प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
महापरिनिब्बानांतील बुद्धचरित्रविषयक गोष्टी.- बुद्धाच्या आयुष्यांतील शेवटच्या भागांतील गोष्टी व त्याची भाषणें यांचा त्याच्या शिष्यांच्या मनावर विशेष परिणाम झाला असावा, व यामुळें त्या गोष्टी व तीं भाषणें जास्त काळजीपूर्वक व आदरपूर्वक स्मरणांत ठेविलीं जाऊन परंपरेनें चालत येणें हें साहजिकच दिसतें. त्यामुळेंच या सुत्ताच्या सर्वांत जुन्या असलेल्या भागांत बुद्धाच्या चरित्रविषयक गोष्टी आपणांस प्रथमतः आढळून येतात, असें विंटरनिट्झ याचें ठाम मत आहे. परंतु महापरिनिब्बान सुत्तामध्यें मूळचा व सर्वांत जुना असा भाग फारच थोडा आहे. कारण या सुत्ताचे निरनिराळे भाग निरनिराळ्या वेळीं रचले गेले असून त्यांमध्यें एकतानता दिसत नाहीं. फार प्राचीन काळीं-म्हणजे बुद्ध निवार्णानंतर लागलीच-बुद्धनिर्वाणाची साग्र हकीकत देणारें एखादें लहानसें सुत्त अस्तित्वांत आलें असलें पाहिजे, व त्यांतच पुढें आणखी भर पडून त्याचें हल्लीचें महापरिनिब्बानसुत्त हें मोठें सुत्त झालें असावें.