प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

अस्सलायन सुत्त.- सुत्त नं. ९३ हें प्रसि अस्सलायन सुत्त बुद्धकालीन समाजस्थितीवरून रचलेलें असावें असें दिसतें, व त्यामुळें तें आपणांला विशेष मनोरंजक वाटतें. गौतम बुद्ध हा चारहि वर्णांच्या शुद्धतेबद्दल उपदेश करीत होता हें त्या मानी ब्राह्मणास मोठें विचित्र वाटलें असलें पाहिजे. अस्सलायन आणि गौतम बुद्ध यांच्यामधील संभाषणांसारखे जातिभेदाच्या यथार्थत्वाबद्दल वाद अनेक प्रसंगीं झाले असले पाहिजेत. ब्राह्मणांच्या जातिभेदसमर्थनाविरुद्ध घेतलेले आक्षेप व त्याचें केलेलें खंडन फार मौजेचें आहे. अस्सलायन बुद्धास म्हणतोः 'हे बुद्धा ब्राह्मण म्हणतात कीं, ब्राह्मण हेच सर्वांत उच्च वर्णाचे आहेत; इतर वर्ण त्यांच्याहून कनिष्ठ आहेत ब्राह्मण हे श्वेतवर्णी असून इतर कृष्णवर्णी आहेत. ब्राह्मण हे शुद्ध होतात तसे ब्राह्मणेतर होत नाहींत. ब्राह्मण हे ब्रह्मदेवाचे साक्षात् पुत्र आहेत. ते त्याच्या मुखापासून उत्पन्न झालेले आहेत. ते ब्रह्मबीजापासून उत्पन्न झालेले, ब्राह्मणांनीं वाढविलेले व त्यांचेच वंशज आहेत. यावर बुद्धाचें काय म्हणणें आहे ?' नंतर बुद्धानें अस्सलायन यास एकामागून एक असे प्रश्न विचारले कीं, त्या सर्व प्रश्नांनां त्यास होकारार्थी उत्तर द्यावें लागून ब्राह्मणांचीं विधानें निराधार आहेत असें कबूल करावें लागलें. त्याचे प्रश्न अशा प्रकारचे होते:-

''समजा, एका अभिषिक्त क्षत्रिय राजानें ब्राह्मणक्षत्रियादि सर्व दर्जांचे लोक मिळून १०० निरनिराळ्या जातींचीं माणसें एकत्र केलीं. नंतर प्रत्येकानें साल, चंदन अथवा पद्मक या झाडांच्या लांकडांची एक एक रवी घेऊन ती दुस-या लांकडाच्या उखळांत फिरवून अग्नि उत्पन्न केला. येणेंप्रमाणें चांडाल, व्याध, बुरूड, रथकार, पुक्कस (म्हणजे शुद्र) इ. सर्व जातींच्या लोकांनीं अग्नि उत्पन्न केला, तर ब्राह्मणादिकांनीं चांगलीं लांकडें घेऊन तयार केलेला अग्नि जास्त तेजस्वी व प्रकाशमान असेल काय ? किंवा इतरांनीं तयार केलेला अग्नि अग्नीचीं सर्व कार्यें करणार नाहीं काय ?' अर्थात् अस्सलायन याला दोन्ही अग्नींमध्यें कांहींहि फरक नाहीं असें उत्तर देणें भाग पडलें. तेव्हां गौतमानें त्याचप्रमाणें जातींमध्येंहि फरक नाहीं असें सांगितलें.