प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.
नातपुत्त नवीन पंथाचा संस्थापक होता काय - नातपुत्ताची संप्रदायपद्धति कशी काय होती हें आतां आपण पाहूं (सामञ्ञफलसुत्त पहा). सामञ्ञफलसुत्त यांत चातुर्याम ह्या जैन संज्ञेचा उल्लेख केला आहे. ही संज्ञा महावीराचा पूर्वाधिकारी पार्श्व याच्या मताला लावीत असत. महावीरानें पूर्वींच्या मतांतच सुधारणा केली, व त्या सुधारलेल्या मताला पंचयाम मत (भगवती-वेबर फ्रॅगमेंट डर भगवती पृ. १८५ व शीलांकाची आचारांगावरील टीका पहा) असें नांव पडलें. हें पांच याम म्हणजे महाव्रतें १ अहिंसा, २ सूनृत, ३ अस्तेय, ४ ब्रह्मचर्य व ५ अपरिग्रह (सर्व मायामय वस्तूंचा त्याग करणें) ही होतीं. पूर्वींच्या मतांत ब्रह्मचर्याचा अपरिग्रहांत अन्तर्भाव झाला होता.
ह्यावरून दिसून येतें कीं, निर्ग्रंथ महावीराच्या पूर्वीं अस्तित्वांत होते. नातपुत्तानें फक्त चातुर्याममतांत बदल केला. परंतु बौद्धांनीं असें मानिलें कीं, त्यानेंच हा पंथ स्थापन केला. सारांश महावीरानें पूर्वीं प्रचलित असलेल्याच मतांत सुधारणा केली, नवीन मताची स्थापना केली नाहीं. या सिद्धान्तास प्रमाण म्हणून खालील कारणें दिलीं जातात:-
(१) बुद्ध व महावीर यांचे वर्तनक्रम फार भिन्न होते. बुद्धाला प्रचलित समजत व विधी काढून टाकून नंतर श्रद्धा व आचार यांनां त्याच्या मताप्रमाणें योग्य वळण लावावयाचें होतें. त्याला आपला मार्ग कष्टानें काढावा लागला. महावीर हा एक संन्याशी होता. त्यानें वरील खटपट कधींच केली नाहीं. त्यानें फक्त आपलें ज्ञान पूर्ण (केवल) होईपर्यंत वाढविलें. त्याचीं सूत्रांतलीं मतें म्हणजे त्याचे शोध नाहींत, तर पूर्वीच प्रस्थापित झालेली सत्यें (पन्नत) आहेत.
(२) चतुर्दश पर्वांचा संग्रह देखील हीच गोष्ट सिद्ध करतो. हीं पुस्तकें तीर्थंकर ॠषभ अथवा आदिनाथ ह्याच्या वेळीं होतीं. म्हणून महावीराच्या सुधारणांपूर्वीचीं मूळ निर्ग्रंथांचीं पवित्र पुस्तकें हीं आहेत असें मानिलें पाहिजे. परंतु यावर एक मोठा आक्षेप असा निघतो कीं, हीं पुस्तकें जैन वाङ्मयांतून घेतलीं आहेत. जैन वाङ्मयाचें लेखन पांचव्या शतकांत झालें. जैनांनीं आपला पंथ सृष्टीच्या आरंभापासून अव्याहत चालू राहिला आहे ह्या कल्पनेवर त्यांचा सर्व पवित्र पुस्तकांची जुळणी केली आहे. विरुद्ध मतास त्यांनीं त्यांत अगदीं थारा दिलेला नाहीं.
याला उत्तर असें देतां येईल कीं, जैन सूत्रांत कांहीं बदल झालेला नाहीं. त्याचप्रमाणें आचारांगाचाहि मूल ग्रंथ पूर्वीप्रमाणेंच आहे.
(३) जर बौद्ध व जैन हे दोन्ही पंथ, त्यांच्या पंथांचे आद्य संस्थापक बुद्ध व महावीर हे समकालीन असल्यामुळें सारखेच प्राचीन आहेत, तर त्या पंथांचा निर्देश विरुद्धमतवाद्यांच्या ग्रंथांत केलेला आपणांला सांपडला पाहिजे. परंतु वस्तुस्थिति अशी नाहीं. निर्ग्रंथांचा उल्लेख बौद्धांच्या पिटकांच्या जुन्यांत जुन्या भागांत देखील आलेला आहे; परंतु जैन सूत्रांत बौद्धांचा उल्लेख नाहीं. यापुढें बौद्ध संप्रदायाला जास्त महत्त्व आलें. शिवाय, हे दोन्ही पंथ समकालीन आहेत असें याकोवी साहेबांनीं गृहीत धरलें आहे. ह्यावरून बुद्धाच्या वेळीं निर्ग्रंथांचा नवीन पंथ नव्हता असें अनुमान काढतात.
या सर्व गोष्टींवरून असें सिद्ध होते कीं, जैन कल्पना व विधी हीं महावीराच्या काळीं प्रचलित होतीं, व तीं टिकून राहण्यासाठीं महावीराची जरूरहि नव्हती. त्याचप्रमाणें निर्ग्रन्थ लोकहि महावीरापूर्वी बराच काळ अस्तित्वांत होते. महाविरानें अगोदर अस्तित्वांत असलेल्या अशा एका पंथाची फक्त सुधारणा मात्र केली.