प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

अंगुत्तर निकाय.- चौथा मोठा संग्रह अंगुत्तर निकाय हा होय. यामध्यें बोधपर वचनें असून तीं संख्येच्या चढत्या क्रमानें लावलेली आहेत. यांतील सूत्रें संख्येनें निदान २३०८ (किंवा जास्तींत जास्त २३६३) असून तीं ११ प्रकरणांमध्यें (निपातांमध्यें) ग्रथित केलीं आहेत. ती अशी कीं, एकसंख्याक वस्तूंबद्दलचीं सूत्रें पहिल्या प्रकरणांत, दोन वस्तूंबद्दलचीं दुस-या प्रकरणांत, तीन संख्याक वस्तूंबद्दलची तिस-या प्रकरणांत. उदाहरणार्थ, दुस-या प्रकरणामध्यें मनुष्यानें ज वस्तूंपासून दूर रहावें अशा दोन वस्तू, दोन काळ्या व दोन हलक्यावस्तू, अरण्यांत रहाण्याबद्दल दोन कारणें, बुद्धांच्या दोन जाती, इत्यादिकांविषयीं विवेचन आहे. तिस-या प्रकरणामध्यें क्रिया, वाचा व विचार या त्रयीबद्दल, भिक्षूंच्या तीन वर्गांबद्दल, देवांच्या तीन दूतांबद्दल (वार्धक्य, रोग व मृत्यु), मृत्यूचा जगावर ताबा चालतो याच्या तीन कारणांबद्दल, मौनाच्या तीन प्रकारांबद्दल, ज्या तीन कारणांमुळें स्त्रियानरकांत जातात त्यांच्याबद्दल, इत्यादि विवेचन आहे. आठव्या प्रकरणांत ज्या आठ गोष्टींनीं पतिपत्‍नी हे परस्परांस बद्ध करितात त्या गोष्टी, भिक्षेचे आठ प्रकार, पुढील जन्म देवगणांच्या कोटींत होण्यासाठीं स्त्रियांस अवश्यक असणारे आठ गूण, भूकंपाचीं आठ कारणें इत्यादि विषय येतात. दहाव्या प्रकरणामध्यें बुद्धाच्या दहा शक्ती, दहा आद्यतत्त्वें (बौद्ध संप्रदायाचें थोडक्यांत स्वरूप) पातिमोख्खविधीबद्दल दहा कारणें व श्रीमंत लोकांचे १० वर्ग इत्यादि गोष्टी आहेत.

पो ट वि भा ग.- या अकरा प्रकरणाचे पुन्हां कित्येक विभाग (वग्ग) केलेले आहेत. आणि यामध्ये बहुतकरून (नेहमींच नव्हे) एकाच विषयाबद्दल असलेलीं सूत्रें एकत्र केलीं आहेत. याप्रमाणें पहिल्या प्रकरणांतील (१ ल्या निपातांतील) पहिल्या वग्गामधील १० सूत्रांमध्यें पतिपत्‍नी यांचा परस्परसंबंध वर्णन केला आहे. निपात १ वग्ग १४ यामध्यें ८० सूत्रें आहेत. त्यांमध्यें प्रमुख प्रमुख शिष्य व शिष्यिणी यांचीं नांवें दिली असून त्यांच्या गुणांचें वर्णन केलें आहे. निपात १ वग्ग २० यांत निर्वाणप्राप्त्यर्थ करावयाच्या ध्यानाचे निरनिराळे प्रकार २६२ सूत्रांमध्यें सांगितले आहेत. निपात ५ वग्ग १८ हा उपासकांबद्दल असून त्यांत १० सूत्रें आहेत. संयुत्तनिकायांतील सूत्रांप्रमाणें या संग्रहांतील सूत्रेंहि लहान लहान भाषणांच्या व संवादांच्या रूपानें आहेत. परंतु कांहीं ठिकाणीं लांब लांब प्रवचनें असून इतर निकायांप्रमाणें यांतील प्रवचनांतहि मधून मधून पद्यें (गाथा) आढळतात. अंगुत्तर निकायांतील पुष्कळ सूत्रें व गाथा इतर ग्रंथांतील सूत्रें व गाथा यांच्या प्रमाणेंच आहेत; व कांहीं ठिकाणीं तर तीं अवतरणें म्हणून उद्‍धृत करून घेतलीं आहेत. अंगुत्तर निकायांतील कांही सूत्रांमध्यें लघुत्व हा मोठा विशेष गुण आहे. तिस-या प्रकरणामध्यें (३, १२९) दिलेलें बुद्धाचें भाषण बौद्ध संप्रदाय हा गुप्तविद्याविशिष्ट आहे अशी ज्याची भ्रामक समजूत असेल त्यानें वाचण्यासारखें आहे. त्यांतील दोन गाथांचा आरंभ असा होतो.

''भिक्षूहो, तीन गोष्टी गुप्तपणें होत असतात, उघडपणें होत नाहींत. या तीन गोष्टी कोणत्या ? भिक्षूहो, स्त्रिया नेहमीं गुप्तपणें गोष्टी करतात, उघडपणें करीत नाहींत. ब्राह्मणांचे मंत्र गुप्तपणें चालू असतात, उघडपणें नसतात. खोटा सिद्धांत गुप्तपणें पसरत असतो, उघडपणें पसरत नाहीं. भिक्षूहो, या तीन गोष्टी गुप्तपणें चालतात, उघडपणें चालत नाहींत.

''भिक्षूहो, तीन गोष्टींचा प्रकाश उघडपणें पसरत असतो, गुप्तपणा त्यांत नसतो. त्या तीन गोष्टी कोणत्या ? चंद्राचें बिंब आपला प्रकाश उघडपणें पाडीत असतें, गुप्तपणें नाहीं. सूर्याचें बिंब आपला प्रकाश उघडपणें पाडीत असतें, गुप्तपणें नाहीं. बुद्धाचा धर्म आणि त्याचें शासन हीं उघडपणें आपला प्रकाश पाडीत असतात, गुप्तपणें नाहीं. भिक्षूंहो, या तीन गोष्टी उघडपणें प्रकाश पाडीत असतात, गुप्तपणें नाहीं.''

पुष्कळशा सूत्रांत स्त्रियांचें वर्णन असून त्यांत इतर संप्रदायांतील साधू व पुरोहित यांच्याप्रमाणेंच बौद्ध भिक्षूनींहि स्त्रियांस चांगलें म्हटलें नाहीं. फक्त बुद्धाचा प्रिय शिष्य आनंद यानेंच स्त्रियांची तरफदारी केलेली आढळते. त्याच्याच मध्यस्थीमुळें बुद्धानें पुष्कळ आढेवेढे घेऊन सरतेशेवटीं मोठ्या नाखुषीनें भिक्षुणींचा संघ स्थापन करण्याची परवानगी दिली या त्याच्या पक्षपाताबद्दल राजगृह येथील संगीतीमध्यें त्याला जाबा द्यावा लागला अशी परंपरागत माहिती (विनपिटक चुल्लवग्ग ११, १, १०) आहे.

या प्रकरणामध्यें असें सांगितलें आहे कीं, (४, ८०) एकदां अलीकडील 'स्त्रियांच्या कैवा-यांप्रमाणें आनंदानें असा प्रश्न केला कीं, स्त्रियांनां सभेमध्यें जागा मिळत नाहीं अथवा त्यांनां स्वतंत्र धंदा करून पोट भरतां येत नाहीं याला काय कारण असावें ? बुद्धानें उत्तर केलें स्त्रिया रागीट व मत्सरी असतात यामुळें त्यांनां सभेमध्यें स्थान नाहीं, अथवा त्यांनां स्वतंत्र, धंदा करून पोट भरतां येत नाहीं. तिस-या प्रकरणांतील सर्वांत उत्तम भाषण म्हणजे तीन देवदूतांचें होय (३,३५). वार्धक्य, रोग व मृत्यु या तीन देवतांबद्दल घातक देशाचा राजा यम यानें दुष्कृत्यांचा जनक मार याजवळ चौकशी करून त्यास नरकाधिपतीकडे शिक्षेकरितां पाठवून दिलें. ही नरकाबद्दलची कल्पना बौद्धसंप्रदायापूर्वींहि असावी असें दिसतें.

वा ङ्‌म यी न म ह त्त्व.- तथापि अंगुत्तरनिकायामध्यें वाङ्‌मयाच्या दृष्टीनें महत्त्वाचा असा फार भाग आहे. यांत कंटाळवाणीं, लांबलचक पुष्कळ प्रवचनें असून मधून मधून आढळणा-या लांबलचक रुक्ष वादांनीं तीं अधिकच कंटाळवाणीं होतात. पहिल्या प्रकरणामध्यें सुरस अथवा सुंदर अशी एक गोष्ट आढळत नाहीं. यांत संपादकीय दडपशाहीचा एक असा चमत्कार आढळतो कीं, बौद्ध संप्रदायांतील नैतिक, मानसशास्त्रविषयक व आचारविषयक जीं अनेक सूत्रें आहेत त्यांबरोबरच कांहीं सूत्रें त्यांचा कोणत्याहि गोष्टींशीं संबंध नसतां केवळ त्यांतील संख्येवरूनच यांत घुसडून दिलेलीं दिसतात. परंतु अशा सूत्रांमध्यें एक प्रकारचा विनोद आढळतो व तो त्यांत एकामागून एक सांगितलेल्या वस्तूंच्या विविधतेवरून उत्पन्न होतो. उदाहरणार्थ, आठव्या प्रकारणामध्यें असें सांगितलें आहे (८,२७): भिक्षूहो, या जगांत आठ शक्ती आहेत. त्या कोणत्या म्हणाल तर, स्त्रियांची शक्ति कजागपणांत चोरांची शस्त्रांत मुलाची शक्ती रडण्यामध्यें राजाची सार्वभौम सत्तेमध्यें, मूर्खांची गर्वामध्यें, शहाण्यांची नम्रतेमध्यें, विद्वानांची विचारामध्यें आणि ब्राह्मण व यति यांची लीनतेमध्यें असते.''

भारतीय काव्यांतील सुभाषितांतून मधून मधून वरील प्रकार आढळतो. अशा त-हेच्या सारख्या गोष्टी एकत्र देण्याची कल्पना बहुधा बरीच प्राचीन असून लोकांच्या आवडीची असावी व त्यामुळें प्रचलित रूढीवरून या संग्रहांतील सूत्रांची अशा त-हेनें विभागणी करण्यांत आली असावी. अंगुत्तरनिकाय याची रचना झाली त्या वेळीं बुद्ध देवरूपाप्रत नव्हे, पण निदान सर्वज्ञ अशा देवयोनित्वाप्रत अगर देवगणत्वाप्रत पोहोंचला होता असें दिसतें. ही गोष्ट प्रवचनें करणा-या बौद्ध भिक्षूंस या सर्व उत्तम गोष्टी तुम्हांस स्वयंस्फूर्तीनें प्राप्त झाल्या अथवा तुम्ही या बुद्धापासून शिकला असा प्रश्न विचारल्याचा उल्लेख आलेला आहे त्यावरून दिसते. वरील इंद्राच्या प्रश्नास बौद्ध भिक्षूंनीं 'जीं सर्व उत्तम वचनें आहेत तीं सर्व बुद्धाचींच आहेत' असें उत्तर दिलें. हें अंधभक्तीचें उदाहरण पुढें दिलेल्या अशोकाच्या प्रौढांपेक्षांहि अधिक आहे. अशोक आपल्या भब्र येथील शासनामध्यें असें म्हणतो. ''बुद्ध जें जें कांहीं बोलला तें सर्व उत्तम आहे.'' याप्रमाणेंच दिव्यावदान या एका उत्तरकालीन संस्कृत ग्रंथामध्यें असें म्हटलें आहे कीं, चंद्र व तारे यांसह आकाश खालीं येईल, पर्वत व वनें यांसह पृथ्वी रसातळास जाईल, सागर आटून जाईल परंतु बुद्ध कधींहि मिथ्या भाषण करणार नाहीं. या साहसी विधानावरून अंगुत्तर निकाय हें अभिधम्म पिटकाचें पूर्वगामी असून त्यानेंच त्यांतील सूत्रांचा पाया घातला असावा असें दिसतें. अंगुत्तरनिकायांतील सूत्रांची संख्या मोठी होण्याचें कारण संयुत्तनिकायांतील सूत्रांप्रमाणेंच आहे.