प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
विमानवत्थु व पेतवत्थु.- पाली धर्मशास्त्रामध्यें संगृहीत केलेल्या अगदीं अलीकडच्या वाङ्मयाचा भाग म्हटला म्हणजे विमानवत्थु-देवप्रासादांच्या कथा -व पेतवत्थु - भूतांच्या कथा - हे दोन ग्रंथ होत. हे अतिशय नीरस परंतु सुदैवानें लहान आहेत. कर्माचें जें गहन व परम महत्तत्व-ज्याचें ब्राह्मणी व बौद्ध ग्रंथांमध्यें अनेक सुंदर वचनांमध्यें प्रतिपादन केलेलें आढळतें, त्याचेंच या ग्रंथामध्यें उदाहरणें देऊन लहान लहान गोष्टींमध्यें परंतु अतिशय बोजड पद्धतीनें विवेचन केलेलें आहे.
या गोष्टींमध्यें त्या पद्यरूपांत आहेत एवढाच कायतो काव्य या दृष्टीनें गुण आढळतो. या सर्व गोष्टी एकाच नमुन्याच्या आहेत. विमानवत्थु ह्या ग्रंथामध्यें मोग्गलान यानें एखाद्या देवतेला, अमुक देवप्रासादर (विमान) येथील ऐश्वर्यासह तिला कसा मिळाला असा प्रश्न केला असून, पूर्व जन्मीं तिनें केलेल्या सत्कृत्यांबद्दल हकीकत सांगून त्यांबद्दल तिला हें स्वर्गीय सुख मिळालें अशा त-हेचें तिचें उत्तर दिलें आहे. पेतवत्थूमध्यें नारद हा एखाद्या प्रेतास (पिशाचास) कोणत्या कृत्यामुळें त्याला अशी दुःखदायक स्थिति प्राप्त झाली असा प्रश्न करतो, आणि तें थोडक्यांत आपली पूर्व जन्मीची कथा सांगतें. याचें एक उदाहरण पुरेंसें होईल. पेतवत्थु १, २ येथें नारद एका पिशाचास प्रश्न करतोः ''तुझें शरीर सोन्याचें असून त्याचा प्रकाश सर्व जगांत पडतो; परंतु तुझें तोंड डुकराचें आहे तर तूं कोणतें कृत्य केलें होतेंस ?'' पिशाच उत्तर करतें : ''मी सर्व कृत्यें नियमानें करीत असे, परंतु माझ्या वाचेला नियम नसे. त्यामुळें मला अशी कुरूपता प्राप्त झाली आहे. म्हणून नारदा, मी तुला सांगतों कीं, ज्या अर्थी तूं हें पाहिलें आहेस त्या अर्थी वाचेनें कोणतेंहि दुष्कृत्य करूं नकोस. नाहींतर तुला असें डुकराचें तोंड प्राप्त होईल.''
पेतवत्थूमध्यें (४, ३) ज्या अर्थी पिंगलक या राजाचा उल्लेख आला आहे, आणि धम्मपालाच्या टीकेवरून हा राजा बुद्धनिर्वाणानंतर दोनशें वर्षांनीं सुरत येथें राज्य करीत होता असें दिसतें, त्या अर्थी नंतरच्या काळचे टीकाकारहि हे ग्रंथ बुद्धनिर्वाणाच्या ब-याच अलीकडील काळचे आहेत असें समजत होते, ही गोष्ट सिद्ध होते. जरी अर्हत व निर्वाणपदप्राप्ति या प्राचीन बौद्धांच्या ध्येयाबरोबरच स्वर्ग व नरक यांविषयींच्या कल्पना प्रचलित होत्या असें मानिलें तरीहि हीं काव्यें फार प्राचीन आहेत असें म्हणतां येणार नाहीं.