प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

उपमांचे प्रयोग - विनयपिटकामध्यें भाषणांतून व वचनांतून उपमांची मुळींच उणीव नाहीं. उदाहरणार्थ, चुल्लवग्गामध्यें (९.१, ३ इ.) महासागराच्या आठ गुणांची बौद्ध मताच्या व संघाच्या नियमांतील मुख्य आठ विशिष्ट गुणांनां उपमा देऊन तिचा फार काळजीपूर्वक परिपोष केलेला आहे. याच ठिकाणीं आपणांला एक वारंवार उद्धृत केलेलें वाक्य आढळतें. तें हें कीं, ज्याप्रमाणें सर्व महासागराच्या पाण्यामध्ये एकच रस (लवण) आहे, त्याचप्रमाणें धर्म आणि नियम यांमध्यें एकच रस मोक्ष हा आहे.