प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ

नीगंठ नातपुत्त व महावीर एकच - वरील सहा आचार्यांपैकीं 'नीगंठ नातपुत्त' हा व जैनपंथाचा मानलेला संस्थापक 'महावीर' या दोन्ही एकच व्यक्ति आहेत, असें म्हणतात.

जैन संप्रदायाचा एक विशेष हा आहे कीं, जैनसंप्रदायी लोकांची सजीव जगताची कल्पना फार विस्तृत व व्यापक असते. लता व वृक्ष सजीव आहेत इतकेंच नव्हे तर मृत्तिकाकण, जल, अग्नि व वायु हे देखील सजीव आहेत. हेंच मत नीगंठ नातपुत्ताचें होतें.

गौतमबुद्धाच्या अक्रियावादाच्या विरुद्ध असणारा जो क्रियावाद, त्याचा नीगंठ नातपुत्त यानें पुरस्कार केला होता (महावग्ग सुत्त ६.३१, १). हा क्रियावाद म्हणजे आत्म्याच्या कार्यशक्तीवर असणारी श्रद्धा होय. हें जैनसंप्रदायाच्या आद्यतत्त्वांपैकीं एक तत्त्व आहे व आचारांगाच्या पहिल्या अध्यायांत तें तत्त्व सांगितलें आहे. नातपुत्त असेंहि प्रतिपादन करीत असे कीं, पाप करण्यासाठीं तीन दंड अथवा कर्ते आहेत. (१) कायेचीं कृत्यें, (२) वाचेचीं कृत्यें व (३) मनाचीं कृत्यें हीं पापाचीं तीन पृथक् कारणें होत; व तीं परस्परनिरपेक्षतया व्यापार करीत असतात (स्थानाङ्ग, तिसरें उद्देसक). अपराध व सद्वृत्त, सुख व दुःख हीं दैवनियंत्रित व केवळ दैवघटित आहेत व म्हणून पंथाच्या नियमांप्रमाणें वागून कांहीं फल नाहीं; कारण दैव टाळतां येत नाहीं. त्याचा विशेष ह्या मुद्दयांतच होता.