प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

वाङ्‌मयदृष्ट्या महत्त्वाचे भाग.- या ग्रंथांतील ब-याचशा प्रास्ताविक गोष्टी जरी केवळ कल्पित असून ऐतिहासिक अथवा पौराणिक महत्त्वाच्या नसल्या, तरी त्यांमध्यें कांहीं भाग वाङ्‌मयदृष्ट्या फार सुंदर व महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारची एक साधीच परंतु हृदयद्रावक गोष्ट आहे ती अशीः त्या कालीं एका भिक्षूला अतिसाराचा विकार होऊन तो आपल्या विष्टेंत लोळत पडला होता. इतक्यांत बुद्ध आपला शिष्य आनंद यासह भिक्षूंच्या निवासावरून जात असतां वरील भिक्षु जेथें होता त्या खोलीजवळ आला, व तो भिक्षु आपल्या विष्टेंत लोळत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. बुद्ध त्याच्या बिछान्याजवळ येऊन त्या भिक्षूस विचारूं लागला, 'तुला काय होत आहे ?' 'महाराज मला अतिसार झाला आहे,' असें त्यास उत्तर मिळालें. बुद्धानें विचारलें, 'तुझी शुश्रूषा कोणी भिक्षु करीत आहे काय ?' भिक्षु उत्तरला, 'नाहीं महाराज.' यावर बुद्धानें पुन्हां प्रश्न केला : 'हे भिक्षू लोक तुझ्याकडे कां बरें पहात नाहींत ?' भिक्षू म्हणाला : 'महाराज, माझा त्यांनां उपयोग होत नाहीं म्हणून ते माझी काळजी घेत नाहींत.' तेव्हां बुद्ध आनंदाकडे वळून म्हणाला, 'आनंद, थोडें पाणी आण, आपण या भिक्षूस स्नान घालूं.' होय महाराज असें म्हणून आनंदानें पाणी आणलें, व बुद्धानें त्या भिक्षूवर पाणी ओतून आनंदानें त्याचें अंग धुतलें. नंतर बुद्धानें डोक्याकडून व आनंदानें पायांकडून याप्रमाणें दोघांनीं त्या भिक्षूस उचलून बिछान्यावर ठेविलें. ही गोष्ट घडल्यामुळें त्या प्रसंगीं बुद्धानें सर्व संघाची सभा भरवून तेथील भिक्षूंस पुढीलप्रमाणें प्रश्न विचारले:-

'भिक्षूंनो ! या खोलींत एखादा भिक्षु आजारी आहे काय ?' 'होय महाराज !' 'त्याला काय होत आहे ?' 'त्याला अतिसार झाला आहे महाराज.' 'त्याची कोणी शुश्रूषा करीत आहे काय ?' 'नाहीं महाराज !' 'भिक्षू लोक त्याची कां बरें शुश्रूषा करीत नाहींत ?' 'महाराज, या भिक्षूचा त्यांनां कांहीं उपयोग होत नाहीं म्हणून ते त्याची शुश्रूषा करीत नाहींत.' 'हे भिक्षूंनो, तुमची शुश्रूषा करणारे आई अगर बाप येथें कोणीहि नाहींत; तेव्हां तुम्हीं जर एकमेकांची काळजी घेतली नाहीं तर तुमच्याकडे कोण बरे पाहील ? यासाठीं ज्यानें माझी काळजी घेतली असती त्यानेंच त्या भिक्षूचीहि काळजी घ्यावी.'