प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
सुत्तपिटकाचें अशोकाच्या कालीं अस्तित्व दाखविणारा पुरावा. - या स्तुपांवर बौद्ध कथांतील प्रसंगांचीं चित्रें असून कांहीं चित्रांवर नांवें खोदलेलीं आहेत. त्यांवरून ही चित्रें बुद्धाच्या जातककथांतील म्हणजे त्याच्या पूर्वजन्माच्या कथांतील प्रसंगांचीं आहेत याबद्दल संशय रहात नाहीं. या जातककथा हा एक तिपिटकाचाच भाग आहे. सांची येथील स्मारकांवर जे अपूर्ण लेख खोदलेले आहेत त्यांमध्यें भिक्षूंनां 'पचनेकायिक' म्हणजे पांच निकायांचें ज्ञान असणारा, 'पेतकि' म्हणजे पिटकांचें ज्ञान असणारा, 'धम्मकथिक' म्हणजे धर्माचें शिक्षण देणारा, अशा नांवांनीं संबोधिलें आहे; व भिक्षुणीस 'सुत्तातिकिनी' म्हणजे सूत्रें जाणणारीं असें म्हटलें आहे. यावरून असें स्पष्ट दिसतें कीं, ख्रिस्तपूर्व तिस-या शतकाच्या मध्याच्या सुमारास बौद्ध संप्रदायाचा पिटक नांवाचा धर्मशास्त्रसंग्रह असून त्यामध्यें पांच निकाय होते; आणि धर्माचें विवरण करणारीं सुत्तें [सूत्रें] होती. या सुत्तांपैकीं कांहीं सुत्तें सध्यांच्या तिपिटकांतील सुत्तांप्रमाणेंच होतीं. त्याप्रमाणेंच सध्यांच्या तिपिटकांतील जातकांतल्याप्रमाणेंच त्या वेळींहि जातककथा बौद्ध वाङ्मयांत प्रचलित होत्या. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अशोक राजाच्या वेळी बौद्ध धर्मशास्त्रांतील सुत्तपिटक हा भाग तरी प्रचलित पाली ग्रंथांतील सुत्तपिटकाहून फारसा निराळ्या स्वरूपांत नव्हता.
तिपिटकाच्या व त्यांत असलेल्या निकायांच्या अस्तित्वाचा सर्वांत प्राचीन वाङ्मयांतील उल्लेख प्रथम मिलिंदपन्ह (मिलिंदप्रश्न) या ग्रंथांत आढळतो. हा ग्रंथ बहुधा ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या आरंभीं लिहिला गेला असावा. परंतु या पाली धर्मशास्त्राखेरीज जें इतर बौद्ध वाङ्मय आहे, त्यावरून या धर्मशास्त्रांतील बहुतेक भाग फार प्राचीन कालचा असून तो बुद्धकालाच्या फारसा अलीकडचा नसावा असें दिसतें: व त्यावरून बौद्ध संप्रदायाची बुद्धानंतरच्या दोन शतकांतील मतें काय होतीं तें खात्रीलायक कळतें. हीच गोष्ट धर्मशास्त्रेतर पाली वाङ्मयावरूनहि सिद्ध होते. या वाङ्मयामध्यें मिलिंदपन्हांतील संवाद, सिंहलद्वीपांतील दीपवंसो व महावंसो या बखरी व तिपिटकासंबंधीं अनेक भाष्यात्मक ग्रंथ येतात. हे सर्व ग्रंथ इसवी सनाच्या आरंभींच्या शतकांमध्यें तिपिटकाचें अस्तित्व गृहीत धरतात.