प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ७ वें.
बुद्धजन्मकालीन वैचारिक चळवळ.

जैनांचे तीर्थकर - आतां बौद्ध व जैन यांतील अगोदरचा जो जैन संप्रदाय त्याकडे वळूं; जैनांचे प्राचीन ग्रंथ आज उपलब्ध नाहींत. त्यामुळें अधिक अर्वाचीन ग्रंथांवर भिस्त टाकणें प्राप्त होतें. जैनांनीं आपले धर्मप्रवर्तक चोवीस तीर्थंकर म्हणून मानले आहेत. त्या चोवीस तीर्थकरांच्या अस्तित्वावर आज कोणी संशोधक विश्वास ठेवीत नाहीं. तथापि महावीराच्या अस्तित्वाविषयीं प्रमाणें बरींच असल्यामुळें त्याच्याबद्दल कोणी शंका घेत नाहीं. ॠषभ हाहि ऐतिहासिक पुरुष असावा असा त्याजविषयीं भागवतांत म्हणजे जैनेतर ग्रंथांत उल्लेख असल्यामुळें कल्पना होते.

सद्धर्मालंकारावरून महावीर व त्यापूर्वींच्या सहा तीर्थंकरांची हकीकत येणेंप्रमाणें निघते (इं. अँ. पु. ८):-

पू र्ण का श्य प बु द्ध- हा एका सरदाराच्या घरीं परमुलुखांतून आलेल्या बाईच्या उदरीं जन्मला. तरी पण हा आपणांस ब्राह्मण म्हणवीत असे. त्याच्या जन्मानें त्याच्या मालकाच्या घरांतील गुलामांची संख्या पूर्ण शंभर झाली, म्हणून त्याचा 'पूर्ण' हें नांव मिळालें. मालकाचें घर सोडून तो चालला असतां चोरांनीं त्याला सर्वस्वीं नागविलें. तेव्हां नग्नावस्थेंतच तो शेजारच्या गांवीं जाऊन तेथील लोकांस त्यानें नाना त-हेच्या युक्त्यांनीं फसविलें. आपलें नांव 'पूर्ण काश्यप बुद्ध' आहे असें त्यानें जाहीर केलें. त्याला कपडे देऊं केले असतां तो दिगंबरच राहिला. तो म्हणे कीं, ज्यानें पाप केलें असेल त्यास लाज उत्पन्न होते व लाज झांकण्याकरितां मग कपडे पाहिजेत; पण मला पापच नाहीं - मी निष्पाप (अर्हत) आहे. याच्या अनुयायांची संख्या लवकरच ८०,००० वर गेली. हा राजा अगर प्रजा, बाप अगर लेक इत्यादि धर्मबंधनें मानीत नसे. त्याच्या मतें शून्यता हीच जगांतील मुख्य वस्तु आहे.

२ म ख ली गो शा ल- हा एका सरदाराच्या घरचा गुलाम होता. याच्या आईचे नांव मखली होतें, व हा गोशाळेंत जन्मला म्हणून याचें नांव मखली गोशाल असें झालें. एके दिवशीं हा तेलाचें भांडें घेऊन जात असतां त्याचा पाय घसरला व भांडें खालीं पडलें. तो मालकास भिऊन पळूं लागला असतां मालकानें त्याचीं वस्त्रें पकडलीं. तेव्हां तो वस्त्रें टाकून देऊन नग्न स्थितींतच पळत सुटला, व एका शहरांत शिरून दिगंबर जैन अथवा बुद्ध म्हणून प्रसिद्धीस आला. त्यानें काढलेल्या पंथास मखली गोशाल हें नांव प्राप्त झालें. मनुष्यास सुखदुःख पूर्वकर्मानुसार प्राप्त होत नसून तें यदृच्छेनें प्राप्त होतें असें हा म्हणत असे.

३  नी गं ठ ना त पु त्त- हा नाथ (नात) नांवाच्या शेतक-याचा पुत्र (पुत्त) होता व यानें गांठीं तोडल्या म्हणून याचें नांव नीगंठ (निर्ग्रंथ) नातपुत्त असें पडलें. थंड पाणी पिणें पाप आहे असें याचें मत होतें. पाण्याचे बारीक कण हे लहान आत्मे व मोठे कण हे मोठे आत्मे होत असें हा म्हणे. नशिबाप्रमाणें पापपुण्य किंवा सुखदुःख प्राप्त होतें व आपणांस तीं टाळतां येणार नाहींत असें याचें मत होतें.

४  अ जि त के श कं ब ल-  हा एका सरदाराचा नोकर होता. पुष्कळ कर्ज झाल्यामुळें सावकारास चुकविण्याकरितां हा दुस-या गांवीं पळून गेला. तेथें निर्वाहाचें दुसरें कांहीं साधन नसल्यामुळें यानें डोकें मुंडून व केशकंबल पांघरून तपाचरणास सुरुवात केली, म्हणून यास लोक अजित केशकंबल म्हणूं लागले. जलचर, भूचर व खेचर अशा सर्व प्राण्यांस व त्याचप्रमाणें वृक्षलतादिकांसहि जीव म्हणजे आत्मा आहे असें याचें मत आहे. या त्याच्या मतामुळें त्यास सहस्त्रावधि अनुयायी मिळाले. नशिबाचा म्हणजे पूर्वसंचिताचा नाश या जन्मांत नाना त-हेच्या शरीरविटंबनेनें - उदाहरणार्थ, केशलुंचन, धूम्रपान, पंचाग्निसाधन इत्यादिकांनीं - होऊन पुढील जन्मांत निरवधि सुख प्राप्त होईल असें हा प्रतिपादन करी.

५  सं ज य बे लं टे- याचें डोकें चमत्कारिक असून याने मुक्तता मिळवून निरनिराळ्या शास्त्रांचा अभ्यास केला व आपण बुद्ध आहों असा पुकारा केला. त्याचें मत असें होतें कीं, या जन्मांत प्राण्यास जी योनि प्राप्त झाली असेल तीच त्यास पुढील जन्मांस प्राप्त होईल. 'बोधि' शोधून काढण्याचें कांहीं कारण नाहीं, ऐशी हजार कल्पें संपतांच तें आपोआप प्राप्त होईल असें हा म्हणत असे.

६  क कु ध का त्या य न- याची उत्पत्ति जारकर्मापासून झाली. याची आई गरीब व हीन जातींतील असल्यामुळें तिला राहण्यास घर नव्हतें. व म्हणून याचा जन्म एका ककुध झाडाखालीं झाला. तेथून एका ब्राह्मणानें त्यास उचलून घेऊन त्याचें नांव कात्यायन असें ठेविलें. ककुध नांवाच्या झाडाखालीं हा सांपडला म्हणून ककुध कात्यायन असें याचें नांव पडलें. बाप मृत झाल्यावर याला फार वाईट स्थिति प्राप्त होऊन हा तपस्वी झाला, व एका मातीच्या उंचवट्यावर बसून यानें उपदेश करण्यास प्रारंभ केला. थंड पाण्यांत आत्मा असतो असें नीगंठ नातपुत्त याच्याप्रमाणें हाहि म्हणत असे. चिनी दंतकथांवरून असें समजते कीं, धर्मशास्त्रांपैकीं कांहीं नियम आपल्या बुद्धीस आकलन होत नाहींत व कांहीं होतात असें हा म्हणत असे.