प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

चरियापिटक.- खुद्दनिकायांतील शेवटला ग्रंथ चरियापिटक हा होय. यामध्यें ३५ पद्यमय जातकांचा संग्रह असून त्यांमध्यें बोधिसत्त्वाच्या ठायीं त्याच्या निरनिराळ्या जन्मांमध्यें सर्व पारमिता कशा पूर्णपणें बसत होत्या हें सांगितले आहे. औदार्य व सदगुण या दोन पारमितांनां प्रत्येकी एक एक प्रकरण दिलें असून त्यामध्यें दहा दहा गोष्टी आहेत. तिस-या प्रकरणामध्यें बाकीच्या पारमितीच्या उदाहरणादाखल पंधरा गोष्टी सांगितल्या आहेत. या सर्व गोष्टी बुद्धाच्या तोंडी घातल्या आहेत. त्यानें या सर्व गोष्टी थोडक्या शब्दांत निरनिराळ्या प्रसंगांचें वर्णन करून व कांहीं ठिकाणीं निरनिराळ्या प्रसंगांचा केवळ उल्लेख करून सांगितल्या आहेत. यावरून ते प्रसंग सर्वांच्या माहितीचे असून त्यांचे केवळ स्मरण करून देणें हेच कांहीं अशा या गोष्टीचे कार्य असावें असें वाटतें. यांपैकीं ब-याच गोष्टी जातक ग्रंथांमध्यें येऊन गेल्या आहेत, आणि या ठिकाणी एखादा पारमिता पूर्णपणें मनावर ठसविण्याकरितां जरूर तेवढाच भाग सांगितला आहे. मूळ गोष्टींतील काव्यकल्पना व विनोद यांनां मुद्दामच फांटा दिल्याप्रमाणें दिसतो. एखाद्या पारमितेबद्दल उदाहरण देतां यावें म्हणून कांहीं गोष्टींनां तसेच वळण दिलेले आढळतें. उदाहरणार्थ, माकडाने फसविलेल्या मगराचा गोष्ट पहावा. जातक नं. २०८ मध्यें पंचतंत्राप्रमाणें त्या मगराने त्याच्या स्त्रीला वानराचे काळीज खावें अशी इच्छा झाल्यावरून वानराकरितां टपून बसून त्याला मारण्याकरितां फुसलावून आणिलें, परंतु वानराने आपलें काळीज नदीकांठच्या एका झाडावर टांगून ठेविलें आहे असें सांगून त्या मगराला चकविलें, ही गोष्ट फार विनोदी भाषेमध्यें सांगितली आहे. जातक नं. ५७ या गोष्टीतील विनोद थोडा कमी दर्जाचा आहे, परंतु चरियापिटक (३, ७) यामध्यें विनोदाला अजीबात फांटा दिलेला आहे. ही गोष्ट बुद्धाने अशी सांगितली आहे:-

'मी एकदां वानराच्या जन्मांत असून नदीतीरावरील एका गुहेत रहात असे. एकदां मला एका मगराच्या धास्तीमुळे बाहेर पडतां आले नाहीं. ज्या ठिकाणावर उभा राहून मी पलीकडील तीरावर उडी मारून जात असे, त्याच ठिकाणीं तो माझा घातक शत्रु भयंकर मगर बसला होता. त्याने मला हांक मारिला, इकडे ये; मी उत्तर दिले. हा आलों, आणि त्याच्या डोक्यावर उभा राहून पेलीकडील तीरावर गेलों. मी त्याच्याजवळ खोटे बोललो नाही, अगदी आपल्या शब्दाप्रमाणें वागलो. सत्याच्या प्रीतीमध्यें माझा कोणीहि बरोबरी करूं शकणार नाहीं. याप्रमाणें माझी सत्यपारमिता होती.'

या ठिकाणीं मूळ गोष्टीचा अर्थविहीन असा केवळ सांगाडा आपल्या दृष्टीस पडतो. तींतील मुख्य भाग जे तात्पर्य तें जातक नं. ५७ याप्रमाणेच असून मूळ गोष्टीला भिंतीवर कागद डकवावा त्याप्रमाणें चिकटविलेले दिसतें. त्याप्रमाणेच वेस्संतर जातक जे जातकग्रंथामध्यें ७८६ पद्यांचें महाकाव्य म्हणून आढळते, तें चरियापिटक (१,९) यामध्ये ५८ भिकार पद्यांमध्यें आणिलें असून त्यामध्यें भूकंप इत्यादि चमत्कारांवरच अधिक जोर दिलेला आढळतो. मूळ महाकाव्यांतील फक्त पांचच पद्यें येथें शब्दशः आलेलीं आढळतात.

चरियापिटक आणि जातकग्रंथ यांमधील संबंधाबद्दल आपणांला दोन कल्पना करतां येतील. प्रारंभीं जातकांचें मुख्य कार्य पारमितांचे विशदीकरण हे असावें. प्रथमतः तीं ३४, ३५ गोष्टींचा एक लहानसा संग्रह असून त्याचाच पुढें वाढत वाढत ५५० गोष्टींचा जातकग्रंथ झाला असावा, आणि त्याचा मूळ उद्देश बाजूला राहिला असावा. याच जातकग्रंथावरून पुढें चरियापिटक ग्रंथ तयार केला असावा. अथवा असेंहि शक्य आहे कीं, जातक ग्रंथामध्यें सध्यां आपणांला आढळणा-या गोष्टी विशेष गंभीर वृत्तीच्या भिक्षूंनां अगदींच लौकिक वाटल्यामुळें त्यांनीं जातकांनां थोडेसें तात्त्विक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असावा; व याकरितां त्यांनीं कांहीं जातकांची निवड करून त्यांची दहा पारमितांच्या अनुरोधानें रचना करून त्यांचें स्वरूप आपणांला पाहिजे तसें बदलून घेतलें असावें. विंटरनिट्झ यास दुसरी कल्पनाच जास्त शक्य दिसतें, आणि त्याच्या मतें सध्यांच्या जातकसंग्रहावर चरियापिटकाची थोडी फार छाया पडलेली दिसते. या प्रारंभीच्या गोष्टींचा पारमितांशीं कांहींहि संबंध नसावा असें तो म्हणतो. याचें कारण तो असें देतो कीं, जातक कथांतील अनेक कथांनां केवळ वरवर सांप्रदायिक स्वरूप दिलें असून त्यांमध्यें या पारमितांचा उल्लेख कोठेहि आढळत नाहीं. ख्रिस्तपूर्व तिस-या शतकामध्यें जेव्हां चरियापिटक धर्मशास्त्रामध्यें समाविष्ट करण्यांत आलें. त्या वेळच्याच स्वरूपामध्यें तें हल्लीं उपलब्ध आहे कीं काय हा दुसरा प्रश्न आहे. जातकग्रंथाचा प्रास्तविक भाग जो निदानकथा त्यामध्यें एका चरियापिटकाचा गोषवारा दिला आहे, परंतु तें प्रस्तुत ग्रंथाहून अगदींच निराळें आहे. त्यामध्यें एकंदर ३४ गोष्टी असून त्यांपैकीं २१ प्रस्तुत चरियापिटकाशीं जुळतात. यावरून चरियापिटकाचें अनेक भिन्न पाठ होते असें दिसतें. परंतु या दोन पाठांचा व जातकमालेची पारमितांच्या दृष्टीनें रचना करून तुलना केली असतां शार्पेटिये याने प्रयत्न केल्याप्रमाणें आपणांला मूळ चरियापिटकाची रचना करतां येईल असें विंटरनिट्झ यास वाटत नाहीं. शार्पेंटिये यानें असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे कीं, प्रस्तुत चरियापिटक हें अपूर्ण व अलीकडील असा बनावट ग्रंथ असून, तें कांहींसा मूळ ग्रंथाचा आधार घेऊन उपलब्ध जातकग्रंथाच्या नंतर-बहुधा धर्मग्रंथांचे पालीमध्यें भाषांतर झाल्यानंतर-ख्रिस्त शक ४३० या सुमारास रचलें गेलें असावें. परंतु प्रस्तुत जातकग्रंथ व चरियापिटक यांतील जातकांमध्यें आढळणारे अर्थसादृश्य व शब्दसादृश्य यांचा असाहि एक प्रकारें खुलासा करितां येईल कीं, जेव्हां धर्मशास्त्रीय ग्रंथ संगृहीत करून निश्चित करण्यांत आले, तेव्हां जे अनेक भिक्षू जमले होते, त्यांमध्यें कांहीं थोड्या स्वतंत्र विचारांचे जे भिक्षू होते त्यांनीं जातकठ्ठवण्णनामध्यें आढळणा-या गोष्टींचा संग्रह केला; आणि दुसरे जे जास्त कडक भिक्षू होते, त्यांनीं चरियापिटकांतील गोष्टींचा संग्रह केला. कसेंहि असले तरी चरियापिटकाची रचना करणारा भिक्षु सरळ वृत्तीचा असून त्याच्या ठिकाणीं कवित्व शक्तीचा अभाव दिसतो. उलटपक्षीं जातकग्रंथांतील गोष्टीची रचना करण्या-यांमध्यें कांहीं सात्त्विक भिक्षू व अडाणी कवी असून थोडेसे अलौकिक कवीहि असावे.

याप्रमाणें आपणांला असें अनेक ठिकाणीं आढळून येते कीं, खुद्दक निकायामध्यें निरनिराळ्या कालच्या व बहुधा निरनिराळ्या पंथांच्या सर्व त-हेच्या ग्रंथांचा समावेश करण्यांत आला होता, आणि त्यांच्या धर्मशास्त्रांतील महत्त्वाबद्दलहि संशयच होता.