प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
सिंहली भाषेंतील विदेशीय शब्द — या शब्दांपैकीं कांहीची व्युत्पत्ति पुढें मागें आर्यन् भाषांतूनच लागूं शकेल व दुसरे कांहीं शब्द द्रविड भाषांतून आले असल्याचें आढळून येईल. सर्वच गोष्टींचा पहिल्या तडाख्यांत उलगडा होत नसतो. तथापि कांहीहि झालें तरी ज्यांची व्युत्पत्ति कोणत्याच भाषेंतील शब्दांपासून लावतां येत नाहीं असे कांहीं तरी शब्द शेवटी शिल्लक राहतीलच. हे शब्द भारतीयांची सिंहलद्वीपांत वसाहत होण्यापूर्वीं तेथें जे इतर लोक राहत होते त्यांच्या मूळ भाषेंतील असले पाहिजेत असें अनुमान करणें युक्त होईल. असो. ज्यांची व्युत्पत्ति आर्यन् भाषांपासून लागूं शकत नाहीं असे कांहीं शब्द पुढें दिले आहेत :—
अंड=गलबला, ओरडणें (धातु-अंडणु=ओरडणें); इदिबु, इदुब, इब्ब=कासव; इंग (ला. इम्)=जघन; इळु=जंगल, अरण्य; कस=नारळ; कोंड=फळ; किदु, किंदि=मिरें; कोल=पान; दोडनु=बोलणें (क्रि.); देल=एक भाकरीचें जंगली फळ; बेली=शुक्ति, मोत्याचे शिंपले; बेलि=मान; महनु=शिवणें (क्रि.);
मोल=मेंदु; मुहुसु=विंचू; रिका, रिळव्=वानर; लिंद (ला. लिन्) =झरा, कारंजें; रल्=कठिण, मजबूत बळकट; रावुल्=दाढी; लोकु=मोठा; वरल=डोक्याचे केस; सवस=संध्याकाळ; हलल्, हल्ला=काजवा; हिबिलि=टोपली (मासे धरण्याकरीतां); हिसा=मोत्याचे शिंपले; हुलंगि (ला. हुलं) =वारा, हवा; हुसु=मासा, शिजवून तयार केलेला मासा.
कांहीं शब्द तामिळ भाषेंतून घेतले आहेत. उदाहरणार्थ, अडि=पाय, पाया; अलि=हत्ती; काडि=सिरका; तक्कडि=लबाड; टेक्क=सागवानाचें झाड; पंगु=भाग घेणें (नाम); पुंचि=लहान; मल्=धाकटा भाऊ; वेल=भाताचें शेत.
पोर्तुगीज भाषेंतील शब्दांपासून तयार झालेले शब्द :—
इस्ताल=तबेला (पो. एस्तल्ल); कडदासि किंवा करदासि=कागद (पो. कार्टझ); लन्स=भाला (पो.लान्सो).
डच शब्दापासून झालेले शब्द :— तरप्पु=जिना (ड=ट्रॅप); ते=चहा (ड थी.); बक्किया=दोण, टांकी (ड. बक्जे); अक्कर=परिमाण (इं. एरप), पोनि=घोड्याचें शिंगरू; वगैरे.
व्यापारी व सरकारी कामकाजांत वापरले जाणारे शेंकडों शब्द इंग्रजी भाषेंतून घेतले आहेत.
येणेंप्रमाणें सिंहलींतील विदेशीय शब्दांचा थोडासा परिचय केल्यानंतर आतां सिंहली संलग्न पोटभाषा जी मालदिवी तिजसंबंधी कांहीं ज्ञान करून घेऊं.
मालदिव बेटांतल्या भाषेसंबंधाचीं साधनें डॉ. गैजरनें पुष्कळशीं स्वतःच सिलोनांत मिळविलीं. नंतर ए. गुणशेखर यांच्या साहाय्यानें त्यांस आणखी साधनें मिळालीं. या साधनसंग्रहांत सिंहली वाक्यांचीं व लहान कथानकांचीं मालदिवी भाषेंतील भाषांतरें आहेत. मालदिवीच्या वर्णशास्त्रावरून असें दिसून येतें कीं, सिंहलीचा विकास होऊन तिच्यांतील विशेष बनल्यानंतर तिच्यापासून मालदिवी भाषा विभक्त झाली. याचा अर्थ भारतीय रक्ताचें मालदीव बेटांत प्रयाण बरेंच अलीकडे झालें असा होतो. असो.
खालीं जीं उदाहरणें दिलीं आहेत त्यांवरून सिंहलीचें मालदिवीशीं साम्य किती आहे, व असाम्य किती आहे तें लक्षांत येईल.
१ स्वरविकार :— | |||
मराठी | मालदिवी | सिंहली | पाली |
पृथ्वी | बिन | बिम | भूमि |
मिरीं | मिरस | मिरिस | मरिच |
माशी | मेहि | मासि | मछिआ(प्रा.) |
नंतर | देन | दान | दानि |
मध्य | मेदु | मादि | मज्झ |
फिरणें | एवुरेण | आँबुरेणु | |
बोट(हाताचे) | इगिलि | आँगिलि | अंगुली |
२ व्यंचनविकार :— | |||
मराठी | मालदिवी | सिंहली | पाली |
पांढरा | हुदु | हुदु | सुद्ध |
लांब | दिगु | दिगु | दिग्घु |
चंद्र | हंदु* | हँदु | [ँ= अर्धानुनासिक] |
झाड | गस | गस | गच्छ |
मासा | मस | मस | मच्छ |
झाडाचें पान | गहु-फत | शब्दाच्या पोटांतील ‘स्’ चा ‘ह्’ होतो. | |
माशांचें तेल | महु-तेउ | ||
चार | हतरु | शब्दाचे आरंभी ‘स्’ चा केव्हां केव्हां ‘ह्’ होतो. | |
चौतिस | सउर-तिरीस | ||
निशाण | दिद | दद | धज |
जीभ | दू | दिव | जिव्हा |
आठ | अर. | अट | अठ्ठ |
'र.' हा मालदिवीमधील वर्ण सिंहलींत नाहीं. र्, ह्, स्, या तीन वर्णांची थोडी थोडी भेसळ या 'र.' मध्यें आहे. | |||
खालीं | अरि. | यट | हठ्ठ |
मी पाहिलें | दुरि.ण | दुटु | दिठ्ठ |
हाणून पाडणें | कोरा.ण | कोटानु | कोट्टेटि |
फूल | म(उ)# | मल | माला |
दगड | ग(उ)# | गल | |
दांत | **दई, | दत | |
पान | **फई, | फत | |
उंट | #ओ(र.)## | ओटु | |
हत्ती | ॥एग | एत | |
* लंडन प्रतींत 'हदु' व ख्रिस्तोफर प्रतींत 'हडु' अशीं रूपें आहेत. # (उ) हा उगीच थोडा 'अ' बरोबर उच्चारावयाचा. ** लं. प्रत-दत, फत; ख्रि. प्रत-दई; फई. # ल. प्रत-ओर.ख्रि. प्रत- ओग. पिरार्ड, ओल. ## (र.)यी 'र.' चा उच्चार करीत नाहींत. ॥ लं. प्रत-एत. ख्रि. प्रत-एग. |
या वरील कोष्टकांवरून मालदिवींतील वर्णविकारनियमांची थोडीशी कल्पना येईल. पाली 'ऊ' बद्दल सिंहलीप्रमाणें मालदिवींत 'इ' येतो; जेथें सिंहलींत 'आ' येतो तेथें मालदिवींत 'ए' येतो, क्वचित 'इ' येतो; पालींत जेथें जोडाक्षर असतें तेथें सिंहलींत व मालदिवींत साधें अक्षर येतें;
सिंहलींत अर्धानुनासिक असतें तेथें मालदिवींत पूर्णानुनासिक येतें; पाली ‘च्’ ‘छ्’ बद्दल सिं. व मा. दोहोंतहि ‘स्’ आदेश होतो व पाली ‘ज्’ बद्दल ‘द्’ होतो; सिं. ‘ट’ चा मा. त ‘र’ होतो; सिं. तील ‘ल’ सारखीं काहीं व्यंजनें लोप पावून मागीर स्वरांत किंचित् बदल होतो; इत्यादि नियामांचीं उदाहरणें वर दिलीं आहेत. गैजरनें गोळा केलेल्या साधनांत व तत्पूर्वींच्या ख्रिस्टॉफर व पिरार्ड यांच्या प्रतींत आणि ‘लंडनप्रत’ म्हणून गैजरनें उल्लेखिलेल्या प्रतींत थोडीशी तफावत आढळते तीहि वर दर्शविली आहे.
मालदिवी भाषेंत पूर्वीं जेथें ‘प’ असे तेथें आतां ‘फ’ येतो असें गैजरच्या नजरेस आलें. याचीं दोन उदाहरणें गैजरनें दिलीं आहेत तीं फस्, फहेइ (=पांच) व फा (=तंगडी) हीं होत. या शब्दांचीं पिरार्डच्या प्रतींत 'पहेत' व 'पाए' अशीं रूपें आढळतात. पिरार्ड हा १७ वे शतकाच्या आंरभीं होऊन गेला. तेव्हां अलीकडील २।३ शतकांतच ‘प’ चा ‘फ’ झाला असें दिसतें.
मालदिवींतील कांहीं शब्द सिंहलींतील समान शब्दांहून जुन्या व्युत्पत्तीचे आहेत. उदाहरण, हाहे (=हजार) हा मालदिवी शब्द जुन्या 'सहस्स' शब्दावरून आला आहे, व तत्समान 'दहस' हा सिंहली शब्द अलीकडचा आहे.
मालदिवी व सिंहली यांचा प्रत्ययांच्या बाबतींत पुष्कळच भेद आहे.
सिंहलीशीं संलग्न असलेल्या मालदिवी भाषेचें स्वरूप वरील वर्णनावरून आपणांस कळलें आहे. यापेक्षां अधिक विस्ताराचें येथें प्रयोजन नाहीं.
सिंहलींतील अनार्यन् व विदेशी शब्द पूर्वी दिलेच आहेत व तिच्या मुख्य शब्दसंग्रहाचें स्वरूपहि वर दाखविलें आहे.
गैजरनें या सर्व सामग्रीचा विचार करून सिंहली ही शुद्ध आर्यन् भाषा आहे असें ठरविलें व हेंच मत वस्तुस्थितीस धरून आहे. तरी पण सिंहली ही आर्यन् भाषा आहे काय या प्रश्नाचें उत्तर सध्याप्रमाणें नेहमींच होकारार्थी देतां येत असे असें नाहीं. सिंहली ही द्रविडी भाषा आहे असें रास्क याचें म्हणणें होते. फ्रेड मुल्लर यानें सिंहली भाषेला द्रविड भाषांच्या सदरांतच घातलें आहे, परंतु हिंदुस्थानच्या भाषांपैकीं सिंहली ही एक स्वतंत्र भाषा आहे असेंहि त्याला वाटलें. लॅसेनचें मत ही मलायी भाषेपासून झाली असावी असें होतें. सिंहली भाषेच्या आर्यन् कुलाचें समर्थन प्रथम डी. आल्विस यानें केलें परंतु त्याजवळ याबद्दल भरपूर पुरावा नव्हता. सिंहली व तामिळ या दोन भाषांत फरक आहे या मुद्यावर त्यानें विशेष जोर दिला. या दोन भाषांत मुळींच संबंध नाहीं असें कॉल्डवेल याचेंहि ठाम मत होतें.
सिंहली भाषेचें आर्यन् कुल सशास्त्र सिद्ध करण्याचें काम प्रथम चाइल्डर्स व र्हिस डेव्हिस यांनीं हातीं घेतलें, व त्यांच्या पक्षास गोल्डश्मिट व ई. मुल्लर हे बिनशर्त येऊन मिळाले. सिंहली ही आर्यन् भाषा आहे हें निर्विवाद आहे व अशोकाच्या शिलालेखांत ज्या भाषा येतात त्यांपैकीं कांहीं भाषांशीं व महाराष्ट्री-भाषेशीं सिंहलीचें निकट साम्य आहे; आणि कांहीं महत्त्वाच्या बाबतींत प्राकृत भाषांत व या भाषेंत फरक आहे असें गोल्डश्मिट यानें ठरविलें. मुल्लरनेंहि असाच सिद्धान्त केला कीं सिंहली भाषेचा अशोककालीन शिलालेखांच्या भाषेशीं निकट संबंध आहे.
हास व इ. कुहन् यांचीं मतें याच्याविरुद्ध आहेत. हासचें म्हणणें सिंहली ही आर्यन् भाषा आहे असें ठरविण्यास पुरेसा पुरावा नाहीं. इ. कुहन् म्हणतो, "सिंहली भाषा बरीचशी आर्यन् भाषेसारखी दिसते, परंतु ती मिश्र भाषा आहे. तिच्यांतील कांहीं द्दढमूल विशेष अंश अनार्यन् भाषांतून आले आहेत असेंच म्हणावें लागतें. या विशेष अंशांची याशिवाय दुसरी उपपत्तीच बसत नाहीं, व म्हणून सिंहली ही मिश्र भाषा आहे असें म्हणावें लागतें."
या सर्व मतांचा उल्लेख करून डॉ. गैजर म्हणतात, "मीं सिंहली भाषेसंबंधींचा पुरावा बर्याच विस्तारानें मांडला आहे. या पुराव्यावरून सिंहली ही शुद्ध आर्यन् भाषा आहे व इतर इंडो-आर्यन् लोकभाषांचा जो दर्जा आहे तोच हिचाहि दर्जा आहे, हें माझ्या मतें निःसंशय होत आहे. सिंहलींतील वर्णशास्त्र प्राकृताच्या वर्णशास्त्रावर आधारलेलें आहे, स्वरविकाराचे जे विशेष सिंहलींत आहेत तत्समान विकारविशेष मालदिवी वगैरे संलग्न भाषांत आहेत, वगैरे गोष्टी ज्यांनां स्पष्ट झाल्या आहेत त्यांनां माझें मतच ग्राह्य वाटेल. सिंहलींत महाप्राणोच्चार्य ख, झ, ढ, घ, भ हे वर्ण नाहींत ही अडचण ज्यांनां भासते, त्यांस माझें सांगणें आहे कीं, हे वर्ण पूर्वीं सिंहलींत होते व पुढें तिच्या विशिष्ट विकासाच्या पहिल्या कालखंडांत ते नाहींसे झाले ही गोष्ट सिद्ध करतां येण्यासारखी असल्यानें सिंहली ही आर्यन् भाषा आहे या सिद्धांताला सदर अडचणीनें बाध येत नाहीं."
सिंहलद्वीपस्थांची सामाजिक स्थिति, त्यांचा राजकीय व वाङ्मयात्मक इतिहास आणि त्यांच्या सिंहली भाषेचें स्वरूप व मूळ यासंबंधानें आपल्याला आतां बरीच माहिती झाली आहे आणि त्यांचा व आपला हिंदूंचा व भारतीयांचा जुना व नवा संबंध कशा प्रकारचा आहे याचाहि शक्य तेवढा खुलासा झाला आहे तेव्हां आतां या विषयाची येथें रजा घेण्यास हरकत नाहीं.