प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.

तत्कालीन लोकांच्या आयुष्यक्रमाची माहिती देणा-या कथा - दुस-या कांहीं कथांवरून प्राक्कालीन भारतवर्षीय लोकांच्या आयुष्यक्रमाची आपणांस माहिती मिळते, म्हणून त्या आपणांस महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, उपालीनें पुढें काय करावें याबद्दल त्याच्या मातापितरांमध्यें जो विचार चाललेला आहे, तो मोठा गमतीचा आहे. त्यानें कारकुनी केली असतां त्याची बोटें दुखतील, त्यानें गणित केलें तर त्याच्या छातींत दुखूं लागेल व तो चित्रकला शिकल्यास त्याचे डोळे बिघडतील. म्हणून त्याच्या आई-बापांनीं त्याला भिक्षु होऊं देण्याचा निश्चय केला. कारण, पोटाला मिळविण्याचा हा सर्वांत सोपा मार्ग होता. त्याप्रमाणेंच जीवक या वैद्याच्या गोष्टी तत्कालीन संस्कृतीच्या इतिहासाच्या दृष्टीनें महत्त्वाच्या आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांमध्यें बराचसा गमतीचा विनोदहि आढळून येतो. त्यांतील एक लहानसा उतारा येथें देतों.

राजगृह हें वैशलीइतकेंच महत्त्वाचें व प्रसिद्ध शहर होतें. वैशाली येथील वेश्या अंबपाली हिनेंहि त्याच्या वैभवांत बरीच भर टाकली होती. ती एका रात्रीबद्दल ५० सुवर्णमुद्रा घेत असे.

राजगृहाचें वैभव वाढविण्याकरितां तेथील राजाच्या आज्ञेवरून सालवती या सुंदर व सुशिक्षित वेश्येची तेथे स्थापना करण्यांत आली. ती एका रात्रीबद्दल १०० सुवर्णमुद्रा घेत असे. पुढें ती गर्भवती झाली. परंतु धंद्याकरितां ही गोष्ट तिनें गुप्त ठेविली, व पुत्र झाल्यावर त्याला तिने एका टोपलींत घालून नदींत सोडून दिलें. ते मूल राजा अभय यास सांपडलें, व त्यानें त्याचें जीवक असें नांव ठेवून त्याचें पालनपोषण केलें. जीवक मोठा झाल्यावर तो तक्षशिला येथें एका प्रसिद्ध वैद्याकडे शिष्य म्हणून राहिला. तेथें ७ वर्षें शिक्षण घेतल्यानंतर तो परीक्षेंत उत्तीर्ण झाला. ती परीक्षा अशी : त्याच्या गुरूनें त्याला एक खोरें देऊन तक्षशिलेच्या आसमंत भागांत फिरून ज्यांचा औषधीच्या कामीं उपयोग होणार नाहीं अशा सर्व वनस्पती शोधून आणण्यास पाठविलें. जीवकानें परत येऊन सांगितलें कीं, मी पुष्कळ हिंडलों. परंतु अशा त-हेची वनस्पती मला एकहि सांपडली नाहीं. या उत्तरानें त्याच्या गुरूचें समाधान होऊन त्यानें त्यास प्रवासाकरितां द्रव्य देऊन जावयास निरोप दिला.

जीवकाच्या जवळचें द्रव्य लवकरच संपल्यामुळें पोटाकरितां कांहीं मिळवावें म्हणून एका गांवीं त्यानें आपण वैद्य आहों असें प्रसिद्ध केलें. तेथील एका धनाढ्य व्यापा-याची बायको आजारी आहे असें त्यास कळलें. तिला उपचार करतांना जीवकानें तिच्या नाकांत कांहीं तूप ओतलें. तें तिच्या तोंडात गेलें, तेव्हां तिनें तें बाहेर थुंकून आपल्या मोलकरणीस ते भरून ठेवण्यास सांगितलें. हें पाहून बाई कंजूष आहे अशी जीवकाची समजूत होऊन त्यास पारितोषिकाबद्दल काळजी वाटूं लागली. तेव्हां त्या बाईने आपण कंजूष नसून सुगृहिणी आहोंत अशी जीवकाची खात्री केली. कारण, तूप चाकरांनां कोठें चोळण्यास अगर दिव्यांत जाळण्यास उपयोगीं पडेल असें ती म्हणाली. पुढें ती बरी होऊन तिनें त्याला चार हजार सुवर्णमुद्रा दिल्या. त्याप्रमाणेंच, तिचा मुलगा, सून व नवरा यांपैकीं प्रत्येकानें त्याला चार चार हजार सुवर्णमुद्रा दिल्या. याखेरीज तिच्या नव-यानें त्याला एक दास, एक दासी व एक रथ बक्षीस दिला. पुढें तो राजगृहास परत आला व आपले पालनपोषण केल्याबद्दलचे उपकार स्मरून त्यानें स्वतःला मिळालेलें द्रव्य राजा अभय यास अर्पण केलें. परंतु राजानें ते त्याचें त्यासच देऊन त्याला राजगृह येथेंच कायमची वस्ती करून राहण्यास सांगितलें.

पुढें वृद्ध राजा बिंबिसार याची जीवकानें एका वाईट रोगापासून मुक्तता केल्यामुळें तो राजवैद्य झाला. त्याने कित्येक असाध्य रोगी बरे केले होते. एकदां राजगृहांतील एक मोठा व्यापारी फार आजारी पडला. सर्व वैद्यांनीं त्याचा रोग असाध्य ठरविला. तेव्हां राजानें आपल्या वैद्यास त्याला उपचार करण्याची परवानगी दिली. जीवकानें प्रथम एक हजार सुवर्णमुद्रांचे परितोषिक मागितलें व तितकेंच राजाकरितांहि ठरविलें. नंतर त्यानें व्यापा-यास विचारलें कीं, तुला प्रथम एका कुशीवर, नंतर दुस-या कुशीवर आणि अखेरीस पाठीवर प्रत्येक वेळीं एकसारखें सात महिने त्याच स्थितींत निजून राहतां येईल काय ?   त्या रोग्यानें ती गोष्ट कबूल केली. तेव्हां जीवकानें त्याला बिछान्याला बांधून टाकलें, व त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करून त्यांतून दोन किडे बाहेर काढून जखम शिवून टाकिली. याच किड्यांनीं त्याच्या जीवितावर गदा आणिली होती. परंतु या रोग्याला एकाच स्थितींत सात महिन्यांच्या ऐवजीं जेमतेम सातच दिवस पडून राहतां आलें. तथापि सात दिवसांच्या अखेरीस तो रोगी बरा झाला. तेव्हां जीवकानें सांगितलें कीं, मीं रोग्याकडून सात महिन्यांचा करार करून घेतला, म्हणून रोगी सात दिवस तरी एका स्थितींत राहूं शकला; नाहीं तर तो तितकेहि दिवस राहिला नसता.

याप्रमाणें जीवकाच्या चातुर्याच्या व कौशल्याच्या ब-याच गोष्टी आढळतात. जीवक हा बुद्धाला वैद्यकी उपचार करीत असे व संघालाहि त्याची बरीच मदत असे.