प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

सुत्तनिपात.- आतांपर्यंत उल्लेख केलेल्या खुद्दकनिकायाच्या सर्व भागांमध्यें जरी आपणांला प्राचीन बौद्ध काव्यांपैकीं पुष्कळ भाग कायम राखलेला आढळून येतो, तरी हीच गोष्ट आपणांला सुत्तनिपाताबद्दल जास्त खात्रीपूर्वक म्हणतां येईल. कारण, हा सर्व संग्रह जरी अगदीं प्राचीन काळचा आहे असें सि करतां येणार नाहीं, तरी त्याच्या निरनिराळ्या भागांतील केन्द्र (सार) भूत असा कांहीं भाग सर्वांत प्राचीन बौद्ध काव्यांपैकींच आहे. सुत्तनिपात हा पद्यमय सूत्रांचा संग्रह आहे. त्यांत पांच प्रकरणें आहेत. त्यांतील पहिल्या चार प्रकरणांमध्यें (उरगवग्ग, चुल्लवग्ग, महावग्ग व अठ्ठकवग्ग) ५४ लहान पद्यमय सूत्रें असून पांचव्या (पारायण या) भागामध्यें एक स्वतंत्र मोठें काव्य आहे. त्याचे १६ लहान लहान भाग आहेत. या पांच प्रकरणांपैकीं अठ्ठकवग्ग आणि पारायण यांच्या नांवांचा उल्लेख व त्यांतील कांहीं अवतरणें इतर पाली व संस्कृत सांप्रदायिक ग्रंथांमध्यें आलीं आहेत. या दोन प्रकरणांनां एक प्राचीन टीका असून तिचा निद्देस या नांवानें पाली धर्मशास्त्रामध्यें समावेश करण्यांत आला आहे.

यां ती ल प्रा ची न सु त्तें.- यांतील पांचहि प्रकरणांतील स्फुट सूत्रें व पुष्कळ श्लोक इतर सांप्रदायिक ग्रंथांमध्यें आढळतात. अशोक राजानें आपल्या भब्रू येथील शासनामध्यें ज्या सूत्रांचा मुद्दाम विशेष अभ्यास करावा म्हणून निर्देश केला आहे त्यांपैकीं तीन सूत्रें बहुत करून सुत्तनिपातांतील आहेत. या सूत्रांची भाषा व त्यांतील मूलभूत तत्त्वें यांवरूनहि यांपैकीं कांहीं सूत्रें संप्रदायाच्या प्रारंभापासून अस्तित्वांत असून निदान ती बुद्धनिर्वाणाच्या नंतर लवकरच त्याच्या आरंभींच्याच शिष्यवर्गापैकीं कोणीं तरी रचलीं असावीं असें दिसतें. यांच्या प्राचीनत्वाप्रमाणेंच बौद्ध संप्रदायाचीं मूलतत्त्वें काय होतीं हें समजून घेण्याच्या दृष्टीनेंहि यांचें महत्त्व सर्वमान्य आहे. सर्व बौद्धसंप्रदायिक ग्रंथांमध्यें धम्मपदाच्या खालोखाल सुत्तनिपातांतील आधार घेतलेले आढळतात. ह्या संग्रहांतील सूत्रांचें काव्यदृष्ट्याहि महत्त्व सर्वमान्य आहे.

ब्रा ह्म णा व र टी का.- यामध्यें आपणांला कांहीं लहान व कांही मोठे पद्यांचे गुच्छ, ज्यांमध्यें एकच कल्पना आहे अथवा ज्यांचे पालुपद एकच आहे असे एकत्र केलेले आढळतात. त्याप्रमाणेंच आपणांला प्राचीन ब्राह्मणी महाकाव्यामध्यें आढळणारे काव्याचे सर्वप्रकार- प्राचीन काळापासून लोकांच्या आवडीचे असलेले संवाद, मधूनमधून संवाद व मधूनमधून कथानक असणारीं आख्यानें अथवा पोवाडे, आणि गद्यपद्यमिश्रित आख्यानें - आढळतात. कांहीं ठिकाणीं ब्राह्मणी कल्पनांशीं संबंध अथवा त्यांचा उल्लेख केलेला आढळतो. ब्राह्मणधम्मिक सुत्त (नं. १९-धार्मिक ब्राह्मणाविषयीं सूत्र) हें एखाद्या जुन्या पुराणांतहि तितकेंच शोभलें असतें. 'प्राचीन काळचे ॠषी हे खरे ब्राह्मण असून ते प्रत्येक बाबतींत संयमानें रहात असत; परंतु पुढें त्यांनीं राजांच्या संपत्तीचा व ऐषाअरामाचा मोह सुटून तसें सुख भोगण्याची इच्छा होऊं लागली. त्यांनां इक्ष्वाकु राजानें द्रव्य व सुंदर स्त्रिया दान केल्या. नंतर पशुयज्ञ सुरू होऊन त्यामध्यें दीन गाईंचाहि वध होऊं लागला व त्यामुळें नीतिभ्रष्टता व वर्णसंकर यांचा प्रसार झाला.' अशा प्रकारचें त्यामध्यें वर्णन आहे. यावरून बौद्ध संप्रदाय म्हणजे मूळच्या ॠषि-धर्माची पुनःस्थापना होय असें बौद्धांचें या ठिकाणीं म्हणणें असावेंसें दिसतें. याप्रमाणेंच सेल या ब्राह्मणाच्या धर्मप्रवेशाचा वृत्तांत असलेल्या सेल सुत्तामध्यें (नं. ३३) कांहीं भाग अगदीं भगवद्गीतेंतील व अनुगीतेंतील श्लोकांप्रमाणेंच आढळतात. तसेंच जो बौद्ध भिक्षु आपलें व्रत नियमानें पाळतो त्याला सन्मुनि म्हटलेलें आढळतें. खरें ब्राह्मण्य जन्मामध्यें नसून सदाचरणामध्यें आहे ही महाभारताच्या मूळ भागांत आढळणारी कल्पना वासेत्थ सुत्तामध्यें (वसिष्ठसूत्र नं. ३५) ''त्यालाच मी खरा ब्राह्मण समजतो'' असें पालुपद असलेल्या ६३ श्लोकांमध्यें सुंदर रीतीनें विशद केलेली आढळते. ब्राह्मणी जीवितध्येयापेक्षां बौद्ध ध्येय उच्च प्रकारचें आहे असें कांहीं ठिकाणीं मोठ्या चातुर्यानें पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून सिद्ध केलें आहे. उदाहरणार्थ, आमगंध सुत्तामध्यें [नं. १४] आहाराचे नियम पाळणें हा सर्वांत श्रेष्ठ धर्म असून निषिद्ध असें मांसाशन करणें हें सर्वांत मोठें पातक होय असें म्हणणा-या ब्राह्मणाला बुद्धानें असें सांगितलें आहे कीं, जिवंत प्राण्याची हिंसा करणें, खून करणें, दुस-याला दुःख देणें, चोरी करणें, खोटें बोलणें, कपट करणें, परस्त्रीगमन करणें या गोष्टींमध्यें पातक आहे; तसेंच क्रूरता किंवा कठोरपणा दाखविणें, निंदा करणें, विश्वासघात करणें, निर्दय, गर्विष्ठ आणि लोभी होणें, दान न करणें यामध्यें पातक आहे - मांसाशनामध्यें नाहीं !!

बौ द्ध सं प्र दा या च्या आ रं भीं ची स्थि ति.- कासिभरद्वाजसुत्त (नं. ४) यासारख्या काव्यामध्यें आपणांला बौद्ध संप्रदायाच्या आरंभींची स्थिति दिसते. त्या वेळीं कामकरी लोक, शेतकरी लोक व धनगर यांनां भिक्षु हा एक आळशी मनुष्य वाटून त्याच्याकडे ते चमत्कारिक दृष्टीनें पहात असत. या सूत्रामध्यें असें वर्णन आहे कीं, भरद्वाज या ब्राह्मण कृषिकानें बुद्धाला तो भिक्षा मागावयास आला असतां, जो काम करीत नाहीं त्याला खावयाचा हक्क नाहीं असें सांगून तिरस्कारानें घालवून दिलें, तेव्हां बुद्धानें आपणहि काम करीत असून कोणतें क्षेत्र नांगरतों तें त्याला नीट समजावून दिलें. याप्रमाणेंच धनियसुत्त (नं. २) या जुन्या कवितेमध्यें, आपल्या वैभवामध्यें व कौटुंबिक स्थितीच्या सुखामध्यें आनंद मानणा-या एका श्रीमंत व अनेक कळपांचा धनी असलेल्या अशा गृहस्थाच्या सुखाची व निर्धन व निराश्रित परंतु सर्व ऐहिक बंधनांपासून मुक्त अशा बुद्धाच्या शांतीची तुलना केली आहे. तो श्रीमान् धनिय व बुद्ध यांच्या मधील संवाद फार सुंदर असून, प्रत्येक जण ''हे देवा तुझ्या इच्छेला येईल तेव्हां वर्षाव कर'' असें पालुपद असलेलें पद्य एकामागून एक म्हणतो. 'या जगापासून दूर असणारा, स्त्री अथवा अपत्य यांविषयीं कांहीं ज्ञान नसणारा व त्या ज्ञानाची इच्छाहि नसणारा असा भिक्षूच कायतो खरा सुखी असतो' हें जुनें गाणें या कवींनीं निरनिराळ्या प्रकारांनीं गायिलेलें आढळतें. जी गोष्ट धनियसुत्तामध्यें संवादरूपांत सांगितली आहे तीच पुन्हां आपणाला खग्गविसानसुत्त (नं. ३, गेंड्यांचें काव्य) यामध्यें ''तो गेंड्याप्रमाणें एकटाच भ्रमण करीत राहील'' असें पालुपद असणा-या ४१ जोरदार पद्यांमध्यें आढळते. विंटरनिट्झच्या मतें यांत दिसून येणारी कळकळ व करुणरस यांचा भिक्षूंच्या जीवितक्रमाहून अगदीं भिन्न रहाणीच्या मनुष्याच्या मनावर देखील परिणाम झाल्यावांचून राहणार नाहीं.

आलवक सुत्त (नं. १०) आणि सूचिलोम सुत्त [नं. १७] यांमध्यें या संवादांतून मधून मधून, वेद व महाकाव्यें यांतून आढळणा-या कांहीं श्लोकांप्रमाणें कूट श्लोक दिलेले आढळतात. महाभारतांतील यक्षप्रश्नांप्रमाणें येथेंहि यक्ष व भिक्षु यांच्यांतील प्रश्नोत्तरांमध्यें कांहीं तत्त्वांचें प्रतिपादन केलेलें आढळतें.

सुत्तनिपातामध्यें बोधपर संवादांप्रमाणें कांहीं कथा व संवादहि आढळतात. यापैकीं नालक सुत्त (नं. ३७) पब्बज्जा सुत्त (नं. २७) आणि प्रधान सुत्त (नं. २८) हे तीन विशेष महत्त्वाचे आहेत. कारण, ते प्राचीन आध्यात्मिक पोवाड्यांपैकीं महत्त्वाचे अवशेष असून ज्याप्रमाणें लौकिक पोवाडे व आख्यानें यांपासूनच पुढें वीररसात्मक महाकाव्य तयार झालें त्याप्रमाणें यांच्या पासूनच पुढें बुद्धचरित्राचें महाकाव्य निर्माण झालें. यांचें संवादात्मक स्वरूप हेंच यांतील मुख्य वैशिष्टय आहे. श्रोत्यांच्या डोळ्यांपुढें कोणताहि प्रसंग मांडण्यास हें संवादात्मक स्वरूपच बहुधा पुरेसें होतें. तथापि जेथें हें पुरेंसें वाटलें नाही त्या ठिकाणीं कांहीं ठराविक गद्य वाक्यें व थोडासा प्रास्ताविक भाग अथवा इतर थोडा गद्य मजकूर मधून मधून दिलेला आढळतो. संवादात्मक श्लोकांमध्यें मधून मधून कथानकात्मक श्लोक घालणें ही त्यांत मागाहून केलेली सुधारणा असावी.

महाकाव्याच्या रचनेच्या अगदीं पूर्वींची व आख्यानांच्या रचनेला पूर्णत्वाप्रत नेणारी अशी शेवटची पायरी आपणांला या सुत्तनिपातांतील बुद्धाच्या तारुण्यांतील चरित्राचे वर्णन करणा-या सूत्रांतील प्रसंगांमध्यें आढळते.

ना ल क सु त्त.- बुद्धचरित्रावर मागाहून रचलेल्या दंतकथेंतील मुख्य मुख्य भाग येथें आढळतात. नालक सुत्तामध्यें वर्णिलेला प्रसंग बुद्धाच्या जन्मानंतर लागलाच घडलेला आहे. स्वर्गामध्यें देवांनां आनंदातिशय झालेला आहे. त्यांच्या आनंदाचें ज्ञान असित या द्रष्ट्यास होऊन त्यानें विचारिलेल्या प्रश्नास असें उत्तर मिळालें कीं, जगाच्या मुक्ततेकरितां शाक्यांच्या देशामध्यें लुंबिनी वनांत बुद्धाचा जन्म झाला आहे. तेव्हां तो साधु स्वर्गांतून खालीं उतरून शुद्धोदनाच्या राजवाड्यामध्यें आला, आणि त्यानें त्या नुकत्याच जन्मलेल्या मुलास पहावयाची इच्छा दर्शविली. जेव्हां त्यानें त्या अग्नीप्रमाणें देदीप्यमान, सर्व ता-यांपेक्षां प्रकाशमान आणि शरदृतूंतील निरभ्र आकाशांतील सूर्यासारख्या, ज्याला देवता थंड वारा घालीत आहेत अशा मुलास पाहिलें, तेव्हां त्यानें त्याला हातांत घेऊन म्हटलें कीं, हा मानवश्रेष्ठ आहे, हा अतुलनीय आहे. इतक्यांत त्याला स्वतःच्या नश्वरतेची आठवण होऊन तो अश्रुमोचन करूं लागला. तेव्हां त्या शाक्यांनां आश्चर्य वाटून त्यांनीं त्या मुलास कांहीं वाइटापासून भीति आहे काय असें विचारिलें. त्या साधूनें त्यांनां आश्वासून सांगितलें कीं, हा मुलगा पूर्ण ज्ञानाच्या शिखरास जाईल; परंतु त्याचा उपदेश मला ऐकावयास मिळणार नाहीं म्हणून मला दुःख होत आहे. परत जाण्यापूर्वीं त्यानें आपला पुतण्या नालक यास बजावून सांगितलें कीं बुद्धाच्या आदेशाबरोबर तूं त्याचा अनुयायी हो.

प ब्ब ज्जा सु त्त.- यांपैकीं दुस-या पब्बज्जा सुत्तामध्यें तरुण बुद्धानें केलेला गृहत्याग व यतिवेषानें भ्रमण करीत असतां त्याची राजगृह येथें राजशीं झालेली भेट यांचें वर्णन आहे.

प धा न सु त्त.- पधान सुत्तामध्यें यापुढील एक प्रसंग वर्णिलेला आहे. यामध्यें दुष्टबुद्धि मार हा गौतमाच्या पाठोपाठ सात वर्षें फिरून त्याच्याशीं पुन्हां विरोध सुरू करतो, आणि त्याला ज्ञानाच्या मार्गापासून पुन्हां ऐहिक मार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्याचा पराजयच होतो. जरी या पोवाड्यांतून दंतकथाचें व काल्पनिक कथांचें बरेंच प्राबल्य दिसून येतें, तरी नंतरच्या बुद्धाच्या चरित्रामध्यें आढळून येणा-या अतिशयोक्तीशीं तुलना केली असतां हीं सूत्रें बरींच साधीं व सत्यास अनुसरून आहेत असं म्हणावयास हरकत नाहीं.

पा रा य ण व ग्ग.- कथा सुत्तनिपातांतील पोवाड्यांत ज्या स्वरूपांमध्यें आढळतात त्या स्वरूपांत त्या परंपरागत बौद्ध कथांचा जो जुन्यांत जुना भाग आहे त्यांत नसल्या पाहिजेत. कारण, त्यांमध्येंहि त्यांच्या पूर्वीं बौद्धसांप्रदायिक इतिहासाची बरीच मोठी परंपरा अस्तित्वांत असावी ही गोष्ट गृहीत धरलेली दिसते. सुत्तनिपाताचें शेवटचें प्रकरण पारायणवग्ग हें निदान त्याच्या हल्लीं उपलब्ध असलेल्या स्वरूपामध्यें बरेंच अलीकडे रचलें गेलें असावें असें वाटतें. त्याच्या आरंभीं एक प्रास्ताविक गोष्ट आहे. बावरी नांवाच्या एका ब्राह्मणानें उदारपणानें आपलें सर्वस्व दान केल्यानंतर त्याच्याकडे एक ब्राह्मण येऊन पांचशें सुवर्ण मुद्रा मागूं लागला, आणि त्या मिळाल्या नाहींत तेव्हां तुझें शिर सात दिवसांनीं सप्तधा विदीर्ण होईल असा त्यानें बावरीला शाप दिला. तेव्हां बावरीला फार भीति वाटली, परंतु एका देवतेनें त्याला बुद्धास शरण जावयास सांगितलें. येथें एक बुद्धाचें स्तोत्र देऊन त्यामध्यें त्याच्या ३२ विशिष्ट शारीरिक लक्षणांचें वर्णन केलें आहे. या वर्णनांत त्याची लांब जीभ - जिच्यामुळें त्याला सर्व मुखांचें आच्छादन करतां येत असे - व वस्त्रांत आच्छादिलेला अवयव यांचेंहि वर्णन आहे. तेव्हां बावरीनें आपले विद्वान् व प्रसिद्ध असे १६ शिष्य बुद्धाकडे पाठविले. त्यांनीं त्याला १६ प्रश्न विचारिले, व बुद्धानें त्यांचीं उत्तरें दिलीं. हे सोळा प्रश्न व त्यांचीं उत्तरें हेंच वास्तविक या कवितेचें मूळ आहे. शेवटच्या प्रश्नानंतर कांहीं गद्य भाग असून त्यामध्यें या प्रश्नोत्तरांचें महत्त्व सांगितलें आहे, व हाच भाग कांहीं संस्कृत बौद्ध ग्रंथांप्रमाणें पुन्हां गाथांमध्यें दिला आहे. पुन्हां एक बुद्धाचें स्तोत्र देऊन कविता पूर्ण झाली आहे, व मूळ गोष्ट तशीच अर्धवट सुटलेली आहे. पूर्वी जुनीं म्हणून दाखविलेल्यांपैकीं (पृ. २१४ पहा) पारायण सुत्त हें याच स्वरूपांत उपलब्ध असल्यामुळें, त्यांतील मूळ प्रास्ताविक गोष्ट मूळच्या स्वरूपांत चालत आली नसून तिच्या स्वरूपामध्यें कांहीं अधिक मजकूर आल्यामुळें फरक पडला असावा, असें गृहीत धरावयास हरकत दिसत नाहीं. हीच गोष्ट गद्यपद्यमिश्रित जे भाग आहेत त्यांतील गद्य भागासंबंधीं बहुतांशीं खरी दिसते. फॉसबॉल यानें सर्व गद्य भाग मागाहून घातलेला आहे असें जें विधान केलें आहे, तें बहुतांशीं खरें दिसत नाहीं; परंतु के. ई. न्यूमन यानें आपल्या भाषांतरामध्यें फक्त कांहीं गद्य भाग ''भिक्षुकांची क्षुद्र टीका'' अशी एका ठिकाणीं कडक टीका करून गाळून टाकला आहे, त्या ठिकाणीं तो बहुतांशीं बरोबर आहे असें विंटरनिट्झ यास वाटतें. उदाहरणार्थ, सेल सुत्तांतील गद्य भागामध्यें ज्या ठिकाणीं बुद्धाचा चक्रवर्ती म्हणून गौरव केला आहे, व त्याच्या विशिष्ट ३२ शारीरिक लक्षणांचें विस्तृत वर्णन केलें आहे, त्या ठिकाणीं त्या भागाचें अर्वाचीनत्व दाखविणारा पंथांचा उल्लेख आलेला आहे. त्याप्रमाणेंच ज्या ठिकाणीं एखाद्या संवादाची प्रस्तावना करण्याकरितां एखादा यक्ष अथवा देवता यांचें नीरस व अनवश्यक वर्णन केलेलें आहे, त्या ठिकाणीं हा भाग टीकाकारानें घुसडून दिला आहे असें म्हणणें सयुक्तिक दिसतें.