गे कथाव असा, ऊ नूल्-बोलय आत्ता-गेनः "उंब मोदक आतुळे ला वट-कळा-द ?" किया आसुवाय. आः "तिंबिर-आटयक आतुळे ला वट-कळा" किया कीवाय. देन्ना-गे कथाव असा, सभा-वेहि उन्नु मिनिसुन कामति-करवा नूल बोलय गलवा, आतुळे. तिबुनु तिंबिरि-आटय दाक, आ सेर-बव ओप्पु कळाय. बोहो देना तीन्दु-कळ-हाटिय-ट तुटु-पहटु-व दहस् -गणन साधुकार-शब्द पावात्तुवाय.


मराठी अर्थ.

एक स्त्री एका कापसाच्या शेतांत कामाला होती; या मळ्यांत काम करीत असतां एके दिवशीं तिला मिळालेल्या कापसाची तिनें संध्याकाळीं सरकी काढून तो साफसूफ व मोकळा करून त्याचा एक गोळा केला व त्याचें सुरेख सूत काढून त्या सुताचा चेंडू बनवून तिनें तो आपल्या खिशांत ठेविला. पंडित महोषधानें हें जें तळें खणलेलें आहे त्यांत आपण स्नान करावें असा विचार गांवांत जातांना तिला सुचला. हा विचार सुचल्यानंतर तिनें आपलीं वस्त्रें फेडून तीं त्या तळ्याच्या काठांवर ठेविलीं व त्यांच्यावर तो सुताचा चेंडू ठेवून, स्नान करण्यासाठीं ती पाण्यांत उतरली. दुसर्‍या एका स्त्रीनें तो चेंडू पाहून तो आपल्यापाशीं असावा अशी तिला इच्छा झाल्यामुळें तिनें तो आपल्या हातांत घेतला. व "हा फार उत्तम आहे; याचें सूत फार सुरेख आहे; ताई, हा तूं तयार केलास का ?" असें तिनें विचारलें. तिनें त्या चेंडूची वाखाणणी केली व आपल्याला पाहण्यासाठीं पाहिजे आहे असा बहाणा करून तो चेंडू तिनें आपल्या खिशांत कोंबला, व ती चालती झाली. नंतर गांठी दिलेल्या दोर्‍याच्या डागिन्याची गोष्ट पूर्वी आली आहे त्या गोष्टीप्रमाणेंच एकसारख्या भांडत असलेल्या त्या दोन स्त्रिया बोधिसत्त्व ज्या मंदिरांत होता तिकडे आल्या. बोधिसत्त्वानें त्यांनां आपल्या कडे बोलाविलें व मीं जो निकाल देईन तो तुम्ही मान्य कराल का असें त्यानें त्यांस विचारिलें. 'होय' असें त्यांनीं उत्तर दिल्यावर, "तूं तो चेंडू केलास त्यांत काय घातलेंस ?" असा प्रश्न त्यानें चोरट्या स्त्रीला विचारिला. "महराज, मीं त्यांत कापसाची सरकी घातली आहे" असें त्या स्त्रीनें सांगितलें. हें उत्तर ऐकून "तूं त्या कापसांत काय घातलेंस ?" असें त्यानें त्या चेंडूची जी खरी मालक होती तिला विचारलें. "मीं त्यांत लांकडी चेंडू घातला आहे" असें तिनें उत्तर दिलें त्या ठिकाणीं असलेल्या लोकांच्या संमतीनें त्यांने तो चेंडू उलगडण्यास लाविलें; आंत लांकडी चेंडू आहे असें आढळतांच प्रथम प्रश्न केलेल्या स्त्रीस चोर ठरविलें. या निकालानें लोकांना अत्यंत आंनद होऊन त्यांनीं त्याची फार वाहवा केली.

आतां एळुबोधिवंसय व अट्टनगलुवंसय ह्या पाली ग्रंथांच्या भाषांतरांचाच फक्त उल्लेख करावयाचा राहीला असून तेवढें केलें म्हणजे आपण आपल्या दुसर्‍या कालखंडाच्या अखेरीस आलों. यांपैकीं पहिला ग्रंथ उपतिस्स थेर याच्या सिहंली मूळावरून रचलेल्या बोधिवंशनामक पाली ग्रंथांचें सिंहली गद्यात्मक रुपांतर असल्याचें पूर्वीं सांगितलेंच आहे. एळुबोधिवंसय हा ग्रंथ छापून प्रसिद्ध झालेला कोठें आढळून येत नाहीं. अट्टनगलुवंसय हा ग्रंथ हत्तहंगल्लविहारवंशनामक एका पाली गद्यमिश्रित काव्याचें भाषांतर असून तो चौदाव्या शतकाच्या अखेरीस लिहिला गेला. गोठभयाकडून पदच्युत झाल्यावर अट्टनगलु मठांत जाऊन राहिलेल्या सिरिषंधबोधि राजाची कथा या पालीकाव्यांत आहे. आणखी थोड्या काळानें म्हणजे इसवी सन १४०० च्या सुमारास सासनावतार किंवा निकायसंग्रह नांवाचा ग्रंथ रचला गेला. हा ग्रंथ म्हणजे बौद्ध धर्माचा व त्याच्या निरनिराळ्या पंथांचा एक इतिहासच असून त्यांत सिंहली राजांची एक यादी व त्यांतील ज्यांनीं बौद्ध मताच्या प्रसारार्थ खटपट केली त्यांची संक्षिप्‍त माहितीहि दिली आहे. ह्या पुस्तकांत दिलेली कालविषयक माहिती सिंहली भाषेंतील दुसर्‍या कोणत्याहि ऐतिहासिक ग्रंथापेक्षां अधिक विश्वसनीय मानण्यांत येते.

धम्मसेनथेर याच्या सद्धर्मालंकारय या ग्रंथाचा काल बरोबर ठरवितां येत नाहीं. पण तो या कालांत घालतां येईल. हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप यांतील बौद्ध इतिहासपुराणांचा हा एक संग्रह आहे; हीं कथानकें रसवाहिनीविदेहांत देखील आढळतात. थेरचे ग्रंथ पालीभाषेंत आहेत. सिंहली ग्रंथ आणि पाली ग्रंथ यांचा एकमेकांशीं काय संबंध आहे हें काढण्यास अजूनहि संशोधन केलें पाहिजे. रसवाहिनीच्या प्रस्तावनेंत असें म्हटलें आहें कीं, यांतील कथा संतांनीं या द्वीपाच्या भाषेंत म्हणजे सिंहली भाषेंत मूळ निवेदिल्या असून, सर्व ग्रंथकारांनीं त्यांचें जतन करून मग पालींत त्यांचें भाषांतर केलें. धम्मसेन थेराचा म्हणून मानलेला दुसरा विस्तृत ग्रंथ म्हणजे, धम्मपद अठ्ठकथांचें सद्धर्धरत्‍नावलिय नांवाचें सिंहली रूपांतर; याला थोडक्यांत रत्‍नावलिय असेंहि म्हणतात.

वाङ्‌मयाच्या इतिहासांतील फार महत्त्वाची कृति म्हणजे चवथ्या पराक्रमबाहूच्या कारकीर्दींत अजमासें इ.स. १३०० सालीं झालेलें, पन्सियपनस्जातक नांवाचें जातक ग्रंथाचें भाषांतर होय. महावंशांतील हकीकतीप्रमाणें (९०, ८० व पुढचा भाग) पाहतां, हें भाषांतराचें काम राजानें करून पुढें त्यानें तें भाषांतर तपासण्यासाठीं विद्वान् आचार्यांच्या सभेकडे दिलें, आणि नंतर तें वर आलेला विनायार्थसमुच्चयाचा कर्ता मेधङ्कर यानें आपल्या शिष्यांत त्यांतील ज्ञानाचा प्रसार करावा म्हणून त्याच्या हवालीं केलें. सिंहलद्वीपांत या जातकाच्या हस्तलिखितांची मुळींच वाण नाहीं;  पण आतांपर्यंत हें सबंध प्रसिद्ध झालें नसून याचे फक्त वेगवेगळे अंशच प्रसिद्ध झालेले आहेत.

अलीकडच्या कांलातील शास्त्रीय ग्रंथांमध्यें एळु-व्याकरण सिदत् संगराव हा मुख्य ग्रंथ असून लंकेंत हा अत्यंत पूज्य मानिला जातो. संस्कृतमध्यें पाणिनीस व पालीमध्यें कच्चायनास जसें महत्त्व आहे, तसेंच सिंहलीमध्यें या ग्रंथास महत्त्व आहे. दक्षिण लंकेंतील पालीराज नांवाच्या एका सरदाराच्या आश्रयाखालीं हें व्याकरण रचिलें गेलें. चौथ्या पराक्रमबाहूच्या वेळीं पालीराज नावांच्या एका प्रधानाचा उल्लेख केलेला आढळतो, त्या अर्थीं हा ग्रंथ इ. स. १३०० च्या सुमारास लिहिलेला असावा; दुसर्‍या कांहीं गोष्टींवरूनहि हीच गोष्ट दर्शविली जाते. रसवाहिनी हा ग्रंथ ज्यानें लिहिला त्याच विदेहथेरानें हें सिंहली व्याकरण केलें असावें अशी सामान्य समजूत आहे. सिदत्-संगरावाच्या अनेक आवृत्या निघून, त्याचे अनुवाद व भाष्यें एकसारखीं होत आहेत. येथें सिंहली अलंकारशास्त्रावरील सियबस्-लकर नांवाच्या एका ग्रंथाचा उल्लेख करूं. शिलामेघवण्ण नांवाच्या राजानें हा ग्रंथ लिहिला अशी दंतकथा आहे. हा राजा नवव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास होऊन गेला. परंतु हा ग्रंथ खात्रीनें बराच अलीकडचा असावा. पूजावलिय हा ग्रंथ ज्यानें लिहिला त्या मयूरपादानें योगार्णव नांवाचा एक वैद्यक ग्रंथ लिहिला आहे असें म्हणतात;  परंतु त्या ग्रंथाची यापेक्षां अधिक माहिती उपलब्ध नाहीं.