प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
रुक्ष प्रवचनें वगैरे.- अशा प्रकारच्या सुंदर कथांशेजारींच रुक्ष प्रवचनें आढळतात. हीं प्रवचनें संवादरूपी असून त्यांमध्यें एखाद्या आद्यतत्त्वाचें प्रतिपादन केलेलें असतें; अथवा कांहीं तात्त्विक परिभाषेचा अर्थ समजावून दिलेला असतो. नं. ४३ व ४४ यांपैकीं कांहीं व नं १२७, १३७, १४०, १४८ व १५१ हीं सुत्तें अंगुत्तर निकाय यांमधील याद्यांप्रमाणें व अभिधम्म पिटकांतील व्याख्यानांप्रमाणें किंवा वर्गीकरणाप्रमाणें आहेत.
वरील गद्यपद्यमिश्रित सुरस आख्यानांहून अगदींच निराळ्या त-हेचें असें सुत्त नं. ११६ हें आहे. यामध्यें प्रथम गद्याप्रमाणें व लागलीच पुढें पद्यामध्यें ज्या भिक्षूंनां साक्षात्कार झाला असून त्यांनीं तो जगांत प्रसिद्ध केला नाहीं अशांच्या नांवांची यादी दिलेली आहे. हें गद्यपद्यमिश्रण बरेंच अलीकडचें असून तें आपणांस पुढें बौद्ध संस्कृत वाङ्मयामध्यें आढळून येणार आहे.