प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

सिंहावलोकन.- बौद्धांच्या तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र या नांवानें प्रसिद्ध असलेल्या वाङ्‌मयांत किती ग्रंथ आहेत, त्यांचें अंतर्गत स्वरूप कसें आहे, त्यांत नवा भाग किती, जुना भाग किती, आंतील विचार कोणत्या प्रकारचे आहेत इत्यादि गोष्टींचें स्थूलपणानें वर्णन आतांपर्यंत केले आहे. या ग्रंथाच्या एकंदर विस्तारामुळें याचें स्वरूप आकलन होत नाहीं असें पुष्कळांत वाचतांना वाटेल. यासाठीं, झालेल्या वर्णनाचा पुनः संक्षेप अवश्य आहे. तो करण्याकरितां पाली धर्मशास्त्र, त्याचे मुख्य विभाग आणि मुख्य विभागांचे पोटविभाग हें दाखविणार कोष्टक येथे देतों.

त्रिपिटक याचे १ विनयपिटक (आचारसंग्रह), २ सुत्तपिटक (विवरणात्मक) व ३ अभिधम्मपिटक असे तीन विभाग आहेत.

१ विनयपिटक.- विनयपिटकाचे पुन्हां तीन विभाग : १ सुत्तविभंग [पाराजित व पाचित्तिय], २ खंधक (महावग्ग व चुल्लवग्ग) आणि ३ परिवार अथवा परिवारपाठ.

(१) सु त्त वि भं ग.- याचा अर्थ सुत्तांची फोड. यांत पापांची यादी दिलेली आहे. पापांच्या प्रकारानुसार हीं पापें पाराजित व पाचित्तिय या दोन भागांत विभागलीं आहेत.

पाराजिक.- यांतील पातकांनीं मनुष्य संप्रदायबहिष्कृत होत असे.
पाचित्तिय.- यांतील पातकांस प्रायश्चित्त आहे.

(२) खंधक.- यांत संघाच्या व्यवस्थेबद्दल नियम दिले आहेत. याचे महावग्ग व चुल्लवग्ग असे दोन पोटविभाग आहेत.

महावग्ग.- ह्याचीं दहा प्रकरणें असून त्यांत संप्रदायप्रवेश, उपोसथविधी वगैरेसंबंधीं नियम आहेत.

चुल्लवग्ग.- ह्यांत १० प्रकरणें असून त्यांपैकीं ९ प्रकरणांत दिनचर्या वगैरे दिलें असून १० व्या प्रकरणांत भिक्षुणींबद्दल नियम दिले आहेत.

(३) प रि वा र.- कमी महत्त्वाचा भाग. यांत १९ प्रकरणें असून त्यांत सूची, परिशिष्टें वगैरे आहेत.

२ सुत्तपिटक.- यांत पुढें दिलेले पांच निकाय आहेत : १ दीघ निकाय (दीर्घ सूत्रें); २ मज्झिम निकाय (मध्यम प्रकारचे संवाद); ३ संयुत्त निकाय (सूत्रांचे गुच्छ); ४ अंगुत्तरनिकाय (कांहीं लहान सूत्रें); व ५ खुद्दकनिकाय (क्षुद्र सूत्रें).

१ दी घ नि का य.- हा उपदेशपर मोठमोठ्या सूत्रांचा संग्रह आहे. यांत बरींच मोठीं सूत्रें आहेत. यांपैकीं कांहीं महत्त्वाचीं सूत्रें पुढें दिल्याप्रमाणें:-

नं १  ब्रह्मजालसुत्त, हें संप्रदौयेतिहासाच्या दृष्टीनें महत्त्वाचें आहे.
नं. २ सामज्जफलसुत्त, यांत वैराग्यफलावर विवेचन आहे.
नं. ३ अंबठ्ठसुत्त, यांत जातिव्यवस्थेचा इतिहास आहे.
नं. ५ कूटदंतसुत्त, हें तीक्ष्णदंत ब्राह्मण यावर व्याख्यान आहे.
नं. १३ तेवि जसुत्त, हें वेदत्रयीवर व्याख्यान आहे. यांत व कूटदंत सुत्तांत बौद्ध व ब्राह्मण संप्रदायांचा संबंध दाखविला आहे.
नं. १४ महापदानसुत्त, यांत बुद्धाच्या चमत्कारांचें वर्णन आहे.
नं. १५ महानिदानसुत्त, यांत कारणपरंपरेचा ऊहापोह केला आहे.
नं. १६ महापरिनिब्बान सुत्त, हें बुद्धाचें महानिर्वाणावरील व्याख्यान आहे.
नं. १७-२१ हीं पौराणिक सुत्तें आहेत. यांपैकीं सर्वांत चमत्कारिक सक्कपन्हसुत्त (शक्रप्रश्नसूत्र) हें आहे.
नं. २३ पायासिसुत्त, हा एक प्लेटोच्या संवादासारखा इतिहाससंवाद आहे.
नं. २९  सिगालोवादसुत्त, यांत बौद्ध गृहस्थाचा आचार दिला आहे.

(२) म ज्झि म नि  का य.- यांत १५२ भाषणें व संवाद आहेत. यांपैकीं अस्सलायनसुत्त यांत बुद्धकालीन समाजस्थिति चांगली दृष्टीस पडते.

(३) सं यु त्त नि का य.- या संग्रहांत सूत्रांचे ५६ गुच्छ आहेत. यांपैकीं नं. १ देवतासंयुत्त, नं. ४ मारसंयुत्त, नं. ५ भिक्षुणीसंयुत्त, नं. ११ सक्कसंयुत्त, नं. १२ निदानसंयुत्त, नं. १५ अनमतग्ग संयुत्त, नं. १६ कस्सपसंयुत्त, नं. २८ सारिपुत्तसंयुत्त, नं. २९ नागसंयुत्त, नं. ३४ समाधिसंयुत्त, नं. ३५ साळायतन संयुत्त नं. ३७ मातुगामसंयुत्त, नं. ४० मोग्गलानसंयुत्त, नं. ५६ सच्चसंयुत्त हे कांहीं महत्त्वाचे गुच्छ आहेत.

(४) अ गु त्त र नि का य.- यांतील सूत्रें लघुत्व ह्या गुणानें युक्त आहेत.

(५) खु द्द क नि का य.- याचे पोट विभाग येणेंप्रमाणें : खुद्दकपाठ, २ धम्मपद, ३ उदान, ४ इतिवुत्तक, ५ सुत्तनिपात, ६ विमानवत्थु, ७ पेतवत्थु, ८ थेरगाथा, ९ थेरीगाथा, १० जातक, ११ निद्देस, १२ पटिसंभिद्रामग्ग, १३ अपदान, १४ बुद्धवंस व १५ चरियापिटक.

१  खुद्दकपाठ.- यांत ९ सूत्रें आहेत. पैकी नं. ६ हें रतनसुत्त व नं. ९ मेत्तसुत्त आहे.
२  धम्मपद.- यांत ४२३ श्लोक आहेत.
३  उदान.- याचे १० वर्ग असून प्रत्येक वग्गांत ८ सूत्रें आहेत.
४  इतिवुत्तक.- यांत ११२ सूत्रें आहेत.
५  सुत्तनिपात.- यांत उदगवग्ग, चुल्लवग्ग, महावग्ग, अठ्ठकवग्ग व पारायण अशीं ५ प्रकरणें आहेत.
६-७  विमानवत्थु व पेतवत्थु.- या देवांच्या व भूतांच्या गोष्टी आहेत.
८-९  थेरगाथा व थेरीगाथा.- हीं अनुक्रमें बौद्ध भिक्षू व भिक्षुणी यांनीं लिहिलेलीं दोन फार सुंदर काव्यें आहेत.
१०  जातककथा.- या बुद्धाच्या पूर्वजन्मींच्या गोष्टी आहेत. प्रत्येक जातक कथें पच्चुपन्नवत्थु, अतीतवत्थु, गाथा, वेच्चाकरण व समोधान असे ५ भाग असतात.
११ निद्देस.- हें सुत्तनिपाताच्या दोन भागांवरील टीकेचें नांव आहे.
१२  पटिसंभिदामग्ग.- हा अभिधम्म वाङ्‌मयापैकीं भाग आहे.
१३  अपदान.- हीं अर्हत झालेल्या शिष्यांची व शिष्यिणींचीं पद्यें आहेत.
१४  बुद्धवंस.- या २४ बुद्धांच्या परंपरागत कथा आहेत.
१५  चरियापिटक.- हा ३५ पद्यमय जातकांचा संग्रह आहे.

३  अभिधम्मपिटक - याचे १ पुग्गल पञ्ञत्ति (म्ह. व्यक्ति वर्णन); २ धातु कथा (पदार्थ निर्देश - यांत १४ प्रकरणें आहेत); ३ धम्मसंगणि (मनःस्थितीचे प्रकार) ४ विभंग (वरील ग्रंथास पुरवणी दाखल ग्रंथ); ५ पठ्ठान प्रकरण अथवा महाप्रकरण (पैकीं प्रसिद्ध भाग दुकपठ्ठान); ६ कथावत्थु (यांत २३ प्रकरणें असून त्यांत पाखंडाचें खंडन केलें आहे); व ७ यमक (याचा एकच भाग प्रसिद्ध झाला आहे); असे सात भाग आहेत.