प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

खुद्दक पाठ.- या संग्रहाच्या आरंभीं खुद्दक पाठ हा भाग आहे. यामध्यें ९ लहान लहान सुत्तें असून त्यांचें ज्ञान नवीन बुद्धसंप्रदायांत प्रवेश करणारांनीं अवश्य संपादिलें पाहिजे. हीं सूक्तें मंत्रांप्रमाणें अथवा प्रार्थनेप्रमाणें म्हणावयाचीं असत. हीं नवशिक्यांकरितां प्रथमप्रवेश म्हणून किंवा नित्यप्रार्थना म्हणून रचलीं होतीं, हें सांगतां येत नाहीं. पहिलीं चार सुत्तें फारच लहान आहेत. पहिल्यामध्यें सांप्रदायिक प्रतिज्ञा आहे, दुस-यामध्यें भिक्षूंनां केलेल्या दहा आज्ञा आहेत, तिस-यामध्यें शरीराचा ओंगळपणा व त्याची नश्वरता या गोष्टींचें मनन करतां यावें म्हणून शरीराच्या ३२ भागांचीं नांवें दिलीं आहेत, आणि चवथ्यामध्यें नवशिक्यानें विचारलेले १० प्रश्न असून त्यांच्या उत्तरांमध्यें (अंगुत्तर निकायाप्रमाणें) महत्त्वाच्या सांप्रदायिक मर्यादांचे विवेचन केलें आहे. बाकीचीं पांच लहान लहान सुत्तें असून त्यामध्यें पूजाविधीचे मंत्र असावेत असें त्यांतील विषय व त्यांचें मंत्रासारखें स्वरूप यावरून अनुमान निघतें. फार प्राचीन काळापासून मंगलांनां (शुभदायक गोष्टींनां) भारतवर्षामध्यें फार महत्त्व दिलेलें आढळतें. शुभचिंतन, आशीर्वाद, ब्राह्मणसंतर्पण, पुष्पहार, वाद्य गीत इ. गोष्टी मंगल असून यज्ञभोजनप्रसंगीं, विवाहप्रसंगीं व जननप्रसंगीं यांच्यावांचून चालत नसे. मंगल सुत्तांमध्यें बुद्धानें मंगल कशाला म्हणावे तें सांगितलें आहे. तो म्हणतो : 'मातापितरांस मान देणे, स्त्री व पुत्र यांचें प्रेमानें संगोपन करणें व शांततेनें एखादा धंदा करणें, हें उत्तम मंगल होय. औदार्य, सात्विक वृत्ति, आप्ताबद्दल प्रेम आणि निर्दोष आचरण हें उत्तम मंगल होय. वाइटाचा त्याग आणि त्यापासून दूर रहाणें, मादक पेयापासून, निवृत्ति आणि धर्माज्ञेकडे लक्ष देणें हें उत्तम मंगल होय.'

बाकीच्या सुत्तांतहि अशींच नीतीचीं उच्चतत्त्वें भरलेलीं आहेत. उदाहरणार्थ, रतनसुत्त (नं. ६) यामध्यें असलेल्या मंत्रांनीं पृथ्वी, वायु इ. महाभूतांची व रत्नत्रयाची पूजा करण्याची चाल प्राचीन कालीं होती हें दिसतें. त्याप्रमाणें मृतासंबंधीं असलेल्या पांचव्या सुत्तांतील कांहीं मंत्र अद्यापीहि सिंहलद्वीप व सयाम या देशांत प्रेतसंस्काराच्या वेळीं म्हणण्यांत येतात. ''गुप्तनिधि'' नांवाचें आठवें सुत्त हें यापेक्षां वरच्या दर्ज्याचें आहे. यामध्यें बौद्धानें करावयाच्या संग्रहांमध्यें सत्कृत्यसंग्रह हा श्रेष्ठ होय असें सांगितलें आहे. सर्वांत श्रेष्ठ अशा मेत्त सुत्तामध्यें (नं. ९) सर्व जीवांवर उपकार करणें (मेत्त) हें बौद्ध संप्रदायाचें सर्वांत मुख्य तत्त्व म्हणून त्याची स्तुति केली आहे.

या नऊ सुत्तांतील सात सुत्तें अद्यापीहि परित्ताविधीमध्यें ज्याला सिंहलद्वीपांतील बौद्ध 'पिरित' म्हणतात- उपयोगांत आणितात. परित्ता या शब्दाचा अर्थ ''रक्षण'' अथवा ''निवारण [परित्राण]'' असा असून तिपिटकामध्यें त्याचा 'पिरित' अथवा 'मंत्र' किंवा ''आशीर्वाद'' या अर्थी उपयोग केलेला आहे. सध्यां सिलोनमध्यें परित्ता (सिंहली-पिरित) या शब्दाचा अर्थ कोणतीहि पीडा निवारण करण्यासाठीं भिक्षूंनीं धर्मशास्त्रांतील विवक्षित सुमारें ३० मंत्र पठन करण्याची क्रिया असा होतो. हा परित्ताविधि सर्व प्रसंगीं करण्यांत येतो. (उदाहरणार्थ, नवीन घर बांधावयाचें झाल्यास, कोणी मरण पावल्यास अथवा कोणी आजारी पडल्यास वगैरे. के. सेडन्स्टुकर याच्याप्रमाणें विंटरनिट्झचें मतहि असेंच आहे कीं, पांच ते नऊ हीं सूत्रें तांत्रिक मंत्रांसारखीं दिसतात, आणि पहिल्या चार सूत्रांचे रूप ठराविक सांच्याप्रमाणें दिसतें. यावरून खुद्दकपाठ याची रचना सध्यां सिंहलद्वीपांत प्रचारांत असलेल्या परित्ताविधीतील मंत्राप्रमाणेंच त्या कालीं विशिष्ट विधीकरितां झाली होती असें मानावयास हरकत नाहीं.

धम्मपद.- धम्मपद हा बौद्धसंप्रदायिक ग्रंथ फार प्राचीन कालापासून सर्वविश्रुत असा असून त्याचें यूरोपीय भाषांमध्यें अनेकदां भाषांतर झालें आहे. बौद्ध ग्रंथांमध्यें यांतील अवतरणें विशेष आलीं आहेत. आणि नीतिदृष्ट्या तो विशेष महत्त्वाचा असल्यामुळें त्याला फार मान्यता मिळालीं आहे. या ग्रंथामध्यें बौद्धसांप्रदायिक नीतितत्त्वविषयक सुभाषितांचा संग्रह आहे. यामध्यें ४२३ श्लोक असून एकाच विषयाबद्दलचे अथवा दृष्टांताबद्दलचे (उदाहरणार्थ, वग्ग ४ पुष्पवग्ग), अथवा ज्यामध्यें एक विशिष्ट चरण आढळतो असे, दहा वीस श्लोक एकत्र करून निरनिराळे वर्ग (वग्ग) पाडलेले आहेत. हे वर्ग पाडण्याचें काम संग्रहकारानें केलें असावें. परंतु कांहीं ठिकाणीं कित्येक श्लोक मिळूनच पूर्ण कविता होते. उदाहरणार्थ, श्लोक १९७ ते २०० पहा. त्यांचा अर्थ येणेंप्रमाणें:-

''अहाहा, सभोंवतालच्या द्वेषग्रस्त लोकांमध्यें स्वतः पूर्णपणें द्वेषवर्जित असलेले आम्ही किती तरी सुखानें काळ कंठीत आहोंत.

''या द्वेषग्रस्त लोकांमध्यें आम्हीच काय ते द्वेषवर्जित असे आहोंत.''

''अहाहा, सभोंवतालच्या व्याधिग्रस्त अशा लोकांमध्यें व्याधिमुक्त असलेले आम्ही किती तरी सुखानें काळ कंठीत आहोंत.

''या व्याधिग्रस्त लोकांमध्यें आम्हीच काय ते व्याधिमुक्त असे आहोंत.

''अहाहा, सभोंवतालच्या लोभाविष्ट लोकांमध्यें लोभवर्जित असलेले आम्ही किती तरी सुखानें काळ कंठीत आहोंत.

''या लोभाविष्ट लोकांमध्यें आम्हीच काय ते लोभवर्जित असे आहोंत.

''अहाहा, आमच्याजवळ कांहीं धनदौलत किंवा मालमत्ता नसतांहि आम्ही किती तरी सुखानें काळ कंठीत आहोंत. तेजःपुंज देवतांप्रमाणें आम्ही आनंदपूर्वक सुखाचा अनुभव घेत आहोंत.''

कांहीं श्लोकयुग्में विशेष लोकप्रिय झालीं आहेत. श्लोक ३३५-३६ हें अशा प्रकारच्या श्लोकयुग्माचें उदाहरण आहे. त्यांचा अर्थ पुढें दिल्याप्रमाणें आहे:-

''जो तृष्णेच्या व विषयवासनांच्या ताब्यांत गेला आहे त्याचीं दुःखें रानाप्रमाणें वाढतात.

''जो दुर्निवार अशा या तृष्णेस आपल्या ताब्यांत ठेवतो त्याचीं दुःखें कमलपत्रावर पडणा-या जलबिंदूप्रमाणें नाहींशीं होतात.''

बौद्ध संप्रदायांतील प्रसिद्ध सुभाषितें बहुतेक धम्मपदांतील आहेत. उदाहरणार्थ, बुद्धाला साक्षात्कार झाल्यानंतर बुद्धानें म्हटलेले श्लोक पहा (१५३ व पुढील). हे श्लोक असे : ''या मंदिरांची रचना करणा-याच्या शोधाकरितां मी अनेक जन्म तळमळ केली. ही पुनर्जन्माची परंपरा फार दुःखमय आहे. हे मंदिरे बांधणा-या, तूं आतां सांपडला आहेस, आतां तुला पुन्हां मंदिर बांधतां येणार नाहीं. त्याच्या तुळ्या मोडून गेल्या आहेत व त्याचें छप्पर नाहींसें झालें आहे. माझें हृदय मोकळें झालें आहे, त्यांतील तृष्णा नष्ट झाली आहे.''  यांतील चित्र फार साधें पण सुंदर आहे. वासना ही मंदिरें बांधणारी असून ती पुन्हां पुन्हां नवे मंदिर बांधते - म्हणजे पुन्हां जन्म घेऊन नवीन देह धारण करावयास लावते.'' या अशा त-हेचे साधे परंतु मनावर ठसणारे देखावे व दृष्टांत आपणांला या सुभाषितांतून ठिकठिकाणीं आढळतात. साधूच्या शांतीची तुलना गंभीर अशा जलाशयाशीं, गुळगुळींत अशा आरशाशीं, व अचल शिलेशीं केली आहे (८१ व पुढील). एका ठिकाणीं म्हटलें आहे कीं, ज्याप्रमाणें कढीचा स्वाद आंतील पळीला मिळत नाहीं, त्याप्रमाणें साधूच्या सहवासापासून मूर्खाला कांहीं लाभ मिळत नाहीं; आणि कढीचा स्वाद ज्याप्रमाणें फक्त जिभेलाच कळतो त्याप्रमाणें साधूच्या सहवासापासून फक्त साधूलाच फायदा मिळतो (६५ व पु.). ज्याप्रमाणें गाडीला जोडलेल्या पशूच्या पावलामागोमाग चाक येतें, त्याप्रमाणें जो अशुद्ध मनानें कोणतीहि गोष्ट करतो अथवा बोलतो, त्याच्यामागें पीडा लागते. परंतु जो शुद्ध मनानें कोणतीहि गोष्ट करतो अथवा बोलतो, त्याला त्याच्या पाठीमागून येणा-या सावलीप्रमाणें निरंतर सुख मिळतें (५० व पु.) जसें दुधाचें ताबडतोब दहीं होतें, तसें कांहीं एखाद्यानें केलेल्या दुष्कृत्याचें फळ तात्काल मिळत नाहीं; दुष्कृत्य राखेनें झांकलेल्या अग्नीप्रमाणें धुमसत राहून नंतर त्याचा परिणाम तें करणा-या मूर्खावर होतो (७१). अशा प्रकारचे दृष्टांत आपणांला वरचेवर आढळतात; व पुष्कळ ठिकाणीं ते जोडीनें दिलेले असतात. कांहीं ठिकाणीं हीं सुभाषितें भारतीयांच्या विशेष आवडीच्या अशा शब्दावरील कोठ्यांत व श्लेषादि शब्दालंकार यांमध्यें ग्रथित केलेलीं आढळतात (नं. ३४४).

धम्मपदांतील निम्म्यापेक्षां अधिक श्लोक पाली धर्मशास्त्रांतील इतर ग्रंथांत आढळतात. आणि सध्यां आपणांला ते ज्या ग्रंथांमध्यें दिसतात त्यांतूनच या संग्रहकारानें ते घेतले असावेत याबद्दल संशय नाहीं. तथापि या संग्रहामध्यें असलेलीं कांहीं सुभाषितें मूळचीं बौद्ध नसून तीं तत्कालीन भारतवर्षांमध्यें प्रचलित असलेल्या म्हणी व सुबोधवचनें यांवरून घेतलेलीं आहेत. हींच वचनें मनूच्या धर्मशास्त्रामध्यें, महाभारतामध्यें, जैनांच्या सांप्रदायिक ग्रंथांमध्यें, पंचतंत्रांतील कथांमध्यें वगैरे ठिकाणीं शिरलीं. अशा त-हेचीं वचनें अथवा म्हणी हीं प्रथम कोणत्या ग्रंथांतून आलीं हें सांगणें अशक्य आहे.