प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ११ वें.
तिपिटक अथवा पाली धर्मशास्त्र.
तिपिटकेतर बौद्ध वाङ्मय.- तिपिटकाशिवाय बौद्ध वाङ्मयांत दुसरेहि अनेक ग्रंथ आहेत. यांपैकीं कांहीं पाली भाषेंत, कांहीं मिश्र संस्कृतांत व कांहीं शुद्ध संस्कृतांत लिहिलेले आहेत. तिपिटकेवर पाली वाङ्मयासंबंधानें लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं त्यामध्यें एक मिलिंदपन्ह हा अपवार खेरीज करून दुसरा कोणताहि ग्रंथ खुद्द हिंदुस्थानांत लिहिलेला नाहीं. बौद्ध वाङ्मयांत आजपर्यंत झालेल्या या ग्रंथांची संख्या इतकी मोठी आहे कीं त्यांच्या स्वरूपाचा परिचय करून देण्याकरितां त्यांतील कांहीं मुख्य मुख्य ग्रंथांचा केवळ सूचिरूपानेंच येथें उल्लेख करतां येण्यासारखा आहे.
पाली ग्रंथ.
मि लिं द प न्ह.- मिनँडर व नागसेन नामक बौद्ध प्रचारक यांमधील संवाद. हा भरतखंडांत ख्रिस्ती शकाच्या आरंभीं रचला गेला असावा.
नि दा न क था.- म्ह. आरंभींच्या गोष्टी. बुद्धाचें संगतवार लिहिलेलें पाहिलें चरित्र. हा सिंहलद्वीपांत रचला गेला.
गं ध वं स.- हा बहुधा १७ व्या शतकांत ब्रह्मदेशांत नंदपञ्ञ नामक ब्रह्मी इसमानें लिहिला असावा.
बु द्ध घो षा चे ग्रं थ.- जातकटीका; विसुद्विमग्ग (शुद्धतेचा मार्ग, सांप्रदायिक विधी व संस्कार याची माहिती); समंतपासादिका (विनय पिटकावरील टीका); समंगलविलासिनी (दीघनिकायावरील टीका); पपंचसूदनी (मज्झिम निकायावरील टीका); सारत्थपकासिनी (संयुत्त निकायावरील टीका); मनोरथपूरणी (अंगुत्तर निकायावरील टीका); कंखावितरणी (पातिमोक्खावरील टीका); परमत्थकथा (अभिधम्म पिटकांतील सात ग्रंथांवरील टीका); खुद्दक पाठ, धम्मपद, सुत्तनिपात, जातक आणि अपदान यांवरील टीका.
प र म त्थ दी प नी.- पेतवत्थु, विमानवत्थु, थेरगाथा व थेरीगाथा या ग्रंथांवरील धम्मपालाची ख्रिस्ती शकाच्या ५ व्या किंवा ६ व्या शतकांत लिहिलेली टीका.
ने त्ति (संगतिसूत्र).- कच्चायनाच्या नांवावर असलेला पण मूळ ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत लिहिलेला ग्रंथ.
पे ट को प दे स.- पिटकाच्या अभ्यासकास उपदेश. कच्चायनाच्या नांवावरील दुसरा एक ग्रंथ.
दी प वं स.- ख्रिस्ती शकाच्या ४ थ्या ५ व्या शतकांत अठ्ठकथांवरून महाकाव्य रचण्याचा सिंहलद्वीपांत केला गेलेला पहिला अर्धवट प्रयत्न.
म हा वं स.- सिंहलद्वीपांतील महानाम नामक कवान ५ व्या शतकाच्या चतुर्थ पादांत रचलेलें एक स्वतंत्र व पूर्ण महाकाव्य.
म हा बो धि वं स किं वा बो धि वं स.- बोधिवृक्षाची उपतिस्स नांवाच्या भिक्षूनें १० व्या शतकाच्या अखेरीस रचलेली गद्यात्मक गोष्ट.
दा ठा वं स.- धम्मकित्ति यानें १३ व्या शतकांत संस्कृतच्या धर्तीवर पालींत लिहिलेली बुद्धाच्या दातांची गोष्ट.
थू प वं स.- पवित्र स्थानाची गोष्ट; काल-तेरावें शतक; भाषा-सिंहली व पाली; रचणार - वाचिस्सर.
च के स धा तु वं स.- हा ब्रह्मदेशांत रचला गेला.
शा स न वं स.- पञ्ञसामि भिक्षूनें १८६१ त ब्रह्मदेशामध्यें लिहिलेला पाली ग्रंथ.
खु द्द सि क्खा व मू ल सि क्खा.- हे अनुक्रमें महासामि व मूलसिरि यांनीं इ. स. ४४० त रचले असून त्यांत विनय पिटकांतील नियमांचा सारांश आहे.
ध म्म सं ग्र ह व सा र सं ग्र ह.- धम्मकित्तीचे बौद्ध मतावरील ग्रंथ.
द्वे मा ति का व कं खा वि त र णी.- ब्रह्मदेशांत सिक्खांप्रमाणेंच हेहि फार उपयुक्त समजले जातात.
अ भि ध म्म त्थ सं ग्र ह.- मानसशास्त्रावरील व नीतिशास्त्रावरील लहानसें बौद्ध पुस्तक.
पं च ग ति दी प न.- पातालादि लोकांचें वर्णन करणारें काव्य.
लो क दी प सा र.- १४ व्या शतकांतील मेधंकराचा वरच्याप्रमाणेंच एक ग्रंथ.
अ ना ग त वं स.- भविष्य कालाची गोष्ट.
पा र मी म हा श त क.- १४ व्या शतकांतील कोण्या एका धम्मकित्तीचें पाली काव्य.
स द्ध म्मो पा य न.- सद्धर्माचीं साधनें व मार्ग.
प ज्ज म धु.- बुद्धप्पिय याचें बुद्धस्तुतिपर ११०० च्या सुमाराचें पाली काव्य.
ते ल क टा ह गा था.- कल्याणीच्या तिस्स राजाची गोष्ट असलेलें १२ व्या शतकापूर्वीचें पाली काव्य.
जि ना लं का र.- बुद्धरक्खिताचें बुद्धाची गोष्ट वर्णन करणारें काव्य.
जि न च रि त.- वनरत मेधंकर याचें १३ व्या शतकांतील बुद्धचरित्रपर काव्य.
मा ला लं का र व त्थु.- ब्रह्मींत भाषांतर झालेलें एक बुद्धचरित्रपर पाली काव्य.
र स वा हि नी.- सिंहलींतून पालींत भाषांतरिलेला हिंदुस्थानविषयक व सिंहलद्वीपकविषयक गोष्टींनीं भरलेला वृत्तान्तपर ग्रंथ.
बु द्धा लं का र.- आवामधील सीलवंस कवीनें पंधराव्या शतकांत रचलेला ग्रंथ.
वे स्सं त र जा त क.- पद्यात्मक तर्जुमा.
रा जा धि रा ज वि ला सि नी.- आठराव्या शतकांतील ब्रह्मदेशांत लिहिला गेलेला गद्य ग्रंथ.
शुद्ध वि मिश्र संस्कृत भाषेंतील बौद्ध वाङ्मय.
ल लि त वि स्त र.- महायानी पंथाचा ग्रंथ. याचा सारांश मागें आठव्या प्रकरणांत दिलाच आहे.
म हा व स्तु.- बुद्धचरित्रपर ग्रंथ. हीनयानाच्या जुन्या संप्रदायाचें मिश्र संस्कृत भाषेंत ख्रि. पू. तिस-या शतकांत लिहिलेलें गद्यपद्यात्मक पुस्तक.
अ श्व घो षा चे ग्रं थ.- बुद्धचरित (बुद्ध चरित्रावर एक सुंदर काव्य, हा चिनी व तिबेटी भाषांत भाषांतरलेला आहे); सौन्दरानंद (बुद्धचरित्रपर दुसरें एक काव्य); सूत्रालंकार (यांत हीनयानी धोरणाचीं अनेक कथानकें आहेत. हा इ. स. च्या दुस-या शतकांत रचला गेला) वज्रसूचि (धर्मकीर्तीनें रचलेला ब्राह्मणांच्या जातिकल्पनेचें सूक्ष्मपणानें खंडन करणारा ग्रंथ); महायानश्रद्धोत्पाद (कर्ता निश्चित नाहीं); शतपंचाशतिकनामस्तोत्र (इत्सिंग हा हें स्तोत्र मात्रचेतनामक कवीनें लिहिलेलें आहे असें म्हणतो. हें फार लोकप्रिय आहे); हे सर्व ग्रंथ इ. स. च्या दुस-या शतकांत रचले गेले.
जा त क मा ला.- आर्यशूराचा चौथ्या शतकांतील ग्रंथ.
अवदान वाङ्मय.
अ व दा न श त क.- शंभर अवदानांचा संग्रह. हा हीनयान पंथाचा ग्रंथ दुस-या शतकांत रचला गेला. अवदान म्हणजे धार्मिक अथवा नैतिक आचारकृत्यांचा इतिहास.
क र्म श त क.- अवदानशतकाशीं बरेंच साम्य असलेला ग्रंथ. याचें फक्त तिबेटी भाषांतर उपलब्ध आहे.
दि व्या व दा न.- आरंभीं महायानी पंथाचें स्तवन असलेला हीनयान पंथाचा तिस-या शतकांत संगृहीत केलेला ग्रंथ. यापैकीं अशोकावदानचक्र इ. स. च्या तिस-या शतकांत चिनी भाषेंत भाषांतरित केलें गेलें.
क ल्प द्रु मा व दा न मा ला / र त्ना व दा न मा ला / अ शो का व दा न मा ला - महायान पंथाचे वीरकाव्यग्रंथ. या तीन गोष्टी अशोक व उपगुप्त यांमधील संभाषणरूपानें घातलेल्या आहेत.
द्वा विं श त्य व दा न.- यांत अवदानशतकातील ब-याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत.
भ द्र क ल्पा व दा न.- उपगुप्तानें अशोकाला सांगितलेला चौतीस गोष्टींचा पद्यात्मक संग्रह.
व्र ता व दा न.- यांत व्रत्तें व उत्सव यांच्या उपक्रमासाठीं शोधून काढलेल्या गोष्टी अशोक व उपगुप्त यांच्या संवादरूपानें दिल्या आहेत.
वि चि त्र क र्णि का व दा न.- यांत अवदानशतकांतून घेतलेल्या व व्रतावदानाच्या नमुन्याच्या गोष्टी आहेत.
सु मा ग धा व दा न.- चिनी व तिबेटी भाषांत उपलब्ध असलेली सुमागधा नांवाच्या मुलीची गोष्ट.
अ व दा न क ल्प ल ता.- काश्मिरी कवि क्षेमेंद्र याचा अकराव्या शतकांतील एक अवदानसमुच्चय.
महायान सूत्रें.
स द्ध र्म पुं ड री क.- महायान पंथाच्या विशिष्ट तत्त्वांची व गुणावगुणांची माहिती करून देणारा इ. स. २०० च्या सुमारास झालेला ग्रंथ. याचें चौथ्या शतकांत चिनी भाषेंत भाषांतर झालें.
अ व लो कि ते श्व र गु ण का रं ड व्यू ह.- सर्व प्राण्यांनां जो अमर्याद त-हेनें अवलोकन करतो त्या अद्भुत उद्धारक अवलोकितेश्वर या आदर्शभूत बोधिसत्त्वाची स्तुति असलेला ग्रंथ. याचें इ. स. २७० च्या सुमारास चिनी भाषेंत भाषांतर झालें.
सु खा व ती व्यू ह.- यांत बुद्धमिताभाची स्तुति आहे. याचें प्रथम दुस-या शतकांत व नंतर बाराहूनहि अधिक वेळां चिनी भाषेंत भाषांतर झालें.
अ मि ता यु र्ध्या न सू त्र.- यांत अमितायूंचें ध्यान करण्याची शिफारस आहे.
गं ड व्यू ह.- जपानी के-गोन पंथाचा मुख्य ग्रंथ. याचें चौथ्या शतकाच्या सुमारास बुद्धावतंसकसूत्र नांवाचें चिनी भाषत भाषांतर झालें.
क रु णा पुं ड री क.- म्ह. जाईचें कमल. या महायान सूत्राचें सहाव्या शतकांत चिनी भाषेंत भाषांतर झालें.
लं का व ता र उ. स द्ध र्म लं का व ता र सू त्र.- बुद्ध शाक्यमुनीनें लंकापति रावण यास दिलेल्या चमत्कारिक भेटीचें वर्णन. यांत तत्त्वज्ञानविषयक मतें आलीं आहेत. याचें इ. स. ४४३ त चिनी भाषेंत भाषांतर झालें.
द श भू मी श्व र.- एक महायानसूत्र. याचें ४०० च्या सुमारास चिनी भाषेंत भाषांतर झालें.
स मा धि रा ज.- यांत समाधीसंबंधाच्या दुराग्रहयुक्त गोष्टी आहेत.
सु व र्ण प्र भा स.- अंशतः तत्त्वज्ञानविषयक, अंशतः दंतकथात्मक व अंशतः तंत्रबौद्धधर्मप्रांतांतला ग्रंथ. याचें ६ व्या शतकांत चिनींत भाषांतर झालेलें होतें.
रा ष्ट्र पा ल सू त्र.- याचें सहाव्या शतकाच्या अखेरच्या सुमारास चिनीत भाषांतर झाले. यांत बौद्ध संप्रदायाच्या -हासाबद्दलचें भविष्य दिलेलें आहे.
प्र ज्ञा पा र मि ता.- यांत बोधिसत्त्वाच्या बुद्धीच्या सर्वश्रेष्ठ परिपूर्णतेचें वर्णन आहे. यांत शब्दावडंबराचा कळस झाला आहे. हें सर्वांत धाकटें महायानसूत्र असून तें नागार्जुनानें केलेलें आहे असें हीनयान पंथाचे लोक म्हणतात. नागार्जुन २ -या शतकाच्या अखेरीस झाला असावा.
व ज्र च्छे दि का प्र ज्ञा पा र मि ता.- हा उपर्युक्त ग्रंथाचा थोड्या पानांत केलेला संक्षेप आहे.
अ कु तो भ या.- ही वरील ग्रंथावरील नागार्जुनाचीच टीका असून तिची तिबेटी भाषांतरावरून माहिती मिळते.
मा ध्य म क का रि का.- नागार्जुनाचा एक ग्रंथ.
ध र्म सं ग्र ह.- नागार्जुनाचा (?) ग्रंथ. यांत पारिभाषिक शब्दांची यादी आहे.
सु हृ ल्ले ख.- नागार्जुनानें एका राजास लिहिलेलें मित्राचें पत्र.
यो गा चा र भू मि शा स्त्र किं वा स त्प द श भू मि शा स्त्र.- चौथ्या शतकांत होऊन गेलेल्या पुरुषपुर येथील वसुबंधु असंगाच्या योगाचारपंथाचा तत्त्वज्ञानविषयक बिकट ग्रंथ.
म हा या न सू त्रा लं का र.- असंगाचा दुसरा एक ग्रंथ.
अ भि ध र्म को श.- वसुबंधू (असंगाच्या धाकट्या भावा) चा नीतिशास्त्र, मानसशास्त्र व अध्यात्मशास्त्र या विषयांची चर्चा करणारा सूत्रकारिकाबद्ध हीनयानपंथाचा ग्रंथ. याला महायानीयांनींहि प्रमाण मानिलें असून त्यावर पुष्कळ टीका झाल्या आहेत.
अ भि ध र्म को श व्या ख्या.- वरील ग्रंथावरील यशोधर्माची टीका. हिचें चिनी भाषेंतील प्राचीनतम भाषांतर ६ व्या शतकांतील आहे.
गा था सं ग्र ह.- वसुबंधूचा ग्रंथ. यांत हीनयान पंथांतील आधारवचनांचा संग्रह आहे.
प र मा र्थ स त्प ति.- परमार्थाविषयीं सत्तर श्लोक. सांख्य तत्त्वज्ञानावर टीकांचा भडिमार करणारा वसुबंधूचा ग्रंथ. यांशिवाय वसुबंधूनें सद्धर्मपुडरीक, प्रज्ञापारमिता व इतर महायान सूत्रें वगैरे ग्रंथांवर भाष्यग्रंथ लिहिले आहेत.
शि ष्य लि ख ध र्म का व्य.- स्वतःच्या शिष्यास लिहिलेल्या पत्राच्या रूपांत असलेलें बौद्ध पंथाचीं तत्त्वें ग्रथित केलेलें अजमासें पांचव्या शतकांतील चंद्रगोमीचें काव्य.
शि क्षा स मु च्च य.- तत्त्वांचा समुच्चय. महायान पंथाचा सातव्या शतकांत होऊन गेलेला सौराष्ट्रांतील रहिवाशी शांतिदेव याचा ग्रंथ. यांत महायान पंथांतील मूलाधार नीतितत्त्वें दिलीं आहेत.
बो धि च र्या व ता र.- बोधिजीवितामध्यें प्रवेश, म्हणजे दिव्यदृष्टीप्रत नेणारा जीवितक्रम. शांतिदेवाचा दुसरा एक श्रेष्ठ प्रतीचा ग्रंथ.
सू त्र स मु च्च य.- शांतिदेवाचा आणखी एक ग्रंथ.
अ ष्ट सा ह स्त्रि का / त था ग त गु ह्य क अ थ वा / त था ग त गु ण ज्ञा न
हे दोन व वर दिलेले सुवर्णप्रभास प्रज्ञापारमिता, सद्धर्मपुंडरीक, ललितविस्तर, दशभूमीश्वर, लंकावतार अथवा सद्धर्मलंकावतार, गुंडव्यूह आणि समाधिराज हे सात अशा नऊ ग्रंथास वैपुल्यसूत्रें असें म्हणतात. हे कोणत्याहि एका विशिष्ट पंथाचे नाहींत.
स्तोत्रें, धारणी आणि तंत्रें.
क ल्या ण पं च विं श ति का.- पंचवीस आशीर्वचनें. अमृतानंदकवीचें काव्यपद्धतीवर लिहिलेलें पंचवीस कवितांचे सूत्र.
लो के श्व र श त क.- वज्रदत्त कवीचें जगताच्या ईश्वरावर सूक्त.
सु प्र भा त स्त व.- ४९ सूक्तांचा एक संग्रह.
प र मा र्थ ना म सं गी ति.- हिंदुस्थानांत अगदीं प्राचीन काळापासून सतत चालू असलेलें देवतांचीं नांवें किंवा गौरवपूर्ण विशेषणें असलेलें सूक्त.
मृ ग श त क स्तु ति./ स प्त बु द्ध स्तो त्र. / स मं त भ द्र प्र णि धा न - दुसरीं कांहीं स्तोत्रें.
आ र्य ता रा स्त्र ग्ध रा स्तो त्र.- काश्मिरी कवी सर्वज्ञमित्र यानें अवलोकितेश्वराची अर्धांगी तारा इच्या स्तुतिपर लिहिलेलें गुणमय स्तोत्रकाव्य.
आ र्य ता रा ना मा ष्टो त्त र श त क स्तो त्र.- आर्यतारेच्या १०८ नांवांचें स्तोत्र.
ए क विं श ति स्तो त्र.- तारा देवतेच्या प्रार्थनापर पद्यांची विस्कळित माला.
मे घ सू त्र.- जादूच्या कामाकरितां केलेलें धारणीसूत्र. याचें इ. स. च्या चौथ्या पांचव्या शतकांत चिनी भाषेंत भाषांतर झालें.
पं च र क्षा.- पांच धारणींचा (धारणी=भूतें अथवा अदभुतशक्ति यांनां धरण्याचें साधन) संग्रह.
प्र ज्ञा पा र मि ता हृ द य सू त्र.- यांत सर्व दुःखहारक मंत्र असून त्यांचे मूळ संस्कृत ग्रंथ इ. स. च्या सातव्या शतकापासून जपानांतील एका मठांत जपून ठेविलेले आहेत.
उ ष्णी ष वि ज य धा र णी.- ही धारणी वरील मठांतच सुरक्षित असून तींत अर्थशून्य प्रार्थनांची मालिका आहे.
आ दि क र्म प्र दी प.- या क्रियातंत्रग्रंथांत ब्राह्मणांच्या विधिप्रयोगग्रंथांतल्याप्रमाणेंच धर्मकृत्य व विधी यांचें वर्णन आहे.
अ ष्ट मी व्र त वि धा न.- अष्टमीला करावयाच्या संस्काराबद्दल नियम. यांत गूढार्थक आकृती व हस्तविक्षेप उपयोगांत आणिले आहेत.
त था ग त गु ह्य क अ थ वा गु ह्य स मा ज.- हें योगतंत्र नेपाळी बौद्धांच्या नवधर्मांमध्यें मोडतें. यांत परमोच्च सिद्धीकरितां गज, अश्व व श्वान याचें मांसभक्षण व तरुण चांडाल कन्येबरोबर नित्य मैथुन करण्याचा उपदेश केला आहे.
म हा का ल तं त्र.- याला बुद्धप्रणित म्हटलें असून गुप्तधन, इच्छित वधू इत्यादि गोष्टींच्या प्राप्तीविषयीं त्यांत माहिती दिली आहे.
सं व रो द य तं त्र.- हें बुद्ध आणि बोधिसत्त्व वज्रपाणि यांमधील संवादाच्या स्वरूपांत आहे तरी ते शैवपंथीच अधिक दिसतें. यांत मक्का व मुसुलमानी संप्रदाय यांविषयीं उल्लेख आहे.
मं जु श्री मू ल तं त्र.- हा ग्रंथ नागार्जुन व महायानसूत्रें यानंतर ब-याच कालानें लिहिलेला असावा.
पं च क्र म.- या तंत्राचा पांच षष्ठांश भाग नागार्जुनानें लिहिला असें म्हणतात. यांत तांत्रिक संस्कारांपेक्षां योगाबद्दल जास्त माहिती आहे. हा नागार्जुन नवव्या शतकाच्या मध्यांतील-म्हणजे महायान पंथाच्या संस्थापकाहून भिन्न-दिसतो.
यांशिवाय मान्यतेच्या दृष्टीनें कमी महत्त्वाच्या अनेक ग्रंथांचाहि उल्लेख येथें करतां येईल, पण तसें करण्यास अवकाश नाहीं. जो संप्रदाय सुमारें पंचवीस शतके जगांत आलें अस्तित्व राखून आहे, आणि ज्या संप्रदायाचे अनुयायी जगांत सर्वांहून जास्त असण्याचा संभव आहे अशा संप्रदायाचें वाङ्मय जगड्व्याळच असणार. अनेक पोट संप्रदाय व त्यांचें वाङ्मय यांचा उल्लेख जरी करावयाचा झाला तरी वाङ्मयसूचिस्वरूपी अनेक ग्रंथ तदान करावे लागतील इतकें मोठें वाङ्मय या संप्रदायाचें आहे. तथापि सर्व राष्ट्रांवर परिणामकारी जें वाङ्मय झालें त्याची विस्तार कल्पना वर दिलेल्या यादीवरून येईल.