प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
विनयपिटकाचें ब्राह्मणांशीं साम्य.- विनयपिटकांतील ग्रंथांचें वैदिक ब्राह्मणांशीं बरेच साम्य आढळतें. ब्राह्मणाप्रमाणें यांतहि विधि (नियम) व अर्थवाद (नियमाचा अर्थ) हे एकापुढें एक दिलेले सांपडतात. अर्थवादांत स्पष्टीकरणार्थ कथा दिलेल्या असतात व त्या या विधिनिषेधांच्या रुक्ष प्रदेशांत शीतोदकाच्या झ-याप्रमाणें सुखदायक वाटतात. विनयपिटकाचा शेवटचा भाग जो परिवान तो सर्वांत कमी महत्त्वाचा असून बराच उत्तरकालीनहि आहे. हा बहुतकरून एखाद्या सिंहली भिक्षूनें लिहून त्यांत सामील केला असावा. यामध्यें १९ लहान लहान प्रकारणें असून संवाद, सूची, परिशिष्टें, अनुक्रमणी वगैरेहि आहेत. हा भाग वेद व वेदांगें यांनां जोडलेल्या अनुक्रमणीपरिशिष्टांप्रमाणेंच आहे. अभिधम्मपिटकाप्रमाणें हा भागहि प्रश्नोत्तररूपांत असून त्याचाच समकालीन असावा.