प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.
बौद्ध व जैन संप्रदायांचापरस्पर संबंध.- आतां बौद्ध संप्रदाय व जैन संप्रदाय यांचा परस्पर संबंध काय होता तें पाहूं.
बौद्ध संप्रदाय हा जैन संप्रदायापासून निघालेला नाहीं. कारण, निर्ग्रंथांची मुख्य तत्त्वें व विधी बुद्धानें नाकबूल केले आहेत. इतकेंच नव्हे, तर बौद्ध संप्रदाय हा जैन संप्रदायाच्या विरुद्ध टिका करणारा संप्रदाय आहे.
महावीराचा शिष्य गौतम इंद्रभूति व गौतम सांख्य मुनि हे एक नाहींत. त्याचप्रमाणें गौतम बुद्धाच्या पूर्वी २४ बुद्ध होऊन गेले ह्या गोष्टीलाहि कांहीं आधार नाहीं.
महावीर हा जैन संप्रदायाचा आद्य संस्थापक नव्हता. सर्व पंडितांच्या मतें पार्श्व हाच जैन संप्रदायाचा खरा संस्थापक आहे. त्याचे अनुयायी व त्याचीं मतें यांचा स्पष्ट उल्लेख जैन सूत्रांत केला आहे. चातुर्याम पंथाचें तेंच मत बौद्धांनींहि निर्देशिलें आहे, मात्र त्यांनीं तें नातपुत्ताचें आहे असें म्हटलें आहे. परंतु पार्श्व हाच जैन संप्रदायाचा संस्थापक होता असें म्हणण्यास कांहीं आधार नाहीं. जैन दंतकथेप्रमाणें ॠषभ हा पहिला तीर्थंकर होता. पुराणांतरीं (विष्णुपुराण, स. २ अ. १ व भागवत पुराण पहा) एक ॠषभ वर्णिला आहे. त्या वर्णनावरून हे दोन्ही ॠषभ एकच असावेत असें वाटतें (विल्सन, विष्णुपुराण, पृ. १०४, टीप १ पहा). परंतु ऐतिहासिक दृष्ट्या ह्याचें फारसें महत्त्व मानतां येत नाहीं.
जैन संप्रदायाच्या वाढीचा विचार करतां, मागें पार्श्वापर्यंत आपणांला कांहीं समाधानकारक माहिती मिळते. त्यापूर्वीची हकीकत दंतकथा व अद्भूत गोष्टी यांनीं भरलेली आहे.
महावीराचा काल- उपर्युक्त तीर्थंकरांपैकीं महावीर ज्याचा संस्थापक समजला जातो त्या जैन संप्रदायाची हकीकत देण्यापूर्वीं महावीराच्या काळासंबंधीं दोन शब्द लिहिणें जरूर आहे. महावीराविषयीं आर्यविद्यासुधाकरग्रंथांत असें वाक्य लिहिलेलें आढळतें:-
ततःकालेनात्र खंडे भारते विक्रमात्पुरा ॥
खमुन्यं भोधिविमिते वर्षे बीराव्हयो नरः ॥
प्राचारयज्जैनधर्म बौद्धधर्मसमप्रभम् ॥
त्याच्या निर्वाणाचा काल ख्रिस्ती शकापूर्वीं ५२७ हा येतो असें रा. का. बा. पाठक यांनीं 'श्रावकाचार' या ग्रंथांतील एका उता-यावरून शाबीत केलें आहे. नेमिचंद्र आपला 'त्रिलोकसार' या ग्रंथांतहि असेंच म्हणतो. पण त्याचा टीकाकार माधवचंद्र यानें चुकीची टीका केल्यामुळें सदर निर्वाणकालाबद्दल घोटाळा उत्पन्न झाला होता (इं. अँ., पु. १२ पृ. २१).