प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

संयुत्तनिकाय.- तिसरा मोठा संग्रह संयुक्तनिकाय हा होय. यामध्यें उपदेशपर प्रवचनांचा संग्रह असून त्यांचे निरनिराळे गुच्छ केलेले आहेत. या संग्रहांत सूत्रांचे ५६ गुच्छ (संयुक्त) असून प्रत्येकाचा संबंध निरनिराळ्या नांवांशीं अगर वस्तूंशीं आहे व त्यांमध्यें निरनिराळ्या सांप्रदायिक तत्त्वांचें विवेचन केलें आहे. हे निरनिराळे गुच्छ पाडतांना केलेली विषयविभागणी शास्त्रीय नसून केवळ प्रयत्नरूपी आहे. यामुळें देवतासंयुत्तामध्यें (नं. १) देवतांचीं वचनें आहेत; परंतु तीं अगदीं निरनिराळ्या विषयांबद्दल आहेत. मारसंयुत्तामध्यें (नं. ४) २५ सुत्रें असून त्यांमध्यें प्रत्येकांत माराबद्दलची एकएक दंतकथा सांगितली आहे. मार हा, बुद्ध स्वतः अगर त्याचा एखादा शिष्य मोक्षमार्गापासून च्युत व्हावा म्हणून प्रयत्न करतो. परंतु प्रत्येक वेळीं त्याला अपयश येतें. भिक्षुणीसंयुत्तामध्यें (नं. ५) भिक्षुणींबद्दलच्या १० दंतकथा असून त्यांमध्यें मार हा त्यांनां संप्रदायच्युतकरण्याबद्दल व्यर्थ प्रयत्न करीत असलेला दिसतो. निदान संयुत्त (नं. १२) यामध्यें ९२ भाषणें व संवाद असून त्यांमध्यें पुनरुक्ति फार आढळते. यांचा विषय १२ निदानें म्हणजे कार्यकारणन्याय (पटिच्च समुप्पाद) हा आहे. अनमतग्गसंयुत्त (नं. १५) यामध्यें २० प्रवचनें असून तीं सर्व अनमतग्गो (हे भिक्षूंनो, आद्यंतरहित असा हा संसार आहे) या वाक्यापासून सुरू होतात. उलट कस्सप संयुत्तांतील (नं. १६) १३ सूत्रें केवळ तीं कश्यपाच्या तोंडीं घातलीं आहेत म्हणूनच एकत्र केलेलीं आढळतात. याप्रमाणें सारीपुत्त संयुत्तामध्यें (नं. २८) सारीपुत्ताचीं १० प्रवचनें आहेत. नागसंयुत्ताच्या (नं. २९) ५० सूत्रांमध्यें नागांच्या निरनिराळ्या जातींचीं नांवें दिलीं असून कोणतें कृत्य केलें असतां विशिष्ट नागजातीमध्यें जन्म येतो तें सांगितलें आहे. ध्यान (झान) अथवा समाधिसंयुत्तांतील (नं. ३४) ५५ सूत्रांमध्यें ध्यानाचें अथवा समाधीचें विवेचन आहे. स्त्रियांची अबलता अथवा निर्बलता व त्यांचे सदगुण अथवा दुर्गुण आणि त्यांनां पुढील जन्मीं प्राप्त होणारी स्थिति यांचें वर्णन मातुगामसंयुत्तांतील (नं. ३७) ३४ सूत्रांमध्यें केलें आहे. मोग्गलान याच्याबद्दल कथा व त्याचीं कांहीं प्रवचनें मोग्गलान संयुत्तांतील (नं. ४०) ११ सूत्रांमध्यें आहेत सक्कसंयुत्त (नं. ११) यांतील नायक सक्क (शक) म्ह. इंद्र हा असून तो येथें धार्मिक बौद्धाप्रमाणें आढळतो. वेदांतल्या ॠचांतील वृत्रघ्न इंद्र याचें भयंकर वर्णन व सक्क संयुत्तांतील त्याची शांति व मी कधींहि रागावत नाहीं अशी त्यानें मारलेली प्रौढी हीं ध्यानांत घेतां वेद व तिपिटक यांच्या रचनेच्या कालामध्यें केवढें अंतर असलें पाहिजे ही गोष्ट लक्षांत येते. सच्चसंयुत्त (सत्यसंयुक्त नं. ५६) हें अखेरचें संयुत्त असून त्यामध्यें १३१ सूत्रांत सत्यचतुष्ट्याचें, मानवी दुःखाचें व त्याच्या निरसनाचें विवेचन आहे. याच संयुत्तामध्यें (नं. ५६,११) प्रसिद्ध धम्मचक्कप्पवत्तनसुत्त-बनारस येथील प्रवचन आढळतें. येथूनच बुद्धानें धर्मचक्राला गति दिली.

रचना.- हीं सूत्रें एकत्र करतांनां तीन गोष्टींकडे लक्ष दिलेलें आढळतें. (१) एकाच गुच्छांतील सूत्रांमध्यें बौद्धसंप्रदायाच्या कांहीं मुख्य तत्त्वांचें उदघाटन केलेलें असतें अथवा (२) त्यांचा संबंध एखाद्या विशिष्ट वर्गांतील देव, दानव अगर मनुष्यें यांच्यांशीं असतो किंवा (३) त्यांमध्यें एखादी प्रसिद्ध व्यक्ति विवेचन अथवा नायक असते. या ५६ संयुत्तांचे ५ वर्ग (वग्ग) केलेले आहेत व एकंदर सूत्रसंख्या २८८९ आहे. हीं सर्व सूत्रें मध्यम अथवा दीघ निकायांतील सूत्रांपेक्षां बरीच लहान आहेत. सूत्रांची संख्या येवढी मोठी असण्याचें मुख्य कारण प्रत्येक विषयाच्या सर्व बाजूंचा एखाद्या ठराविक पद्धतीनें व कांहीं वाक्यांची अनेकवार पुनरुक्ति करून इतका उहापोह केला आहे कीं, वाचकांस कंटाळा येतो. उदाहरणार्थ, सळायतन संयुत्तामध्यें (नं. ३५) एकंदर २०७ सूत्रें असून त्यांत षडिंद्रियांवर संवाद व भाषणें आहेत. यांमध्यें पुनःपुनः हेंच सांगितलें आहे कीं, नेत्र, कर्ण इत्यादि पंचेंद्रियें व मन हीं नाशवंत असून दुःखमय आहेत, त्यांचा आत्म्याशीं काहीं संबंध नाहीं व या षडिंद्रियांपासून झालेलें प्रत्यक्ष ज्ञान नाशवंत व दुःखमय असून त्याचाहि आत्म्याशीं कांहीं संबंध नाहीं. तसेंच या षडिंद्रियांचे जे विषय तेहि नाशवंत व दुःखमय असून त्यांचाहि आत्म्याशीं कांहीं संबंध नाहीं. ही गोष्ट प्रत्येक इंद्रियाबद्दल, तज्जन्य ज्ञानाबद्दल व त्याच्या विषयाबद्दल त्याच त्याच शब्दांत पुनःपुनः सांगितली आहे व प्रत्येक गोष्टीबद्दल निराळें सूत्र केलें आहे. अर्थात् याचें वाचन आपणांस त्रासदायक वाटतें. परंतु या संग्रहांतहि वाङ्‌मयाच्या दृष्टीनें महत्त्वाचा भाग पुष्कळ आढळतो.

वा ङ्‌म यी न म ह त्त्व.- असा महत्त्वाचा भाग विशेषतः पहिल्या वर्गांत दृष्टीस पडतो. या वर्गामध्यें नं. १ ते ११ हीं संयुत्तें असून त्यांस सागथवग्ग (गाथायुक्त वर्ग) असें नांव आहे. अशा गाथा मधून मधून इतर निकायांप्रमाणें सर्व वर्गांतून आढळतात. परंतु पहिल्या वर्गामध्यें त्यांची संख्या इतकी मोठा आहे कीं, कांहीं सूत्रें केवळ गाथामयच आहेत. इतर सूत्रें, विशेषतः मारसंयुत्त व भिक्षुणीसंयुत्त यांतील सूत्रें पूर्वीं सांगितल्याप्रमाणें गद्यपद्यामिश्रित आख्यानरूपामध्यें आहेत. त्यांच्या स्वरूपावरून व त्यांतील प्राचीन भाषेवरून तीं प्राचीन बौद्धकाव्यापैकीं आहेत हें उघड होतें. र्‍हीड डेव्हिडस् यानेंहि निकायांतील बहुतेक गाथा प्राचीन असाव्यात असें म्हटलें आहे (दीघनिकाय ग्रं. २ पृ. ८). वरील दोन संयुत्तांतील कांहीं लहान लहान आख्यानें हीं प्राचीन भारतीय काव्यांचीं उत्कृष्ट उदाहरणें आहेत. नमुन्यादाखल किसा गौतमी (कृश गौतमी) हिचें सूत्र (५, ३) हें आपण येथें देऊं:-

''मी असें ऐकिलें आहे कीं, बुद्ध एकदां श्रावस्ती (सावत्त्थी) येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या बागेमध्यें रहात होता. किसा गौतमी ही भिक्षुणी प्रातःकाळीं वस्त्रें परिधान करून व आपलें भिक्षापात्र आपल्या वस्त्राखालीं घेऊन भिक्षा मागण्याकरितां श्रावस्ती नगरास गेली. श्रावस्ती नगरामधून भिक्षा मागून आणलेलें अन्न भक्षण केल्यावर ती राहिलेला दिवस घालविण्याकरितां एका दाट जंगलामध्यें गेली व बराच आंत प्रवेश केल्यावर ती एका झाडाखालीं बसली. तेथें दुष्टबुद्धि मार हा तिचें ध्यान मोडण्याकरितां तिला भीति दाखविण्यास आला व तिला एका श्लोकांत म्हणाला कीं, येथें तूं पुत्र हरवलेल्या आईप्रमाणें डोळ्यांत अश्रू आणून एकटीच कां बसली आहेत ? या दाट जंगलांत एकटीच बसून एखाद्या पुरुषाची मार्गप्रतीक्षा करीत आहेत काय ? हें ऐकून किसा गौतमी आपल्या मनाशीं विचार करूं लागली कीं, आतां ज्यानें श्लोक म्हटला तो कोण असावा; मानव असेल कीं मानवेतर असेल ? नंतर तिला असें वाटलें कीं, तो दुष्टबुद्धि मार असावा व त्यानें आपल्या ध्यानांत विघ्न आणण्याकरितां व आपणास भिवविण्याकरितां वरील श्लोक म्हटला असावा. नंतर किसा गौतमीला तो दुष्टबुद्धि मार आहे असें ज्या वेळीं कळून आलें तेव्हां तिनें त्याला पुढील अर्थाचें श्लोकांत उत्तर दिलें. ''होय, मी खरीच एक पुत्र नष्ट झालेली आई आहे. परंतु मला जवळच असलेल्या या पुरुषाची मार्गप्रतीक्षा करण्याची जरूर नाहीं. मी अरू गाळीत नाहीं किंवा शोकहि करीत नाहीं व मित्रा, मला तुझी भीतीहि वाटत नाहीं. माझ्या कामाचा पूर्ण नाश झालेला आहे व अंधःकार दूर पळाला आहे. मी मृत्यूच्या सैन्यास जिंकलें आहे. सर्व दुःखापासून अलिप्त अशी मी रहात आहे.'' तेव्हां त्या दुष्टबुद्धि मारास किसा गौतमीनें आपणास ओळखिलें हें कळून येऊन तो मोठ्या दुःखानें तेथून अदृश्य झाला.

या काव्यांतून आपणास भारतीय महाकाव्याचें मूळ ज्यांत सांपडतें अशा आख्यानासारखींच सांप्रदायिक आख्यानें आढळतात. जे शार्पेटिये हा या आख्यानांस लहान नाटकें असें नामाभिधान देतो. परंतु सर्व तिपिटकामध्यें अशा प्रकारचीं अध्यात्मिक विषयावर नाटकें त्या वेळीं होत असल्याबद्दल कोठेंहि मागमूस आढळत नाहीं. शिवाय इतकी सुसंस्कृतताहि त्या वेळच्या बौद्ध भिक्षूंमध्यें आढळून येत नाहीं. उलटपक्षीं वरील काव्यें बौद्ध भिक्षूंनींच रचलीं असली पाहिजेत व त्यांनां तर नाटकें व त्यांसारखे इतर प्रकार यांमध्यें भाग घेण्याबद्दल त्यांच्याच शास्त्रांत वारंवार निषेध केलेला आढळतो. तथापि आपणांला अशा प्रकारचीं कथागीतें ठिकठिकाणी आढळतात व त्यांमध्यें वरीलप्रमाणेंच नाट्यकल्पनेचा बराच अंश आढळतो. अशा लौकिक व आध्यात्मिक कथागीतांपासूनच नाटकांचा उदय झाला असावा; परंतु महाकाव्यें यांपासून उत्पन्न झालीं तरी यांसच महाकाव्यें म्हणणें जसें सयुक्तिक होणार नाहीं, तसें या चुटक्यांसच नाटकें म्हणणेंहि संयुक्तिक होणार नाहीं. या आख्यानांतील गद्यभाग हा पद्याइतकाच जुना आहे कीं काय याबद्दल मात्र संशय आहे.