प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
या सुत्तांतील कांहीं भागांच्या उत्तरकालीनत्वाचा पुरावा. - तथापि सध्यांच्या स्वरूपांत असलेलें महापरिनिब्बान सुत्त हें ब-याच अलीकडच्या काळचें असलें पाहिजे. कारण, एका ठिकाणीं विनयपिटकांतील सुत्तांचा व इतर कांहीं सुत्तांचा आधार घेतल्याबद्दल उल्लेख आहे, आणि या सुत्ताच्या अखेरच्या प्रकरणांत बुद्धाचे अवशेष व त्यावर बांधलेले स्तूप यांचाहि उल्लेख आढळतो. म्हणजे जो बुद्ध आनंदाशीं संभाषण करीत असतांना एखाद्या साध्या माणसाप्रमाणें व गुरूप्रमाणें बोलतांना आढळतो, तोच येथें बौद्ध संप्रदायाचें पूज्य दैवत झालेला दिसतो. परंतु बुद्धाची प्रतिमा अशोकाच्या कालीं प्रथम पूजेंत आली असें निश्चित ठरलें आहे.
पहापदान सुत्त.- त्याप्रमाणेंच महापदान सुत्तांत (नं. १४) बुद्धानें केलेले चमत्कार वर्णिले असून तेंहि बरेंच अलीकडील असावें. यामध्यें गौतमबुद्धाच्या पूर्वीं होऊन गेलेल्या सहा बुद्धांच्या अस्तित्वाबद्दलची कल्पना गृहीत धरलेली दिसते. त्याचप्रमाणें बुद्धाबद्दलची दंतकथा व त्यानें केलेले चमत्कार विशेषतः त्याची गर्भावस्था व जन्म या वेळचे चमत्कार-यांचें वर्णन त्यांत केलेलें आहे.
पौराणिक सुत्तें: सक्कपन्हसूत्त.- कांहीं सुत्तें (१७-२१) पौराणिक आहेत. यांमध्यें देवलोकाचें वर्णन असून देवांच्या वैभवाचें कारण ते पूर्व जन्मीं बौद्ध संप्रदायाचे भाविक अनुयायी होते असें सांगितलें आहे. यांतील सर्वांत चमत्कारिक सुत्त म्हणजे सक्कपन्हसुत्त (शक्रप्रश्नसुत्र नं. २१) हें होय. यांत सक्काचे प्रश्न आहेत. सक्क म्हणजे देवांचा राजा वज्रायुध इंद्र होय. इंद्रास बुद्धाकडे येण्याचें धैर्य होईना; म्हणून त्यानें त्याला प्रसन्न करण्याकरितां प्रथम एका गंधर्वास पाठविलें. या गंधर्वानें एक गीत गाऊन (हें प्रेमगीत होतें ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे) बुद्धास प्रसन्न केलें. नंतर इंद्र आला तेव्हां बुद्धानें मोठ्या मेहेरबानीनें त्याचें स्वागत करून त्याला बौद्ध संप्रदायाप्रमाणें वागूनच कोणतेंहि उच्च ध्येय कसें संपादन करितां येतें हे समजावून सांगितलें. पुढें इंद्राच्या सर्व प्रश्नांस बुद्धानें उत्तरें दिल्यानंतर इंद्र हर्षभरित होऊन त्यानें बुद्धाच्या स्तुतिपर एक गीत म्हटलें. वरील गोष्ट आपणांला जरी विचित्र वाटत असली तरी जुन्या बौद्ध लोकांस ती भूषणीय वाटत असली पाहिजे.
पायासि सुत्त.- दीघ निकायांतील उत्कृष्ट संवादांपैकीं पायासि सुत्त (नं. २३) हा संवाद आत्मा व परलोक यांचें अस्तित्व मान्य न करणारा राजा पायासि व कुमार कस्सप यांच्यामध्यें झालेला आहे. सुत्तपिटकांतील इतर संवादांमध्यें बुद्ध हा स्वतः बोलणारा असून दुस-याचें काम केवळ होकार देण्याचेंच असे असें दिसतें. परंतु पायासि सुत्त हा एक वास्तविक सुरस असा संवाद असून त्यावरून प्लेटोच्या संवादाची आठवण होते.
तथापि हें सुत्तहि मूळचें नाहीं. हा एक केवळ इतिहाससंवाद असून त्यामध्यें भर घातल्यामुळें त्याचें मूळचें स्वरूप उलट बिघडलें आहे. बहुधा तो दुस-या कोणत्या तरी संप्रदायांतून-विशेषतः जैन संप्रदायांतून-घेतलेला संवाद असवा असें विंटरनिट्झ म्हणतो.